सीमोल्लंघन

© समीर खान.
सुमी घरात आली तेव्हा घरात धीरगंभीर वातावरण होतं. आईचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे झालेले होते तर शेजारच्या रमाकाकू आईजवळ बसल्या होत्या. रमाकाकू सहसा घरात वरचेवर येत नसत. काही खास कारण असले तरच येत असत. ईतर शेजाऱ्यांची तर तशी काही शक्यताच नव्हती.
कारण सुमीच्या आईचा स्वभाव थोडा कडक होता नव्हे तो सुमीच्या वडिलांनी म्हणजेच अण्णांनी तो तसा बनण्यास भाग पाडला होता. अण्णा म्हणजे जगदम्नी चा अवतार. सरकारी विभागात कारकून. प्रामाणिक, तत्वनिष्ठ व तितकाच तिरकस स्वभाव. २५ वर्षांचे शेजारी म्हणून रमाकाकू फक्त बिनदिक्कत या घरात येत असत. बाकी कुणी तसा प्रयत्न ही करत नसत.

या घरात होतं तरी कोण? सुमी आणि तिची आई! अण्णा देवाघरी जाऊन आता चार पाच वर्षे झाली होती. एक बहीण होती ती नाशिकला होती. वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी आलेली ती नंतर आलीच नाही. असंही ती कधी घरी येत नसत.
सुमी वडिलांच्याच जागेवर नोकरीस लागली होती. एक भाऊ ही होता सुमीला पण अण्णा होते तोपर्यंत त्याचा विषय निघाला की आई कमालिची अस्वस्थ होत असे.
तो लहानपणीच वारलाय ईतकंच सुमीला ठाऊक होतं. अण्णा गेल्यानंतर ही एकदोनदा सुमीने हा विषय आईकडे काढलेला.. तीच भयंकर अस्वस्थता.. त्यानंतर सुमीने विषयच काढणं सोडून दिले. ल्ल

घर, आई, आॅफिस या चौकटीत तिने स्वतःला झोकून दिले. मागील चार पाच वर्षे अण्णा गेल्यानंतर सुमीच्या ह्या दैनंदिनीत काहीच बदल नव्हता. असे असले तरी इतक्यात सुमीच्या आईला सुमीची लग्नाची चिंता लागून राहिली होती.
सुमी आता पंचविशीत आली होती. गुरूजींना व काही जुन्या जाणत्या मंडळींना मध्यस्थी घालून एक दोन स्थळ पाहूनही गेले होते. सुमी मात्र निवांत होती. तिला वाटायचं आईची जबाबदारी फक्त तिचीच आहे. बहिणीने आईकडे लक्ष देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. लग्न ज्या घरात होईल तिथे तिला या जबाबदारी सहित स्विकारावं अशी तिची अपेक्षा होती आणि ही अपेक्षा रास्तच होती.

परवाच पाहून गेलेल्या मुलाकडील मंडळींचा काहीतरी निरोप आला असावा आणि त्यानंतरच आईची ही अवस्था झाली असावी हे चाणाक्ष सुमीने पटकन ओळखलं. सुमी आत घरात आल्या आल्या आई आणि रमाकाकू काहीसे सावरून बसले. 
“काय झालं आहे आई? काही सांगशील? “
“काही नाही तू तोंड, हात पाय धुऊन घे मी चहा ठेवते” बोलत आई ऊठली.
“मला काही झालं नाहीये, सांगितलं ना तुला सुमे? “
रमाकाकू तितक्यात येते मी म्हणत जाऊ लागल्या तोच सुमीने त्यांना थांबवून घेतलं. 

 ” थांबा काकू, तुम्हीही या घरातल्याच आहात. तुमच्याकडून काहीही लपून राहिलेले नाही. तुम्ही सांगा काय झालं ते? त्या स्थळाचा नक्कीच काहीतरी निरोप असणार आहे. नाकारलं असेल त्यांनी माझी अट पाहून पण याने काहीच फरक पडत नाही.
ज्यांना ही अट मान्य असेल त्याच ठिकाणी मी लग्न करेन आईला मी एकटी सोडणार नाही. “
” अगं पण… ” काकू मधेच अडखळल्या.
“तुम्ही सांगणार आहात का? की त्यांना फोन लावून विचारू मी ” सुमीचा पारा चढला होता. 

