©अपर्णा देशपांडे
सायली कंपनीच्या गेट वर पोहोचली. आनंद तिथे वाट बघत होता .
” सायली , मला कळालंय सगळं. मी एक चांगला वकील देतो करून, तुमची बाजू मजबूत आहे. निकाल तुमच्याच बाजूने लागणार . “तिने डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले ..
” डोळे पूस आधी . नीट ऐक सायली .
आपले नाते कसे वळण घेते हा आता नंतरचा विषय आहे …माझ्या यशाच्या पायऱ्या अशा दुसऱ्याच्या दुःखावरून नाही जाऊ शकत . बाबांना न्याय मिळालाच पाहिजे . संध्याकाळी वकील येईल , त्याला मी नाही ,तू बोलावलं आहेस हं ! …..बोलू नकोस …..टेक केअर !”
सायली त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघतच राहिली .
बाबांची केस पुन्हा सुरू झाली होती . इतक्या वर्षांनी ती लढवणे अवघड होते …पण आताची गोष्ट वेगळी होती . आनंद ने खूप नामांकित वकील नेमून दिला होता .
सायली घरी TV बघत बसली असतांना एक पाकीट येऊन पडले .
ते बँकेचं पत्र होतं .
सायली वाचू लागली ….
कर्जाचे हप्ते बराच काळ थकल्याने घरावर जप्ती येणार अशा आशयाचे पत्र होते . सायली गंभीर झाली .
ती ते वाचत असतांनाच आनंद चा फोन आला .
” सायली , मी बँकेत गेलो होतो तुमचे कर्जाचे स्टेटस बघायला . तिथे तुमच्या घराचे कागदपत्र दिसले . मी चौकशी केली …….”
पुढचे ऐकून सायली च्या डोळ्याला धाराच लागल्या .
आपल्या घरावर जप्ती येणार हे कळाल्यावर आनंद ने परस्पर काही रक्कम भरून जप्ती थांबवली होती .
कोणते आहे हे नाते , दोन अडीच महिन्या पूर्वी एकमेकांना न ओळखणारे आम्ही ….त्याची मदत घेणे योग्य होईल ?
” पण हे मला पटत नाहीये आनंद . मला अजून ओझ्याखाली नको टाकूस .”
” आणि आई बाबा? त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढणं पटतंय तुला !!! शहाणी बन आणि तुझ्या आई वडिलांना कळू पण देऊ नकोस ह्या पत्राबद्दल . “
” सोळा लाख म्हणजे लहान रक्कम नाही आनंद .”
” पण मी कुठे सगळे पैसे भरलेत ? तू केस जिंकलीस…..आणि , जिकणारच …तर माझ्या अंदाजाने चाळीस लाख सहज मिळतील …तुमच्या हक्काचे !! उपकाराचे नाहीत . ”
” मला तुला भेटायचंय . आत्ता !!! .”
“नाही सायली . आपण आत्ता नाही भेटायचं . वेळ आल्यावर मी स्वतः तुला भेटायला येईन . आता मला माझे काम करू दे …. मी उद्या U .S ला जातोय , कंपनीच्या कामाने . फोन करत राहीन ..आल्यावर भेटू ..हस बघू आता … हं…. बाय .”
हातात ते पत्र घेऊन ती पुतळ्या सारखी बसली होती .
” सायु “
आई येतीये म्हणून तिने ते पत्र लपवले .
” सायली , आपल्या वकील साहेबांचा फोन होता . फायनल हिअरिंग ला मला अन तुला जावे लागणार मुंबईला . तुला रजा घ्यावी लागेल न बेटा . “
” तारीख काय सांगितली ?”
” ह्या महिन्याची अठरा तारीख . अठरा जुलै . ”
“मग मोकाशी कन्स्ट्रक्शन कडून कोण असणार आहे ? खुद्द संजय मोकाशी ? ”
” नाही त्यांच्या वतीने कुणीतरी येईल , पॉवर ऑफ अटर्नि घेऊन…..सायु , आनंद खूप चांगला माणूस आहे , पण तू पुढे संबंध वाढवू नकोस. “
” कळतंय आई , काळजी करू नकोस , तुम्हाला मुळीच मान खाली घालावी नाही लागणार .”
