असं शेजार सुरेख बाई

© सौ प्रभा कृष्णा निपाणे
कदम ताई खूप अस्वस्थ होत्या, उद्या त्यांच्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहे हे त्यांचे मिस्टर विशाल यांनी सांगितले . कदम ताई खूप घाबरल्या. कारण मुलीने तिचे एका मुलावर प्रेम आहे आणि त्याच्या बरोबर लग्न करणार हे पंधरा दिवसापूर्वी आईला सांगितले होते.
तो काय करतो. त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती, आणि त्याचा फोटो दाखवला होता.
मुलगा हँडसमच होता. 

तिने हे ही सांगितले होते , आई तू हे बाबांना लवकरात लवकर सांग नाहीतर बाबा लगेच मुलांची रांग लावतील.
कदम साहेब जरा स्वभावाने कडक होते. त्यामुळे त्यांना कसे सांगू हा विचारच कदम ताई करत होत्या.
तोच कदम साहेब म्हणाले, “उद्या उमंगला मुलगा पाहायला येणार आहे.”
हे सांगताच उमंग बेडरूम मध्ये जाऊन रडायला लागली. 

कदम ताई तिच्या पाठोपाठ बेडरूम मधे गेल्या. 
“आई !  तुला किती दिवसापासून सांगते बाबांशी बोल या विषयावर ?  पण तू गप्प.  काही झाले तरी मी त्या मुलाला बघणार नाही.” 
“हे बघ, आता मुलगा येतोच आहे तर आपण बघण्याचा कार्यक्रम पार पाडू. मुलगा बघून गेला म्हणजे त्याला होकार दिलाच पाहिजे असे काही नाही. तुझ्या बाबांचा मुड बघून मी त्यांना सांगेन. पण तू उद्यासाठी तयार राहा. नाहीतर माझी खैर नाही.”
“काही झाले तरी मी उद्या मुलगा बघायला तयार होणार नाही. सांगून ठेवते !” 

कदम ताई, विनवणी करू लागल्या, “अग बाई ! अस काही करू नको. अग ! तुझ्या बाबांना कळले तर ते मला फाडून खातील ग! 
त्यांचा स्वभाव माहित आहे न तुला !” 
“म्हणूनच तुला आधीच सांगितले होते. आता तूच ठरव पप्पांना काय सांगायचे ते ?” मुलगी सुध्दा फार हट्टी होती.
आता कदम ताई सुध्दा रडायला लागल्या.  खूप विनंती केली त्यांनी उमंगला. 

उमंग काही केल्या उद्यासाठी  तयार होत नव्हती.
बेडरूम मधिल वादळ आता कधी बाहेर येईल याची शाश्वती नव्हती. 
उमंगची छोटी बहिण रूपा हिला याची खात्रीच पटली.
ती सुध्दा खूप घाबरली होती. रूपा, हळूच बेडरूम बाहेर आली. तिला माहित होते. उमंग कुणाचे ऐकणार नाही पण शेजारच्या गोखे काकुंचे नक्की ऐकणार.

खूप आदर करायच्या त्या दोघी गोखे काकूंचा. मुख्य म्हणजे गोखे काकु नेहमी त्यांच्या सोबत मैत्रिणी सारख्या वागत. त्यांचा हाच स्वभाव दोघी बहिणींना फार आवडायचा. 
म्हणूनच रूपाने ठरवले गोखे काकूंना सांगुया. त्या नक्की यातून मार्ग काढतील.
पप्पांचे तिच्याकडे लक्ष नाही हे पाहून तिने हळूच दार उघडले गोखे काकूंकडे गेली. 
घडलेला सगळा प्रकार काकूंना सांगितला. 

“काकु!  उमंग तुमच्या शिवाय कोणाचेच ऐकणार नाही. पप्पांना कळले तर आमची काही खैर नाही.
काकु प्लीज तुम्ही उमंग ला समजवा. 
काकु ! आई पण खूप रडते आहे.” 
“असे काही होणार नाही रूपा. तू घरी जा. मी आलेच. आईला सांग काळजी करू नको. ती उद्या नक्की तयार होईल.” 
थोड्याच वेळात गोखे काकु कदम ताई कडे पोहचल्या.