” नकारच आलाय.. पण त्यांना अट मान्य होती. कारण वेगळेच होते. ” गडबडीत काकू बोलून गेल्या पण त्यांचा चेहरा पांढराफटक पडला. 
” काय? ऽऽऽऽऽ” सुमी जवळ जवळ ऊडालीच. 
“मग काय कारण दिलं त्यांनी? ” सुमीचे प्रश्न वाढत होते तशी काकू व आईची चुळबूळ वाढली.
आता सर्व सांगणं भागच होतं त्याशिवाय त्यास गत्यंतर नव्हते.
कारण सुमीने त्या मंडळींकडे फोन लावला असता जे बरं दिसणार नव्हतं. 

“तूच सांग रमे, तूच सांग सर्व ” म्हणत आई रमाकाकू शेजारीच मटकन खालीच बसली.
सुमी कानात प्राण आणून ऐकत होती. 
” तुझा जो लहानपणी भाऊ वारलाय तो जिवंत आहे.” काकू खोल ऊसासा सोडत बोलू लागल्या.
सुमीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तर ईकडे आईचीही अवस्था तीच होती. 
” पुढे ऐक.. तो भाऊ नव्हता तुझा.. बहीण होती. “

 एकापाठोपाठ एक धक्के ऐकून सुमी सुन्न झाली होती.
” पण खुप पूर्वी अल्बममध्ये मी काही त्याचे लहानपणीचे जुने फोटो पाहिले आहेत की. आठ नऊ वर्षांचा असतानाचा आणि काही त्यानंतरचे त्यात तो मुलगी असणं अशक्य आहे. असं काय बोलता काकू तुम्ही ? जय नाव होत त्याचं. आई बोलली होती मला.
हो ना गं आई? सांग ना? “
” जया नाव होतं तिचं. मोठे टपोरे डोळे, तरतरीत नाक, दाट मुलांसारखे केस, चालणं, बोलणं, वागणं, पेहराव पुर्ण पुरूषी. ईतकंच काय तिचा आवाज ही पुरूषी होता. तुझा तर मागमूसही नव्हता त्यावेळी सुमे.

फक्त दोनच घरं होती या भागात. एक आमचं आणि एक तुमचं. ही दोनच बिऱ्हाड रहायला होती या वस्तीत. दूर दूर पर्यंत चिटपाखरूही नव्हतं. आम्ही नेमकंच रहायला आलो होतो तर तुमचे कुटुंबही येणार होते. समोरच्याच मोकळ्या जागेत अण्णांनी तुमचे हे घर बांधून घेतले. तुझ्या आईचा स्वभाव पाहून आमची लगेच गट्टी जमली.
मोठी जया मुलगी आहे हे आम्हाला ती घर सोडून पळून गेल्यावर कळलं .तोपर्यंत आम्ही तिला मुलगाच समजत होतो. नुकतेच तुझ्या नाशिकच्या बहिणीची आशाची दहावी झाली होती. तर तू नकळत्या वयाची पाच सहा वर्षांची होतीस. तिसर्‍या वेळी अण्णांना व तुझ्या आईलाही मुलगा व्हावा ही खूप आस होती म्हणून तुझ्या व आशाच्या वयात ईतकं अंतर असूनही त्यांनी तिसरं अपत्य होऊ दिलं आणि तू झालीस. तुम्हा दोघींपेक्षाही मोठी जया होती. “

