दृष्टिकोन ( भाग २)

भाग 1 इथे वाचा

विदिशा हॉस्पिटलमध्ये बसून मनाने धृव आणि तिच्या भूतकाळात गेली. तिचा आणि धृवचा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा झरझर जाऊ लागला.
विदिशा दिसायला गोरीपान आणि देखणी त्यातून तिने ज्या काळात मुलींना दहावी बारावी शिक्षण म्हणजे खूप झाले असे मानले जाणाऱ्या काळात हॉटेल मॅनेजमेंट केले होते.
त्यामुळे जेंव्हा लग्नाची वेळ आली तेंव्हा साहजिकच तिच्या अपेक्षा जास्त होत्या.

त्यातच तिला नात्यातीलच असणाऱ्या धृवचे स्थळ सांगून आले.
धृव ही काही कमी नव्हता दिसायला हँडसम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि पुण्यात नुकताच नोकरीला लागलेला तरी चांगला कमवता होता.
तो त्याच्या कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. घरात सगळ्याला स्थळ पसंत पडले तसेच विदिशाला ही धृव आवडला आणि धृवला ही विदिशा आणि लग्न ठरले.

पण तिच्याच शेजारी राहणारी तिची बेस्ट फेंड शीला होती. ती  दिसायला अगदी साधारण आणि बारावी झालेली होती म्हणजेच सगळ्याच बाबतीत विदिशा पेक्षा कमी!
तिला ही स्थळं पाहणे सुरू होते आणि तिचे लग्न ठरले.
तिने विदिशाला मुद्दाम घरी बोलावून घेतले. विदिशाने तिचे अभिनंदन केले पण शीला मात्र कायमच तिचा हेवा करत असे विदिशाच्या मात्र मनात काहीच नव्हते. तिला तर हे ही माहीत नव्हते की शीलाचे लग्न कोणाशी ठरले आहे. 

विदिशा,“ अभिनंदन शीला! काकुने कालच सांगितले तुझे ही लग्न ठरले आहे ऐकून आनंद झाला मला!” ती आनंदाने म्हणाली.
शीला,“ thanks! तुझे ही ठरले आहे कि लग्न! जीजू काय करतात? पगार किती आहे त्यांना?” तिने मुद्दाम विचारले.
विदिशा,“ते ना सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत पुण्यात! त्यांना पगार  वीस हजार आहे!” तिने अभिमानाने सांगितले.
शीला,“ अग्गो बाई मला वाटलं होतं तू माझ्या पेक्षा हुशार शिकलेली आहेस देखणी आहेस मग तुला तर माझ्या पेक्षा चांगले स्थळ मिळेल पण जाऊदे तू चहा घे!” तिने मुद्दाम तिला डिवचले.

विदिशा,“ काय म्हणायचे काय आहे तुला? तुझा होणारा नवरा असं काय करतो ग?” तिने जरा रागानेच विचारले.
शीला,“ ते ना क्लास टू ऑफिसर आहेत ते ही रेल्वेमध्ये पगार आहे पंचवीस हजार पेक्षा जास्त! काय उपयोग ग विदि तुझ्या या सौंदर्याचा आणि शिक्षणाचा!” ती विदिशाला हिणवत म्हणाली आणि विदिशाचा चेहरा खर्रर्रकन उतरला. ती रागानेच तिच्या घरातून अपमानित होऊन निघून गेली.
आणि विदिशाच्या आयुष्य सुरू झाली जीवघेणी तुलना!
ती रूपवान होती! गुणवान होती! सुसंस्कृत होती! पण आज तागायत तिच्या संसारात ती असमाधानी राहिली.

