त्याचं अस्तित्व तिची आभूषणे

© आर्या पाटील
दर्पणासमोर बसून वीणा एकटक स्वत:ला न्याहाळत होती… कोमेजलेला चेहरा आणि कोमेजलेलं मनही त्या आरश्यात तिला स्पष्ट दिसत होते.
दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं तिचं विराज सोबत.
प्रेमविवाह असल्याने सुख, आनंद आणि समाधान पाणी भरत होतं आयुष्यात.
तिचं रुपडं ड्रेसिंग टेबलच्या आणि विराजच्या डोळ्यांच्या आरश्यात रोजच सजायचं.. विराजला ती सजलेली खूप आवडायची.

हातभर सजलेल्या कंच हिरव्या बांगड्या, कानात लोंबकळणारे डुल, कपाळावर सजलेली चंद्रकोर, डोळ्यांच्या कडा उजळणारे काळे काजळ, नाकामध्ये मोत्यांची नथ, ओठांना पिऊन टाकणारी गुलाबी लिपस्टिक, नाभीपर्यंत लोंबकळणारे मंगळसूत्र, गळ्याला शोभून दिसणारी सोन्याची ठुशी, त्याच्या आवडीची डाळिंबी रंगांची पैठणी आणि त्याच्या हृदयाला रुणझुण करत भिडणारे पैंजण… सारं सारं त्याला भारी आवडे.. तिला या रुपात पाहिलं की तो बेभान व्हायचा….

तिच्या कपाळावर स्पर्शखुण देत तिचं सौंदर्य नजरेने पिऊन घ्यायचा.. तिला नव्हती आवड फारशी या सगळ्याची.. पण त्याच्यासाठी ती आवडीने सजायची.. शेवटी तो आणि ती वेगळे कुठे होते….
आज त्या आठवणी सरशी तिच्या गालावर लाली चढली.. आपल्या ओंजळीने चेहरा झाकत ती भलतीच लाजली.
तोच दरवाजा वाजला.. तिने झाकलेल्या चेहर्‍यावरून हात बाजूला केला आणि आरश्यातून दरवाज्याचा वेध घेतला..
” विराज…..” त्याला दरवाज्यातून येतांना पाहून तिची कोमेजलेली कळी खुलली.

ती स्टुलवरून उठून त्याच्याकडे झेपावणार तोच त्याने तिच्या खांद्यांना स्पर्श करत बसण्याचा इशारा केला.. कमरेत वाकत त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला..
” माझ्या राणीची कळी आज पुन्हा रुसली वाटते..?” आरश्यातून तिच्याकडे पाहत तो मधाळ हसला.
तिने नकटा राग चेहर्‍यावर आणत नाक मुरडले.
” आज काही खरं नाही आमचं..?” त्याने डोक्याने हलकेच तिच्या डोक्याला टक्कर दिली.

” तू असच करतोस..? नेहमीच उशीरा येतोस.. तुझ्याशिवाय एक क्षणही चैन पडत नाही मला.. जीव कासाविस होतो.. माझा श्वास तुझ्यातच तर जिवंत आहे.. तू आहेस म्हणून मी आहे.. मला सोडून नको ना जाऊस.” स्टुलवरून उठत ती त्याला गच्च बिलगली आणि म्हणाली.
” ये वेडाबाई, मी कुठेही गेलो तरी तुझ्याजवळच असतो ना.. कारण मी ही तुझ्यातच श्वास घेतो..” त्याने नेहमीप्रमाणे तिला समजावलं.
” तू नेहमी असच करतोस.. श्वासाचं कारण देत माझा जीव टांगणीला लावतोस..” त्याच्या छातीवर लडीवाळपणे मारत ती म्हणाली..
” चल तयार हो पाहू.. काकी रागावतील उशीर झाला तर.. खाली हळदी कुंकवासाठी बायकांची वर्दळ सुरु झाली आहे.. आवर पटकन..” तिला मिठीतून बाहेर काढत तो म्हणाला.

तिने मानेनेच खाली जायला नकार दिला.. त्याने मात्र हट्टाने तिला त्याच आरश्यासमोर बसवले…
आभूषणांनी भरलेला तो चॉकलेटी बॉक्स काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला.. कपाटातून तिच डाळिंबी पैठणी काढत तिच घालण्याचा हट्ट धरला..
त्याचा लडिवाळ हट्ट तिला खूप आवडे.. आताही ती नाही टाळू शकली तो..
साडी अर्धी घालून झाली.. आणि निऱ्यांचा नेहमीचा घोळ तिला सतावू लागला..