मायलेकी अजूनही रडतच होत्या.
त्या उमंग जवळ आल्या. उमंगने वर पहिले. 
गोखे काकूंना बघून दोघी मायलेकी डोळे पुसायला लागल्या.
“उमंग काय चालले तुझे हे ?”
“कुठे काय ?”
“मला रूपाने सगळे सांगितले.”
“काकु तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा.  काकु तुम्ही सांगा ना पप्पांना.”

“हो बाळा मी नक्की सांगेन .पण आज नाही.”
“काकु, मी आईला पंधरा दिवसापूर्वी सगळे सांगितले होते की माझे एका मुलावर प्रेम आहे, तू बाबांना वेळीच सांग. तिने अजून सांगितले नाही. उद्या मुलगा येतोय बघायला. मी काही झाले तरी याला तयार होणार नाही.”
काकूंनी तिला जवळ घेतले, “ये वेडा बाई मुलगा बघायला येणार म्हणून कोणी असे रडतात का? मला रूपाने सगळे सांगितले. तुला या मुलाशी लग्न करायचे नाही. बरोबर?”
“हो काकु”
“या काकुवर विश्वास आहे ?”
“हो काकु” 

“मग मी म्हणते तसे करणार ?” 
“हो करणार”
“मग उद्या मुलगा बघायला तयार व्हायचे.”
“काकु प्लीज. मला नाही करायचे त्या मुलाबरोबर लग्न. तो कितीही सुंदर आणि पैसेवाला असेल तरीही” 
“तुला कुठे म्हणाले मी त्याच्या सोबत लग्न करायचे म्हणून?”
“पण काकु त्या मुलाने होकार दिला तर ?” 

“तर , तुझ्या नकाराची जबाबदारी माझ्यावर.”
“काकु खरंच?” 
“हो बेटा अगदी खरं”
तिने गोखे काकूंना कडकडुन मिठी मारली. “थँक्यू काकु !” तिने डोळे पुसले. 
“काकु, तुम्ही म्हणताय म्हणून आणि तुमच्यावर विश्वास आहे म्हणून होते मी उद्यासाठी तयार. पण काकु पप्पांची अजून एक अट आहे की उद्या साडीच घालायची. मला नाही घालायची साडी. मी ड्रेसच  घालणार !”

“हे बघ बेटा,  तो मुलगा शहरात नोकरी करत असला तरी तो गावचा रहिवाशी आहे. शिवाय अजून ड्रेस वर मुलगी पाहणे ही प्रथा रुळायला थोडा वेळ लागेल. आपल्याला नकार जरी द्यायचा असला तरी , काही झाले तरी घराण्याचे नाव राखले गेले पाहिजे. नाही का? आपल्या मुळे आपल्या आईवडिलांना कधी कमीपणा येऊ देऊ नये !” 
“काकु काय हे ?” 
“ठीक आहे मग. तुला जे करायचे ते कर ! पुढची जबाबदारी मी घेणार नाही तुझ्या पप्पांशी पण बोलणार नाही ! येते मी !” 

उमंग ने काकूंचा हात धरला, “सॉरी काकू ! मी नेसते साडी पण माझी एक अट आहे.” 
“आता हे काय नवीन ?” 
“काकु अट काही फार कठीण नाही. फक्त उद्या मी जेव्हा बाहेर त्या मुलाशी बोलायला येणार तेव्हा तुम्ही माझ्या बाजूला बसायचे. तरच मी साडी नेसणार.” 
कदम काकूंनी आता डोळे पुसले म्हणाल्या ,”गोखे ताई तुम्ही बसा हिच्या बरोबर. काहीच हरकत नाही. फक्त उद्याचा दिवस कसाबसा काढून द्या. मी लवकरच बोलेन यांच्याशी.”

