ना उम्र की सीमा हो ( भाग 15 )

भाग 14 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
मैथिली हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या पत्त्यावर पोहोचली.
तिने बेल वाजवली.
तिचे हृदय जोर जोरात धडपड करत होते.
थोड्या वेळाने दार उघडले गेले. समोर संयम उभा होता.
तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.
ती संयमला दारातूनच न्याहळत होती.

टीशर्ट आणि बरमुडा वर तो तिच्यासमोर उभा होता.
प्रकृती बरीच खालावलेली, चेहरा उतरलेला! पायाला लागल्यामुळे तो कसा बसा उभा होता.
तिच्या मनात कालवाकालव झाली.
संयम- “  तुम्ही इथे? तुम्हाला पत्ता कसा मिळाला माझा?” त्याने तिला रोखून पाहत रागाने विचारले.

मैथिली-“ सगळ्या चौकशा दारातच करणार का?” तिने विचारले आणि तो दारातून बाजूला झाला.
लंगडत जाऊन सोफ्याजवळ उभा राहिला.
मैथिली आत आली ती घर न्याहाळत होती.
घर म्हणजे तरी काय एक मोठी हॉल वजा रूम होती.
आत गेले की समोर एका भिंतीला टी. व्ही आणि त्यासमोर सोफा आणि दोन खुर्च्या,  एका बाजूला किचन दिसत होते. आणि  त्याच्या विरुद्ध बाजूला बेड तिथेच एक वॉर्डरोब आणि थोड्या अंतरावर वॉशरूम!

ती घर न्याहळण्यात मग्न होती आणि तो तिला न्याहळण्यात दंग होता.
ढगळा पायघोळ घातलेला वनपीस, त्यावर तिने स्वेटर घातले होते.
काखेत पर्स!
थोडीशी गोलमटोल दिसत होती ती!
केसांची पोनी टेल आणि चेहऱ्यावर बराच थकवा दिसत होता.

संयम मनातच विचार करत होता.
‛ कालपासून पाहतोय मी, ही असा का अवतार करून फिरत आहे?
आधी तर किती छान टापटीप आणि प्रेझेंटेबल राहायची छान कपडे, मेकअप आणि मोकळे केस पण आता ना मेकअप आहे ना कपडे व्यवस्थित आहेत.
कसला ढगळा गाऊन घालून फिरत आहे! जरा गोलमटोल वाटतेय पण चेहरा सुकलेला आणि थकलेला!’ तो विचारात गाढलेला असताना मैथिलीने त्याला हाक मारली आणि तो भानावर आला.

मैथिली- “ संयम मला पाणी देशील जरा! माझ्याजवळ असते पाण्याची बॉटल पण त्यात पाणी भरायला विसरले मी!”ती सोफ्यावर बसत म्हणाली आणि संयमने होकारार्थी मान हलवून तिला पाणी आणून दिले.
तिने पाणी पिले आणि संयम खुर्चीत बसत तिला म्हणाला.
संयम-“ का आला आहात तुम्ही इथे?”

मैथिली- “ खरंच तुला माहीत नाही का संयम? अरे गेले सहा महिने झाले तुला शोधतोय आम्ही! इतका ही काय रे राग की तू सरळ गायब झालास? बरं राग तर माझ्यावर होता ना? मग बाकी तुझ्या घरच्यांना शिक्षा का?
इथे येऊन काय चालवले आहेस तू? स्वतःच्या जीवाशी का खेळत आहेस असा?
डॉक्टरांनी काल सगळं सांगितले आम्हाला! का तू स्वतःची अशी हेळसांड करून घेत आहेस?
स्वतःचा नाही तर तुझ्या आई-बाबांचा, भाऊचा तर विचार कर ना!” ती कळकळून बोलत होती.

संयम- “मुळात माणूस आपल्या माणसावर रागावत असतो आणि तुम्ही माझ्या कोणी नाही तर तुमच्यावर रागावण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम!
दुसरी गोष्ट माझ्या कुटुंबा विषयी काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मी माझ्या स्वतःची हेळसांड करेन नाही तर जीव देईन तुम्हाला अधिकार नाही मला काही विचारण्याचा!
तुमचे आणि माझे नाते प्रोफेशनल होते ते ही गेल्या सहा महिन्यांपासून संपले आहे. तुम्ही जाऊ शकता.” तो कडवटपणे म्हणाला.

मैथिली त्याच्या अशा बोलण्यामुळे दुखावली आणि रागावली देखील ती रागात त्याला बोलू लागली.
मैथिली- “ खरंच तुला असं वाटतं की मी तुझी कोणी नाही? तुझा माझा काही संबंध नाही असच आहे तर मग गेले सहा महिने झाले तू इथे काय करत आहेस सांगशील मला? हे सगळं बोलून तू मला फसवतो आहेस की स्वतःला रे?
मला माहित आहे माझं चुकलं आणि त्याची शिक्षा ही भोगली आणि पुढे ही  भोगायला तयार आहे  पण तू स्वतःला आणि तुझ्या कुटुंबाला कोणती शिक्षा देत आहेस?

