©स्वामिनी चौगुले
मैथिली तिच्या पोटावर हात ठेवून बोलत मागे मागे सरकत होती आणि ती अचानक अडखळली.
ती पडणार तर संयमने तिला सावरले आणि तिला सोफ्यावर बसवले.
संयम- “ सांभाळून मैथिली! तू काय डोक्यावर पडली आहेस का? मी इतका नीच वाटलो का तुला की आपले बाळ तुझ्यापासून हिरावून घेईन. तू मनात आणले असते तर कधीच त्याला संपवू शकली असतीस. बाळावर कायम सगळ्यात आधी अधिकार त्याच्या आईचा असतो. मला तुम्ही दोघे ही हवे आहात पण एका अटीवर!” तो म्हणाला.
मैथिली- “ अट कसली अट?” तिने विचारले.
संयम-“तू स्वतःच्या मनातील अपशकुनी असल्याची भीती कायमची काढून टाकशील. मुळात असं काही नसतं मैथु!
तू कोणाच्या ही मृत्यूला जबाबदार कशी असू शकशील! पण तुला हे कळत नव्हतं आणि त्याच भितीपोटी तू आपलं प्रेम नाकारत होतीस.
उलट तुझ्याच मुळे मी जिवंत आहे. मला केतनने सगळं सांगितले औरंगाबादला गेल्यावर की मी बर्फात गाडला गेलो तेंव्हा तूच मला शोधून काढलेस त्यानंतर ही त्या रात्री मला हायपोथर्मीयाचा अटॅक आला तेंव्हा मागचा पुढचा विचार न करता पुन्हा माझा जीव वाचवलास.
मला तुझ्या डोळ्यात प्रेम दिसत होते पण तू ते मान्य करत नव्हतीस.
त्या रात्री तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस पण सकाळी मला झिडकारलेस!
तू अशी का मागतेस ते मला कळत नव्हते पण केतनला त्याचे कारण तू सांगितलंस आणि मी शॉक झालो.
तुझ्यासारखी शिकलेली मुलगी अशी अंधश्रद्धा मनात बाळगू शकते हेच मला पटत नव्हते.
मी जगावं किंवा तू माझ्याजवळ राहिली तर मी मरेन या भीतीने तू माझ्यापासून लांब गेलीस म्हणून मी ठरवले की रोज मृत्यूचा सामना करायचा आणि त्याला हरवून परत यायचे म्हणून मी इथे आलो.”तो बोलत होता आणि मैथिलीने त्याला रडत मिठी मारली.
मैथिली-“ सॉरी माझं चुकलं.”
संयम-“ बास आता रडू नकोस. आपलं बाळ पण रडकं होईल. तुला कधी कळलं की तू प्रेग्नेंट आहेस?” त्याने तिचे डोळे पुसत तिच्या पोटावरुन मायेने हात फिरवत विचारले.
मैथिली- “ तू निघून गेलास आणि माझी पाळी चुकली. सतत मळमळत होत होती. मला शंका आली म्हणून मी प्रेग्नन्सी किट आणून टेस्ट केले आणि ती पॉजिटीव्ह आली. मला इतका आनंद झाला की बास आपल्या प्रेमाचा जिवंत अंकुर माझ्या पोटात वाढत होता. मला तुला ही गोष्ट सांगायची होती पण तू नव्हतास माझ्याबरोबर!
माझी मैत्रीण डॉक्टर आहे तिच्याकडे गेले. तिने मला अबोर्शन कर म्हणून सल्ला दिला पण मी तो नाकारला आणि ट्रीटमेंट सुरू केली. पहिले तीन महिने त्रास झाला सतत उलट्या होत होत्या पण नंतर कमी झाला.
सगळ्यांपासून हे लपवण्यासाठी ढगळे गाऊन घालायला सुरुवात केली. कदाचित बाळाला आणि निसर्गाला ही माझी तगमग कळत असावी किंवा मग माझी अंगकाठी म्हण सहा महिने होऊन ही माझं पोट इतकं दिसत नाही पण बाळ हेल्दी आहे. थोड्याच दिवसांपूर्वी सोनोग्राफी केली!आता बाळ पोटात फिरायला लागले आहे.” ती कौतुकाने तिच्या पोटावरचा त्याचा हात धरून सांगत होती.
संयम- “ आय एम सो सॉरी मैथु! तुला जेंव्हा माझी सगळ्यात जास्त गरज होती तेंव्हा मी तुझ्याजवळ नव्हतो. तुला आरामाची गरज आहे आणि अशा अवस्थेत तुला माझ्यामागे इथपर्यंत पळत यावे लागले.” तो तिचा हात धरून बोलत होता.
मैथिली- “ बास झाले सॉरी सॉरी आता! आणि हो उद्या आपण जात आहोत इथून कळलं तुला!” ती त्याच्या कुशीत शिरून हक्काने बोलत होती.
संयम,“ पण उद्या लगेच नको ना आता इथून आपण गेलो की तू मला पुन्हा इथे कधीच येऊ देणार नाहीस. या शहराशी आपल्या खूप सुंदर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या प्रेमाचं प्रतीक आपलं बाळ पण इथेच तर रुजलं ना तुझ्या उदरात! म्हणून एक दिवस इथे घालवू ना आपण!” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेऊ बोलत होता.
मैथिली-“ बरं!मी भाऊंना फोन करून सांगते तसं!” ती म्हणाली.
संयम- “ आणखीन एक महत्त्वाचे काम आहे मीच भाऊला फोन करतो.(असं म्हणून त्याने फोन लावला.)
भाऊ तू आणि केत्या पुढे जा मी आणि मैथिली मागून येतो परवा आणि हो पुढच्या आठ दिवसात मला लग्न करायचे आहे मैथिलीशी तर तयारी कर त्याची! जास्त मोठ्या प्रमाणात नाही तर घरातच करू लग्न!” तो म्हणाला.
भाऊ-“ ठीक आहे पण संय्या तू भेट मला तुझा कान कसा पिळतो तू बघचं. नालायका खूप सतावलं आहेस तू आम्हाला!”
संयम- “ सॉरी ना भाऊ!” तो म्हणाला.
भाऊ- “ ठीक आहे मी तयारी करतो लग्नाची या तुम्ही मागून.” ते म्हणाले आणि फोन ठेवला.
संयमने आणखीन कोणाला तरी फोन केला.
संयम- “ हॅलो मी संयम बोलतोय तुझ्याकडे काम आहे माझे. मला सहा महिने आधीचे मॅरेज सर्टिफिकेट हवे आहे. तुमच्या देवळात लग्न केल्याचे. मी डिटेल्स पाठवून देतो.” तो म्हणाला आणि फोन ठेवला मैथिली त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
मैथिली- “ आपण आत्ता लग्न करणार आहोत तर सहा महिने आधीचे मॅरेज सर्टिफिकेट कशाला संयम?”
संयम- “ मैथु तू सहा महिन्यांची प्रेग्नेंट आहेस. सहा महिने आधी कोणत्या परिस्थितीत आपण एकत्र आलो हे फक्त आपल्याला माहीत आहे. उद्या तुझ्याकडे आणि आपल्या बाळाला कोणी बोट दाखवलेले मला सहन होणार नाही म्हणून सहा महिने आधीचे मॅरेज सर्टिफिकेट! माझा मित्र एका देवळाच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहे तिथे लग्न ही होतात रजिस्टर पध्द्तीने त्याच्याकडून मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेऊ म्हणजे कोणी ही काहीच विचारणार नाही आणि घरगुती पध्दतीने लग्न करून घेऊ.बरं ते सगळं जाऊ दे. बघ दहा वाजून गेले. भूक लागली असेल की तुला आणि बाळाला ही मी खिचडी केली आहे भाताची घेऊन येतो. ” तो तिला म्हणाला.
मैथिली- “ बाप रे खूप हुशार रे तू हा सगळा विचार तर मी केलाच नव्हता आणि बस तू! पायाला बघ किती लागले आहे तुझ्या! मी घेऊन येते जेवायला.” ती म्हणाली.
★★★
चार वर्षांनंतर……
बेल वाजली आणि मैथिलीने दार उघडले.
समोर संयम होता ऑफिसमधून आलेला.
तिने त्याच्या हातातून बॅग घेतली.
संयम येऊन सोफ्यावर बसला.
तीन वर्षांची मूनमून धावत येऊन त्याच्या मांडीवर बसली.
मैथिली पाणी घेऊन आली आणि ती संयमच्या खांद्यावर हात ठेवून काही तरी बोलणार तर मूनमून ओरडली.
मूनमून,“ डॅडा माजा हाय. हात लावायच नाय!” आणि संयम हसायला लागला.
मैथिली- “ तू हसू नकोस हा! हो बाई तुझाच आहे हा! दिवसभर मला मस्का मारून मम्मा मम्मा करून माझ्यामागे फिरायचे आणि डॅडा आला की त्याला चिटकायचे! ही चिमुरडी माझ्याच नवऱ्याला मला हात पण लावू देत नाही. घाला गोंधळ बाप लेक मिळून.” ती लटक्या रागाने म्हणाली आणि निघून गेली.
मूनमून संयम आणि मैथिलीची मुलगी!
तिचे हे नेहमीचेच होते.
ती संयमला कोणालाच त्याला हात लावू द्यायची नाही.
कोणी हात लावायला गेले की ओरडून आणि रडून घर डोक्यावर घ्यायची.
ती झोपल्यावर मग तिच्या जाचातून मैथिलीची सुटका व्हायची.
जेवणं झाली आणि मैथिली मागचं आवरूपर्यंत संयमने मूनमूलला झोपवले.
मैथिली रूममध्ये आली.
मैथिली- “झोपली का माझी सासू!” ती हसून म्हणाली.
संयम- “ हो झोपली.” तो तिलाजवळ ओढत म्हणाला.
मैथिली- “ तू तिला खूप लाडावून ठेवले आहे संयु! ती महाहट्टी झाली आहे तुझ्यासारखी!” ती त्याच्या मिठीत विसावत तक्रारीच्या सुरात बोलत होती.