“ठीक आहे,” असे बोलून गोखे ताई हॉल मध्ये आल्या.
उमंगचे बाबा सोफ्यावर बसले होते.
गोखे काकु म्हणाल्या, “उद्या आपल्या उमंगला मुलगा बघायला येणार आहे असे कळले. रूपा आलेली मला बोलवायला, काकु साडी कोणती घालू हे उमंग तुम्हाला विचारते घरी चला.” 
“हो, मुलगा ME आहे. government जॉब आहे. गावी शेती, बंगला सगळ आहे. शिवाय एकुलता एक ! 

“अरे वाह! नशीब काढले म्हणायचे पोरीने.”
“हो ना! हे लग्न ठरले तर खरच नशीबच काढले म्हणायचे.”
“नक्की होईल हो ! आपली उमंग आहेच मुळात सुंदर. त्यात ती पण इंजिनिअर.”
“हो ना!” 
“चांगलेच होणार हो ! तुम्ही नका काळजी करू !”
“धन्यवाद गोखे वहिनी.”

दुसऱ्या दिवशी सकाळी  गोखे ताई लवकर उठल्या. सगळं आवरून कदम ताई कडे गेल्या.
उमंगला साडी नेसून दिली.
मुलगा आणि त्याचा मित्र आला होता बघायला. चहा पोहे झाले. नेहमी प्रमाणे प्रश्न उत्तर झालीत. 
जातांना तो बोलून गेला. मला मुलगी पसंत आहे. जमेल तसे लवकर आईबाबांना बोलवून घेतो. 
मुलगा गेला, आता गोखे काकूंनी कदम ताईंना सांगितले, “ताई तुम्ही तुमची देवपूजा करायला घ्या. मला भाऊजी सोबत थोडे बोलायचे आहे. तुम्ही असलात तर ते उगाच चिडतील.”  

कदम ताई पूजेला बसल्या. त्यांची आजची अवस्था मन देवळात चित्त बाहेरचे ऐकण्यात अशी होती.
गोखे काकूंनी बोलायला सुरुवात केली, “काय मग मुलगा पसंत आहे का ?” 
“हो. हो. जरा सावळा आहे  पण जोडा शोभतो. तुम्ही मुलगा बघायला बोलवायच्या आधी उमंग ला विचारले होते का ?”
“तिला काय विचारायचे ?”
“अहो काय म्हणजे काय ? ती इंजिनिअर आहे. एका चांगल्या कंपनीत नोकरी करते. तिला कुणी मुलगा आवडत असेल तर !” 

“त्याच्याशी मला काही घेण देण नाही, मी काही तिचा दुश्मन नाही. तिच्या भल्याचाच विचार करणार.,” 
“बरोबर आहे भाऊजी. पण तरीही मुलगा बघायला यायच्या आधी उमंगला विचारायला पाहिजे होते.” 
“तुम्हाला का असे वाटते गोखे वहिनी ?” 
“कारण उमंगचे एका मुलावर प्रेम आहे. मुलगा खूप छान आहे. चांगला पगार आहे. वडील कॉन्ट्रॅक्टर आहेत. डोंबिवलीलाच राहतात.” 
“काय बोलता तुम्ही हे वहिनी?”

“खरे तेच बोलते.”
“मला हे चालणार नाही. जातीच्या मुलांची काही कमी नाही आमच्या समाजात.” 
“बरोबर आहे , जातीच्या मुलाची काही कमी नाही तुमच्या समाजात. मग मुलींची कमी होती का?” 
“नाही हो ! मुली पण भरपूर आहेत.”
“नक्की का ?”
“हो वहिनी .”
“मग २८ वर्षा पूर्वी तुम्ही का केले लव्ह मॅरेज ?”
“माझी गोष्ट वेगळी आहे.” 

“का ? तुमची गोष्ट का वेगळी ? तुम्ही पण प्रेम केले. तिने सुध्दा प्रेम केले. मग तुमचे पारडे जड का ? तुम्ही पुरुष आहात म्हणून? हे बघा भाऊजी, पोरीचे ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलाचा फोटो, तो काय करतो,  पगार सगळे बघा. तुम्ही तुमचा निर्णय असा मुलीवर लादू शकत नाही. अजून एक जर तुम्ही या लग्नाला परवानगी दिली नाही तर !!”
“तर काय ?????”
“तर मी आणि माझा नवरा आम्ही दोघे तिचे रजिस्टर लग्न करून देऊ.”