” कुठे गेला हा..?” विराजला शोधत ती मनात पुटपुटली..
नजर खालून वर यायचा अवधी की तो समोर हजर झाला..
विस्कटलेला निऱ्यांच्या घडीला त्याच्या हातात देत ती स्तब्ध उभी राहिली.. नेहमीसारखं निऱ्यांना एकमेकांवर विसावत त्याने पद्धतीशीर घडी घालून दिली..
” तू नसल्यावर अशी तारांबळ उडते बघ..? तुझ्यासारख्या निर्‍या राणीताईंना पण जमत नाहीत..” साडी घालण्याचं महादिव्य जवळजवळ पूर्ण झाल्याच्या आनंदात ती म्हणाली..तो ही तिच्याकडे पाहत खट्याळ हसला.

ती आरश्यासमोर बसली.. तिने बॉक्स उचलला.. तोच त्याने तो तिच्याकडून खेचून घेतला… आणि तिला सजवण्याचा अधिकारही. आभूषणांची आरास तिच्या देहावर सजवतांना ती शहारत होती. आपल्याला सजवणाऱ्या त्याच्यावरून तिचे डोळे हटत नव्हते..
त्याने हिरवा चुडा तिच्या हातात हळुवारपणे चढवला. त्याच्या आवडीचे कानातले, मोत्यांची नथ, मंगळसूत्र.. एक एक करत तिच्या नितळ कायेवर विसावणारे सर्वच दागिने तिचे सौंदर्य खुलवत होते.. आणि विराजचा ओझरता प्रत्येक स्पर्श मनाला उभारी देत होता..

सारी सौभाग्यलेणी लेवून झाल्यावर त्याने अलगद हनुवटी पकडून तिचा चेहरा आरश्यासमोर धरला.. ती मात्र त्याच्या डोळ्यात स्वत:ला न्याहाळत होती.
“काही तरी कमी आहे…” त्याच्या मनातली भावना तिने डोळ्यांत टिपली..
त्याने खाली वाकून कुंकवाचा करंडा उचलला… करंड्यावरचं चंदेरी झाकण उघडून कुंकवाची चिमूट भरली आणि हात तिच्या कपाळाकडे सरसावले..

तशी ती पटकन भानावर आली..
” नको, काकू ओरडतील.. त्यांना नाही आवडणार मी..” ती बोलणार तोच त्याने दुसरा हात तिच्या ओठांवर ठेवला.. आणि भांगेत कुंकू भरले.. त्यासरशी तिच्या हृदयात भावनेची विज चमकली आणि क्षणात डोळ्यांतून बरसली..
ती पटकन उठून उभी राहिली आणि त्याला गच्च बिलगली..
” मला अधिकार नाही आता असं सजण्याचा.. माझी आभूषणे तुझ्यासोबत कायमची अनंतात विलिन झाली..
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की तू गेलास तरी माझा श्वास कसा सुरु आहे..?” त्याच्या मिठीत बंदिस्त होत ती म्हणाली.

” मी त्यासाठी तुला सोडून जायला हवे ना.. अगं जगासाठी मी मेलोय पण मी अजूनही जिवंत आहे तुझ्यात.. विसरलीस माझा श्वासच तू आहेस.. आणि मी जिवंत असतांना माझी बायको लंकेची पार्वती बनून राहिलेली नाही आवडणार मला.. तू अर्धांगिनी आहेस माझी.. मी अजूनही जिवंत आहे तुझ्यात.. माझ्यानंतर तु आई बाबांना सांभाळते आहेस, राणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत:च्या बहिणीप्रमाणे पेलते आहेस, घरचा आर्थिक भार मुलगा बनून पेलते आहेस.. माझ्या सर्वच जबाबदाऱ्या तर स्विकारल्या आहेत तू.. मग माझं तुझ्यात जिवंत असलेलं अस्तित्व कशाला नाकारतेस..?

लोकांच्या मते ही आभूषणे म्हणजे नवऱ्याच्या अस्तित्वाचं प्रतिक.. मग तेच अस्तित्व कशाला नाकारते आहेस..? मी अजूनही जिवंत आहे तुझ्यात, तुझ्या कर्तव्यांत, तुझ्या जबाबदऱ्यांत.. लोकांच सोड मला नाही आवडणार माझ्या बायकोने असं कोमेजलेलं राहिलेलं.. मला नेहमीच तुला आनंदी, प्रसन्न आणि उत्साही पाहायचं आहे.. माझ्यासाठी एवढही करणार नाही..?” म्हणत त्याने पुन्हा एकदा कपाळावर स्पर्शखुण ठेवत तिचं सौंदर्य नजरेत भरून घेतलं.. तिच्या काळजात पुन्हा तिच विज सळसळली आणि तशीच नजरेतून बरसून गेली..

