सावली प्रेमाची ( भाग 1)

©अपर्णा देशपांडे
दीदी,तुझी मेल आली ग s . मनू नि हाक मारली आणि सायली धावत वर गेली.
ती अतिशय अधीरतेने वाट बघत होती .तिला GIBS मध्ये इंटरव्ह्यू साठी कॉल होता. तिने तीन दिवसात मनुचं डोकं खाल्लं होतं. म्हणाली, तू माझी लकी चॅम्प आहेस,तूच हि मेल आधी वाचायचिस.
सोमवारी सकाळी अकरा वाजता रिपोर्ट करायला सांगितले होते.
GIBS तशी बऱ्यापैकी दूर होती. हायवे ला लागून आत आठ किलोमीटर जावे लागत होते.
सायली आई बाबांना नमस्कार करून निघाली. 

काळ्या रंगाचे ब्लेझर, आत पांढरा शर्ट, तश्याच शेड ची फॉर्मल पॅन्ट एकदम कार्पोरेट लूक! मस्त दिसत होती. तिने दाट कुरळे केस क्लीप मध्ये फक्त पिन करून बाकी मोकळे सोडले होते. 
” दीदी, जॉब तर तुला तुझ्या मेरिट वर मिळेलच ,पण आज पोरांचं काही खर नाही बघ. ” मनू चिडवत म्हणाली; “उगाच बस नि नको जाऊस. कॅब बुक कर.” 
” कॅब ? नाही बाई, चारशे, पाचशे जातील उगाच.  आणी बस स्टॉप तरी काय ,घराला लागूनच तर आहे ग .आधीच बाबांना इतकं  कर्ज आहे, आपण किमान जास्तीचा खर्च टाळू शकतो न ? ” 

“मग तर खूप जण घायाळ “
” का ग?” 
” का ग काय?? सॉलिड दिसतीएस ! खतरनाक !  कातिल!! “
मनुचं बरोबर होतं.
सायली मुळातच खुप सुंदर,त्यात  पाच फूट चार इंच ची उंची .  अतिशय समजूतदार , जबाबदारीची  आणि आपल्या घरच्या परिस्थिती ची तिला जाणीव होती. 

“पण दीदी,आता वेंधळेपणा करू नकोस ह? तू फार विसरभोळी आहेस बाबा ” 
“नाही ग ,आता नाही विसरणार काही”
सायली अगदी घराजवळच  बसस्टॉपवर वाट बघत उभी होती .
बराच वेळ झाला तरी बस येईना.
ती वेळ राखूनच निघाली होती,पण आता मात्र फार झालं , कॅब  बुक करूया .
वाट पाहून शेवटी तिने कॅब बुक केलीच. 

कॅब मध्ये बसल्या बसल्या तिने सोनालीला फोन लावला.
” ए निघाले एकदाची “
” ऑल द बेस्ट!! नीट जा. मोठ्या कंपनीत जात आहेस , बाई ग मलाच धडधड करतंय.” 
” ही कंपनी फार लांब आहे ग, सगळा  दिवस   जाईल बहुतेक.” 
” सगळं घेतलंस ना नीट? कॉल लेटर?”
” घेतलं ग” 

“आपल्याला इंप्लान्ट ट्रेनिंग चे ,समर प्लेसमेंट चे सर्टिफिकेट मिळालंय ,घेतलंस?
“……..”
अग बोल न घेतलं का? ” 
“………न ..नाही , सोना तेवढंच काय मी मागच्या प्रोजेक्ट ची कॉपी पण विसरले…देवा!! आता? “
” अशी कशी ग ..’तिला मधेच थांबवत सायली म्हणाली , “तू आता  नुसतं ओरडणार की काही मदत करणारेस ??” 
” मी बघते, पण आज नेमकी गाडी नाहीए दादा घेऊन गेलाय .तू किती पुढे गेली???…….
………रेंज गेली होती.

सायली ला खूप टेन्शन आलं होतं. असं कसं आपण तीन महत्त्वाचे कागद ह्याला जोडले नाहीत? रात्री उशिरा xerox आणल्या, मग आईला बरं नव्हतं म्हणून आई जवळ बसलो, आणि ,……
….. ” आपण किती पुढे आलोय?” तिने कॅब ड्राइवर ला वीचारले.
” बस पोहोचलोच ” 
काय होईल ते होईल असं म्हणून तिने एकूण बिल बघितले . 417  बिल झाले.
सुटे नसल्याने ड्रायव्हरने चक्क वरचे सतरा रुपये राहुद्या म्हटले. 

ती आत कंपनीत गेली. तिथले गेट, आतील परिसर सगळंच भव्य. आज आपली निवड व्हायला पाहिजे, पण आपण तर …सायली नि मनातल्या मनात स्वतःला खूप कोसलं.
स्वागत कक्षात गेल्यावर तिला कळाले की इंटरव्ह्यू अजून  दोन तासांनी होणार आहे.
‘ मग आणावेत का आपले सर्टिफिकेट?’ तिला वाटले.विचार करण्यातच तास भर गेला,.
” मिस.सायली ?” 
” येस ,” 
” तुम्हाला कुणीतरी भेटायला आले आहेत ” 

सायलीला वाटले, ‘इथे मला कोण ओळखतय ?’
बघते तर समोर तोच सकाळचा कॅब ड्राइवर! 
” तुम्ही ?” 
” ही घ्या तुमची सर्टिफिकेटस . लावून टाका लगेच फाईलला. ऑल द बेस्ट ” 
” ओह ,तुम्ही इतक्या लांब पुन्हा गेलात? आणि तुम्हाला कसं कळलं माझ्या सर्टिफिकेट बद्द्ल?” 