ती सतत दुसऱ्याशी धृवची आणि स्वतःच्या संसाराची तुलना करत राहिली. ज्या वेळी धृव ती तुलना करत असलेल्या व्यक्तीच्या पुढे निघून जाई तेंव्हा ती त्याच्या वरचढ दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करत असे!
घरात ही दुसऱ्या कोणी एखादी वस्तू आणली किंवा सोसायटीमध्ये कोणी नवीन दागिना केला की ती वस्तू तो दागिना तिला हा हवाच असायचा!
धृव आज स्वतःच्या मेहनतीने त्याच्या कंपनीमध्ये एक उच्च पदस्त अधिकारी होता. त्याला गलेलठ्ठ पगार होता! घरात सगळ्या सुख-सोई!

तिच्या मुली एका नामांकित शाळेत शिकत होत्या! दारात चारचाकी होती! हातात हवा तितका पैसा, दागिने,कपडे! धृव सारखा प्रेम करणारा नवरा!
अगदी सगळी सुख तिच्या पायाशी होती पण विदिशा मात्र असमाधानी होती.
तिच्या याच वृत्तीमुळे धृव मात्र भरडला जात होता पण तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते.
तिला कायम  दुसऱ्या पेक्षा जास्त हवे असे! आज ही तिच्या कीटी पार्टी मधील मैत्रिणीने कसलासा चार तोळे सोन्याचा हार तीन महिन्यापूर्वी  घेतला होता आणि तेंव्हा पासून तिने धृवच्या मागे भुणभुण लावली होती.

तरी त्याने तीन महिने तिला पन्नास हजार करून हार घेण्यासाठी  दीड लाख दिले होते पण तो या महिन्यात पैसे देऊ शकत नव्हता. कारण विदिशाला देखील माहीत होतं! तिला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं.
म्हणूनच तिने आज धृव ऑफिसला जाताना त्याच्याशी भांडण केले होते.
या सगळ्याचा परिणाम मात्र धृवच्या तब्बेतीवर झाला होता. आता तिला धृवला या अवस्थेत पाहून  तिच्या वागण्याचा  पश्चात्ताप होत होता.

ती हादरून गेली होती. धृवला गमावण्याच्या विचारानेच ती कासावीस होत होती. स्वतःलाच दोष देत होती. पण व्हायचे तेव्हढे नुकसान मात्र झाले होते.
ती या सगळ्या विचारात होती आणि धृवच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्या स्पर्शाने ती भानावर आली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली.
त्या तिला काही बोलणार तो पर्यंत O. T. चे दार उघडले आणि डॉक्टर बाहेर आले.
ते पाहून विदिशा पळतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारले.

विदिशा,“ डॉक्टर धृव कसा आहे तो ठीक आहे ना?”तिने काळजीने विचारले.
डॉ.चव्हाण,“Mr. सरनाईकांची सर्जरी सक्सेसफुल झाली आहे तरी चोवीस तास त्यांना अंडर ऑब्जरवेशन ठेवावं लागेल ते आमच्या ट्रिटमेंटला कसा रिस्पॉन्स देतात त्यावर सगळं अवलंबून आहे!” ते म्हणाले.
धृवच्या आई-बाबा आणि  वेद(भावाने) धृवला पाहिले. वेदने आईला मुलींकडे घरी पाठवून दिले.
प्रशांत आणि रश्मी तेथेच होते बाकी धृवचे सहकारी मित्र घरी गेले.

रश्मीचा नवरा  श्रेयस ऑफिसमधून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
विदिशा मात्र खूपच अस्वस्थ दिसत होती म्हणून मग श्रेयेसने  कँटीन मधून दूध आणि  पाणी  रश्मीच्या हातात दिले आणि इशाऱ्यानेच विदिशाला पाज असे सांगितले.
असं ही विदिशाने  सकाळ पासून काहीच खाल्ले नव्हते. जेवायला बसली आणि प्रशांतचा फोन आला. आता रात्रीचे दहा वाजत आले होते.