“काय ?” 
“होय ?”
“उमंगला आवाज द्या बरं” 
गोखे काकु वर जाऊन उमंगला घेऊन आल्या. येताना तिला थोड्या सूचना दिल्या. 
“उमंग ! 
“काय पप्पा ?”
“हे मी काय ऐकतो ?” 
“काय पप्पा ?” 
“तुझे एका मुलावर प्रेम आहे म्हणून सांगतात , काकु”.

“खरे आहे पप्पा”
“मला का नाही सांगितले?” 
“पप्पा !  भीती वाटत होती. सॉरी.”
“दाखव बर त्या पोराचा फोटो”
उमंग ने फोटो दाखवला. मुलगा खूपच छान होता. नोकरी पण चांगली होती. 
जरा चढ्या आवाजात म्हणाले, “तुला या मुलाशी लग्न करायचे आहे ?” 
“हो पप्पा !” 

“किती वर्ष झाले याला भेटते ?”
” आठ नऊ महिने झाले.” 
“आईला माहित आहे ?” 
“नाही! फक्त काकूंना सांगितले होते.”
“हो हे मला काकूं कडूनच समजले.”

“मग आता पुढे काय करायचे?”
“पप्पा मला या मुलासोबत लग्न करायचे.” 
उमंगच्या बाबांचा आवाज जरा मृदू झाला,”मग कधी आणतेस भेटायला तुझ्या हिरोला ?”
उमंग आश्चर्याने पप्पा कडे पाहत राहिली.
“नाव काय ग त्याचे ?”
“अमित साळवे.”
“म्हणजे महाराष्ट्रीयन.”
“होय पप्पा.” 

“ठीक आहे ! तु अस कर, आज रविवार आहे. त्याला सांग आज संध्याकाळी सहा पर्यंत ये. तो फोन आण इकडे.” 
कदम साहेबांनी फोन घेतला, नंबर डायल केला आणि त्या पहायला आलेल्या मुलाच्या वडिलांना गावी नकार कळवला. 
फोन वरचा संवाद ऐकून उमंग ने पप्पांना मिठी मारली. म्हणाली ” Love You Pappa. “
कदम ताई वरवर करत असलेली पूजा बंद करून बाहेर आल्या.
मि. कदम त्यांच्या कडे बघून म्हणाले, “तुमच्या पोरीचे कारनामे माहित आहे का ?”
“का काय झाले ?”

“अहो, ती एका मुलावर प्रेम करते.” 
“काय बोलताय? नाही मला काहीच कल्पना नाही हो! तुम्हाला आता बोलली का ती ?” 
“ती कसली बोलते? तिच्या ह्या लाडक्या काकु आहेत न, त्यांनी सांगितले ! सांगितलेच नाही तर, तर माझे डोळे सुध्दा उघडले.”
“काय ?”
कदम ताई काहीही माहीत नसल्याचा आविर्भाव करत  गोखे बाईंना म्हणाल्या.  “गोखे ताई तुम्हाला हे माहित होते का  हो ? मला ही काहीच नाही बोलली.”
“अहो मागच्याच आठवड्यात बोलली ती. मला म्हणाली, काकु माझी आई पप्पांना सांगायची हिम्मत होत नाही. तुम्हीच काहीतरी करा. नेमका आजचा मुहूर्त मिळाला.”

कदम साहेब म्हणाले, “गोखे वहिनी खूप खूप धन्यवाद ! खरच शेजारी असावे तर तुमच्या सारखे.”
कदम ताई पण हेच म्हणाल्या.
उमंगची लहान बहीण रूपा हिने गोखे काकुंचे हात धरले. म्हणाली thank you काकु. त्यांना धरून एक गोल गिरकी घेतली. 
म्हणाली, ” असं शेजार सुरेख बाई जन्मो जन्मी मिळावे.”
दोघी बहिणीन्नी काकूंना कडकडुन मिठी मारली
समाप्त
© सौ प्रभा कृष्णा निपाणे
सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

Leave a Comment

error: Content is protected !!