अण्णांचे हरवलेले पत्र

©पल्लवी घोडके-अष्टेकर.
अण्णा गावातील प्रतिष्ठित लोकांपैकी एक, स्वभावाने फार भोळे व विनोदी, कुणी कधी त्यांना वेडेवाकडे बोलले किवा चुकून अपमान केला तरी अण्णा त्या व्यक्तीस प्रत्युत्तर देऊन दुखावत नसे. 
तरुण वयात अण्णांनी गावचे सरपंच पद गाजवले होते. पण आता म्हातारपणाने थकलेले, भरदार मिश्या, पांढरे शुभ्र-लाल बॉर्डर चे धोतर, काळा कोट व हातात काठी.कधी गांधी टोपी तर कधी सणावाराला फेटा असा त्यांचा पेहराव. 

अण्णांना दोन मुले व एक मुलगी. दुर्दैवाने गेल्या महिन्यात अण्णांची कणखर अशी बायको ‘माई’ हृदयविकाराच्या झटक्याने वारली.माई आणि अण्णांचे नाते अगदी जगावेगळे,माई हुशार, खंबीर, आणि चतुर होत्या. अण्णांना कधीही एकटे न पडू देणारी माई पण नियतीने घात केला आणि आता अण्णा एकटेच राहिले. माईंच्या माघारी. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्यांचे दुःख कधी कुणाला दिसत नसे. पण Miss करायचे ते माईंना खूप. 

अण्णांनी त्यांचे शेत मुलांच्या नावावर केलं होते, राहता वाडाही मुलांनाच दिला होता.गावची जमीन मात्र लेकीला दिली आणि आता सगळ्या जबाबदारीतून ते मोकळे झाले होते. सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या असे अण्णांना वाटत होते पण ‘पत्राची’ एक भानगड मात्र त्यांच्या मागे होतीच.
त्या हरवलेल्या पत्राबद्दल अण्णा कधी कधी विचार करीत स्वतःशीच हसत. “खरंच मी पत्र कुठेतरी ठेवून विसरून गेलो? गंमतच आहे.मी ठेवलं आणि मलाच कसं आठवत नाही?” अण्णांना असे स्वतःशीच विचार करून हसतांना पाहून त्यांची मुलं लगेच त्यांना  “आठवलं का काही?” म्हणून विचारत.

“काय?”
“काहीतरी?”सुधीर ने विचारले.सुधीर अण्णांचा मोठा मुलगा.
त्यावर अण्णा भोळेपणाचा आव आणुन म्हणत,”काहीतरी म्हणजे?” त्यांना माहित असतं त्यांची मुले त्यांना काय विचारतात ते. पण उगाच हसून ते विचारतात “काय आठवायला हवं मला?”
“अहो अण्णा….ते ‘हरवलेलं पत्रं’ कुठे ठेवले तुम्ही…. ते आठवलं का?” सुधीरने विचारलं.

“हा……ते होय?सापडेल रे कधीतरी, तुझ्या आईने नाव सुधीर ठेवलं तुझं,पण जरा…. धीर नाही बघ तुझ्यात” अण्णा हसुन म्हणाले आणि नेहमीचच उत्तर ऐकून सुधीर हिरमुसला.
सुनबाई अण्णांना चहा देत म्हणाल्या, “माईंना तरी ते पत्र आपल्याला द्यायला काय झालं होतं कुणास ठाऊक?”
हं……… तर पत्राची गंमत अशी की काही महिन्यापूर्वी माई माहेरी गेल्या होत्या,आल्या तेव्हा फार खूश होत्या. म्हणाल्या माझे वडील सावकार होते. इस्टेटीच्या वाटण्या करून मुलींना पण वाटा द्यायचं ठरवलंय दादांनी. (माईंचा भाऊ)तेव्हा पुढच्या आठवड्यात वकीलाला घेऊन जाऊन कागदपत्र तयार करून घेईल.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला, ठरल्याप्रमाणे त्या गेल्या होत्या पण माईंनी कागदं काही घरी आणली नाही. वकिलांकडे ठेवलीत म्हणाल्या. 
यांच्या मृत्युनंतर मात्र वकिलाने एक पत्र आणले होते,”मी माझ्या इस्टेटीचं काय करायचं ते एका पत्रात लिहून ठेवलंय, ते पत्र अण्णा तुम्हाला देतील. माझ्या मृत्यूनंतर अण्णा त्या इस्टेटीच्या वाटण्या करतील.” असे त्या पत्रात लिहिले होते.
पण…. आता पत्र हरवलं होतं, अण्णांना चक्क आठवतच  नव्हतं पत्र कुठे ठेवलंय ते!

