फ्रेंड रिक्वेस्ट

© सौ. प्रतिभा परांजपे
लग्नासाठी आलेले पाहुणे रवाना झाले. मुलगा, सून ही हनीमूनला गेले. घर ही आवरून झाले.
आले गेल्या कडून आलेले गिफ्ट आणि लिफाफे रिकामे करून झाले.
कोणी काय दिले काय नाही यावर बायकोचे रिमार्क्स ऐकून झाले.
एकूण किती खर्च झाला याची मोजदाद झाली. 
फराळाचे डबे  ही रिकामे होत आले.

घरा बरोबर मन ही रिकामे रिकामे वाटत होते, या दहा-बारा दिवसात एकटं बसायला असा वेळच मिळाला नव्हता .
आज अगदी निवांत वेळ आहे, म्हणून प्रमोद नी सहज मोबाइल हातात घेत  फेसबुक उघडले.
बऱ्याच फ्रेंड रिक्वेस्ट होत्या त्यात एक-दोन स्त्रियांच्याही होत्या. 
एका वंदना दिक्षित ची फ्रेंड रिक्वेस्ट, त्यांनी तिचा प्रोफाईल चेक केला. साधारण पन्नाशीच्या आसपास वय, दिसायला स्मार्ट, कुठल्यातरी कंपनीत नोकरी एवढीच माहिती इतर माहिती lock. 

प्रमोदना आश्चर्य वाटले.‌ या बायका प्रोफाइल अर्धवट लाॅक कां करतात? उगाचच पुरुषांना उत्सुकता.
गंमत म्हणून प्रमोद नी रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. तशी थोड्याच वेळात थँक्स आले.
आता रोज फेसबुकवर पाहताना प्रमोद  मेसेंजर चेक करू लागले .
कधी गुड मॉर्निंग, तर कधी गुड नाईट, असे करत करत गाडी पुढे सरकू लागली.

एक दिवस गंमत म्हणून प्रमोद ने गुड इविनिंग बरोबर चहा, स्नॅक्स असा फोटो टाकला.
तिकडून वंदनाने ही गुड इव्हिनिंग व थँक्स पाठवले.
दोन दिवसानंतर प्रमोदने चुकून परत—- संध्याकाळी गुड इविनिंग — बरोबर तोच फोटो पाठवला.
तशी तिकडून, ‘रोज हेच खायचं …?’ असा मेसेज आला.

प्रमोद उडालेच–बापरे , ‘पण मग आज खाऊन घ्या— उद्या दुसरा पाठवीन’ असा रिप्लाय दिला.
तशी तिकडून, लाडीकपणे लिहून आले ‘आज भूक नाही.’
‘हाय, किती नखरे हे'”—मनातून तरुणाई सारख्या गुदगुल्या प्रमोदना होऊ लागल्या.
आता गाडी ट्रॅक बदलू लागली.
मुलगा व सून ह्यांचा हनीमूनहून परतीचा दिवस आला.

बायकोच्या सूचना सुरू झाल्या, “अहो, त्यांची खोली पहा ना जरा, स्वच्छ आहे ना ?”… “आणि आता ज-रा,…..मला थोडी मदत करा, काय सारखं मेला फोन घेऊन बसता?– आणि हो– आज लवकर झोपू या सकाळी लवकर उठायचे आहे…..”
प्रमोद जरा चपापलेच.
‘उगीच हिला कळायला नको.’ म्हणत बायको ची इच्छा प्रमाण, मानून दहा वाजताच गुड नाइट चा पडदा टाकून प्रमोद झोपायला बिछान्यात गेला.

रात्री मध्ये झोप उघडली तेव्हा हळूच फोन चेक केला तर, ‘अजून कुठलीझोप,– हीच वेळ तर आवडीच्या लोकांशी बोलायची’ —- असा मेसेज!!
मग प्रमोदनी “अर्ली टू बेड”   —-असा बाळबोध मेसेज दिला मारून.
सकाळी मुलगा ,सून घरी परतले .त्यांचे जंगी स्वागत बायकोने अगदी वेलकमच्या रांगोळीने केले. 
दिवसभर मग गप्पा आणि खाणेपिणे.
बायको तर अगदी उत्साहाने भरून गेली होती.

सुनेला कुठे ठेवू नी काय करू असे झालेले दिसत होते.
मुलगा, सून यांचा हनिमून पाहून प्रमोद ना ही थोडं थोडं गुलाबी गुलाबी वाटत होते ,पण बायको मात्र ढिम्म मग काय करणार?
शेवटी  दुधाची तहान— फोन अ फ्रेंड, केला तिला मेसेज.
एक दिवस — ‘तुमच्या काय Hobbyआहेत ?’ असा प्रश्न आला.

‘अरे बापरे  हे असले बाळबोध प्रश्न ?’ प्रमोद ना वाटले.
सो बोरींग यार, घरी बसून कंटाळा येऊ लागला. ही रिटायरमेंट भारी पडणार दिसते .कामावर जायचो तेच बरे होते. Hobby चा विचार करायला वेळ कुठे?
त्यांनी तिच्या प्रश्नाला कल्टी मारली आणि एक गाणे अगदी शम्मी कपूरच्या स्टाईलचे दिले पाठवून.
तिकडून ही लगेच साधना स्टाईल गाणे.