 “पळून गेली म्हणजे प्रेमप्रकरण? ” सुमी बुचकळ्यात पडली होती.
आता मात्र रमाकाकूंची जिभ रेटत नव्हती पुढचं काही बोलायला. मात्र आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच या ईरेला सुमी पेटली होती. तिचा त्रागा वाढला तशी आई बोलायला लागली. 
“पळून गेली ती अवदसा..चिंचेजवळच्या भाभीच्या मुलीबरोबर. मुन्नीबरोबर. तोंड काळं केलं सटवीनं. माझ्या आशेच्या आयुष्याचीही वाट लावली. हिच्यामुळे आशाचं लग्न जमत नव्हतं तेव्हा विदुरासोबत लग्न लावलं माझ्या आशेचं. ते ही ईकडे न भेटण्याच्या अटीवर. आणि आता तुझ्याही लग्नाला हीच अडचण येत आहे. ” म्हणत ढसाढसा आई रडायला लागली.

सुमीसाठी हा अजून एक धक्का होता. सर्व मनावरचं दडपण गेल्याने आई आज अगदी मोकळ्या झाल्या होत्या. काहीतरी मनाशी ठरवून सुमी ऊठली.
आॅफिसमध्ये सहकर्मीला चार दिवसांची रजा कळवत व आईची जबाबदारी रमाकाकू कडे सांगत सुमीने थेट नाशिक गाठलं.
या प्रकरणाचा छडा लावायचाच याचा चंग तिने बांधला होता.
आशाताईकडे सुमी आली. तिच्या सासरच्यांना सुमीचं येणं फारसं रूचलं नसलं तरी दाजींसहीत सर्वांवरच आपल्या चाणाक्ष, हुशार, लाघवी स्वभावाने ती प्रभाव पाडण्यात सफल झाली.

कधी नव्हे ते आशाताईच्या चेहर्‍यावर हसू फुलले.
लग्नानंतर ईतक्या वर्षांनी ती सासरमध्ये खुशीत वावरत होती.
रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर दोन्ही बहिणी निवांत गप्पा मारत बसल्या.
सुमीला जयाताईविषयी सर्व जाणून घ्यायचे होते.
आशाताई सर्व हकीकत सांगू लागली. 

 “जयाताई…वादळाचे दुसरे नाव. तिच्या धडाडीची काही झलक तुझ्यातही दिसते सुमी. मला ते कधी जमलेच नाही. जयाताई माझी बहिण कमी भाऊ जास्त होता. ती होतीच तशी. सुंदर ,बिनधास्त, बिनधाक.. कसलाही लाग नसणारी. कराटे चॅम्पियन. ब्लॅक बेल्ट. कबड्डीची राज्यस्तरीय खेळाडू.
बाबांचं आणि तिचं कधी जमलंच नाही. पट्टयाने सोलून काढायचे बाबा तिला. दुसर्‍या दिवशी काही झालेच नाही अशा अविर्भावात ती सोललेल्या अंगाने कबड्डी मॅचला जायची.
पुरूषी पेहरावात राहणं पुरूष मित्रांच्या गराड्यात वावरणं. काही काहीच बाबांना आवडायचे नाही.

बरेच दिवस मारून थकल्यावर बाबांनी तिला मारायचंही सोडून दिले. ऊपाशी ठेऊन पाहिली, घरात कोंडून पाहिली ती कशालाच जुमानली नाही. बाबा आणि तिच्या फरफटीत आई आणि माझ्या जिवनाची कुतरओढ झाली.
आईचा स्वभाव रागीट बनत गेला. घरातलं वातावरण नेहमीच तंग असे. कुणाचं येणं जाणं नाही की कुणाकडे जाणं नाही.
बाबांचे व जयाताईचे भांडणं पाचवीलाच पुजलेले. आई त्यांचा राग माझ्यावर काढत असे. तर बाबा मी सुद्धा जयाप्रमाणे होऊ नये म्हणून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मला नियंत्रणात ठेवत असे. म्हणून मी भित्र्या स्वभावाची झाले तर आई रागीट होत गेली.

