ना उम्र की सीमा हो ( भाग 11)

भाग 10 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
हे सगळं अवघ्या काही मिनिटात झाले आणि कोणाला काहीच कळले नाही जेंव्हा कळले तेंव्हा खूप उशीर झाला होता. संयम त्या विस्तीर्ण आणि शुभ्र बर्फात कुठे तरी गायब झाला होता.
केतन आणि मैथिली त्याला हाका मारत होते पण कोणताच प्रतिसाद येत नव्हता.
मदत पोहोचली होती. दोन हेलिकॅप्टर मदतीसाठी पोहोचले होते.

सगळ्यांना एका हेलिकॅप्टरमध्ये बसवण्यात आले पण मैथिली आणि केतन जायला तयार नव्हते.
एक रेस्क्यू टीम मधील अधिकारी त्यांना समजावत होता.
अधिकारी- “ मॅडम जे इथून ग्लेशियरबरोबर खाली गेले आहेत त्यांच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्ही चला आमच्याबरोबर! इथलं वातावरण आणखीन बिघडू शकते त्याआधी  आपल्याला जायला हवं.”
मैथिली- “वाचण्याची शक्यता कमी आहे म्हणजे? त्याला काही होणार नाही कळलं तुम्हाला? मी संयमला घेतल्या शिवाय इथून जाणार नाही.”

मैथिली म्हणाली आणि  गुडघा भर बर्फात ‛संयम..संयम’ अशा हाका मारत खाली जाऊ लागली.
तिच्या मागे केतन होता.
आतापर्यंत संयम बर्फात गायब होऊन अर्धा तास होऊन गेला होता.
सगळीकडे नुसता बर्फच दिसत होता कोठेच काही दिसत नव्हते. रेस्क्यू टीमने एका हेलिकॅप्टरमध्ये सगळ्यांना बसवून सुरक्षित स्थळी हलवले आणि त्यातील चार जण हेलिकॉप्टरबरोबर तिथेच थांबले सगळे मैथिली आणि केतनबरोबर संयमला शोधत होते.

हाडे गोठणाऱ्या थंडीत मैथिली गुडघाभर बर्फात संयमला शोधत होती पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता जसा वेळ पुढे जात होता तशी संयमच्या जिवंत असण्याची शक्यता धूसर होत होती.
मैथिली पुढे पुढे जात होती.
सगळ्यांचे डोळे संयमला शोधत होते आणि एका ठिकाणी मैथिलीला पांढऱ्या शुभ्र बर्फात काळे काही तरी दिसले.
ती धावत तिथे गेली तर संयमच्या गॉगल्सच्या फुटलेल्या काचा तिला दिसल्या आणि मैथिलीने सगळ्यांना हाक मारून तिथे बोलावून घेतले.

सगळ्यांनी मिळून तिथला बर्फ बाजूला केला तर दिड फूट  अंतरावर संयम त्यांना दिसला. पूर्ण बर्फाने गारठलेला. चेहरा आणि अंग पांढरे फटक पडले होते. पापण्यांवर देखील बर्फ साचला होता. तिथल्या एक अधिकाऱ्याने त्याला चेक केले.
अधिकारी- “ सॉरी ही इस नॉट ब्रिथींग!” तो म्हणाला.
मैथिली मात्र ते ऐकून रडायला लागली तिने संयमला दोन्ही हाताने मिठी मारली आणि बोलू लागली.

मैथिली- “ संयम तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस! तू मला असा सोडून जाऊ शकत नाहीस.” 
ती बोलत तिने संयमच्या पांढरट आणि शुष्क झालेल्या ओठावर तिने ओठ ठेवले. तिचे गरम श्वास त्याच्या थंड शरीरात पोहोचले आणि संयमला जोरात ठसका लागला आणि तो श्वास घेऊ लागला पण त्याचे डोळे अजून ही बंद होते.
केतन सगळं पाहत होता. संयमला श्वास घेताना पाहून त्याच्या ही जीवात जीव आला.
संयमला कुल्लूच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते.
मैथिली मात्र बाहेर संयमसाठी प्रार्थना करत होती.
केतन ही अस्वस्थपणे तिथे बसून होता.
डॉक्टर बाहेर आले.
केतन- “ डॉक्टर वो  कैसा है अब?” त्याने अधिरपणे विचारले.

डॉक्टर,“  उनकी  बॉडी बहुत देर तक बर्फ में दबी हुई थी। इस वजह से खून जम रहा है और ऑक्सीजन लेवल भी बहुत कम हो गया है। हमे तो आश्चर्य हो रहा है कि इतनी देर तक बर्फ में रहने पर भी हो जिंदा कैसे है?वो जिंदा तो है लेकिन कितनी देर तक हम भी नही कह सकते। उनकी हालत क्रिटिकल है। हम सुबह तक कुछ भी नही कह सकते।” असं म्हणून ते निघून गेले.
मैथिली मात्र हे ऐकून सुन्न होती.
केतनच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.

