दुबळी का खंबीर?

© वर्षा पाचारणे.
“आज कुठे गेली रखमी? का आता सगळ्यांसारखा तिला पण माझा वीट आलाय? म्हणून म्हणतोsss मेलेलं बरं यांच्या अशा उपकारावर जगण्यापेक्षा देवा उचल रे मला. लेकांना वाटतं पैसा फेकला म्हणजे सगळंss होतं. लेकी नुसत्या लांबून माया दाखवायला. बापाचं करायची वेळ आली की, सगळ्यांना कामं, संसार आठवतात”… आप्पांची अशी सतत बडबड चालू होती.
तरीही सकाळचे सातच वाजले होते म्हणून बरं.

रखमा आज्जी आज वटपौर्णिमा म्हणून वडाची पूजा करायला लवकरच गेली होती.. कारण कसला मुहूर्त अन् कसलं काय.. दिवसभर आप्पांच्या सेवेत राबताना तिला एका क्षणाचीही उसंत नसे.
रखमा आजी आणि आप्पांना दोन मुलं आणि तीन मुली… शेतीवाडी, पैसाअडका अगदी पूर्वजांपासून बक्कळ होता. त्यात आप्पा एकुलते एक असल्याने सारं काही त्यांच्याच मालकीचं… सहाजिकच या एकुलत्या एक आप्पांचे लहानपणापासूनच अतिशय लाड झाले. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन आप्पा सैन्यदलात भरती झाले.

‘आपल्या लेकाने सीमेवर नोकरीसाठी जाऊ नये’, यासाठी आप्पांच्या आई-वडिलांनीही जीवाचा आटापिटा केला, पण आप्पांनी मात्र कुणाचंच ऐकलं नाही.. वर्षभरातच घरच्यांनी आप्पांचं लग्न लावून दिलं. एक वर्षाच्या सुट्टीनंतर आप्पा घरी यायचे.
घरात आता चिल्लीपिल्ली खेळू लागली होती. मुलांमध्ये जेमतेम एक-दीड वर्षांचं अंतर होतं.. एवढ्या सगळ्या बाळंतपणानंतर रखमा आज्जी मात्र अगदीच तोळामासा झाली होती. 

घरी पैसाअडका नवऱ्याची चांगली नोकरी असूनही रखमाची मात्र सुरुवातीपासूनच कसलीच हौस झाली नाही. साधं नवऱ्याने कधीही प्रेमाने लुगडं घेतलं नाही की कधी सुट्टीवर आल्यावर आपुलकीचे चार शब्द बोलला नाही. केवळ रात्रीला सोबत करण्यासाठी जणू तो तिच्याजवळ यायचा. ‘अबोल असणाऱ्या आप्पांना बोलतं तरी कसं करावं’, असा विचार कायम रखमाच्या मनात यायचा. तिला वाटायचं असं काहीतरी व्हावं आणि आप्पा तिच्याशी घडाघडा बोलायला लागावे… पण सुट्टीवर आल्यानंतर जेमतेम आता कुठे त्यांच्या सहवासाची सवय होऊ लागताच सुट्टी संपून जायची.

पुन्हा तीच हुरहुर, तीच ओढ, तीच काळजी रखमाच्या मनात काहूर माजवायची.
सैन्यातली नोकरी झेपेनाशी झाल्यावर आप्पांनी नोकरीला रामराम ठोकला. आता आप्पांचे आई-वडीलही फार थकले होते. आप्पा नोकरीला असताना सासू-सासर्‍यांनी रखमाला स्वतःच्या लेकीप्रमाणे सांभाळले होते. आप्पा नोकरी सोडून आल्यानंतर आता त्यांना घरात देखील करमेनासे झाले होते. रखमा दिवसभर तिच्या कामात गुंतलेली असायची. मुलांचं, सासू-सासर्‍यांचे सारं अगदी रीतसरपणे करायची.