काही दिवस या सर्व गोष्टींमध्ये बदल झाला तो नविन रहायला आलेल्या चिंचेजवळच्या मुन्नीमुळे.
बिनबापाची मुन्नी तिच्या अम्मीसोबत राहत असे. तिचा बाप वारला असे ती सांगत असे.
चार घरची धुणी भांडी करत ती आपल्याकडे ही घरकामासाठी येत असे.
सोबत जयाच्याच वयाची मुन्नीही येत असे. गोरीपान, घारे डोळे, मोठाले लांबसडक केस, कधी शरारा तर कधी चुस्त पायजमा मध्ये मुन्नीवरून कुणाचीही नजर हटत नसे.पहात रहावं असं देखणं स्रीरूप.

जयाची आणि तिची खूप लवकर गट्टी जमली. काहीशी हट्टी जया तिच्या संगतीत कमालीची संयमी झाली होती. बाबांच्या नजरेतून ही हा बदल सुटला नव्हता. मात्र बाबा आणि जयाचे नाते यामुळे मधुर होत होते म्हणून ते मुन्नीला खूप मानू लागले होते.
मुन्नी असली की जया घरीच रमायची. भाजीपाला आणणे ते किराणापर्यंत कधी नव्हे ते दोघी सोबतच असायच्या. दोघीही मुली असल्याने संशयाचा प्रश्नच नव्हता. पण त्या दोघींचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्या प्रेमापेक्षाही खुप काही… त्यांचं नातं खूप पुढे गेलं होतं.

बाबांना काही भनक लागण्याआधीच त्या दोघी पळून गेल्या त्या पुन्हा परतल्याच नाही. त्यानंतर वर्षभरातच माझं लग्न बाबांनी लावून दिलं. ते ही एका विदुरासोबत. नशीब तुझे दाजी खूप छान व्यक्ती आहेत. माहेरी पाठवत नसले तरी बाकी काही कुरबुरी नाहीत. सुरूवातीला सासूबाई व नणंदांचा त्रास काढला पण आता तसं काही नाही.
काही असलं तरी जयूताई माझ्यावर, तुझ्यावर, आईवर खुप खुप प्रेम करायची. त्याहीपेक्षा बाबांवर.. आभाळभर प्रेम करायची ती बाबांवर. पण मुखाने कधीच बोलून दाखवलं नाही. बायकी वागणं कधीच जमलं नाही तिला. मला अजून आठवतं, एक मुलगा मला दहावीत असताना त्रास द्यायचा. तिला त्याची भनक लागली. शाळेत येऊन सर्वांसमोर चांगलाच ‘प्रसाद’ दिला होता तिने त्याला. खूप जपायची ती मला.

बाबांच्या अंतिम संस्कारासाठी ती आली होती. त्यात ऐटीत, त्याच रूबाबात. कुणासही न घाबरता. कुणाची बिशाद झाली नाही तिला काही विचारायची. बाबांना अग्नि तिनेच दिला. रितीरिवाजांच्या विरूद्ध जाऊन .सोबत मुन्नी होतीच.
आईने फक्त तिला डोळेभरून पाहिलं, भेटली नाही. मी चोरून थोडंसं बोलले तिच्यासोबत.
ईथेच नाशिकच्या जवळच राहते ती. कसलीशी अॅकेडमी चालवतेय. माझी खुशाली विचारण्यास ती विसरली नाही .मोठ्या भावाप्रमाणे डोक्यावरून मायेचा हात फिरवला.

खरं सांगू सुमे? बाबानंतर तीच मला बाबांप्रमाणे भासली. माझा भाऊ असता तर अगदी असाच असता. तिच्यामुळे मी कितीही त्रास भोगला असला तरी मी तिला दोषी मानत नाही. ऊलट मला तिची किव येते. स्रीदेहात अडकलेला आपला भाऊच आहे गं तो. ती जयाताई नाही जयभैय्या आहे.
केवळ याच एक कारणामुळे सर्वांच्या मायेला पारखा झालेला आपला भाऊ. ना बाबांचं प्रेम की आईची माया ना बहिणींची माया. तिनं तिच्यापरीनं तिचं प्रेम मुन्नीमध्ये शोधलं. आता हे नैतिक अनैतिक काहीही असो ईतक्या वर्षांनंतरही मुन्नीने तिची साथ सोडली नाही. आईला अजून त्रास द्यायचा नव्हता तिला म्हणून ती तिकडे नंतर फिरकली नाही. पण या सर्वांमध्ये जयाचा काय दोष? ” यापुढे आशाताई काहीच बोलू शकली नाही. तिचा कंठ दाटून आला. 

