हुंदका

© उज्वला सबनवीस
डोक्याला कचकच व्हायला लागलं , तसा तिनं आलवणाचा पदर बाजुला केला ,थोडसं तेल लावलं. तेव्हा तिला जरा बरं वाटलं . अन मग ती खिडकीतून बाहेर बघायला लागली. 
बाहेर लगोरीचा खेळ रंगात आला होता .सात वर्षांची छोटी सुमन लगोरी वर चेंडु मारत होती. हिलाही त्यांच्यात खेळायला जावं वाटलं पण , सासुबाई ओरडल्या असत्या.तिचा नवरा नुक्ताच गेला होता .ती एक बालविधवा होती. तिला हे असं खेळणं वगैरे याची मुभा नव्हती. तिचं बालमन करपुन गेलं होतं.

डोक्यावरचा पदर पुन्हा घट्ट घेत ती बागेत गेली.मोगरा चारी अंगाने फुलला होता.ती फुलं तोडत असतांना चेंडु तिच्या जवळ आला , ती हरखली. चेंडु हातात पकडला .तसा दिर आला ,अन खसकन चेंडु घेउन निघुन गेला. सासुबाईंची करडी हाक ऐकू आलीच . ” शके , तोडले का फुलं. मामंजी खोळंबले आहेत तुझे.” तिने आपल्या इवल्या मुठीने डोळे पुसले . आणि फुलं तोडायला सुरवात केली. टोपलीभर फूले गोळा केली अन देवघरात आली .

मामंजींना रोज सगळ्या देवाच्या तसबीरांना हार लागत असत , अन तेही हिनेच बनवलेले.
शकू हार फार सुबक करायची ते बघुन मामंजी खुश व्हायचे . पण सासुबाईंच्या घा-या नजरेत क्वचितच कौतुक डोकवायचे.
रोज सकाळचा तिचा हा दिनक्रमच होता झाडांना प्रेमाने पाणी घालणे,प्रत्येक झाडा वरुन प्रेमाने हात फिरवणे फूलं गोळा करणे. दुसरा विरंगुळाच काय होता तिला. 

अवघ्या सातव्या वर्षी विवाह करुन दिला आई वडिलांनी. माहेरची गरीबी , ही पाचवी मुलगी , वडलांनी लवकरच उजवली. घरी खायला तोंड खुप म्हणून सासरी पाठवूनही दिली. सासरी आली, अन सासूबाईंना आयती मोलकरीणच मिळाली. 

नवरा म्हणजे काय हे ही कळायचं तिचं वय नव्हतं. तोच साप चावून तिचा अकरा वर्षाचा नवरा गेला. अन तिच्या नशीबी आलवण आलं. सासूने सगळं खापर हिच्याच माथ्यावर फोडलं. वडिल भेटायला आले , कोरडी विचारपुस केली. सासरे म्हणाले न्यायचं असेल तर घेउन जा मुलीला. तिकडे अठरा विश्व दारिद्र्य . वडिलांनी हिला न्यायला साफ नकार दिला. दिली तेंव्हाच आमच्यासाठी मेली. असं म्हणत ते गावी निघूनही गेले . आणि छोटी शकु तिथेच राहिली कष्ट उपसत.

तिने मौजमजा करायचीच नाही कायम उदासच राह्यचं हेच अपेक्षित होतं .
सकाळ झाली की तिचे कामं सुरु होत , ते रात्री झोपे पर्यंत. मामंजींना यायची तिची दया , पण कठोर बायको पुढे त्यांचे काही चालत नसे. शकू दुपारच्या वेळेस जरा मोकळीक मिळाली की मोग-याच्या झाडा जवळ बसायची . आपल्या मनातलं दु:ख मोकळं करायची. मुक्या झाडाचाही तिला आधार वाटायचा. 