म्हणून मग रश्मी  तिच्या जवळ दूध आणि पाणी घेऊन गेली आणि ती म्हणाली.
रश्मी,“विदि हे घे पाणी पी आणि मग हे दूध घे तू सकाळ पासून काहीच खाल्लेले दिसत नाही हे तरी घे!” ती काळजीने म्हणाली.
विदिशा,“ नको मला रश्मी!” ती म्हणाली.
रश्मी,“ अग पाणी तरी घे!” ती पाण्याची बाटली पुढे करत म्हणाली.
विदिशा,“ नको मला;माझ्या  धृवने ही सकाळ पासून काही खाल्ले नाही रश्मी!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
या तिच्या उत्तरावर मात्र रश्मी निरुत्तर झाली. तिचे डोळे भरून आले. ती विचारात पडली की विदिशा धृववर किती प्रेम करते!

धृवने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि तो दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास शुद्धीवर आला. सगळे I. C. U.च्या बाहेरच बसले होते.
नर्स आत धृवची ड्रीप बदलायला गेली आणि त्याने अर्धवट डोळे उघडलेले पाहून ती डॉक्टरांना घेऊन आली.
डॉक्टरांनी त्याला तपासले आणि बाहेर आले.
विदिशा,रश्मी, श्रेयस,वेद आणि धृवचे बाबा डॉक्टर काय सांगणार याची वाटच पाहत उभे होते.

डॉक्टर,“ he is all right now! धोका टळला आहे. तुम्ही त्यांना एकेक करून भेटू शकता.त्यांना सूप द्यायला हरकत नाही. मिसेस सरनाईक तुम्ही त्यांना भेटून माझ्या केबिन मध्ये या तुमच्याशी सविस्तर बोलायचे आहे!” ते असं म्हणून निघून गेले.
सगळे त्याला जाऊन भेटले शेवटी विदिशा गेली. तिने कसे बसे स्वतःचे अश्रू डोळ्यात थांबवून ठेवले होते. तिला पाहून धृव कसनुसा हसला. ती जवळ खुर्चीवर जाऊन बसली आणि म्हणाली.
विदिशा,“ कसं वाटतय तुला धृव आता?” तिने काळजीने विचारले.
धृव,“ मी बरा आहे पण तू इथे आहेस मग घरी श्रवू आणि सरगम जवळ कोण आहे? बाबा आणि दादा पण आलेत काय झालंय मला?आणि मी किती वेळ बेशुद्ध होतो विदि?” तो हळूहळू बोलत होता.

विदिशा,“ अरे हो  हो किती प्रश्न विचारशील जरा दम घे! श्रवू आणि सरगम जवळ आई आहेत त्या ही आल्या आहेत. पोरी शाळेला गेल्या आहेत आणि साहेब तुम्ही काल पासून बेशुद्ध होतात मग घाबरून बोलावले सगळ्यांना!” ती प्रयत्न पूर्वक नॉर्मल बोलत होती.
धृव,“ बाप रे इतके तास मी बेशुद्ध होतो! आणि मला माहित देखील नाही ” तो आश्चर्याने म्हणाला.तो पर्यंत प्रशांत सूप घेऊन आला आणि विदिशाच्या हातात देऊन गेला.
विदिशा,“ बरं जास्त बडबड करू नको हे सूप घे आणि आराम कर!” ती त्याला  सूप पाजत म्हणाली.

धृव,“ सॉरी विदू मी काल तुझ्यावर जास्तच चिडलो!” तो म्हणाला.
विदिशा,“I am sorry! बरं तू हे पी आणि आराम कर बाकी काही विचार करू नकोस!” ती आवंढा गिळत कसंबसं म्हणाली.
त्यावर धृवने नुसती होकारार्थी मान हलवली.विदिशा त्याला झोपवून बाहेर आली आणि तिला घेरी आली आणि ती तिथेच खुर्चीवर बसली. रश्मीने ते पाहिले आणि तिच्या जवळ येत म्हणाली.
रश्मी,“ मॅडम चला आता तरी निर्जल उपवास तोडा की नाही तर धृव बरोबर तुला ही एक बेड बुक करावा लागेल आम्हाला आणि धृवची सेवा तू करायची सोडून आम्हाला तुझी ही सेवा करावी लागेल! बरं तुझ्या धृवने सूप पिले ना मग आता सोडा उपवास!” ती मिस्कीलपणे म्हणाली.