आईने समाधानाने तिच्या गालावरून हात फिरवला .
सायली ने ते पत्र तिच्या कपाटात लपवून ठेवले .
सायलीचा पहिला पगार जमा झाला होता .
ती अतिशय खुश होती .
घरी येतांना तिने आई साठी एक सुंदर साडी व मोगऱ्याचा गजरा घेतला . बाबांसाठी वॉकर स्टँड आणि मनू साठी फॉर्मल ड्रेस घेतला.
आनंद साठी पण काहीतरी घेतले होते .
तिला त्याची खूप आठवण येत होती .
‘आनंद , तू माझी शक्ती बनलाएस . प्रेम काय असतं असं कुणी विचारलं तर मी तुझ्याकडे बोट दाखवेन. तू एकदा म्हणाला होतास … “सायली , तू मला स्वीकारलं नाहीस तरीही चालेल , पण कायम लक्षात ठेव एक सच्चा मित्र म्हणून मी सतत तुझ्या सोबत असेल..तुझी सावली बनून…..कायम .”
“माझी सावली ?. पण सावली तर रात्री दिसत नाही ..”
तू म्हणाला होतास ,” जे दाखवून सिध्द करावं लागतं ते प्रेम कसलं .”
खरच रे …जे दाखवावं लागतं ते प्रेम कसलं . विचारातच ती घरी आली .
” म s नू , ” तिने हाक मारली
” दीदी , तुझ्यासाठी सरप्राईज !!”
” आधी माझं सरप्राईज !! “
” नाही !! मी छोटी ना !!”
” ब s s र !! बोल “
” मला AT & T मध्ये जॉब मिळालाय . रोहित सरांचा फोन होता .”
” wow !! ग्रेट !!आ जा मेरे शेर !! गले लग जा !” तिने मनूला मिठी मारली , आणि मनू रडायला लागली .
” ए वेडाबाई , काय झालं ? ”
” दीदी , ज्या व्यक्तीने आपल्या फॅमिली चे इतके नुकसान केले , बाबा ज्या माणसाचा गेल्या दहा वर्षांपासून प्रचंड तिरस्कार करतात , ज्यांनी आपल्याला इतकं हीन पणे वागवलं त्यांचा च मुलगा इतका देवमाणूस ?”
“………”
******
सतरा तारखेला आई सोबत मुंबईला जाण्यासाठी सायली अर्धी सुटी काढून आली .
थोड्याच वेळात दारात गाडी उभी . ड्रायव्हर आत आला .
” रोहित सरांनी गाडी पाठवलीये .”
आई बाहेर आली .
” सायली ,गाडी वापस पाठव . आपल्याला कुणाचे उपकार घ्यायचे नाहीत .
… उपकार ?…हिला जर कळाले की घर जप्त झाले असते , ते कोणी वाचवले , तर सहन नाही होणार हिला ….तिच्या मनात आले .
” आई , हे आपण उपकार मानायचे नाहीत . आतापर्यंत तुम्ही जे हाल सहन केलेत ते यांच्याच मूळे न ? ” कशी बशी आई तयार झाली .
रात्री दोघींनी रमेश मामा कडे मुक्काम केला .
सकाळी अकरा ला कोर्टात जायचं होतं .
मोकाशी कन्स्ट्रक्शन कडून त्यांचे एक मॅनेजर आले होते .
सूनवाई सुरू झाली …………..
………….. आणी निकाल सायलीच्या बाजूने लागला .
अडोतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा कोर्टाचा आदेश होता . कंपनीला मान्य करावा लागला .
इतक्या वर्षांनी त्यांना न्याय मिळाला होता . हे सगळं आनंद मुळे शक्य झालं नाहीतर माहीत नाही आणखी किती काळ झगडावे लागले असते .
ही आनंदाची बातमी मनूला कळवायची होती .
पण घडलं वेगळंच होतं ..
” दीदी , ऐक ! बाबांना आज सकाळी हार्ट ऍटॅक आला . त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय . अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे .आईला काहीच सांगू नकोस . मी हँडल करिन सगळं .
…….का परीक्षा घेतोएस देवा . एक आनंद पदरात पडत नाही , की दुसरा धक्का देतोएस ….आता बाबांना काही झालं तर … हा पैसा काय कामाचा ?