सासूबाई फार कडक स्वभावाच्या होत्या. त्या प्रेमाने तर सोडा , साधं सुद्धा बोलत नसत हिच्याशी. फक्त रागावणे आणि कामं सांगणे. एवढाच काय तिचा आणि त्यांचा संवाद. 
छोटी नणंद सुमन , तिच्यासाठी आता लग्नाचं बघत होते , त्यामुळे हिची सावलीही तिच्यावर सासूबाई पडु देत नव्हत्या. दीराशी बोलायला मज्जावच होता. शकुशी बोलायला कोणीही नव्हतं. घशात आवंढा दाटून आला की ती या झाडा जवळ येउन आपलं मन रितं करायची.

बघता बघता सुमनचं लग्न ठरुन ती सासरी गेली सुद्धा. आता तर घर आणखीच उदास झालं. काळ असाच उदासिनतेतच सरकत होता . शकू आता पंधरा वर्षांची झाली .तारुण्य सुलभ भावना तिलाही होत्या .दिसायला अतिशय देखणी होती शकू .पण सगळं सौंदर्य वाया चाललं होतं. सासूबाई म्हणायच्याच जळता निखारा आहे म्हणून ही. अन मग त्या हिच्या वरचे बंधनं अजूनच घट्ट करायच्या. त्यामुळे शकूला निराशा घेरुन टाकायची. 

आपल्याला जोडीदार का नाही या कल्पनेने ती खिन्न व्हायची . पण इलाज काहीच नव्हता . तिच्या दिनक्रमात काहीच फरक नव्हता. तेच रोज फूलं तोडणे, अन सासूबाईंची बोलणी खाणे एवढ्या पुरतच तिचं आयुष्य मर्यादित होतं.
“थोडे मोग-याचे फूलं मिळतील का देवासाठी”.ती रोजच्या प्रमाणे झाडावरुन हात फिरवत असतांना आवाज आला. तिने दचकुन वर बघितलं.

शेजारच्या बि-हाडातुन एक उंचापुरा तरुण माणुस विचारत होता.
“मी मास्तर म्हणुन रुजु झालोय ,गावातल्या शाळेत .हे घर घेतलय भाड्याने”.
तिने आपला डोक्यावरचा पदर अजुनच घट्ट केला अन ओंजळभर फुलं त्यांना दिली अन भरकन आत आली.
तिच्या ओंजळीला दिवसभर मोग-याचा दरवळ येतच राह्यला.

आता हा दिनक्रमच झाला रोज सकाळी मास्तरांना ओंजळभर फुलं ती देत राह्यची.अन दिवसभर मग आपल्या ओंजळीचा वास घेत राह्यची. तिच्या रुक्ष जीवनात एक थंडगार सुगंधी वा-याची झूळुक आली होती. 
त्या झुळके बरोबर शकू डोलत होती , उडत होती. सकाळी सकाळी मास्तरांना बघितलं , त्यांना फुलं दिली की शकूचा दिवस पुर्ण सुगंधी जायचा. ती हळुहळु मास्तरांमधे गुंतत होती. मास्तरही तिच्याशी आपुलकीने दोन वाक्य बोलायचे. त्या दिवशी तिला विहरीवर पाणी भरतांना उशीर झाला. मास्तर शाळेत निघून गेले.

तिला दिवसभर चुकल्या चुकल्या सारखे झाले. संध्याकाळी ती तुळशी जवळ दिवा लावत असतान मास्तर तारे जवळ आले , अन भरदार आवाजात म्हणाले , “सकाळी ,तुम्ही दिसल्या नाहीत .आज माझे देव आणि माझी ओंजळ , बिन फूलाचे राह्यले.दिवस चुकचुकतच गेला माझा.”
शकू भारावुन ते जादुई शब्द कानात साठवत राह्यली. आपल्या वाचूनही कोणाचं अडतं .ही कल्पना तिला सुखावह वाटत होती. तिची जीभ टाळ्याला चिकटली .तिने काहीच उत्तर दिले नाही. फक्त डोळे वर उचलुन त्यांच्या कडे बघितले. चार डोळे एकत्र झाले.तिला मास्तरांच्या डोळ्यात अपार प्रेम दिसले.