मेधा देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.
केतनने आय. सी.यु. मध्ये असलेल्या संयमला काचेतून पाहिले. घरी फोन करायचा म्हणून गेला.
मैथिली संयमला पाहत होती. तिच्या डोळ्यातून कढ वाहत होते. 
मेधा- “ मॅडम मला आज स्वतःचीच लाज वाटत आहे. ज्या माणसाबद्दल मी तुमच्या मनात गैरसमज निर्माण केला त्याच माणसाने आज माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव  धोक्यात घातला मी चुकले! खूप मोठी चूक झाली माझ्याकडून!” ती रडत बोलत होती.

मैथिली-,“ म्हणजे काय म्हणायचे काय आहे तुला?” तिने विचारले.
मेधा- “ मॅडम मी खोटं बोलले तुमच्याशी संयम आणि माझ्यात काहीच नाही आणि नव्हतं उलट मीच त्याच्या मागे लागले होते पण त्याने मला कधीच भाव दिला नाही.
त्याचे तुमच्यावर प्रेम आहे हे देखील त्याने नव्हते सांगितले मला तर मी त्या दिवशी पार्टीनंतरचे पार्क मधले तुमच्या दोघांतील बोलणे चोरून ऐकले होते.
मी तुम्हाला जे त्याच्याबद्दल तो तुमचा शिडी म्हणून वापर करणार आहे वगैरे सांगितले ना ते सगळे खोटे होते मॅडम!” ती रडत बोलत होती आणि मैथिलीने तिच्या गालावर एक सणसणीत लगावून दिली.

मैथिली- “ मूर्ख आहेस का गं तू? तू संयमबद्दल माझ्याशी इतकं मोठं खोटं बोललीस! याचा त्याच्या करिअरवर त्याच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असता याचा एकदा ही विचार नाही केलास.” ती बोलत होती आणि हे सगळं लांबून ऐकणारा केतन तिथे आला.
केतन- “ तिला काय दोष देता मॅडम ती आहेच स्वार्थी पण तुम्ही! तुम्ही आमच्या बॉस आहात ना? आमच्या पेक्षा अनुभवाने आणि वयाने, हुद्द्याने मोठ्या आहात! तुम्ही इतक्या हलक्या कानाच्या निघालात आश्चर्य वाटते मला!  माझा विश्वास नव्हता संयमवर तो मला म्हणाला होता की तुम्ही तुमचं त्याच्यावर प्रेम नाही असं खोटं बोलताय पण संयम खरं बोलत होता.

त्याने तुमच्या डोळ्यात त्याच्याबद्दल प्रेम पाहिले होते पण तुम्ही ते नाकारले त्याला झिडकारले पण तेच तुमचे प्रेम मी आज पाहिले मॅडम संयम आज जिवंत आहे तो तुमच्यामुळेच! इतक्या मोठ्या बर्फाच्या ढिगाऱ्यात तुम्ही त्याला शोधून काढले.
त्याचे तर श्वास ही बंद झाले होते. तुम्ही त्याला श्वास दिले आणि तो पुन्हा श्वास घेऊ लागला.
इतकं प्रेम आहे त्याच्यावर तर ते नाकारून त्याला आणि स्वतःला देखील तुम्ही कसली शिक्षा देताय. अजून वेळ गेलेली नाही मॅडम सावरा स्वतःला.” तो डोळे पुसत बोलत होता.

मैथिली-“ प्लिज केतन हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. संयम धोक्याच्या बाहेर नाही अजून देखील! तू त्याच्या घरी कळवले का?कधी येणार आहेत ते?
मला सी.ई.ओ.साहेबांचा फोन आला होता मी इथली सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यांना! ते स्वतः येत आहेत आणि आपल्या क्लायंट्सला आजच पाठवायचे आहे मुंबईला!” ती स्वतःला कशी बशी सावरत बोलत होती.

केतन-“ मेधा जा सगळ्यांना एअरपोर्टवर सोडून ये आणि हो तू ही जा त्यांच्याबरोबर! संयमचा भाऊ  संध्याकाळी येईल ” तो म्हणाला आणि मेधा हो म्हणून खाली मान घालून निघून गेली.
मैथिली संयमजवळ गेली संयमचा थंडीने पांढरा झालेला चेहरा अजून ही तसाच होता.
त्याला तीन चार ब्लॅंकेट्स पांघरून घातले होते. नाकाला ऑक्सिजन  लावले होते आणि लाईफ सपोर्टिंग सिस्टीम बीप बीप आवाज करत होते. एका हाताला ड्रीप होती.

मैथिलीने त्याचा हात हातात घेतला तर तो अजून ही बराच गार लागत होता.
मैथिली -“ सॉरी संयम! मी तुला ओळखण्यात चूक केली तुझ्यावर नको ते आरोप केले तुला दुखावले पण तू मला त्याची इतकी मोठी शिक्षा नाही देऊ शकत. तुझ्या या अवस्थेला मीच कुठे तरी जबाबदार आहे.” ती रडत बोलत होती.
एव्हाना रात्रीचे तीन वाजून गेले होते. मैथिली बराच वेळ संयमजवळ बसून होती पहाटे पहाटे ती उठून बाहेर आली होती. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती पण ते तिला जमत नव्हते.
संयम वाचू शकेल का?
पाहू पुढच्या भागात 
क्रमशः
भाग 12 इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!