सावली प्रेमाची ( भाग 2 )

भाग 1 इथे वाचा

©अपर्णा देशपांडे
इकडे आनंद पूर्णपणे सायलीच्या विचारात गढला होता.
तिचं सीमित सौन्दर्य त्याला फार फार भावलं होतं. अशी MBA झालेली मुलगी आपल्या सोबत काम करेल तर कंपनी साठी सुद्धा चांगलेच असेल म्हणून त्याने रोहीत ला सांगून तिला AT&T कडून जॉब ऑफर पाठवायला  सांगितलं .   
शिवाय सायली कायम सोबत असेल …ह्या विचारानेच तो सुखावला. ‘सोशल मीडियावर सध्या कुठेच माझा फोटो दिसू देऊ नका ‘ हे त्याने आवर्जून सांगितलं .

रोहीत रिजनल मॅनेजर होता कंपनीचा. त्यानेही आपले थोडे नाही, सहा वर्ष दिले होते कंपनीला .
त्याला आवडायचं इथे काम करायला. युरोप टूरचं सगळं तोच बघायचा. 
रोहीत  म्हणाला , ” सर ,मला कळाले नाही तुम्हीं  अचानक मला का समोर केलं ?” 
” काही नाही रे …असंच !! थोडीशी गम्मत ! ” 
” पण सर ,ते …” 

” बोल न “
” ……..”   
” अरे बोल  की ! 
लब्जो को युं आधा ना छोडा करो ,
जान जाएगी कभी सोचते सोचते ” 
” वाव्हा !! क्या बात है सर !! मला पण असं खूप काय काय लिहावं वाटतं पण जमतच नाही .तुमचं न सर एक पुस्तकच छापू आपण. त्यात तुमचे प्रवासातले सगळे थ्रिलिंग अनुभव आणि मध्ये मध्ये असे शेर …कविता ..मजा येईल सर ! बेस्ट सेलर होईल सर एकदम !!! “

” कल्पना वाईट नाही , बघू , पण आत्ता ते लेटर ..”
” येस सर !”
रोहित ने  HR हेड ला ऑफर लेटर तयार करायला सांगितलं. 
*****   
सायलीला GIBS कडून युनिफॉर्म सेट मिळाले होते. जर्मन कॅम्पनी असल्याने सगळं कसं शिस्तीत होतं.
आज सायलीचा  कामाचा पहिला दिवस ..खूप खुश होती ती.
आईची पण खूप लगबग चालली होती.

ती निघणार एवढ्यात कुरिअर आलं. AT&T चं ऑफर लेटर!!!!
एक कंपनी जॉईन कारायच्याच दिवशी दुसरी ऑफर ? 
सायली विचार करू लागली …GIBS ही जर्मन कंपनी ,आपला जर्मन भाषेचा कोर्स पण झालाय , इथे खूप मोठा स्कोप आहे , मग दुसऱ्या कंपनीचा आत्ता तरी विचार नको .
तिने पाकीट उघडून बघितलं , त्यात तिला खूप जास्त चांगला पगार , इसेंन्टिव्हस ऑफर केले होते .
संध्याकाळी नम्र पणे नकार करू ,असा विचार करून ती निघाली .

आज  बस एकदम वेळेवर आली . सायली ला जागाही मिळाली .
पुढच्या स्टॉप वर बरेच जण चढले .
तिने मान वर करून बघितले तर …अरे ! हाच की तो कॅब ड्राइवर .
काय योगायोग आहे ,बरं झालं ,आज त्याचे आभार मानते . 

आनंद मुद्दाम तिची वाट पाहून बरोबर त्याच बस मध्ये चढला होता .
त्याने ऑफिस बॉय ला त्यासाठी हाताशी घेतले होते.
तिच्याकडे बघून आश्चर्य दाखवत तो म्हणाला , ” अरे मॅडम ,तुम्ही ? ” 
” हो ,ऑफिस ला चालले ,तिथेच ,जिथे तुम्ही त्यादिवशी ड्रॉप केलं होतं . थॅंक्यु बरका ,मला तुमची खूप मदत झाली त्या दिवशी . तुमचे पैसे पण द्यायचेत .”  

ती इतकी गोड दिसत होती , वाटलं सगळं खरं सांगून टाकावे .
पण त्याने आवरले स्वतः ला
” पैसे राहुद्या मॅडम , नोकरी मिळाली हे फार छान झालं .” 
” तुम्ही  बस मध्ये कसे ?.”  
ही काय मागच्या जन्मी एन्काऊंटर स्पेशालिस्ट होती की काय ?