तिचे मन थुईथुई नाचत होते. आता उद्या विहिरीवर पाणी भरायला उशीरा जायचे. असे मनाशी घोकतच ती आत आली . रात्रभर तिला सुगंधी स्वप्न पडत राह्यली. लालचुटुक मेंदीने तिचे हात रंगले आहेत. हातात हिरव्या गच्च बांगड्या घातल्या आहेत. अन ते सुंदर मेंदी आणि बांगड्यांचे हात उंचपु-या मास्तरांच्या हातात आहेत.
ती सुखावली. तृप्तीची दाट साय तिच्या मनभर पसरली.
आपल्याला जाग येउ नये , हे स्वप्न असच राहो ही प्रार्थना ती करत राह्यली.

“आताशा मोग-याला कमी फुले येतात का गो सुनबाई”मामंजींनी पुजा करता करता विचारले. तशी ती दचकली.
खाल मानेने गंध उगाळत राह्यली.घारी नजर मात्र आपल्याला आरपार बघतेय असं तिला वाटत राह्यलं.
“पाय फुटलेत की काय म्हणते मी मोग-याला “.सासुबाई खोचकपणे म्हणाल्या.डोक्यावरचा पदर घट्ट करत खालमानेने ती तिथुन उठली.
ओंजळीचा मोग-याचा वास हळुवारपणे घेत राह्यली. आज तिला त्या वासाचा आधार वाटत होता ,सासुबाईंचं खोचक बोलणं सहन करायची तो दरवळ तिला ताकद देत होता.

सासूबाईंच्या हाताखाली सैपाकात ती तरबेज होत होती. नवीन पदार्थ केला तर मास्तरांना नेउन द्यावा ही उर्मी तिला व्हायची. पण सासुबाईंची करडी नजर तिला हे धाडस करु देत नव्हती. तशीही शकू भित्रट होती.
सासूबाई देवळात गेल्या बरोबर तिने संधी साधून पदरा आड दडवून लाडू घेउन ती तारे जवळ गेली अन मास्तरांची चाहुल घेत राह्यली . आपल्यात हा धीट पणा कुठून आला हेच तिला समजेना. मास्तरां शिवाय आता तिला काही सूचत नव्हते. देतील का मास्तर आपल्याला आधार , करतील ते नक्की लग्न आपल्याशी. असं ती मनाशीच बोलत राह्यली . 

तिच्या कानात सनईचे सुर घुमायला लागले. मास्तरांची चाहूल लागलीच नाही. सासूबाईही देवळातुन आल्या . ती पदरा आडचे लाडु घेउन भारावल्या सारखी आत आली . उद्या कसही करुन मास्तरांना लाडु द्यायचेच असं म्हणत ती अंथरुणा वर लवंडली. अन आपलं सुगंधी हिरवं स्वप्न बघायला लागली. मास्तरां बरोबर संसाराचे रंजक चित्र रंगवण्यात ती गुंगुन गेली. दुर्दैवी लाल आलवण तिने मनातून हद्दपार केले .अन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागली. मास्तर नक्की क्रांतीकारी पाउल उचलतील याची तिला खात्री होती.

तिने रोजची फुले तोडली .अन शेजारच्या बि-हाडाकडे बघितलं .तिथे सामसुम होती.मास्तर आज लवकर गेले असतील शाळेत. असं आपल्या मनाचं समाधान करत ती घरात आली. पण आज ओंजळीला मोग-याचा सुवास नव्हता ,तिला उगाचच अस्वस्थ वाटत राह्यलं. संध्याकाळी पण मास्तरांच्या सायकलच्या घंटीचा आवाज आला नाही. कुठे गेले असतील मास्तर, बरं बिरं नाही की काय त्यांना.ती उगाचच आत बाहेर करत राह्यली.