” तुम्ही फोन वर बोलत होता न , त्यामुळे ” 
” इतक्या लांब ?” 
” इट्स ओके .ऑल द बेस्ट ” ती काही बोलायच्या आत तो निघून पण गेला.
सायलीचा इंटरव्ह्यू खूप छान झाला, विशेषतः नेमके तेच सर्टिफिकेटस पाहून टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये तिला चांगले कॉमेंट्स मिळाले होते.
तिला त्या कॅब ड्राइवर चे आभार पण मानता आले नाहीत.
आजच्या काळात कोण करतं एवढ? त्या ड्रायव्हरचा पत्ता काढून त्याला बक्षिस द्यावे असे तिनी ठरवले.

तासा भरानी तिला एच आर कडून पर्सनल इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले आणि तिथेच तिच्या सिलेक्शन ची बातमी मिळाली .
तिने ताबडतोब घरी फोन केला.
” दीदी, कॉंग्रेट्स!!” बातमी कळाल्याबरोबर मनू ओरडली.
“तुला सर्टिफिकेट मिळाले ना?” 
” हो ग त्या ड्राइवर ची कमालच आहे.बरं मी येतेच आहे घरी,मग बोलू.”

 सायलीच्या आई वडीलांना खूप आनंद झाला होता. आपल्या मुली कर्तृत्ववान निघाल्या याचे समाधान होते त्याना . 
अतिशय आनंदात सायली घरी आली .
” मनू  , अब तुझे क्या चाहीये बोल, तेरेलीये सब हाजीर यार!! तेरे दिदीको  s s  जॉ s s ब मिल गया !!!”
” स्वतः साठी चांगल्या कुर्ती घे आधी .” 
” अरे हा ! त्या कॅब वाल्याचे आभार मानायचेत ग ! सॉलिड निघाला माणूस !!  तूच दिलेस का सर्टिफिकेट त्याच्या जवळ ? ” 

“नाही ग आई होती घरी …तू बुकिंग चेक कर न, नाव असेल .”
” अ  s.. ,हे …,हा! हे बघ काय नाव …आनंद मोकाशी !! ” 
” का s s य ?? आनंद मोकाशी? अग तो कॅब ड्राइवर नाहीये, तो मालकए मालक !!! आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स ( AT &T) कंपनीचा  मालक.” 
” काय? शीट !! तुला कसं माहीत? ” 

“आम्ही ह्या वर्षी कॉलेज मध्ये ह्यांनाच चीफ गेस्ट बोलावणार आहोत. कालच सरांनी आम्हा कमिटी मेम्बर्स ना बोलावून सांगितले . ” मनू  म्हणाली.
“तरीच एवढा हॅन्डसम दिसत होता, आय मिन कॅब ड्राइवर कितीही देखणे असले तरी असे तेज येत नाहीगं ,मला वाटलंच  होतं की हा इतका स्मार्ट  कसा ……”
” ओ हो हो ,आता काही ही म्हण हं , पण तुला अजिबात लक्षात आले नाही  हे कबुल कर.” 
” कबूल .पण आता थँक्स कसं म्हणू? सांग न ” 

” दीदी,तू खरच MBA झालीस का ग? कसं म्हणे! सिम्पल!! आपण त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊ .”  
दोघींनी आनंद टूर्स चा ऑफिस फोन नंबर आणि पत्ता मिळवला.
कॉल करून विचारले सर आहेत का ,आणि गेल्या शोधत . 
ऑफिस अतिशय देखणे होते. कलात्मक रित्या सजवलेले.
इतक्या मुख्य रस्त्यावर इतकी प्रशस्त जागा…सायलीला कमाल वाटली. 

खूप कमी वेळात भरपूर मजल मारली होती ह्या कंपनीने. नाशिकच्या इंडस्ट्रियल एरिया मध्ये सगळ्या कंपनी ला AT&,T च्याच गाड्या होत्या ने आण करण्यासाठी. शिवाय भारतात आणि भारताबाहेर टूर्स साठी प्रसिद्ध.
आनंद मोकाशी, एक अतिशय बुद्धीमान ,स्मार्ट तरुण व्यावसायिक होता.
अतिशय लवकर सगळे बारकावे आत्मसात करून त्याने मोठी उंची गाठली होती .