” मी कंपनीत जातोय न “
” AT & T ला ? ती तर उलट दिशेने आहे ,इकडे कुठे ? ”  
त्याला वाटले ,आयला ,मेलो मी आज . ही तर माझी कुंडली काढतेय.
” ते ..अ ..आधी एक काम आहे , ते करून मग जाणार . ” 
” एक मिनिट !!! बरे सापडलात !!!  तुमचं नाव काय म्हणालात ? आनंद मोकाशी ? हा ? ……नाही , तुम्ही मला मदत केली वगैरे ठीक आहे , पण हे असं ड्रायव्हर ने मालकाचं नाव टाकून ट्रिप बुकिंग घ्यावं ? हे तुमची सिस्टीम बरं चालून घेते ? ”  

” ते काय न मॅडम , साहेब स्वतःच येणार होते , कुणीच  ड्रायव्हर जागेवर नव्हता , ते निघाले ,अन वेळेवर मी आलो .” आनंद वेळ मारून न्यायचा प्रयत्न करत होता .
” मग तर ही आमची फसवणूक झाली . नाव एकाचं , चालवतोय एक …तुमच्या मालकाला बरं जमतं हे ? हं ? “
तिने आपले मोठाले डोळे त्याच्यावर उगारले .
आनंद ला वाटले , हिने असाच जाब विचारावा , आणि मी असेच हिच्याकडे बघत बसावे.

किती गोड आहे ही ? पण जास्त उत्तरे द्यायचा नादात फसू आपण म्हणून तो उठला .
” येतो मॅडम , माझा स्टॉप आला .” 
*****
GIBS सारख्या कंपनीत खूप काही शिकण्या सारखं आहे , आणि इथे आपली खूप प्रगती होऊ शकते हे सायली नि ओळखलं . कंपनी ची बस तिच्या घरावरूनच जात असे , पण ती सेवा दोन दिवसांनी मिळणार होती .
तिथून एक किलोमीटर वर सिटी बस स्टॉप होता .
ती पायी चालली होती .
पंधरा मिनीटापूर्वीच आनंद तिथे येऊन थांबला होता . 

आपलं तिच्याकडे लक्षच नाही असं दाखवायचं होतं त्याला , पण कंपनीच्या त्या फॉर्मल युनिफॉर्म मध्ये ती इतकी आकर्षक दिसत होती , की नजर सारखी तिच्याचकडे जात होती . 
त्याने आपली जुनी मारुती कार आणली होती .
सायली चे त्याच्याकडे लक्षच नव्हते . 
ती आता क्रॉस करून पुढे जाणार ,की त्याने हाक मारली ” मॅडम जी ” 

” अरे , तुम्ही इथे पण ? कसे काय ? “
” ते साहेबांनी पाठवलं होतं , आमच्या ऑफिसच्या एका साहेबांना सोडायला …” 
सायलीला ते जर विचित्र वाटलं .अशी नर्व्हस होण्याची वेळ आली की तिची गडबड होत असे . 
” हो ….का …ते ..बस सुटली न , आता पुढे जाऊन कंपनी पकडायचीये …नाही ,स ..स्टॉप सुटलाय न …..मी जाते .” 
आनंद ला हसू आवरेना , तिला थोडं दोन पाऊल चालल्यावर तो म्हणाला ,  “मी सोडू का ?  तिकडेच वापस जायचंय .” 

सायलीला बिलकुल जायचं नव्हतं . ‘हा सगळीकडेच मला कसा भेटतोय ?
माझा पाठलाग करतोय का ? सकाळी बसमध्ये पण ….नाही बाबा . आजकाल काय काय ऐकतो आपण …मी कंपनीच्या कुणाबरोबर जाऊ का ….’ 
विचारातच ती बस स्टॉप वर आली .
मनू चा कॉल आला . तिला इतकं हायसं वाटलं ,
” हे मने , काय वेळेवर फोन केलास ग ! अग , तो ड्रायव्हर आहे  न ..

” दीदी , ऐक तो ..
” अग , आज सकाळी माझ्या बस  ..
” दीदी , अग ऐक न !! दीदी !!!! एक शब्द न बोलता माझं एक !!!! तो जो ड्रायव्हर तुला भेटला , सर्टिफिकेट आणून दिले , तो ड्रायव्हर नाही !!! तेच आनंद मोकाशी आहेत !!! त्यादिवशी त्यांच्या ऑफिस मध्ये होते ते त्यांचे एरिया मॅनेजर रोहित देशमुख होते ……दीदी ..हॅलो ….अग …जागिएस ना ?”

” मनू , काय बोलतेस तू ? …अग कार ..त्याला घेऊन ..वाट बघतेय …म्हणजे …
” दीदी , शांत हो . उगाच बावचळू नकोस . ये घरी , खूप काय काय दाखवायचंय .” 
आता सायलीच्या जीवात जीव आला . 
म्हणजे आपल्या मागे लागलाय तो आनंद मोकाशी ?
तिला खूप आश्चर्य वाटलं ..

तिने बघतीले , अजूनही मारुती हळू हळू स्टॉपच्या दिशेने येतच होती . 
” अजून बस नाही आली मॅडम ? का संकोच करताय , मी सोडतो न .”
सायली दार उघडून पुढे बसली .
” तुम्ही मला इतकी मदत केली , मला तुमचे नाव पण नाही माहीत .”
” मी …प्रशांत .” 
‘ असं का बच्चू ? ‘सायली मनात म्हणाली .