एक दिवस अचानक आप्पांची तब्येत रात्री अचानक बिघडली. शेजाऱ्यांच्या मदतीने आप्पांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आप्पांना अर्धांगवायूचा झटका आला होता. आप्पांचे एक दोन्ही हात आता यापुढे हालचाल करू शकणार नव्हते. ‘आपल्यावर अशी वेळ आली’, हे पाहून आप्पांची चिडचिड होत होती. सहा फूट उंच, पिळदार शरीर असलेले आप्पा या आघाताने अंगात अवसान नसल्यासारखे झाले होते. 

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आप्पांना घरी आणले. रखमाच्या काळजाचं पाणी पाणी झालं… जेमतेम त्रेचाळीस चव्वेचाळीस वयाचा आपला नवरा, असा अधू झाल्याने तिचा जीव तुटत होता.
आता घरातल्या साऱ्याच कामांबरोबर आणखी एका कामाची भर पडली होती…. आप्पांचं सारं काही आता रखमाला  करावं लागणार होतं. मुलं मोठी असल्याने ज्याने त्याने शिक्षणासाठी शहरात धाव घेतली. सासू-सासर्‍यांनी तीनही नातींची लग्न अगदी श्रीमंत घरात लावून दिली. रखमाला आता लेकींची कसलीही काळजी नव्हती. 

दोन मुलंही चांगल्या ठिकाणी कामाला लागल्याने आता त्यांच्याही लग्नाची बघा बघा सुरू झाली.. या साऱ्यात ‘आपण कुठेतरी डावललो जातोय, रखमा आणि आपले आई-वडील सारे काही निर्णय घेऊन मोकळे होतात’, असा उगाचच आप्पांनी गैरसमज करून घेतला होता.
काही वर्षांनी रखमाचे सासू-सासरे वारले. आता रखमा आणि आप्पा एवढ्या मोठ्या जुन्या वाड्यात दोघंच असायचे… आधीच आप्पांचं खाणं-पिणं, संडास लघवी सारंच जागेवर असल्याने या सार्‍या गोष्टी करता करता रखमा थकून जायची.. मुलांनी कामासाठी बाई ठेव असा अनेकदा हट्ट करूनही आप्पांनी मात्र सतत त्या गोष्टीला विरोध दर्शवला…

“अहो आप्पा, तुम्ही शहरात राहायला चला म्हटलं, तर तेही ऐकत नाही आणि इथे आईची किती दगदग होते हे तुम्हाला दिसत नाही का? शेवटी ती पण माणूसच आहे ना. आयुष्यभर या घरासाठी, आमच्यासाठी आणि तिचं राहिलेलं आयुष्य आता तुमच्यासाठी राबतंच आली आहे, कधीतरी तिच्या भावनांचाही विचार करा ना”…. आईच्या मायेपोटी मोठा लेक भडाभडा बोलून मोकळा झाला.
“कामवाल्या बाईचे पैसे मी देतो, पण अहो हिची दगदग मला बघवत नाही. नाहीतर आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघंही हे घर बंद करून कायमचे माझ्या बरोबर राहायला चला… मी तिथे तुमची सारी योग्य व्यवस्था करतो”…

लेकाच्या या अशा बोलण्याने आप्पांचा पारा चढला. “आता मला अक्कल शिकवणार तू? अरे तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त पाहिलेत मी. बापाशी बोलायची ही काय पद्धत झाली, का या रखमीने तुला सांगितले की, तिला माझा त्रास होत आहे? तसं असेल तर मला स्पष्ट शब्दात सांगा.. तुमच्या उपकारावर असं कुत्र्यासारखं जगणं मला नको झालंय. सतत ‘आई तुमचं किती करते, आई तुमचं किती करते’, असं म्हणत तुम्ही दोन्ही लेकांनी मला हिणवायचं. लेकीने फोनवर सतत आईशीच गुलुगुलु गप्पा मारत माझी फक्त तोंडदेखली चौकशी करायची…. का तर मी असा लुळा पांगळा पडून आहे म्हणून? आणि इतकाच जर त्रास होत असेल ना तर निघून जा सगळे इथून”.. खंगुन खंगुन मरून जाईल, पण असले त्रासदायक उपकार नकोत मला”… असं म्हणत आप्पा व्हीलचेअरवर जागच्याजागी तळमळत पडून राहिले.