“चहा झाला का गो सुनबाई,अगं लक्ष कुठेय तुझं?”. सासुबाई खेकसल्या.तिने डोक्यावरचा पदर घट्ट केला अन सासुबाईंना चहा दिला.सासुबाई भेदक पणे तिच्या कडे बघत राह्यल्या ती खालमानेनं तिथुन निघुन गेली.
शकुने मोग-याच्या फूलांनी ओंजळ भरली , अन तारे जवळ गेली पण मास्तर दिसत नव्हते , दार बंदच होते. तिने आपल्या ओच्यातली फूले मामजींच्या नजरेतून वाचवत आत आणली आणि कपाटात आलवणाच्या खाली ठेवली. अन एक दबलेला हुंदका तिच्या ओठातुन बाहेर पडला. सुगंधी झुळुक थांबल्या सारखी वाटली.

येतील मास्तर लवकरच . सासूबाई तिच्या कडे करड्या नजरेने बघत असायच्या . तिला मोकळे पणाने रडताही येत नव्हते.
सकाळी सकाळी दारा समोर टांगा थांबला. मामंजी अन सासुबाई बाहेर गेले बघायला कोण आलंय ते,हिने पण उत्सुकतेने बाहेर डोकावले टांग्यातुन मास्तर उतरत होते. ती बघतच होती, मास्तर दिसल्या बरोबर तिच्या डोळ्यात चमक दाटून आली. अन कपाटात ठेवलेली फूले आणण्यासाठी ती लगबगीने वळणार तोच , टांग्यातुन दोन नाजुक पावलं पण उतरतांना तिला दिसली. 

हिरवी गार साडी नेसलेली, दागिने घातलेली , लालचुटुक मेंदी लावलेली एक षोडषा उतरली. ही , ही तर मी असायला पाहिजे होती . शकुचे डोळे डबडबून गेले. असं दिसण्याचच तर तिचं स्वप्न होतं.
“हे आमचं कुटुंबं,गावाकडे गेलो होतो ,घरचे मागे लागले .उडवुन टाकला मग बार.”मास्तर मामंजींना सांगत होते. मामंजी कौतुकाने हसले.

हिला मात्र आपल्या कानात कोणीतरी गरम शिसं ओततोय असा भास झाला. ती हेलपाटल्या सारखी निघाली अन आत येणा-या सासुबाईंच्या अंगावर आदळली.
तिच्या नकळत तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या .डोळ्यासमोर अंधारी आल्या सारखे झाले.डोक्यावरचा पदर थोडा घसरल्या सारखा झाला.

सासुबाईंनी एकदम तिला सावरले,पदर निट केला.अन प्रेमाने जवळ घेउन म्हणाल्या ,”शांतं हो पोरी.मी बघतेय तुझं गुंतत जाणं पण आलवणातुन हिरव्या साडी पर्यंतचा प्रवास शक्य नाही. या प्रवासात असे प्रवासी भेटतात पण ते साथीदार बनत नाही. तुला एकटीलाच ही वाट चालायची आहे. मोगरा प्रत्येकाच्या आयुष्यात दरवळत नाही ग पोरी.”
नेहमी खोचक बोलणा-या पण आज या धीर देणा-या त्यांच्या शब्दाने ती अजुनच उन्मळुन रडायला लागली.
“काय झालं सुनबाईंना रडायला “.मामंजी बावचळुन म्हणाले”.

तिच्या पदरासहित डोक्या वरुन मायेने हात फिरवत सासुबाई म्हणाल्या,
“भोळी पोर ,मोग-याचा बहर आता संपला म्हणून दुःखी झालीय हो.”
ती मात्र ओंजळ रिती झाली या कल्पनेने गदगदुन रडत राह्यली.
समाप्त
© उज्वला सबनवीस
सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.

2 thoughts on “हुंदका”

Leave a Comment

error: Content is protected !!