आपण ह्या आधीच डॉ खाद्रा ना दाखवायला हवं होतं का ?…नाशिक ला पोहोचेपर्यंत ती अतिशय काळजीत होती .
आईला घरी सोडून ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेली .
I C U च्या समोरच तिला आनंद दिसला .
आनंद !!! हा कधी आला ? मला सांगितले पण नाही .
….आनंद ,do I really deserve you ? …
ती तिथे पोहोचे पर्यंत तो निघून गेला होता .
…..हा का टाळतोय मला ? का भेटत नाहीये …
अँजिओप्लास्टी झाली होती . बाबांना आता काही धोका नव्हता .
ती रात्री ICU च्या बाहेर खुर्चीत अवघडून बसली होती ….बाहेर पाऊस पडत होता आणि मनात विचारांनी गर्दी केली होती .. ..माझी सावली …सावली म्हणाला होतास …मग …..…..
त्या गारव्यात तिचे डोळे मिटले ,आणि अंग चोरून ती तिथेच झोपली . तासाभराने जाग आली तर अंगावर शाल होती …..
…..आनंद !! …आनंद !!…कुठे आहेस …तिने भिर भिर बघितले …तो तिथे नव्हता .
तिच्या मनात कुठेतरी वाचलेल्या ओळी आल्या
त्या निळ्याचा पावा मनावर
फुंकर घालून गेला
माझ्या साठी ऐलतीरावर
तो शेला ठेवून गेला …..
ती सुखावली .
आता बाबांची प्रकृती छान होती .
दुसऱ्याच दिवशी त्यांना कॉट वरच श्वासाचे व्यायाम पण सांगितलं होते .
आनंद हॉस्पिटल ला आला , डॉ . निकम राउंड वरच होते .
” डॉ , कशी आहे त्यांची प्रगती ? “
” आता काही धोका नाही . तुम्ही अगदी देवदूत बनून आला आहात त्यांच्यासाठी . टेक केअर .”
” आज त्यांची मुलगी सगळे बिल भरेल . थँक्स तुम्ही सहकार्य केलंत .”
” mr. मोकाशी ,तुम्ही त्यांचे कोण ?”
” मी त्यांचा वेल विशर ….किंवा कर्जदार म्हणा .”
तो तिथुन निघाला ,अन सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचली .
सायली ची तगमग होत होती . इतकं सगळं झालं पण आनंद भेटला नव्हता .
ट्रीटमेंट चे सगळे पैसे सायलीने भरले . आणि त्याच्या ऑफिस ला गेली .
तो नेमका तिथे नव्हता .
त्याला फोन करणार की त्याचाच कॉल आला ” सायु , तू म्हणाली होतीस न ते डॉ . खाद्रा आत्ता याच आठवड्यात येत आहेत .मी अपॉइंटमेंट घेतलीये . आपण दाखवून घेऊया . बाबांना हिंडते फिरते करण्याची ताकद आहे त्यांच्यात . ”
” तुला मला भेटायची इच्छा नाहीये ? “.
” प्रत्येक नात्याचा एक आदर असतो न सायली , तू बाबांना एम्ब्युलन्स मध्ये घालून तिथे घेऊन ये . मी त्यांच्या समोर येणार नाहीये .”
डॉ . खाद्रा नि बाबांना तपासले , काही चाचण्या केल्या . ऑपरेशन करावे लागेल , काही महिने फिजिओथेरपी ,आणि ते ठीक होतील असे सांगितले .
ठरलेल्या दिवशी डॉ. नि बाबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं .
मनू ने AT&T मधून सुट्टी घेतली होती .
ती सायली सोबत OT च्य बाहेर बसली होती .
अचानक सूट बुटात एक व्यक्ती समोर आली .
” तुमच्या पैकी सायली कोण आहे ? ”
” मी .”
” तुमच्या फॅमिलीचा हा व्यवसायच आहे का? म्हणजे आधी बापाकडून पैसे उकळायचे आणि मग मुलावर पण फासे फेकायचे?”