दिवसामागून दिवस जात होते, सुना अण्णांचे सगळं जिथल्या तिथे करत होत्या.त्यांची पथ्य,औषधं, जेवण-खावण,अगदी सगळं सगळं. मी गेल्यावर अण्णांचे काय होईल? असे माईंना सारखे वाटे, त्यात अण्णा स्वभावाने फारच भोळे. पण अण्णांचं मात्र अगदी मजेत चाललं होतं.
हा…,..अधून-मधून मात्र त्या ‘हरवलेल्या पत्राने’ अण्णा बेचैन होत एवढंच.
आता तर दोन वर्ष होत आले, घरातल्या सगळ्यांनी अण्णांची खोली,माळा,अडगळीची खोली सुद्धा शोधून काढली. पण पत्र काही मिळेना.

आता पत्राची बातमी अण्णांच्या लेकीला ही मिळाली तीही आली.
माईच्या साड्यांचे ट्रंक उघडून मला काही जुन्या साड्या हव्यात म्हणू लागली. मग काय?  सगळ्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली, अगदी एक एक साडी, ही किती सुंदर,ही किती भारी,म्हणून सूना व मुलगी झटकून नेसू लागल्या. पण पत्र काही सापडेना!😀
मग त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी अण्णांच्या सगळ्या वृद्ध मित्रांना घरी जेवायला बोलावलं.
एका एका म्हाताऱ्याचे नखरे झेलत त्यांचा उत्तम पाहुणचार केला.

गप्पा रंगल्या,बालपणीच्या…… लग्नाच्या……. अण्णा  सरपंच होते तेव्हाच्या….. माई बरोबरच्या त्यांच्या सुखी संसाराच्या….,..सगळं सगळं त्यांना आठवत होतं. 
फक्त त्या ‘हरवलेल्या पत्रा’ बद्दल मात्र काही केल्या ते बोलना. सगळी मेहनत पाण्यात गेली.😆
अण्णांच्या छोट्या मुलाने सुबोधने तर एकदा चक्क वकील साहेबांना घरी बोलावून इस्टेटीच्या वाटण्या करण्यासाठी वकील साहेब आल्याचं सांगितलं. 

तिन्ही मुलं व वकीलसाहेब अण्णांकडे पाहू लागले. 
अण्णांनीही प्रश्नार्थक नजरेने सर्वांकडे पाहिले आणि हसत म्हणाले, “कोणी येणार आहे का? करा की सुरू वाटण्या.”
“अहो अण्णा…….तुम्हीच तर करणार आहात ना वाटण्या” सुधीर म्हणाला.
“मी? नाही बुवा, मी तर शेती आणि घर तुमच्या नावावर व गावाकडची जमीन सुनीताच्या (मुलीच्या)नावावर केली की.”
“म्हणजे अण्णा, माई जाण्याआधीच केलेली वाटणी तुम्हाला लक्षात आहे तर?” सुबोध बोलला.

“अरे खुळ्या मीच नाही का केल्या त्या वाटण्या? नाव  सुबोध ह्याचं  पण बोध मात्र काहीच होत नाही याला.” अण्णा हसतच बोलले.
“अण्णा…….मग माईंच्या इस्टेटीच्या वाटण्या करूयात का?” सुनीताने हळूच सुचवलं.
“हं…….करा की मग, वाट कसली पाहताय?” अण्णा मिश्कीलपणे हसत बोलले.
“अहो अण्णा, तुम्ही करणार ना वाटण्या?” सुनबाई बोलल्या.

“हो,पण पत्र सापडल्यावर,पत्र कुठं सापडलंय अजून?” अण्णा बेफिकीरपणे म्हणाले.
मुलांना वाटलं वकील,वाटण्या,इस्टेट असा माहोल तयार केला की अण्णांना काहीतरी आठवेल. पण कसलं काय नी कसलं काय! सगळं मुसळ केरात गेले.🙄
मुलांना इस्टेटीची हाव नव्हती, पण पैसा कुणाला नको असतो?
त्या हरवलेल्या पत्राचा शोध चालूच राहिला.

शेवटी माई गेल्यावर पाच वर्षांनी अण्णांची जीवन ज्योतही विझली. 
अण्णांच्या प्रेमळ स्वभावाने नातवंड,मुले,सुना सगळ्यांनाच त्यांच्या जाण्याने अपार दुःख झाले पण त्याहून मोठे दुःख ते ‘हरवलेले पत्र’ अजूनही सापडले नव्हते त्याचे झाले.
माईंच्या शेजारी अण्णांचाही फोटो भिंतीवर चढला होता.
अशातच वकीलाने एक दिवस एक पत्र आणले आणि “माईंनी हे पत्र अण्णांच्या मृत्यूनंतर तुम्हाला द्यायला सांगितले होते,” असे म्हणून पत्र पुढे गेले.