रखमा आज्जीला त्यांची ही अवस्था सहन होईना.. तिने लेकांना सांगितलं ,”हे पहा नवऱ्याचं करण्यात कसला आलाय मला त्रास आणि आम्ही दोघं इथे मजेत आहोत”..
“अगं, पण बाई कामाला ठेवल्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला असा?”..
“अरे, पण आप्पा नको म्हणत आहेत ना… त्यांना नको आहे दुसरी तिसरी कुठलीही व्यक्ती घरात… आणि मी अजून आहेच की धड धाकट त्यांचं करायला… जेव्हा माझे हात-पाय थकतील तेव्हा बघू हो”… असं म्हणत रखमा आज्जीने विषय बदलायचा प्रयत्न केला… 

पण तितक्यात आप्पा पुन्हा खवळले… “अगं, तू धडधाकट आहे, त्याच्या आधीच देवाने मला उचलावं, नाहीतर या लेकांच्या राज्यात तसाही मी बसल्या जागीच मरून जाईल”… आप्पांनी असे म्हणताच दोन्ही लेकांना राग अनावर झाला.. “आप्पा हीच किंमत करता तुम्ही आमची?”… असं म्हणून दोघांनीही आपापल्या बॅगा भरून धाडकन दार आपटून ते निघून गेले.
रखमा लेकांना समजावण्यासाठी दारापर्यंत धावली पण काहीच उपयोग झाला नाही. आप्पांची इकडे बडबड सतत चालू होती… “जाऊदे त्यांना…. कोणाला दाखवतात हा रुबाब?”…. “पैशाचा माज चढलाय त्यांना”… 

आता मात्र रखमा धावत-पळत पुन्हा आप्पांकडे वळली. “अहो ,तुम्ही तरी शांत व्हा… ते दोघंही आपल्या सोयीसाठीच तर बोलत होते ना…. तुम्ही काय एवढा संताप करून घेता”
रखमाच्या अश्या प्रेमाने समजावण्याने आप्पा गहिवरले… विस्तवावर अचानक पाणी पडावं, तसा त्यांचा राग शांत झाला… रखमाकडे बघत त्यांना अश्रू अनावर झाले… “अगं मग काय करू?”… “एवढं धडधाकट शरीर असूनही या खुर्चीत असं लुळंपांगळं पडून राहताना जीवाला किती वेदना होतात, हे तुला नाही कळायचं”…. “साधं खायचं म्हटलं तर तुझ्या हाताने खावं लागतं… तुझे कष्ट मला दिसत नाही असं नाही गं, पण आता या जगण्याचा वीट आलाय मला”… “असं वाटतं निदान हात हलत असते तर पंख्याला लटकून आत्महत्या केली असती, नाहीतर विष घेऊन संपवले असतं जीवन…

पण देवाने ती संधीही नाही दिली मला”… “कुठल्या जन्माची पापं भोगतोय काहीच कळेना झालंय”…रखमाने आईच्या मायेने आप्पांना उराशी कवटाळलं… “अहो, माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मला तुमचा कसलाही त्रास नाही व्हायचा आणि अर्धांगिनी आहे ना मी तुमची… ते कर्तव्यच आहे माझं… नवऱ्याची सेवा करण्यात कसला आलाय त्रास?” “चला आपण दोन घास खाऊन घेऊयात”, असं म्हणत तिने दोघांसाठी एकाच ताटात जेवण आणलं… कधीच एका ताटात न जेवलेले रखमा आज्जी आणि आप्पा त्यादिवशी मात्र राहिलेलं त्यांचं अपूर्ण प्रेम जणू आज जगत होते..

