कुडी

©अपर्णा देशपांडे
रखमा आणि दत्तू ची प्रचंड लगबग चालू होती . मागचा हौद भरणे ,सगळ्या प्लेट्स पुसून ठेवणे , शामियाना घातलेली जागा लख्ख झाडून ठेवणे …. खुर्च्या मांडून घेणे , पाहुण्यांची सोय लावणे ,एक नाही अनेक गोष्टी होत्या .
सगळीकडे स्वतः राबून जीव ओतून दम लागेपर्यंत दोघे कामं करत होते .
राहुल बाबाचं लग्न म्हणजे आपल्याच घरचा सोहोळा की ! हीच दोघांचीही भावना .

देशमुख साहेब आणि मॅडम पण त्यांची खूप काळजी घेत .
राहुलच्या लग्नानिमित्त सगळ्यांनाच कपडे केले होते . 
छोटी राधा आणि राघव तर आनंदाने फुलले होते नुसते . ते दोघे देखील फुलं तोडून देणे , गजरे करणे , बागेला पाणी घालणे असे त्यांच्या आवाक्यातील कामं करतच होते .
लग्नाच्या आठ दिवस आधीपासूनच चौघेही बंगल्यावरच जेवत . घरी अजिबात चूल पेटवायची नाही , इथेच जेवायचं अशी प्रेमळ ताकीदच होती मॅडम ची .

” आज लईच कंबर दुखतेय वो .” रात्री दमलेली रखमा म्हणाली .
” अग वीट गरम करून शेक ! बरं वाटल . आता लगीन झाल्या बिगर दुखते म्हणायचं नाही . आपल्याला साहेबांनी मोटी जबाबदारी दिलीये ना .”
” बापू , राहुलदादा म्हणत होता की तिथे खूप छान छान आइस्क्रीम , केक् , आन काय काय असेल .” राधा म्हणाली
” हे बघ राधे , तिथे आधाशासारखे करायचे नाही बरं ! ” राघव तिला समजावत म्हणाला .
” झोपा रे आता , सकाळी लवकर उठायचंय .” रखमा म्हणाली .

लग्नाचं वऱ्हाड गोव्याला जायचं होतं . सुनबाई गोव्याच्या होत्या .
” साहेबांचे व्याही ब्रिग्यांझा साहेब तिथले मोठ्ठे ‘हापिसर’ हाईत बरं ! ” भेटेल त्याला मोठ्या कौतुकाने दत्तू सांगत होता .
दोन आलिशान बस भरून पाहुणे कोल्हापूर वरून निघाले . 
रखमा आणी दत्तू सामान उचलणे , खाद्य पदार्थांचे खोके भरणे हे सगळं जातीने बघत होते . रखमा तर मॅडम चा उजवा हात होती . त्या ही तिच्यावर काम सोपवून निर्धास्त होत्या .

राधा आणि राघव पण बस मध्ये बसून कुतूहलाने सगळे बघत होते . त्यांनी ह्या आधी समुद्र कधी बघितलाच नव्हता .राहुल दादा ने पोरांना जेव्हा समुद्रा बद्दल सांगितले होते ,तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नेमके चित्र येईचना . मग दादाने मोबाईल मध्ये खूप सारे फोटो, व्हिडिओ दाखवले समुद्राचे . राधा तर नाचायला लागली .
नदी शांत वाहते आणि समुद्र असा शांत नसतो , एव्हढे तिला नक्कीच कळाले होते . गोव्यात प्रवेश करतानाच पोरांना समुद्र दर्शन झाले . ते डोळे भरून बघत होते . त्यांची नजर हटतच नव्हती तिथून .