“का……य…?” पत्र तुमच्याकडे होते?” मग बोलला का नाही आधीच? सगळ्यांनीच वकील साहेबांना प्रश्न केला.
“अण्णा गेल्यावरच हे पत्र मुलांना द्यायचं अशी ताकीद दिली होती माईंनी मला,पण पत्र तुमच्या हस्ते सुपूर्त करण्यापूर्वी वर्षाचे दोन हजार याप्रमाणे माई गेल्यावर अण्णा पाच वर्षे जगले. म्हणून दहा हजार माझी फि मला द्यावी व पत्र घ्यावे.” अशी त्यांनी विनंती केली.
दोन्ही मुलांनी आपापल्या खिशातून पैसे काढले, 
सुनांनी घरात साठवलेले असे मिळून दहा हजार जमा करून वकिलांच्या हातात ठेवले.

त्यांनी पैसे घेऊन पत्र सुधीरच्या हातात दिले आणि ते निघून गेले. 
पत्रात काय लिहिलं होतं हे त्यांनाही माहीत नव्हतं.पण त्या पत्राची किंमत दहा हजार रुपये होती.
दोन्ही मुलांनी सुनितालाही फोन केला.ती आल्यावर पत्र उघडायचे ठरले.
इतकी वर्षे आपण शोधत असलेले पत्र आपल्याला मिळाले याचा आनंद,तर पत्रात काय लिहिले असेल याच्या उत्सुकतेने कुणाला चैन पडेना.

दुसर्‍या दिवशी सकाळीच सुनीता आणि जावई घरी आले.
जेवणं करून पत्र उघडले गेले.
पत्रात खालील प्रमाणे मजकूर लिहिलेला होता.
“अण्णा गेल्याने तुम्हास अतिशय दुःख झालं असेल हे मला माहीत आहे, त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ती कशानेच भरून येणार नाही हे मी जाणते. अण्णांनी त्यांचे आयुष्य अगदी हसत, आनंदाने घालवले.मी गेल्यावरही ते तसेच जगले असतील याची मला खात्री आहे.तुमचं अण्णांवर असलेले प्रेम मला माहित आहे.मी गेल्यावरही तुम्ही त्यांना काहीच कमी पडू दिलं नसेल याची खात्री बाळगते. 

अण्णा नेहमी म्हणत,”माणसाला बाकी काही आलं नाही तरी हसता आलं पाहिजे”. मी मात्र संसार ऐके  संसार केला.त्यांच्या विनोदी स्वभावामुळे मी नेहमी आनंदी राहिले. पण कधी विनोद करून कुणाला हसवायला मात्र मला जमलं नाही.पण मागे येऊन गेलेल्या अटॅक मुळे मात्र मला त्याची जाणीव झाली व ही पत्राची युक्ती मला सुचली. या पत्राच्या निमित्ताने तुमची थोडी गंमत करावी असे मला वाटले व मी हा प्रयत्न केला. तुम्ही सगळे असेच हसत, आनंदित रहा हीच सदिच्छा.

सुधीर, सुबोध व सुनिता पत्र शोधतांना तुम्ही जसे एकत्र प्रयत्न केले असतील तसेच प्रयत्न पुढे आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी ही कराल आणि कायम एकत्र जिवाभावाने रहाल अशी खात्री बाळगते.
आता राहिला प्रश्न इस्टेटीचा तर तुम्ही तिघे, सुना-जावई आणि नातवंडे हीच आमची इस्टेट.आणि त्याच्या वाटण्या कशा होणार? त्या होऊच नये अशी अण्णांची व माझी इच्छा.
सुनांना अनेक आशीर्वाद,नातवांना आजीचे खूप खूप प्रेम.” अन॒ शेवटी “माईचा राग तर आला नाही ना रे पोरांनो?” असे म्हणून माईने पत्राचा शेवट केला होता.

दहा हजार रुपयांचे पत्र! सगळ्यांचे चेहरे पडले होते पण माई गेल्यावरही ह्या पत्रातून त्यांच्याशी बोलत होती, तिचं ते पत्र आज सगळ्यांनाच समाधान देऊन गेलं. एकमेकांकडे पाहून ते ओशाळवाणे हसले.
मी कायम तुम्हाला साथ देईल ह्या माईंच्या शब्दाला त्या जागल्या होत्या.
अण्णांना त्यांनी गेल्यानंतरही त्या पत्राच्या साह्याने जपले होते.
©पल्लवी घोडके-अष्टेकर.
सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर  यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क  त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

Leave a Comment

error: Content is protected !!