आप्पाही आता सत्तरीच्या घरात होते. वीस पंचवीस वर्ष असं जागेवरचं जगणं खरं तर कुठल्याही नरक यातनेपेक्षा कमी नव्हतं.. समोर सारं काही दिसत असून ना माणूस उठू शकत होता ना स्वतःच्या हाताने कुठली वस्तू घेऊ शकत होता… रखमा आज्जी देखील आता बऱ्यापैकी थकल्याने तिचीही हालचाल मंदावली होती.. तरीही ती रोज सकाळी उठून सडा रांगोळी, झाडलोट सारंकही नित्यनेमाने करत होती.
“ऐकलं का, उद्या वटपौर्णिमा आहे”, रखमा आज्जी अप्पांना म्हणाली. टीव्ही वरती सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट बघण्यात दंग झालेले आप्पा अचानक रडू लागले…

“अहो, काय झालं?”… “तुम्हाला काही होतंय का?… काही दुखतंय का?”, असं म्हणत रखमा आज्जी मनातून घाबरी झाली. “अगं किती वर्ष त्या सत्यवानासाठी सावित्रीनेच जिवाचं रान करायचं…आणि माझ्यासारख्या नवऱ्याला तर अक्षरशः नवरा म्हणून घेतानाही लाज वाटते बघ”…
“अहो, असं काय म्हणताय”…. “हे दुःख काय तुम्ही स्वतःहून मागून घेतल आहे का?”… “नशिबात असलेलं कुणालाही चुकत नाही, त्यामुळे आता जास्त विचार करू नका”, असं म्हणून रखमा आज्जीने आप्पांच्या अंगावर पांघरूण घातलं…

“निवांत झोपा आता, उद्या सकाळी मी लवकर उठून वडाची पूजा करून येईल”.. असं म्हणत रखमा आज्जीने आप्पांचं डोकं चेपून दिलं… आप्पांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या.. पण ते पाणी पुसण्यासाठी देखील दुसऱ्याच्या हाताची गरज लागत होती, याहून दुःख ते काय..
आज रखमा आज्जी लवकरच उठून झाडलोट सडा-रांगोळी करून वडाची पूजा करण्यासाठी निघून गेली. इतका वेळ तिची सारी दगदग व्हीलचेअर वरून बघण्यात दंग असलेल्या आप्पांचा डोळा लागल्याने, तिने त्यांना न सांगताच घराला बाहेरून कडी लावली आणि शेजारी राहणाऱ्या मनीषाला तिने घरावर लक्ष ठेवायला सांगितले.

मोजून पाच एक मिनिटात आप्पांना जाग आली.. रखमा
आज्जीला अजून यायला निदान अर्धा पाऊण तास तरी लागणार होता. आता तो एकटेपणा आप्पांचा अंगावर येऊ लागला होता…
बसल्या जागी त्यांना सगळा जीवनक्रम आठवू लागला… “कधी कुठलेच सुख न दिलेल्या रखमाला आपल्यामुळे किती त्रास होतोय”, हे आठवून त्यांना रडू अनावर झालं होतं… श्वास उष्ण झाले होते. डोळ्यातलं पाणी गालांवरून घळाघळा ओघळत होतं.. सतत मनातल्यामनात स्वतःचीच कीव येत होती… व्हीलचेअरवर बसून ते जोरदार किंचाळले…” देवाsss सोडव या साऱ्यातून मलाsss”… “नको रे अंत पाहू माझा आणि माझ्या रखमीचा पण”.. “किती करते ती माझ्यासाठी! निदान तिच्या पुण्याईचा तरी विचार करून मला मरण दे”….