तिला अंदाज आला …आणि तितकीच चीड पण आली…
” तुम्ही ….मोकाशी साहेब का ? . हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे …तुमच्या फॅमिलीचा हा व्यवसाय आहे का ,की आपल्याच एम्प्लॉई ला मरायला सोडून द्यायचं आणि त्याला तुडवून धंदा पुढे न्यायचा ? ”
” How dare you !! दिले न आता अडोतीस लाख !! ”
” हं !! मग बाबांचे ते दहा वर्ष पण वापस द्या सर ! . त्यांची फरपट , त्यांचे हाल ,असहायता … ह्याची किंमत ?”
” अच्छा !! त्याची किंमत म्हणून आनंद ला शोधलत तुम्ही ? Stay away from him miss Sayli !!” आणि अतिशय मग्रुरीत ते चालते झाले .
सायली अवाक झाली होती . ह्यांना कसे कळाले आम्ही इथे आहोत . ते फक्त आनंद आणि माझ्या बद्दल बोलले असते तर समजण्यासारखं होतं . त्यांना पूर्ण अधिकार ही आहे , पण इतक्या वर्षांनंतरही बाबांना न्याय मिळावा असे यांना कसे वाटत नाही !
” इथे येऊन गेले मनू , बाबांवर आत शस्त्रक्रिया सुरू आहे , पण एका शब्दाने विचारलं नाही की ते कसे आहेत , जिवंत तरी आहेत का ? ..इतके वर्ष त्यांच्या कंपनीत काम करूनही ? “
मनू उठली . तिने सायलीला जवळ घेतले .
“शांत हो दीदी . तुझं बरोबर आहे , पण आपण आपल्या मर्यादेतच राहू . जे चूक ते चूकच . तू त्रास नको करून घेउस .”
डॉ . बाहेर आले .ऑपरेशन यशस्वी झाले होते .
पोरींनी तर नमस्कारच केला डॉ . खाद्रांना .
हॉस्पिटलमध्ये एक छोटे गणपतीचे मंदिर होते . सायली तिथे जाऊन बसली .
एकटक डोळे भरून देवाकडे बघत होती .
ती स्वतः कमावती झाल्याबरोबर तिने ट्रीटमेंट चा निर्णय घ्यावा , नेमके त्याच वेळेला डॉ . भारतात यावे , सगळं ईश्वराने जुळवून आणलं होतं .
तिला मणांचं ओझं उतरल्या सारखं वाटत असतानाच शेजारी हालचाल झाली .
तिने वर बघितलं तर आनंद आला होता .
तिच्या डोळ्यातलं पाणी वाट काढून गालावर आले होते .
तिचे मोठे बोलके डोळे त्याच्या डोळ्यांना सारं सांगत होते .
त्याने हळूच तिच्या पाठीवर हात ठेवला .
तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं .
किती वर्षांचे जीवघेणे ओझे उतरले होते .
” नाराज आहेस माझ्यावर ? “
” आपल्याच सावली वर कोण नाराज होतं ? पण इतके दिवस का भेटला नाहीस ”
” तुला सन्मानाने मालकीण बनवायचंय ग !! “
त्याने अलगद हाताने तिचे डोळे पुसले . विस्कटलेले केस नीट केले .
हळूच विचारले ,” पप्पा आले होते न ? “
“………”
” प्रेमात खूप ताकद आहे सायली . सध्या विसरून जा की ते इथे आले होते . मी डबा आणलाय , दोघी जेवुन घ्या . ”
” मनू ला जॉब दिलास ..
” काम करणारे खूप मिळतील ग , जीव ओतून करणारे मिळत नाहीत . म्हणून मनूला बोलावून घेतले . ”
*******
बाबा आता वॉकर घेऊन घरातल्या घरात चालू शकत होते .
आई अतिशय खुश होती .
संध्याकाळी बाबांनी सायलीला बोलावले .
” सायली , तू आनंद बद्दल पुन्हा बोललीच नाहीस .”
” बाबा ?”
” डॉ निकम राऊंड वर आले होते ,तेव्हा आनंद शी बोलत होते . मी शुद्धीत होतो . मला समजले सारे .
कमाल आहे पोराची . मला त्याची माफी मागायचिये . बापाच्या कर्माची शिक्षा पोराने का भोगायची ? अस्सल सोनं आहे हा पोरगा ….मला तुझा खूप अभिमान वाटतो ग ! . “
सायली समाधान ने भरून पावली .