” तुमची भाषा छान शुद्ध आहे . Educated  वाटताय . ” 
” हो , म्हणजे M .Com . झालंय , पण नोकरी लगे पर्यंत हे टॅक्सी चालवायचं काम करतोय .” आपल्या थापेवर तो खुश झाला 
” तुमच्या A T & T कंपनी चे ऑफर लेटर आलंय मला . पण तसेही माझा संबंध येणारच आहे , कारण लग्न ठरलय माझं .तुमच्याच कंपनीत आहे तो ..
कचकन ब्रेक लागले गाडीचे . 

” काय झालं प्रशांत भाऊ ?” तिने नाटकी पणाने विचारले .
उत्तर आले नाही , गाडीचा वेग मात्र वाढला होता . ‘ भाऊ ? भाऊ म्हणतेय मला ? आणि कुणाचे स्थळ असेल ? रोहितच ?…’ 
सायली हळूच  डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होती …त्याचा विचारात पडलेला चेहेरा बघून गम्मत वाटली तिला .
” बस ,बस आले घर .” ती उतरली , आणि खिडकीतून वाकून म्हणाली ,
” हे तुम्हाला घ्यावे लागेल . मागचे सतरा रुपये आणि काही उधारी पण आहेच .” असे म्हणून तिने पाचशे ची नोट त्याच्या पुढे धरली.

तो  बिलकुल बोलायच्या मूड मध्ये नव्हता …..त्याने ती नोट घेतली आणि जोरात गाडी पुढे नेली .
सायली मनातल्या मनात हसत होती ..माझी फिरकी घेतोस का बच्चू !!
” दीदी , बघितलेस का आमच्या कार्यक्रमात आनंद मोकाशीचे फोटो ? तुला पाठवलेत मी .कसला मारू दिसतो ग !” 
” मनू …मनू …” 
” मनू , माझा मोबाईल …गाडीतच राहिला !! ” रडका चेहेरा करून सायली म्हणाली. 

” दीदी , पाय दाखव तुझे . साष्टांग नमस्कार  घालते !! कशी ग तू वेंधळी ? ” 
” पण लॉक आहे मोबाईल ला  s s “
” गप उगी !! नको ते उद्योग करून ठेवते . आता जा , घेऊन ये मोबाईल .”
आई आत आली .  ” एक जण आलेत बाहेर . सायली , तुझे कुलीग आहेत का ? ” 
सायली बाहेर पळाली . 

आता तिने नीट बहितले ….निळी जीन्स , पांढरा टी शर्ट ,स्टाईल  ..केसांची ठेवण ..पण..स्वतःला बजावले…आवर सायली ,तो  तुझ्यासाठी फक्त ड्रायव्हर आहे सध्या …..
” तुमचा फोन मॅडम …” 
” thanks . पुन्हा तुमची मदत  झाली . ”  आणि ती लगेच वळली .
‘ शीट !!! पुन्हा मी एक चान्स घालवला …’ म्हणत आनंद खूप डिस्टर्ब होऊन वापस जायला निघाला . 

रात्रभर आनंद ला झोप आली नाही . आपल्या कंपनीत कोण असेल …….ती लग्न म्हणतेय चक्क …
सकाळी तो ऑफिस मध्ये बसला होता . आज चार पाच मोठ्या हॉटेल्स सोबत कंपनी चे टायअप करायचे होते . 
युरोप टूर मध्ये काही नवीन डेस्टिनेशन ऍड करायचे होते . पण डोळ्यासमोर सारखी सायली च येत होती ……कुणाशी लग्न ..ठरले असेल..
” तुकाराम , रोहीत सरांना बोलाव .” त्याला सरळ सरळ विचारायचे होते .

” येस सर ?” 
” अरे रोहीत , आपल्या कडे किती एरिया मॅनेजर आहेत ? “
” सर , मी पकडून सोळा . इथे नाशिक मध्ये चार ,आणि बाकी आपल्या इतर ऑफिस मध्ये .” 
” इथे फक्त तूच लग्नाचा आहेस न ? “
” सर ? ..म्हणजे ….” 

“तू बघतोय का सध्या स्थळ वगैरे ..”
” सर , मी सांगितले नाही ,पण लग्न ठरलंय माझं …”
आनंद चे ठोके वाढले …
” अरे वाह !! छुपा रुस्तुम !! कोण आहे रे ? “
” सर , ते आमच्या गावाचीच आहे जयश्री ..”

आनंद चा चेहेरा एकदम असा का उजळला …रोहित ला कळेना  …
“congratulation !!! ग्रेट …ok , दुपारी मीटिंग आहे ,तेव्हा भेटू . 
आनंद च्या मनावर मोरपीस फिरत होतं .
म्हणजे सायली माझी टांग खेचतेय ..
तो गालातल्या गालात हसला . 
क्रमश:
सायली आपली फिरकी घेते आहे हे समजल्यावर खुश झालेला आनंद आता काय करेल पुढे? लगेच जाऊन सायलीला प्रपोज करेल का? यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग… आपल्याच ‘माझी लेखणी’ पेजवर
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

4 thoughts on “सावली प्रेमाची ( भाग 2 )”

Leave a Comment

error: Content is protected !!