अर्ध्या तासाने रखमा आज्जी दार उघडून आतमध्ये आली… इतक्या वेळात आप्पांचे अश्रु सुकून गेले होते. पण मनातली दुःखाची धग मात्र तशीच होती.. रखमा आज्जी स्मितहास्य करत आप्पांजवळ गेली. पूजेच्या ताटामधील प्रसादाचा केळाचा तुकडा आप्पांना देण्यासाठी म्हणून तिने त्यांना तोंड उघडायला सांगताच आप्पा मात्र तिच्यावर खवळले. “कुठे गेली होती सकाळपासून… अगं घरात नवरा एका जागेवर अंथरुणाला खिळून आहे, याचा विसर पडला का तुला?”.. “इथे भुकेने जीव जायला आलाय माझा”…
त्यांच्या अशा बोलण्याने रखमा आज्जीच्या डोळ्यात पाणी तरळलं… “अहो, तुम्हाला कालच म्हणले होते ना, सकाळी वडाची पूजा करायला जाईल म्हणून”….

पण का कोण जाणे, स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारींना पुरते वैतागलेले आप्पा मरणाची याचना करत होते… “कश्याला मारायच्या त्या वडाला फेर्‍या? हा असला लुळापांगळा नवरा सात जन्म मिळण्यासाठी”…. “अगं त्यापेक्षा नको करूस ते उपास-तापास”…. “हे असं परोपकारावरचं जिणं नकोय मला सात जन्म”…
त्यांच असं बोलणं ऐकून रखमा आज्जी निमूटपणे आतमध्ये गेली… तिने खोलीचं दार आतून लावून घेतलं… त्या अंधार्‍या खोलीत कोपऱ्यात बसून आज ती पहिल्यांदा ढसाढसा रडली. “इतके वर्ष ज्या माणसाची आपण मनोभावे सेवा केली, त्यानेच आज वटपौर्णिमेच्या दिवशी असं अभद्र का बोलावं?”, या विचाराने रखमा आज्जीला हुंदके अनावर होत होते.. 

‘खरंच लेकांच ऐकून त्याच वेळेस जर शहरात गेले असते, तर कदाचित माझं जगही थोडंफार बदललं असतं का?’…. ‘ज्या सुखाची मी अपेक्षा केली होती, ते सुख पदरी कधी पडलंच नाही’…. ‘आप्पांचं शारीरिक अधूपण तरी समाजाला दिसतं, पण माझ्या मनाच्या लुळ्या पांगळ्या अवस्थेला कोणीच पाहू शकत नाही’.
‘आप्पांची सेवा करताना त्या मजबूत शरीराला शेजारच्या बाळूच्या मदतीने इकडून तिकडे हलवताना, किती कष्ट पडतात, हे केवळ माझं शरीरंच जाणतं’…. ‘बाळूला पैसे देताना देखील आप्पा दहा वेळा कट कट करतात, पण कोण कुठचा तो पोर, माझ्या मदतीसाठी इतके वर्ष अगदी देवासारखा धावून येतो’… 

‘पण ज्याच्यासाठी आपण इतके वर्ष या खस्ता खातोय, त्याला खरंच आपल्या कष्टाची जाणीवच नाही का’, या विचाराने रखमा आज्जीची चिडचिड वाढत होती… रखमा आज्जीचे डोळे रडून रडून लाल झाले होते. आप्पांपेक्षा जेमतेम पाच-सहा वर्षांनी लहान असलेल्या रखमा आज्जीवर लग्न झाल्यापासूनच असंख्य जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या… पाच बाळंतपणं, घरातली सारी कामं, सासू-सासर्‍यांची आजारपणं आणि नंतर आयुष्यभर पुरेल इतकं नवऱ्याचं अधूपण, स्वतःच्या शरीराला कष्टवून जगताना, तिची कळी उमलण्याआधीच सुकून गेलेली अवस्था आठवताना, आज ती मनोमन हळहळली.