विदिशा थोडीशी हसली आणि म्हणाली.
विदिशा,“ आता माझी खेचून झाली असेल तर आपण डॉक्टरांना भेटून मग जाऊ जेवायला! धृव झोपला आहे तो पर्यंत जेवून ही घेऊ!” ती उठून उभी राहत म्हणाली.
रश्मी,“ डॉक्टरांना नंतर भेटू आपण आधी जेवण करू असं ही धृव दादा आता सेफ आहे. तू चल!” ती असं म्हणून तिला ओढतच कँटीनमध्ये घेऊन गेली.
आठ दिवसानंतर  हॉस्पिटलमधून महिना भर बेड रेस्ट आणि बरीचशी पथ्ये सांगून त्याला घरी सोडण्यात आले.

सरगम आणि श्रविका तब्बल आठ दिवसांनी त्यांच्या डाडाला भेटून खुश होत्या. वेद आणि धृवचे आई-वडील ही खुश होते.
अर्थातच विदिशा खुश होती पण या आठ दिवसात तिने बरेच काही ठरवून ठेवले होते.
तिच्या मनात अपराधीपणाची भावना मात्र घर करून राहिली होती.
वेद गावाकडे निघून गेला.
धृवचे आई-बाबा विदिशाच्या मदतीसाठी तिथेच राहिले होते.

सरगम आणि श्रविकाने त्याच्या डाडा वेलकम करण्यासाठी स्वतः ग्रीटिंग तयार केली होती.
विदिशा त्याला बेडरूममध्ये सोडून आली आणि कामाला लागली. असं ही तिन्ही सांजेची वेळ टाळून गेली होती आणि तिला स्वयंपाक करायचा होता.
धृवच्या आई  तिची मदत  करत होत्या.
विदिशाची कामे जरी यंत्रवत सुरू होती तरी तिचे मन मात्र सतत धृवकडे धाव घेत होते.

तिला धृवला कधी भेटेन आणि तिच्या मनातली सलत असलेली अपराधीपणाची भावना सांगून त्याची माफी कधी मागेण! तो आपल्याला माफ करेल का असे एक ना अनेक विचारांची वादळे तिच्या मनात घोंघावत होती.
तिने कशी बशी कामे उरकली सगळे जेवले. धृवला ही तिने जेवायला घातले आणि सगळी व्यवस्था लावून ती बेडरूममध्ये गेली तर धृव डायरी घेऊन कसला तरी हिशेब करत असलेला तिला दिसला.
विदिशा,“ तू आराम करायचा सोडून घरी आल्या आल्या हे काय घेऊन बसलास रे!” ती चिडून त्याच्या हातून  डायरी काढून घेत म्हणाली.

धृव,“ अग हिशेब करत होतो. एक तर माझ्या आजारपणामुळे सगळे बजेट कोलमडले आहे आणि तू हॉस्पिटलचे बिल कोणत्या पैशातून दिलेस ग? कारण माझ्या मोबाईलवर पैसे काढल्याचा कोणता ही मेसेज नाही.” तो म्हणाला
विदिशा,“ काही बजेट वगैरे बिघडत नाही! आणि तुला कशाला रे चौकशा?” ती पुन्हा चिडून म्हणाली.
धृव,“ एक मिनिटं तू मी तुला हार घेण्यासाठी दिलेले पैसे हॉस्पिटलमध्ये भरलीस की काय? विदू ते पैसे मी तुला दिले होते ना आणि या महिन्याचा पगार जमा झाला आहे की! त्यातून भागवायचे बिल आता तुला अजून थांबावे लागणार!” तो तक्रारीच्या सुरात म्हणाला.