लवकरच संक्रांतीच्या सण आला “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”चे मेसेज, तिळाचे लाडूंचे  फोटो “, यांनी एफ.बी.रंगून गेले.
त्यातीलच एक फोटो त्यांनी सर्व फ्रेंड्स ना दिला टाकून.
तिला ही स्पेशल.
तिकडून पतंगाचा फोटो व खाली मोठ्ठा मेसेज…
‘पतंगबाजी का  शौक बचपन का, नही भुला साथी पचपन का.
कभी तो ढील दो मांजे को, तो कभी डोर खींच लेते हो…. थोड़ी उड़नची दी, और कभी छोड़ दिया हवा के भरोसे?’

‘म्हणजे मी काय केले?’—- प्रमोद. जरा चक्रावले.
‘अभी भी नही समझे?’ .. ती.
‘तुम्ही समझाओ ना.’
‘किती दिवस झाले? काही मेसेज नाही, कशी चैन पडेल’

‘कधी श्रावणातल्या मेघासम बरसतो कधी वळवाच्या सरी सारखा दोन थेंब टाकून, तृषा वाढवतो-‘—  ती
बापरे–प्रेमातच पडली दिसते, कविता काय शेर काय? आपल्याला हे प्रकरण जरा न पेलवणार दिसतंय.
प्रमोद ना आता वाटायला लागलं — पतंगाचा धागा गुंडाळायला हवा. नाहीतर घरातून “कटी पतंग” होईल….
“अहो–जरा तुमचा फोन देता कां-“–बायकोने गुगली टाकली.

“कां ग ?”
 “अहो, संक्रांतीचे हळदीकुंकू करायचे आहे म्हणून निमंत्रण पाठवायचे होते, माझ्या फोनचा रिचार्ज संपला आहे…..”
“दे मी करून देतो रिचार्ज….” प्रमोद ने स्री सौजन्य दाखवले.
“हो ,पण मला जरा घाई आहे . द्या ना जरा” म्हणून बायकोने फोन जवळजवळ हातातून खेचूनच घेतला.
पूर्णवेळ मनात धुक-धुक होती, कुठे हिची नजर नको पडायला.. मेसेंजर लाॅक नाही केला.

हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी दणक्यात झाला.
दोन दिवस खूप बिझी गेले.
बायकोही छान नटली होती, काळी साडी काय. खूप दिवसांनी सुनेबरोबर सासू…. असे बरेच फोटो काढून झाले.
 “तू— छान दिसतेस ग ,–अजूनही.” प्रमोद ची लाडीगोडी
“इश्श”,

प्रमोद तर सपशेल चारो खाने चित. मग दोन दिवस ते बायकोच्या मागेपुढे ,बायकोही थोडी मेहरबान होती.
दोन दिवसात खूप से मेसेज, बापरे —भलतीच वेडी दिसते, नवरा वगैरे नाही वाटतं हिला.
काय करावे बरे? एकदम तोडणे हि बरे नाही, आणि वाढवून अंगचटीला यायला नको…
“अहो–आपल्या लग्नातला अल्बम काढून द्या ना ,तो– वर पेटीत ठेवला आहे.” बायकोने ऑर्डर सोडली.
आता त्या काळ्या -पांढर्या फोटो मध्ये काय पहायचं आहे पण बायको ची  आज्ञा सर आखों पर….. .

सगळ्यांचं अल्बम पारायण यथासांग बायकोच्या कमेंट्री सहित झाले. 
सगळे नातेवाईक, जुने नवीन कोण, कसे त्याबद्दल सगळ्या माहिती सकट फोटो दाखवून झाले .
त्यानंतर तो अल्बम एका बाजूला पडला…..
आता हा ठेवायची जबाबदारी पण आपलीच असे समजून तो अल्बमसहज चाळायला म्हणून घेतला प्रमोदनी,

आणि त्यांत वसंत काका — बाबांचे धाकटे भाऊ — यांचा फोटो दिसला. 
काकांचा हा या वयात ला फोटो काका बरेचसे प्रमोद सारखे…. म्हणजे प्रमोद काकांसारखेच दिसतात असे सर्वजण म्हणतात.
70 ते 75 वर्षाचे काका ,त्यांचा फोटो पाहून प्रमोद च्या डोक्यात एक आयडिया आली.
त्यांनी त्या फोटोला मोबाइल वर घेऊन थोडा एडिट करून वेगळा केला व मेसेंजर वर तिला पाठवला.

हा माझा रिसेंट फोटो, फेसबुक चा डीपी वर चा फोटो तो खूप जुना आहे.
दोन दिवस काहीच रिप्लाय नाही, चला मात्रा लागू पडली…
पण मनातून चैन पडत नव्हते
दोन दिवसांनी एका वयस्कर स्त्री चा फोटो मेसेंजर वर तिने पाठवला.
खाली कमेंट  ‘हा माझा रिसेंट फोटो ……गुड बाय प्रमोद’

आता प्रमोद चारो खाने चित……. 
दोन दिवसांनी तिकडून अनफ्रेंड आणि मेसेंजर Lock लिहून आले.
प्रमोद  ना एकीकडे सुटल्यासारखे तर दुसरीकडे ‘जशास तसे’असे जाणवले….
असो, यातून काय शिकायचे ?
प्रमोद  ने ठरवले आता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना डी.पी.वर कपल चा फोटो असेल तरच भानगडीत पडायचे.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!