******
खूप उत्साहात सायली AT & T च्या ऑफिस मध्ये गेली . आता मोकळेपणाने आनंद शी खूप बोलायचं होतं .
रोहित होता ऑफिसमध्ये .
” या सायली मॅडम “
“अरे ! मॅडम काय !! आनंद कुठाय ?”
” सर मुंबई ला गेलेत कामानिमित्त . उद्या सकाळी येतील .”
तिने फोन लावला .
” सायली , आपली परीक्षा अजून संपली नाहीये . पप्पांनी एक मुलगी बघितलीये आणि जिद्द घेऊन बसलेत की मी तिच्याशीच लग्न करावं . ”
” मग कर न .” सायली खट्याळपणे म्हणाली .
” सावली ला आपले स्वतंत्र अस्तित्व असतं का ग ? …फक्त सावली असं ? ”
” …….रोहित म्हणतो ते बरोबर आहे . तू खूप छान लिहू शकतोस . तुझ्या भाषेला वजन आहे ………आनंद ? ….हॅलो !!
….आनंद !! ”
” काहीतरी घडलंय सायली …..तू ….तुकारामशी बोल …मी…फोन कट झाला .
आनंद सोबत तुकाराम गेला होता .
सायलीने दहा मिनिटे वाट पाहून तुकारामला फोन लावला .
” मोठ्या साहेबांचा खूप मोठा ऍकसिडेंट झालाय मॅडम . वाळू भरलेल्या ट्रक ने कारला धडक दिली . त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय .”
त्याही परिस्थितीत सायली ला कसं वागावे ह्याचे भान होते .
” तुकाराम , मी उद्या , रविवारी तिथे येते . साहेबांना काहीच बोलू नकोस .”
**********
‘ ईश्वरा , मी आमची खुशी मागितली तुला …दुसऱ्याचं सुख ओरबाडून ते आम्हाला नको देऊस ..आम्ही ते पेलू शकत नाही रे . ‘ असा विचार करत सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचली .
लीलावती जवळ खूप गर्दी होती .
सायलीला वाटले , नेमकं कोण मोठं ?
हे कामगार पहा , मालकाची वास्तपुस्त घायला लगेच आलेत ..आणि ………मालक ?
” सायली ?? आलीस !!! ”
उत्तरादाखल तिने त्याच्या खांद्यावर थोपटले .
” पपांनी तुझा अपमान केला ..
” अपमान मोठा की माणूस ?..मग बाबांनी तर तुला हाकललेच होते घरातून . “….” साहेब कसे आहेत ?”
” पाय अडकला होता सीट खाली . पूर्ण मोडलाय . ..कदाचित अँप्युट करावा लागेल . डाव्या मांडीत रॉड टाकावा लागेल . आणखी उजव्या हाताची बोटं पण…”
” आयुष्य सरळ का नाही जात आनंद ? हे सगळं काय घडतंय ? ”
” संकटं आले ,पराभव होतोय म्हणून कुणीच हारत नसतं ग , आपण हारतो तेव्हा , जेव्हा प्रयत्नच सोडून देतो . आपण तर अजून प्रयत्न सोडलेले नाहीत न ?”
डॉ . च्या म्हणण्यानुसार साहेबांना जीवाचा धोका न्हवता ,पण बराच काळ लागणार होता सगळं सुरळीत व्हायला .तेही एक पाय गुढग्यापासून नसतांना . किमानदोन आठवडे दवाखान्यात काढावे लागणार होते .
आनंद मुंबईलाच थांबला . कंपनी ने ‘ वास्तू ‘ हे पाच टॉवर्स आणि दोनशे फ्लॅट चे चॅलेंजिंग प्रोजेक्ट हाती घेतले होते .
ते सगळं आता आनंद बघणार होता .
*****
” हॅलो आनंद ! त्या ‘ दुबई सखी ‘ ह्या खास महिलांच्या टूर साठी कैलास आणि भावना सोबत मनू ला पाठवू का ? ”
” सायली , तू ऑफिस मध्ये ? Thats ग्रेट !!! रोहित काहीच बोलला नाही . ओह माय गॉड !!! ”
” मी GIBS सोडली आनंद !! आता फक्त AT&T “
“………..शब्द अडकलेत ग घशात ! ”
” तुझ्या फक्त दोनच ओळीच ऐकव आनंद , बाकी शब्दांची दाटी कशाला ?”