विदिशा,“ नको आहे मला हार वगैरे काही!” ती डोळ्यातले पाणी लपवत म्हणाली.
धृव,“ अचानक  काय झालं तुला गेले तीन महिने माझ्या मागे भुणभुण लावली  होतीस की!” तो म्हणाला.
विदिशा,“ हे तू मला विचारत आहेस अचानक काय झाले म्हणून अरे तुला इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आला होता! मरणाच्या दाढेत पोहचला होतास तू! त्या सगळ्याला कुठे तरी मीच जबाबदार आहे! मला काहीच नको आहे धृव मला फक्त तू हवा आहेस!” असं म्हणून ती त्याला मिठी मारून रडू लागली.
धृव,“ काही तरीच काय बोलतेस विदिशा!असं काही नाही उगीच मनात भलते सलते काही आणू नकोस! बरं आपण नंतर काही तरी घेऊ तुला! मी काय म्हणतो की मी ना अजून आठ दिवसांनी ऑफिस जॉईन करेन या लॉक डाऊनमुळे खूप सारी कामे पेंडिंग आहेत माझी आणि या काळात खूप आर्थिक नुकसान झाले आहे. वर्क फ्रॉम होम होत पण  20% पगार कापला गेला आठ महिने! त्यामुळे पुढचे नियोजन फिसकटले! फोर बी. एच . के फ्लॅट घ्यायचा आहे मुलींच्या शिक्षणाची तरतूद करायची आहे तुझ्या-माझ्या म्हातारपणाची सोय! आणि समजा मला काही झालेच मी राहिलोच नाही तुमच्या बरोबर तर! तुमच्या तिघींचे भविष्य सुरक्षित करायचे आहे मला!” तो भडाभडा बोलत होता.

हे सगळं ऐकून विदिशा  आता अजून  चिडली.
विदिशा,“ काही तरी अभद्र बोलू नकोस धृव आम्हा तिघींना सुरक्षित भविष्य नाही तू हवा आहेस समजलं का तुला? आणि अजून मोठ्या फ्लॅटची आपल्याला पाच वर्षे तरी गरज नाही अजून पोरी इतक्या ही मोठ्या नाही झाल्यात आपल्या सध्या आपल्याकडे घर आहे आणि मुलींच्या शिक्षणाची सोय होईल! सरगम आत्ता पाचवीत आहे आणि श्रविका तिसरीत अजून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण व्हायला अवकाश आहे तो पर्यंत होईल काही तरी आणि आपल्या भविष्याची तरतूद मी करेन! इतकं हॉटेल मॅनेजमेंट केलं केक बनवण्याची कला आहे माझ्याकडे पण मी त्याचा उपयोग काय केला? अख्ख्या सोसायटीला केक फ्री बनवून देते मी इथून पुढे मी ते विकणार आणि ऑनलाईन आणि घरी क्लासेस सुरू करणार आहे मी केक मेकिंगचे! तुमच्या तिघांचे रुटीन डिस्टर्ब न करता! त्यातून आपल्या भविष्याची तरतूद होईल तुला काळजी करायची गरज नाही!कळलं का?” ती त्याला समजावत म्हणाली.

धृव,“ बाप रे आठ दिवसात इतकं सगळं प्लॅनिंग! मी तुला आधी ही सांगितले आहे मी काम करतो आहे तुला इच्छा नसेल तर नको करुस आणि नसती कटकट कशाला मागे लावून घेते आहेस?” तो म्हणाला.
विदिशा,“  तू स्वतःकडे लक्ष दे धृव आणि कोणत्याही गोष्टीचा विचार नको करुस आणि डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय  तू ऑफिसला जाणार नाहीस! मी तुझी सिक लिव्ह तुझ्या बॉसकडून मंजूर करून घेतली आहे सोड ते सगळं मला तुझ्याशी बोलायचे आहे!” ती त्याचा हात धरून म्हणाली.
धृव,“ बोल?”