दुसर्‍या दिवशी सुमीने सर्वांचा निरोप घेतला.
सर्व समज, गैरसमज दूर झाले आशाताईच्या सासरच्यांचे.
दाजी स्वतः तिला सोडण्यासाठी स्टँडपर्यंत आले तर सासूबाईंनी प्रेमाने आशिर्वाद दिला.
निघताना मात्र ती खाजगीत दाजींबरोबर काही महत्त्वाचे बोलत होती हे आशाच्या नजरेतून सुटले नाही.
साश्रूनयनांनी तिने सुमीला निरोप दिला. 

ती घरी आली आईला भेटली व घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. आईचा विश्वासच बसत नव्हता. अजून एक धक्का ती आईला देणार होती.
तिने दाजींना फोन लावला. आईला सुग्रास जेवण बनवण्यास सांगितले. रमाकाकू होत्याच सोबतीला. कितीतरी दिवसांनी तिने आईला असं हसत खिदळत मनस्वी स्वयंपाक करताना पाहिले.
तिने तोपर्यंत सर्व घर मस्त सजवले.
नविन पडदे, दारावर खास विणलेले तोरण, फुलदाणीत गच्च सुगंधित ताजी फुले तर दारात कधी नव्हे ती रांगोळी स्वतः काढली. 

“सुमे, अगं सांगणार आहेस का? काय चाललंय तुझं”
“थांब गं आई,कळेलच तुला. झाला स्वयंपाक? “
“हो गं, पुरणपोळी, मसालेभात, श्रीखंड सर्व बेत झालाय. “
ईतक्यात चारचाकीचा हाॅर्न वाजला. आई नुसती बघतच राहिली.
आशाताई सहकुटुंब आली होती. लगबगीनं आई आत गेली आणि औक्षणासाठी तबक घेऊन आली.

रमाकाकूंनी लिंबलोण ओवाळून टिकलं तर आई औक्षणासाठी पुढे सरसावली. नंतर कडकडून मिठी मारत तिथेच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चला मुलांनो आत चला म्हणत आई पाठमोरी झाली. 
“आई ऽऽऽऽऽ….” आवाज ऐकून आई जागेवरच थबकली. 
“आई ऽऽऽऽऽऽ..”  जयाताई त्याच गाडीतून खाली ऊतरत होती सोबत मुन्नी होतीच.
क्षणभर हसतानाच आई दगडाप्रमाणे गप्पगार झाली आणि जावईबापू आणि आशाकडे बघू लागली. 

” औक्षणाचं तबक घेऊन या मामी, जया माझ्यासोबतच आलीये. ” जावईबापू म्हणाले.
आईला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
जे ईतक्या वर्षात घडले नाही ती किमया सुमीने चार दिवसात करून दाखवली होती.
कितीतरीवेळ दोन्ही मायलेकी नव्हे मायलेक कडकडून मिठी मारत रडत होते. आज पुर्ण परिवार एकत्र आलेला पाहून रमाकाकूही भरून पावल्या.
सर्वात आधी सर्व घरातल्या देवांपुढे नतमस्तक झाले. बाबांच्या तसबीरीचा आशिर्वाद घेतला व सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी सुग्रास भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला.
ईतक्या दिवस पुजत आलेली देवी आज आईला खरोखरच पावली होती. दसर्‍या आधीच आज या घरात ” सीमोल्लंघन ” झाले होते. आणि घराच्या तिन्ही लेकी तिन्ही स्री शक्ती खर्या अर्थाने तृप्त झाल्या होत्या. 
समाप्त. 
©समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!