गाड्या लग्न स्थळी पोहोचल्या .
डोळे दिपतील असा उंची थाट होता सगळा . प्रचंड मोठी जागा , त्यावर गुबगुबीत मखमली गालिचे ,अतिशय भारी फुलांचे ताटवे , कमानी , अत्तराचे फवारे , श्रीमंती ओसंडून वाहत होती .
सगळ्या व्हराडाची सोय समुद्रकिनारी पंचतारांकित हॉटेल मध्ये केली होती .
कडक पांढरेशुभ्र पोशाख घातलेले हॉटेल चे कर्मचारी अदबीने पुढे आले .
सगळे सामान वरती पोहोचवायला खास माणसे होती .

सगळ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले .
राहुल बाबा , साहेब , मॅडम यांना वेगळे आलिशान ‘ सूट ‘ देण्यात आले होते .
” रखमा , तू इथे माझ्या सोबतच थांब ग बाई ! आता नव्या सुनबाई आणि राहुल बाबा साठी खास पाहुणे येणार आहेत . तयार व्हायचंय मला . ” मॅडम म्हणाल्या .
रखमाचा जीव मात्र मुलांमध्ये अडकला होता .

एका छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत त्यांचे सगळ विश्व सामावले होते . हे इथलं जग , हा झगमगाट तर त्यांच्या स्वप्नापलीकडचा होता . त्यांचा इथे श्वास घुसमटत असेल ह्या भावनेने तिचे लक्ष उडाले होते .
” राहुल बाबा , पोरं दिसले का कुठे ? “
” दत्तू काका आहेत न बरोबर !! मावशी , तुम्ही काळजी नका करू . खाली खूप मोठी पार्टी आहे , तिथेच रमले असतील . “
” रखमा , ये ग लवकर .” हाक आली तशी ती धावतच गेली .
मॅडमच्या बहिणी, भाच्या सगळ्या उंची वस्त्र परिधान करून खाली जायची तयारी करत होत्या.

” रखमा , ही बॅग सांभाळ हं ! मी सांगितले की मला आणून देशील .हे बघ , ह्यात सुझान साठी घेतलेला डायमंड नेकलेस आहे …..तू …..रखमाच्या कानावर ते शब्द पडतच नव्हते ….
” अग कुठे लक्ष आहे तुझं रखू ? …मी कांय दाखवतेय ? ” मॅडम म्हणाल्या तशी ती दचकून भानावर आली .
एका नक्षीकाम केलेल्या सुंदर डब्यात लखलख चमकणारा हिऱ्याचा हार होता .
” किती छान हाय वो हे !! “
” अग , सुझान डायमंड शिवाय दुसरे कुठलेच दागिने घालत नाही न ! हे आता तु सांभाळ . बाकी सगळे पार्टी एन्जॉय करत असतील , मग तूच माझ्या कामाची न ! “

“पोरांचे बापू दिसले का वो ? “
” दत्तू ? तो साहेबांच्या सोबत असणार ग . त्याला आणि मुलांना सांग जेवुन घ्यायला बरं ! “
ती मॅडम सोबत खाली उतरली .
खाली जंगी पार्टी ची जय्यत तयारी होती . 
तिला साहेबांच्या मागे दत्तू दिसला . ‘ अग बया ! कसला साहेब दिसतोय माझा नवरा .’ तिला वाटले ह्याची तर नजरच काढायला पाहिजे …..” आवो , पोरं कुठाईत ? “

” ते खाली एक खोली दिलीय ना , तिथे असतील . “
” असतील म्हंजी ? तुम्ही न्हाई बघितले ? ” तिचा ठोका चुकला .
” जा लवकर !! मॅडम बोलावत्यात .” ती नाराजीनेच मागे वळली .
भव्य स्टेजवर दोन्हीकडची मंडळी , नवरा , नवरी ऊभे होते …त्यांचे काय काय चालू होते ….तिने काचेतून दुसऱ्या बाजूला बघितले . तिचे डोळेच दिपले ते पाहून .