इन अटके हुये लब्जो को
ख्वाबो मे लिपट के सोने दो
आजाएंगे सिरहाने
तो लोरी गाके सुला देना ।
तिच्या डोळ्यातून खळकन दोन थेंब खाली ओघळले .
आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने धडाधड यशस्वी टूर्स ची मालिकाच सुरू केली . लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता . सायली ला मान वर करायला फुरसत नव्हती . आनंद शी सतत सल्लामसलत होत होती .
मोकाशी कन्स्ट्रक्शन नि आपलेअर्धवट राहिलेले ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केले होते .
सोबत पपांची अतिशय काळजी पण घेतली होती .
साहेब व्हील चेअर वर सगळी कडे फिरून आनंदाने सगळे बघत होते .
आपल्या मुलाचा त्यांना प्रचंड अभिमान वाटत होता .
सायली ऑफिस मध्ये असतांना बाबांचा फोन आला . सायली , कमालच झाली ग , मोकाशी साहेबांचा फोन आला होता . आपल्याला सगळ्यांना खूप आग्रहाचे आमंत्रण आहे , मुंबईला बोलावलंय .
” अपमान करायला ? “
” नाही , ‘ वास्तू ‘ चे हस्तांतरण आहे , मोठी पार्टी आहे म्हणे . आनंद तुला बोलला नाही ?”
” नाही , पण जाऊया आपण .”
***********
‘ वास्तू ‘ चे दोनशे कुटुंब , संपुर्ण टीम ,आनंद आणि साहेब उपस्थित होते .
सगळ्या टॉवर्स ला सुंदर रोषणाई केली होती .
आनंद नुसता बेचैन झाला होता . हे असं ह्यापूर्वी कधीच वाटले नव्हते त्याला .
त्याची नजर वारंवार प्रवेशद्वाराकडे जात होती .
इतका काळ दाखवलेला संयम आज वाकुल्या दाखवत होता .
आणि समोरून सायली चे कुटुंब आले .
तिने खास गर्द निळी पैठणी आणि मोत्याचे माफक दागिने असा साधा पण आकर्षक पेहराव केला होता .
साहेब स्वतः समोर आले . त्यांनी हात जोडून आई बाबांचे स्वागत केले .
” झालं गेलं माफ करा ..
” अरे !! साहेब !! नमस्कार नका करू “
आनंद नि मागच्या मागे सायलीला ओढले , आणि कनातीच्या मागे घेऊन गेला .
” AT & T ची मालकीण शोभतेय अगदी !! पेशवाईण कुठली !!”
” ……..”
” वर बघ न सायली . “
” तुझे अडकलेले शब्द माझ्याकडे पाठवलेस ना ? मग कसे बोलणार ?”
दोघेही मनमोकळे हसले .
साहेब ( व्हील चेअर वर ) , आई , बाबा आणि मनू डायस वर उभे होते .
” नमस्कार मंडळी . ‘ वास्तू ‘ हे माझे स्वप्न माझ्या मुलाने , आनंद ने पूर्ण केले . आणि आनंदचे स्वप्न सायलीने वेगळ्याच उंची वर यशस्वीपणे नेले .
मी दोघांना विनंती करतो की त्यांनी ही फीत कापून ‘ वास्तू ‘ चे शुभ हस्तांतरण करावे , आणि पहिल्या फ्लॅट च्या किल्ल्या त्या कुटुंबाकडे द्याव्यात .
टाळ्यांचा कडकडाट झाला .
जोडी खूपच छान दिसत होती .
आई न बाबांच्या चेहेऱ्यावर आनंद मावत न्हवता .
बाबा नि साहेब पुढे आले . त्यांनी आनंद चा हात सायलीच्या हातात ठेवला ……सायली लाजली …
आणि मनू ने एक कडक शिट्टी मारली .
” काय मालकीण बाई , खुश ?”
सायली म्हणाली ,
” सावली कधी बोलते का ? “
आणि त्याने खांद्यावर हात टाकून प्रेमाने तिला जवळ ओढले .
( समाप्त )
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …