माया

© धनश्री दाबके
डोळ्यात पाणी आणणारी तिखट्ट भाजी , बेचव आमटी आणि एक जाडजूड पोळी कशीबशी घशाखाली ढकलून मेधा आपल्या रुमवर आली. आजही तिची रोजच्या सारखीच अवस्था झालेली. पोट अर्धवट भरलेले पण मन मात्र आईच्या आठवणीने तुडुंब भरलेले. म्हणजे आजही झोप लागणार नाही तर लवकर. मग सकाळी उठायला उशीर. आंघोळीसाठी गरम पाणी संपलेलं. तोच मेसमधला बेचव नाश्ता. धावत पळत गाठलेले लेक्चर. सिनिअर्सनी केलेला छळ. 
हा नकोसा वाटणारा रोजचा सिलसिला मेधाच्या डोळ्यासमोर तरळला आणि ती बेचैन झाली.

चार महिन्यांपूर्वीच मेधा इथे म्हणजे C.P. College of Engineering च्या हॉस्टेलवर राहायला आली होती. CET ला उत्तम मार्क्स मिळवून मेधा खुप सारी स्वप्न घेऊन अतिशय आनंदाने कॉलेजमध्ये आली. 
येतांना आई बाबा तिच्या सोबत होते.
ॲडमिशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करुन आणि हॉस्टेलची सगळी सोय लावून ते दोघं गावी परत गेले.
 हॉस्टेलमधे राहायचे तर थोड्याफार प्रमाणात रॅगिंग होणार याची कल्पाना मेधाला होतीच.

पण आता फर्स्ट सेमिस्टर संपत आले तरी सिनिअर्सचा त्रास काही संपतच नव्हता.
फ्रेशर्सना सतत त्रास देणे, चिडवणे, त्यांनी घरुन आणलेले खाऊचे डबे पळवणे. 
त्यात हॉस्टेलच्या रेक्टर इतक्या स्ट्रीक्ट आणि खडूस की कोणाची तक्रार करायचीही सोय नाही.
नुसताच तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
ह्या आधी कधीच घरापासून लांब न राहिलेल्या मेधाला पहिल्या काही दिवसांतच हॉस्टेल लाईफला राम राम ठोकावा असं वाटायला लागलं होतं.

अशीच खूप कंटाळून दोन आठवड्यांपूर्वी मेधा कोणाला काही न सांगता घरी निघून गेली. 
तिला असं अचानक आलेलं पाहून नक्की काय झालं असेल या विचाराने आईबाबा एकदम घाबरुन गेले.
पण फक्त आठवण आली आणि हॉस्टेलवर राहायला जमत नाही म्हणून मेधा घरी पळून आलीये हे समजल्यावर बाबांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं.
असं कॉलेज सोडून आलीचस कशी म्हणत त्यांनी तिला परत आणून सोडलं. आल्यावर रेक्टर मॅडमनी ठेवणीतला खास दम दिला तो वेगळाच.

चार वर्ष तर नाहीच पण आता चार दिवसही इथे राहू नये असं मेधाला रोज वाटायचं पण लगेच बाबांचा रागावलेला दिसायचा आणि बिचारी तशीच सुट्टीला किती दिवस राहिले आहेत ते मोजत मोजत आला दिवस ढकलायची. 
मेसमधले जेवण पाहिले की आई कसे छान छान पदार्थ करुन खा खा म्हणून मागे लागायची आणि आपण कसे नखरे करायचो तेही आठवायचं. 
घरी जेव्हा सगळं हातात मिळत होतं तेव्हा त्याची काही किंमत नव्हती आणि आता?? पण करणार काय. आईही बिचारी झुरते मनात.

त्यादिवशी बाबा इतके रागावले तरीही आईने निघतांना घाईघाईत लाडू करुन दिलेले. तिला माहितीये ना मला जेवणानंतर रोज गोड काही लागतं ते. पण त्या टवाळ सिनिअर मुलींनी तेही दमदाटी करुन काढून घेतले. नाहीतर आत्ता उपाशी पोटाला जरा तरी आधार मिळाला असता. पण तेही सुख नशिबात नाही. आता झोपा तसंच. असं म्हणून समोरच्या टेबलावरच्या तिच्या लहानपणापासूनच्या लाडक्या गणपती बाप्पाला नमस्कार करुन मेधा झोपली. बऱ्याच वेळानंतर तिला झोप लागली.
सकाळी तिला जाग आली तेच रोहिणीच्या म्हणजे तिच्या रूम पार्टनरच्या आवाजाने. 

ती कोणाशीतरी फोनवर बोलत होती. “अरे यार ही मेधा परत गायब आहे यार…. हो… काल होती ना रात्री.. पण आत्ता उठल्यावर बघतेय तर नव्हती बेडवर. मला वाटलं गेली असेल तयार व्हायला पण खूप वेळ झाला म्हणून मग जाऊन सगळीकडे शोधून आले.टॉयलेट, बाथरुम, मेस..नाही तिची बॅग आहे इथेच… नाही ग फोनही इथेच आहे टेबलवर..मागच्या वेळी माहितीये ना तिच्यामुळे मला पण सॉलिड दम दिलेला मॅडमनी.. तिच्यावर लक्ष ठेव असं बजावलंही होतं त्यांनी. आता काय सांगू त्यांना??.. ही अशी कशी अचानक invisible झाली ग…”

मेधा मजेत सगळं ऐकत होती.. अरे… मी इथेच तर आहे.. ही अशी काय? अगं ए बये. इथे समोर बघ की.. का उगीच सकाळी सकाळी मस्करी… आज एक एप्रिल पण नाही ग…पण रोहीणी मेधा उठून बसली तरी तिच्याकडे बघेना..
अरे… हिला खरच मी दिसत नाहीये का? माझा खरंच मिस्टर इंडीया झाला की काय?
मेधाने रोहिणीला हाक मारली जी तिला ऐकूच गेली नाही…

अरे हे काय झालं.. मी खरंच गायब आहे का? बघू म्हणून आरशा समोर गेली तर.. ओह.. मी तर मलाही दिसत नाहीये.. चमत्कार..हे असं कसं शक्य आहे… पण झालंय खरं… घाईघाईने मेधा फ्रेश व्हायला गेली… बघते तर कोणीच तिची दखल घेत नव्हतं कारण ती कोणाला दिसतच नव्हती… चला आज नो लाईन… पटकन मेधा तयार झाली..
रुमवर आली तर तिथे तिचा गृप जमा झालेला.
आता काय करायचं?? लगेच मॅडमला सांगायचं की तिच्या घरी फोन करायचा ह्यावर चर्चा सुरु होती. 

कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे असं होणं शक्य नाही. आपण अदृश्य झालोय ह्यावर मेधाचा विश्वास बसत नव्हता. पण एकीकडे मजाही येत होती.सगळ्यात आधी ती त्या धटींगण सोनालीच्या खोलीत गेली आणि आईने दिलेला लाडूचा डबा उचलला.
त्यात नावाला दोन लाडू शिल्लक होते.
ह्या खादाड मुलीने इतके लाडू उठवले?? पण जाऊ दे दोन तर दोन ते तर मिळाले म्हणून मेधाने लगेच ते दोन्हीही लाडू फस्त केले. व्वा ! काय चविष्ट होते लाडू. परत मेधाला आई आठवली.

चला नाहीतरी आज लेक्चर ॲटेंड केली तरी मी कोणाला दिसणार नाही आणि माझी ॲब्सेंटीच लागणार. त्यापेक्षा सरळ जाऊन गावची बस धरावी. दुपारी जेवायला घरी.. आज गुरुवार म्हणजे आईने खिचडी केली असेल मस्त. जाऊन ताव मारावा.
मेधा तडक बस स्टॅंडवर आली. बरीच लाईन होती बससाठी पण आज मेधाला रॉयल ट्रीटमेंट होती. 
येणाऱ्या पहिल्याच बसमध्ये शिरुन तिकीटही न काढता ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून मेधा थेट तिच्या गावी पोचली सुद्धा. आजचा प्रवास आयुष्यातला फास्टेस्ट प्रवास वाटला तिला. 

अरे हे आज काय होतय? हे खरंच होतय का? पण जाऊ दे.. मी घरी पोचले म्हणजे खरंच असणार.. हळूच मेधा घरात शिरली… जेवायचीच वेळ होती.
नेहमीप्रमाणे बाबा त्यांच्या ठरलेल्या जागी जेवायला बसले होते.. आई वाढत होती..
“अगं तुला सांगितलय ना ही भाजी करत नको जाऊ म्हणून. अशी मसालेदार भरली वांगी पाहिली की मला मेधाची फार आठवण येते ग. ते लेकरु बिचारं मेसमधल्या बेचव भाज्या खातय आणि आपण इथे तिची आवडती भाजी खायची. ह्या विचाराने घास उतरत नाही घशाखाली.” असं म्हणून बाबांनी भाजीची वाटी ताटातून बाहेर काढली.

“अहो.. असं करुन कसं चालेल? तिच्या भल्यासाठीच गेलीये ना ती. होईल सवय तिला आणि तुम्हालाही. ही तर सुरुवात आहे. अजून चार वर्ष हे असंच असणारे. किती दिवस तुम्ही तिच्या आवडीच्या भाज्या वर्ज्य करणार? म्हणून तुम्ही नको म्हणालात तरी आणली मी वांगी”
“मला सांगतेयस खरी, पण तू तरी कुठे आज खिचडी केलीस? नाही न उतरत घास घशाखाली? तुला तरी कुठे सवय झालीये?”

“हो.. सवय तर मलाही नाही झाली. पण आम्ही बायका कशा लगेच मनातली तळमळ डोळ्यांवाटे व्यक्त करुन मोकळ्या होतो आणि आपसूकच सवयही करुन घेतो. पण तुम्ही पुरुष कणखरतेच्या पडद्याआड माया लपवता. कितीही वाटलं तरी कठोरपणे निर्णय घेता.”
“मला माहीत आहे. गेल्यावेळी न सांगता आली म्हणून खूप रागावलो मी तिला. पण ते आवश्यकच होतं ग. तिच्या प्रगतीसाठी, स्वप्नांसाठी. ती दुखावली आहे आत्ता खूप. पण नंतर तिला समजेल मी असा का वागलो ते.” असं म्हणून बाबा जेवायला लागले.
बाबांचे बोलणे ऐकून मेधाला एकदम भरुन आले.

“मी खूप शिकणार बाबा… माझी आणि तुमचीही स्वप्न पूर्ण करणार मी बाबा.. नाही येणार मी परत पळून… मी जाते परत बाबा..मी जाते परत.”. असं मेधा जोरजोरात ओरडायला लागली.. पण छे ..आई बाबा दोघांनाही काहीही ऐकू आलेच नाही..
आई ए आई बघ ना इकडे मी आलीये… मेधाचे ओरडणे ऐकून रोहिणी दचकुन जागी झाली आणि तिने मेधाला उठवले… 
अगं काय? कुठे जातेस आता परत.. जागी हो.. कसलं एवढं स्वप्न पडल तुला?

रोहिणीच्या हाकांनी मेधा उठली आणि तिला समजलं अरे हे तर स्वप्न होतं की. तरीच मला वाटत होतं सारखं हे असं काय घडतय? मी कोणाला दिसत का नाहीये. पण खरंच मला स्वप्नात दिसले तसंच होत असणार. 
बाबा मनातून माझ्यासाठी असेच हळवे होत असणार. पण माझ्या भल्यासाठी कडक वागत असणार.
मी नाही आता त्यांना अजून त्रास देणार..

खूप अभ्यास करुन मी खूप मोठी होणार आणि त्यांची कणखरतेच्या आड लपलेली माया आणि विश्वास सार्थ ठरवणार.. ह्या विचाराने मेधा परत शांतपणे झोपली.
वडलांची माया, जी इतकी वर्ष त्यांच्या समोर असून तिला कळली नाही ती तिला अदृश्य झाल्यावर मात्र पूर्णपणे कळली आणि वळली सुद्धा.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!