असंख्य पदार्थ , पेय , केक्स , पुडिंग्स , आईस्क्रीमस काय काय ! तिला आठवले , राघव म्हणाला होता ,” आई , मला न , पिझ्झा खायचाय एकदा . जाऊ न आपण हॉटेल मध्ये . माझ्या शाळेतले मुलं नेहेमी खातात . “
” हो रं माझ्या राजा ! जाऊ हा , नक्की जाऊ , मी ह्या महिन्याच्या पगारातून थोडे पैसे बाजूला ठेवीन हा ! ” ते पैसे कधी बाजूला पडलेच नाहीत आणि
ती वेळ कधी आलीच नाही .
आज तिथे पिझ्झाचे असंख्य प्रकार होते … ‘पोरं ? कुठे हाईत माझे लेकरं ? ‘ तिला उन्मळून येत होते .

राहुल , सुझान वर पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू चा वर्षाव जात होता . ते सगळं नीट जपून ठेवायची जबाबदारी राखमावर होती . दत्तू पण सारखा इकडून तिकडे पळत होता .
सगळ्यांचे जेवण झाले . भेट वस्तू नीट लावून ठेऊन, रखमा भिरभिर फिरत मुलांना शोधू लागली. रडकुंडीला आली असतांना तिला बस ड्रायव्हर दिसला .
” दादा , पोरं दिसली माझी ? “
” ते काय आत झोपलीत ! “

” झोपले ? आन जेवण ? “
” मावशी , इथलं एक जेवण कितीला पडते माहितेय का ? “
” भरलेल्या डोळ्याने तिने फक्त सुन्नपणे पाहिले .”
” एकाचे सहा हजार लागतात !! आम्ही इथले सगळे ड्रायव्हर आणि हे पोरं ह्यांना तिकडं खाली राईस्प्लेट खायला नेलं हुतं . मी पांघरून दिलंय पोरांना , झोपलेत छान . चिंता नका करू . “

रखमा बसच्या मागच्या बाजूला बेंचावर जाऊन बसली . तोंडात पदराचा बोळा कोंबला , आणि हमसाहमशी रडली . ‘मॅडम खरं तर खूप काळी घेतात , पण आता इथं त्या पण पाहुण्यांचा की ‘ असे म्हणून तिने स्वतः ची समजून घालून घेतली . काहीच झाले नाही असे दाखवत पुन्हा मॅडम च्या कामाला जुंपली .
सकाळी चर्च मध्ये ख्रिश्चन पध्दतीने लग्न होते .

साहेबांनी दत्तूला बोलावले , ” दत्तू , तुम्ही चौघे भरपुर नाश्ता करून घ्या , आणि कोल्हापूर साठी आधीच निघा . आपली रमेश ची कार तुम्हाला घेऊन जाईल . रखमा , आमचा फोन आला की सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करून ठेव , आम्ही दुपारी उशिरा निघू .”
चौघे निघाले . त्या हॉटेलमधून बाहेर पडल्याबरोबर रखमा ने मोकळा श्वास घेतला .
कोल्हापुरात घरी गेल्याबरोबर म्हणाली ,
” तुम्ही सगळे हितंच थांबा ! ” आणि ती बाहेर गेली .

पंधरा मिनिटात दोन चार खोके घेऊन वापस आली .
तिने मुलांसाठी पीझ्झा , आईस्क्रीम अन काय काय आणलं होतं .
मुलं तर अत्यानंदाने पिझ्झावर तुटून पडले .
दत्तू काहीच न बोलता शांत बसला होता .

ती हात पुसत त्याच्याजवळ येऊन बसली .
” रखमे , तुझी एक सोन्याची कुडी कुठं गेली ? एकच हाय कानात . “
” आरं देवा !! लगीन घाईमध्ये कुठं पडली आता कसं शोधू ? ” ती कानाला हात लावत म्हणाली .
आपल्याला काही कळलंच नाही असे दाखवून दत्तू गालातल्या गालात हसला .
समाप्त
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
 साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

Leave a Comment

error: Content is protected !!