संयम तू गायब झाल्यापासून मी एक दिवस देखील नीट झोपू शकले नाही रे! तुला नाही माहीत सहा महिन्यात मी तुला किती मिस केले. मी मूर्ख होते. मला वाटत होते की मी तुझ्याशिवाय जगू शकेन पण नाही मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय बीकॉज आय लव यु!” ती रडत बोलत होती.
संयम- “ मी माझे नशीब आजमायला इथे आलो होतो. कोणाला तरी वाटत होतं की ती माझ्या आयुष्यात आली तर मी मरेन! ती अपशकुनी आणि काय पांढऱ्या पायाची वगैरे आहे म्हणे. म्हणून म्हणले की पाहू आपण ही आपल्या आयुष्याची दोरी किती घट्ट आहे? ती इतकी कमकुवत तर नक्कीच नसेल की कोणाच्या तरी माझ्या आयुष्यात येण्याने माझे आयुष्य संपेल!

आणि तुम्हांला शिक्षा देणारा मी कोण मॅडम तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहात मी तर खूप सामान्य मुलगा आहे हो! आणि प्रेमा बीमच्या गोष्टी तुम्ही नका करू. तुमचा काय भरवसा? तुम्ही आत्ता माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला जवळ कराल आणि पुन्हा मला झिडकाराल.
राहिला प्रश्न माझ्या कुटुंबाचा तर इथे माझी गरज कोणाला ही नाही. माझ्या आई-बाबांना आणखीन एक मुलगा आहे आजपर्यंत त्यांची जबाबदारी त्यानेच घेतली आहे इथून पुढे ही तो ती घ्यायला समर्थ आहे.या जगात माझी अशी कोणाला गरज नाही. मी इथे खुश आहे. निघा तुम्ही!” तो रागाने तिला बोलत होता.

मैथिली- “ माझ्याकडून चूक झाली मी तुला झिडकारले. मी घाबरले होते संयम तुला त्या अवस्थेत पाहून मला वाटलं की माझ्याचमुळे  तुझ्यावर संकट आले कारण मी तुझ्याकडे आकर्षित झाले मनोमन तुझ्यावर प्रेम केले पण तो माझा मूर्खपणा होता.
मी अंधश्रध्देच्या गर्तेत अडकले.
पहिलेही मी खूप काही सोसले आहे. नितेश माझा नवरा लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यात गेला. त्यासाठी माझ्या सासरच्या लोकांनी मला जबाबदार धरले.मीच पांढऱ्या पायाची आहे असे बोल लावले त्या सगळ्याचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की मी घाबरू लागले संयम कोणावर प्रेम करायला.

तू माझ्या आयुष्यात आला आणि मी घाबरले! पण मी चुकीची होते नितेश माझ्यामुळे नाही तर त्याच्या व्यसणीपणामुळे गेला आणि तुझी गरज मला आहे आपल्या होणाऱ्या बाळाला आहे संयम तू असं वागून माझा आणि आपल्या बाळाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाहीस कळले तुला!..” ती रडत पुढे बोलणार तर संयमने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो बोलू लागला.
संयम -“ काय? आपले बाळ? म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस?” त्याने आश्चर्याने विचारले.

मैथिली- “ हो!” ती रडत इतकच म्हणाली.
संयम- “ अच्छा म्हणून तू इतक्या लांब मला शोधत आली आहेस का? तुला संयम नाही तर तुझ्या बाळाला बाप हवा आहे त्याचे नाव हवे आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाही तर तुझी नाइलाज आहे बरोबर का?” तो तिला पाहत कडवटपणे म्हणाला.
मैथिली- ,“ डू यु रेयली थिंक दॅट? अरे मूर्ख माणसा जर माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर मी कधीच या प्रेग्नन्सीमधून  मोकळी झाले असते की खूप सोप्पं होत ते माझ्यासाठी! सहा महिने झाले सगळ्यांपासून हे लपवत फिरले नसते.

माझ्या घरी सुध्दा मी सहा महिने झाले गेले नाही आणि कोणाला भेटायला ही येऊ दिलं नाही. सांग ना का? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हो माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी तुझ्यावर मी कधीच लादणार नाही. मला काही गरज नाही तुझ्या नावाची!मी समर्थ आहे माझ्या बाळाला स्वतःचे नाव लावून सांभाळायला.
मी इथे आले आहे कारण तू माझ्यामुळे स्वतःच्या कुटुंबापासून दूर गेलास. माझ्या चुकीची शिक्षा त्यांना का? तू पुण्याला चल. स्वतःच्या कुटुंबाबरोबर रहा. स्वतःची काळजी घे. उगीच स्वतःच्या जीवाशी खेळ नको करुस.

हे आयुष्य फक्त एकदाच मिळते. त्याच्याशी असं खेळून ते वाया घालवू नकोस. नशीब प्रत्येक वेळीच साथ देईलच असं नाही. मी नाही तुला त्रास देणार.तुला मी नको असेन तर निघून जाईन  मी दूर!” ती डोळे पुसत म्हणाली.
संयम- म्हणजे तू माझं बाळ घेऊन निघून जाणार आणि मग मी काय करायचं?
मला माझं बाळ हवं आहे!” तो तिला पाहत म्हणाला आणि मैथिली घाबरून उठून उभी राहिली .

मैथिली,“ म्हणजे? तुला बाळ हवं आहे? तू जर तुला मी माझं बाळ देईन असा विचार करत असशील तर डोन्ट डियर टू थिंक दॅट! हे बाळ माझे आहे आणि ते मी कोणालाच देणार नाही.
माझ्या आयुष्यात हाच तर एक आशेचा किरण आहे.” ती घाबरून पण रागाने बोलत होती.
संयमच्या मनात नेमके काय असेल?
पुढील भागात पाहू.
क्रमशः भाग १६ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!