विदिशा,“ I am sorry dhruv! मी बायको म्हणून कमी पडले! मी तुझा विचारच केला नाही तुला त्रास होत आहे हे जाणवले देखील नाही मला! मी आपली तुला नुसती भांडत राहिले मला हे हवं आणि मला ते हवं सतत दुसऱ्याशी तुलना करत राहिले! स्वार्थीपणे वागत राहिले आणि तू सतत मला देत राहिला! तुला मी इतका त्रास दिला तुला हार्ट अटॅक आला!तू मरणाच्या दारात जाऊन पडलास! तुला काही झालं असत तर मी काय केलं असत हा विचारच करवत नाही मला! मला काहीच नको धृव फक्त तू हवास! Because I love you and I can’t live without you!तू आहेस म्हणून मी आहे हे आपलं घर आहे आपलं कुटुंब आहे पण तू नाहीस तर काहीच नाही धृव! मला इथून पुढे काही नको. मी नाही भांडणार तुझ्याशी!” ती रडत बोलत होती.

धृव,“ will you please shut up! कुठून भरला ग तुझ्या डोक्यात हा कचरा! मूर्ख कुठली! माझ्या नजरेतून बघ स्वतःला मग कळेल तुला तू काय आहेस! लग्न झाल्या पासून माहेरी दोन दिवसांच्या वर न राहणारी का तर माझ्या जेवणाची आबाळ होते! मला दोन गोंडस मुली देणारी त्याच्यावर चांगले संस्कार करणारी! माझा संसार एकटीच समर्थपणे चालवणारी! माझ्या आई-बाबांच्या डॉक्टर बरोबर कधी अपॉइंटमेंट आहेत ते लक्षात ठेवून त्यांना बोलावून घेऊन त्यांचा दवाखाना करणारी!  ते इथे नसले तरी त्यांना काय हवं नको याची काळजी घेणारी! माझ्या वेद दादाला पगार कमी आहे म्हणून मी नाही म्हणालो तरी त्याला पैसे पाठवणारी म्हणून माझ्या पेक्षा दादा-वहिनीला तूच जवळची वाटणारी! मी  ऑफिसचा स्ट्रेस घेऊन घरी येतो ना तेंव्हा माझ्या मागे पुढे रुंजी घालून मला खुश करणारी! तुझ्या  अत्तरिय श्वासाने माझ्या रात्री फुलवणारी! मला सगळ्या प्रकारचं सुख देणारी! स्वतः भांडली तर रात्री नटून माझी वाट पाहणारी माझ्या आवडीचे जेवण बनवणारी!

मी दोन दिवस बेशुद्ध होतो तर दोन दिवस  पाणी ही न घेणारी अशी आहे माझी बायको! या सगळ्या बदल्यात तिने माझ्याकडून काही अपेक्षा केली तर काय चुकलं अपेक्षा तरी काय एखादा दागिना एखादी घरगुती वस्तू बरं घरगुती वस्तू ती एकटीच नाही वापरत सगळ्यांचा सुविधेसाठी असते ती! दागिने घेते एकदा दोनदा घालते आणि मुलींच्या लग्नासाठी ठेवून देते त्यात ही तिचा स्वार्थ कमी आणि दूरदृष्टी जास्त असते! आणि माझ्या  आजारपणाच म्हणशील तर मलाच कळले नाही मला काय होतंय ते दोन दिवसा पासून छातीत दुखत होत माझ्या पण ऍसिडिटी असेल म्हणून मी बाहेर सोडा घेतला! मलाच कळले नाही तर तुला कुठून कळणार ग!खूप प्रेम करते ती माझ्यावर! खबरदार माझ्या बायकोला काही म्हणशील तर!” तो थोडा रागानेच म्हणाला आणि विदिशाने त्याला रडतच  मिठी मारली आणि त्याच्या ओठांचा ताबा घेतला.