संयम- “ लहान आहे अजून ती आणि हट्टी तर असणारच ना! बरं ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे.
मी काय म्हणतो मूनमून आता साडेतीन वर्षाची झाली आहे तर तू पुन्हा ऑफिस जॉईन कर.
मी आई-बाबांना बोलावून घेतो.” तो म्हणाला.
मैथिली- “ आत्ताच म्हणालास ना लहान आहे ती म्हणून! आणि आई-बाबांना असं ही बोलावले तरी चालेलच की पण मूनमूनची जबाबदारी घेण्यासाठी नाही. त्यांचा सगळं आयुष्य औरंगाबादमध्ये गेलं. ते येतील ही आपल्यासाठी पण त्यांना इथे करमत नाही.
आईच्या मैत्रिणी भजनी मंडळ वगैरे तिथे आहेत त्यांचा जीव तिथे रमतो तर बाबांची मित्रमंडळी तिथे त्यांनी का म्हणून आपल्यासाठी मन मारून जगायचं? आणि मला नाही पटत आपल्या मुलीला बाहेरच्या बाईकडे सोपवणे.
असं ही गरज काय मला नोकरीची माझा नवरा वंडर्स टुरिझममध्ये आता एम.डी आहे एडवेंचर टूरिझमचा तो भरपूर कमावतो.” ती त्याला पाहत कौतुकाने बोलत होती.
संयम,“ यार मैथु तुला नाही कळत. गरज म्हणून नाही म्हणत मी! मी तुमच्या दोघींची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतो पण तू आपले लग्न झाले की राजीनामा दिलास चांगल्या पोस्टवर होतीस तू! आज आणखीन वरच्या पोस्टवर असतीस. स्वतःच ग्रोईंग करिअर सोडून दिलंस मला गिल्टी वाटतं गं!” तो तिला म्हणाला.
मैथिली- “ तुला गिल्ट घ्यायची काय गरज आहे? प्रेग्नन्सीमुळे मी नोकरी सोडली आणि मूनमून जोपर्यंत चांगली मोठी होत नाही तोपर्यंत मी नोकरी करणार नाही. मला करिअर पेक्षा तू आणि मूनमून महत्त्वाचे आहात.
पुढे जाऊन माझा विचार स्वतःचीच एडव्हेचर टुरिझम कंपनी सुरू करण्याचा आहे.
आता उगीच माझा मूड नको स्पोईल करू. एक तर दहा तास घराच्या बाहेर असतोस तू आणि घरी आला की ही कार्टी मला तुझ्याजवळ पण येऊ देत नाही. ही झोपली की मग सुटका आणि त्यात ही तू हे सगळं बोलणार असशील तर मी झोपते.” ती तोंड फुगवून म्हणाली.
संयम- “ हुंम तर मॅडम फुल प्लानिंग करून बसल्या आहेत पुढे काय करायचं याचे. बरं नाही काढणार आता हा विषय आणि लगेच झोपतेस काय? आणि माझ्या पोरीला कार्टी नाही म्हणायचं!” तो तिलाजवळ ओढत म्हणाला.
कधी कधी आपल्याला आलेले पूर्व आयुष्यातील कटू अनुभव आपली विचारसरणी बनवतात आणि आपलेच विचार आपले शत्रू बनतात. आपण आपल्या मनात असलेल्या कटू विचारांपोटी आणि भीतीपोटी आपलेच सुख नाकारतो. तसेच काहीसे मैथिलीच्या बाबतीत घडले. तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूला तिच्या सासूने आणि बाकी लोकांनी तिला जबाबदार धरले.
ती अपशकुनी आहे असा ठपका तिच्यावर ठेवला आणि मैथिलीच्या मानत ही आपण अपशकुनी आहोत हा विचार घट्ट मूळ धरून रुजला. त्याचा परिणाम मात्र संयमला भोगावा लागला.
मैथिलीने याच अंधश्रद्धे पोटी त्याला दूर लोटले पण संयमशिवाय ती जगू शकत नाही आणि आपण अंधश्रद्धेला कवटाळून संयमला स्वतःपासून दूर करून चूक केली हे तिच्या लक्षात आले आणि तिने संयमवरच्या तिच्या प्रेमाचा स्वीकार शेवटी केला. संयम सारखा उत्कट प्रेम करणारा जोडीदार तिला मिळाला आणि सुखी झाली.
आपल्या समाजात आज ही अनेक वेळा काही दुर्दैवी दुर्घटना घडली की नवीन लग्न होऊन आलेल्या मुलीला त्यासाठी जबाबदार धरले जाते तिला पांढऱ्या पायाची आणि अपशकुनी म्हणून दूषणे दिली जातात पण अर्थाअर्थी त्या मुलीशी त्याचा काहीच संबंध नसतो. अपशकुनी वगैरे हे सगळी अंधश्रद्धा आहे.
समाप्त
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.
Mast hoti katha. Khup ch chan
Thank you so much