आपल्या सहकारी कर्मचारी लोकांना  प्रेमाने कंपनीशी बांधून ठेवले होते. त्याची बोलण्याची शैली मिश्किल, विनोदी असे त्यामुळे ऑफिस चे वातवरण उत्साही आणि  आनंदी असायचे .
त्यादिवशी इंटरव्ह्यू च्या दिवशी सायलीला पहील्यांदा बघितलं तेव्हाच त्याला ती आवडली होती.
तिच्या एकूण व्यक्तिमत्वावर तो फिदा झाला होता.
ती भेटायला येणार म्हटल्यावर त्याने पटकन रोहित ला बोलावले .
CCTV मध्ये दोघींना बाहेर बसलेलं बघितलं आणि काहीतरी सांगितलं .

आनंद स्वतः केबिन च्या मागच्या बाजूने निघून गेला ,आणि कोट टाय मध्ये रोहित ला खुर्चीत बसवलं.
सायली अन मनूला  आत बोलावण्यात आले.
सायलीला घाम फुटला अशा वेळी तिचा मुळातला धांदरट स्वभाव आणखीन उसळ्या मारी. 
दरवाजा उघडून आत येतांना आतल्या कार्पेट मध्ये पाय अडकून ती एकदम धडपडली, ते सरळ समोरच्या खुर्चीवर आणि धाडकन खुर्ची खाली पडली.

” सॉरी, सर, सॉरी..” म्हणून मनूने तीला उचलली.
आनंद (रोहित) म्हणाला, ” अरे, इट्स ओके ” 
” सर, ते ….17 ड्राइवर चे ….सर्टिफिकेट द्यायला आलो…..न …नाही ..ते..तुमचा इंटरव्ह्यू  झाला…” सायली ची बोबडी वळली.  (केबिन मागे आतल्या बाजूला आनंद ला खूप हसू येत होते .)
 ” रिलॅक्स मिस सायली.आधी बसा तुम्ही ” .

आयला ह्याला माझं नाव पण माहितेय. …सायलीला वाटलं.
सायली ला गप्प रहायची खूण करून मनू बोलू लागली ..” सर ,”
सायली मधेच म्हणाली  ” पण त्या दिवशी तर  ..”
” दीदी प्लिज ..” मनू कुजबुजली . ती सायलीला बोलू देणार नव्हती .
ती म्हणाली , ” सर, तुम्ही काल स्वतः कॅब घेऊन आलात , सॉरी,आम्ही ओळखल नाही. शिवाय दीदी ची एवढी मदत केलीत  म्हणून आम्ही खास तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहोत.” 

” इट्स एबसोलुटली फाईन …… पण जॉब मिळाला न ? अभिनंदन! ” त्याने सायलीला विचारलं.
” हो ..थॅंक्यु सर….हे पेढे ..आणि तुमचे सतरा रुपये. ”   (आतमध्ये आनंद तोंड दाबून हसत होता)
रोहीत ला  ला खूप हसू आलं.ही पोरगी    ‘सतरा’  चं पालुपद काही सोडत नाहीये.
” फक्त सतराच? मॅडम ,तुमच्या कागदपत्रांसाठी मी आणखी एक चक्कर केलीये…” 

“ओह, सॉरी, त्याचे..किती?…” ती पर्स मध्ये हात घातला पैसे काढू लागली आणि रोहीत  मिश्कीलपणे मनुकडे बघून हसु लागला. 
” मॅडम, त्याचे चार्जेस मी नंतर घेईन” 
” हं? ओके !! ठीक , मी ऑफिस ला कॉन्टॅक्ट करिन .थॅंक्यु सर .सॉरी तुम्हाला त्रास दिला.” 
दोघी तिथून बाहेर पडल्या . लगेच समोर टॅक्सी येऊन थांबली.
ड्राइवर म्हणाला, ” मॅडम,चलीये ,”  

‘ हमे नाही जाना ” 
” साब ने ही भेजा है ” आनंद नि गाडी पाठवली होती.
दोघीं चाचरतच गाडीत बसल्या.
” कांय ग दीदी, ते तुझी खेचत होते तुला कळलं नाही का,?  सतरा रुपये म्हणे !!
एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक तुझे इतकुसे पैसे घेणार का? हसत होते ते.” 

हळूच तिच्या कानात म्हणाली,” किती भारी दिसतात ग !!! हाय s s !” 
” चूप !! एकदम चूप !! मला बोलू देशील का ? हा तो नाही “
” कांय बोलतेस दीदी?  मला कळत नाहीये ..” 
” अग ,त्यादिवशी सर्टिफिकेट घ्यायला  आला तो …हा  होता  का ? .” 

” मी कुठे होते घरी ,…आई होती “
” आग तो ड्रायव्हर वेगळा होता …म्हणजे नाव आनंद मोकाशीच होतं ,पण दिसायला खूपच handsome होता ..” 
” हाच ग ,दीदी ,मालक ना ग !! टेबल वर नाव नाही वाचलस  ?” 
” पण तो वेगळा , हा वेगळा ..नक्की !! काहीतरी गडबड आहे “
क्रमश:
काय असेल आनंदच्या मनात? का त्याने रोहितला स्वत:च्या जागी बसवून सायली समोर येण्याचे टाळले असेल?
वाचा पुढील भागात….
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
 साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

1 thought on “सावली प्रेमाची ( भाग 1)”

  1. पहिला भाग छान वाटला.पुढील भाग वाचायला आवडेल

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!