बराच वेळ दोघे ही एकमेकांमध्ये विरघळत राहिले. विदिशा भानावर आली आणि त्याच्या पासून लांब होत म्हणाली 
विदिशा,“  बास झाले आराम कर! आणि एक मिनिटं तुला कुणी सांगितले की दोन दिवस मी जेवले नाही …..रश्मी ना?”ती विचार करून म्हणाली.
धृव,“ हो तिनेच सांगितले मला! दुसरं कोण सांगणार!” तिला जवळ ओढत तिच्या कानात  म्हणाला.
विदिशा,“ तरीच thanks Dhruva, for everything and being in my life!” ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली.
धृव,“ आता तू मला thanks म्हणार का!” तो तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सरकवत म्हणाला.
विदिशा,“ बरं ऐक ना!” ती हळूच म्हणाली.

धृव,“ बोल! अजून माझ्या बायकोला नावे ठेवायची राहिली आहेत का?” तो लटक्या रागाने म्हणाला.
विदिशा,“ नाही रे! तुला डॉक्टरांनी हवापालटासाठी कुठे तरी घेऊन जायला सांगितले आहे!” ती म्हणाली.
धृव,“ ते आणि कशाला? बरं मग गावाकडे जाऊया! एक तर या महिन्यात हॉस्पिटलचा खूप खर्च झाला आहे आणि मेडिसीन्स अजून किती दिवस आहेत काय माहीत!” तो म्हणाला.
विदिशा,“ गप्प बस गावाकडे जाऊया म्हणे! मी पुढच्या आठवड्याची महाबळेश्वरची सगळी बुक्कीग केली आहे आणि खर्चाची तू नको काळजी करू!” ती म्हणाली.

धृव,“ काय? आणि पैसे आणलेस कुठून?” तो जवळजवळ ओरडलाच!
विदिशा,“ ओरडू नकोस जागे होतील सगळे!तू मला घर खर्चाला जे पैसे देतोस ना त्यातले मी ढापून ठेवले आहेत. आत्ता पर्यंत चार लाख झाले आहेत त्यातलेच वापरले मी!तुझ्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी आणि तूला डायमंड  ब्रेसलेट  गिफ्ट करायला मी ठेवले होते” ती त्याच्या तोंडावर ठेवलेला हात काढत म्हणाली.
धृव,“ बाप रे काय काय करतेस ग तू! तू ढापुन चार लाख ठेवतेस आणि पन्नास हजारांसाठी मला भांडत होतीस!” तो तिला लटक्या रागाने म्हणाला
विदिशा,“ sorry ना मी ना इथून पुढे तुला नाही भांडणार!” ती कान धरून म्हणाली.

धृव,“पण तू भांडली नाहीस तर आयुष्य आळणी होईल  ग एडव्हेंचर नाही राहणार माझ्या आयुष्यात म्हणजे दोन महिने गेले की काय नवीन मागणी!असा विचारच पडणार नाही मला!आणि शिक्षा तर तुला मिळणारच!” असं म्हणून त्याने तिला अजूनच जवळ ओढले.
विदिशा,“ गप्प बस आलाय मोठा एडव्हेंचरवाला तुझ्या एडव्हेंचरने वीस वर्षाची कसर वीस तासातच काढली आहे! आता ना सगळंच बास झालं आणि झोप आता शिक्षा वगैरे नंतर पाहू आपण!” ती त्याला पाहत म्हणाली.
धृव,“ बरं झोपतो मी! पण शिक्षा पेंडिंग आहे तुझी लक्षात ठेव!” तो हसून म्हणाला
.संसाराच्या गाडीची दोन्ही चाके व्यवस्थित असली की संसार सुखाचा होतो पण कधी कधी एक चाक डगमगले किंवा इकडे तिकडे झाले तर दुसऱ्या चाकाणे त्याला सावरून घेतले पाहिजे.
©स्वामिनी(अस्मिता) चौगुले 
सदर कथा लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

3 thoughts on “दृष्टिकोन ( भाग २)”

Leave a Comment

error: Content is protected !!