तोच खालून काकू सासूने आवाज दिला.. ती पटकन भानावर आली..
” जा.. आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे सगळ्यांना.. मी तुझ्या सोबत आहे..” त्याने तिला आश्वासक साथ दिली..
एकवार स्वत: ला त्याच्या नजरेच्या दर्पणात न्याहाळत दबक्या पावल्याने ती खाली उतरली..
हळदी कुंकवासाठी जमलेल्या सगळ्याच महिला तिला असे सजलेले पाहून नको नको ते बोलू लागल्या.. 
वीणाच्या सासूने डोळ्यांना पदर लावला..

तिची नणंद राणी धावत तिच्या जवळ आली आणि डोळ्यांतल काजळ काढत तिची द्रिष्ट काढली.. तिलाही नव्हतं पाहावत लाडक्या वहिनीला वैधव्याच्या पांढऱ्या रंगात. तिचाही विरोध होता ‘विधवा’ या संकल्पनेला.. पण वडिलधाऱ्यांसमोर चालत नव्हतं.
तोच काकेसासू रागात तिच्या जवळ आली.
” वीणा तुला कळतय का काय करतेस तू..? विधवेला शोभत नाही हे.. चार लोकांसमोर आमची इज्जत वेशीवर नको टांगूस.. तुझा सजण्याचा अधिकार विराज सोबत कायमचा हरपला.. जा बदलून ये सगळं..” तिच्या अशक्त दंडांना धरून ती म्हणाली.
तोच शरिरात एक वेगळीच जाणीव उठली.. त्याच्या अस्तित्वाची. झटक्यात तिने काकेसासूचा हात बाजूला लोटला.

” मी नाही उतरवणार हा साज.. माझा विराज अजूनही जिवंत आहे या आभूषणांत.. त्याला माझ्यापासून दूर करण्याचा अधिकार कोणालाच नाही..
हिरव्या बांगड्या फक्त सौभाग्य नाही तर विराजनंतर मला निभावायच्या कर्तव्याची निशाणी आहे…
पायातले पैंजण विराजसाठी नेहमीच उत्साही राहण्याचे संकेत देतात..
माथ्यावरची चंद्रकोर नेहमीच माझ्यात विराज जिवंत आहे याची जाणीव करून देते..
कानातले डूल मला विराजचे सुख जे आम्हां साऱ्यांच्या आनंदी राहण्यात आहे त्या सुखासाठी प्रवाही रहा असा संदेश देतात..

माझ्यानंतर अनेक वादळे येतील जीवनात पण यात तटस्थ रहा मी तुझ्या सोबत आहे ही विराजची हिमंत गळ्यातील मंगळसूत्रातून मिळते..
माझ्यानंतर काळ्या आभाळावरही स्वप्नांची रंगीबेरंगी नक्षी काढायला विसरू नकोस कारण मला तुझं आयुष्य इंद्रधनुष्यासारखं सप्तरंगी हवं आहे असं सांगणारा विराज मला या डोळ्यांतल्या काळ्या काजळातून भेटतो.. ही फक्त आभूषणे नाहीत हा सन्मान आहे विराजचा तो मी नेहमीच करणार.. मी सजणार आहे माझ्या अस्तित्वासाठी जे विराज नेहमीच जपायचा.. हो मी सजणार आहे विराजसाठी.. कारण त्याला मी सजलेलीच आवडते..” ती परखडपणे म्हणाली..
काकेसासूच काय पण एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीवर वैधव्याच्या रुढी परंपरांचे बंधन लादणाऱ्या त्या सगळ्याच स्त्रीया क्षणात खजिल झाल्या..

राणीने आनंदाने वीणाला मिठी मारली.. तिच्या सासूनेही होकारार्थी मान हलवत तिच्या निर्णयाचे स्वागत केले.
तोच तिची नजर वर तिच्या रुमवर गेली..
विराज गोड हसत तिला शुभेच्छा देत होता.. तिने डोळ्यानेच त्याचे आभार मानले..
आज त्याचं अस्तित्व जपल्याचं समाधान तिच्या डोळ्यांत चमकत होतं..
© आर्या पाटील
सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!