तितक्यात आप्पांच्या दुपारच्या गोळीची वेळ झाली, हे आठवून ती भानावर आली. ‘आज माझ्याबरोबर नकळत माझ्यामुळे आप्पांचा देखील उपास घडला’, या विचाराने तिला कसंनुसं झालं. तिने हळूच दाराची कडी उघडली. आप्पा दाराकडे एकटक नजर लावून बघत होते.
रखमा आज्जीला वाटलं आता पुन्हा आपल्यावर शब्दांचा भडिमार होणार.. तिने पटकन जाऊन एक सफरचंद कापून आप्पांना खायला घातलं… त्यांची रोजची दुपारची गोळी दिली.. पण आता मात्र आप्पा नि:शब्द बसले होते.. इतके वर्ष आप्पांचं दुखणं नकळतपणे जगलेली रखमा आज्जी आज स्वतःच्या वागण्यावर अतिशय खजिल झाली होती…

‘आप्पा जरी बोलले तरीही, त्यांच्या मनातील घालमेल ते मलाच बोलून दाखवणार ना’, या विचाराने तिलाच तिचं मन खायला लागलं. ती आप्पांकडे येऊन पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली ,”मी असं रागावून खोलीत जाऊन बसायला नको होतं…. माझं चुकलं”… “तुमच्या मनाची तगमग, तुम्ही माझ्याकडेच तर बोलून दाखवणार ना”… रखमा आज्जीने असं म्हणताच आप्पा अगदी हलकसं हसले आणि म्हणाले ,”माझं पण चुकलंच की”…. “आयुष्यभर माझ्या दुखण्याच्या वेदना तू सहन करत आलीस, पण त्या वेदनांवर साधी मलमपट्टी करणंही मला कधीच जमलं नाही”… “पण यापुढे मात्र मी तोंडावर ताबा ठेवेल. एखादी आई जितकं मुलाचं काळजीपोटी करते त्याहीपेक्षा अधिक जास्त माझं तुला करावं लागतं, हे पाहून वाईट वाटतं गं”, असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. 

“आजवर मला तुझ्यासाठी काहीच करता आले नाही”, असं म्हणत त्या व्हीलचेअरवरची तळमळ पाहून रखमा आज्जी त्यांना म्हणाली ,”तुम्हाला खरंच माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर एक गोष्ट सुचवू का?”… तिने असे म्हणताच आप्पा म्हणाले ,”बोल की”… “एकच गोष्ट करा, यापुढे आयुष्यात कधीही मरण्यासाठी याचना नका करू, कारण तुम्ही आहात म्हणून मी जगते आहे”…. “माझ्या सौभाग्याशिवाय मला दुसरं आणखी काहीही नको”…
मिठीत घेण्यासाठी उरात प्रेम ओसंडून वाहत असताना देखील आजही आप्पांचे हात मात्र त्यांना साथ देऊ शकले नाहीत… त्यांच्या मनाची घालमेल शांत करण्यासाठी रखमा आज्जीने आप्पांचं डोकं मांडीवर घेऊन त्यांना लहान बाळाप्रमाणे थोपटलं… पुन्हा नव्या दिवसाच्या तयारीला रखमाजी कंबर कसून तयार होती पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी…..

नवरा बायकोच्या संसारात तुझं माझं असं काहीच नसतं.. सुख दुःख ही एकमेकांनी वाटून घेण्यासाठीच असतात… मग ते दुःख कितीही मोठं असलं तरीही प्रेमापुढे ते खुजंच ठरतं…
ही एक सत्यकथा असून त्यातली स्त्री आजही खऱ्या अर्थाने आनंदाने नवऱ्याचं सारं काही करण्यात अगदी खुश आहे. कष्ट अपार आहेत… पण प्रेम आणि भावना यांच्या जोरावर तिने हे आयुष्यभराचं बाळ कमावलं आहे. अशा खऱ्या आयुष्यातल्या त्या माऊलीला मनापासून सलाम.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!