आभास क्षणिक होता, पण….!!!!

© परवीन कौसर
“अरे रवी किती वेळ गेम खेळत बसतोस. झोप आता. माझ्या डोळ्यांवर तुझ्या मोबाईलचा प्रकाश पडतो अन् मला झोप येत नाही. वेळाने झोपले की सकाळी लवकर जाग येत नाही. जरा उठायला वेळ झाला की सगळी कामे वेळाने होतात. मग एकदा का वेळ झाला की सकाळची ९.१५ ची लोकल मिस होते. नेहमीप्रमाणे आॅफिसला उशीरा गेले की बॉसची बोलणी खायची.
हे फक्त आणि फक्त तुझ्या या गेममुळे होते बघ. बंद कर न प्लिज. तुझे आपले बरे आहे रे .वर्क फ्रॉम होम आहे. निवांतपणे उठून करु शकतोस. तसे माझे नाही. हे राजा ठेव न रे फोन.

बघ न खिडकीतून बाहेर तो पौर्णिमेचा चंद्र. किती सुंदर दिसत आहे. त्या बघ चांदण्या त्याला रिझवण्यासाठी त्याच्या अवतीभवती चमचम करत आहेत. हे बघून मला आपली कॉलेज वाली लव्ह स्टोरी आठवली बघं.” इतकं म्हणनं झाले न झाले निशाचे रवीने पटकन आपला मोबाईल बंद करून तिला आपल्या बाहुपाशात ओढले .
निशाला आपल्या बाहुपाशात घट्ट बांधुन तिच्या चेहऱ्यावर रुळलेली केसांची बट हळूच मागे सारत तिच्या सौंदर्याला तो न्याहाळू लागला.

तशी निशा ही रंगाने थोडीशी सावळी होती पण नाकेडोळी उठावदार होती. सडसडीत बांधा लांब सडक केस हनुवटीवर छोटासा तीळ तिच्या सौंदर्याची उधळण करत तिच्या सौंदर्यावर आणखीन भर घालत होता. आवाजात माधुर्य असणारी निशा.
तिच्या त्या सुंदर रुपाला तो एकसारखा बघू लागला.
बघता बघता हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवत प्रदीर्घ चुंबन घेतले.
निशा त्याच्या चुंबनाने लाजेने चूर चूर होऊन गेली. तिने पटकन आपले हात आपल्या चेहऱ्यावर ठेवले.

“इतके सुंदर रुप का म्हणून असे लपविते निशा. माझ्या प्रेमात चिंब चिंब होऊन भिजलेले तुझे हे रुप पाहून मला खूप गर्व वाटतो. मला एकेक वेळी विश्वास बसत नाही की इतकी सुंदर मुलगी माझी अर्धांगिनी.” रवीने तिच्या चेहऱ्यावरील तिचे हात बाजूला सारत म्हटले.
” इश्श…!!!!!” निशा यापुढे काहीही न बोलता रवीच्या घट्ट बाहुपाशात विलिन झाली.
निशा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी. वडील शिक्षक आई गृहिणी.

निशा सर्वात मोठी मुलगी तिच्या पाठीवर एक भाऊ नंतर एक बहिण. असे हे तिघे भावंडे. निशा पहिल्या पासून हुशार होती. नेहमी ती शाळेत पहिल्या नंबरने पास व्हायची.
हायस्कूलमध्ये तिने स्काॅलरशीपची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढचे शिक्षण स्काॅलरशीपवरच पूर्ण केले. दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळे शहरातील नामवंत कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला.
सर्वांशी प्रेमाने वागणारी निशा.
तिला बघताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल असेच तिचे रुप होते.

रवी शहरातील नामवंत डॉक्टराचा एकुलता एक मुलगा. रुबाबदार देखणा हसतमुख चेहरा असलेला. त्याच्या वडिलांना तो देखील आपल्या सारखा डॉक्टर व्हावे असे वाटत होते पण त्याला डॉक्टर पेक्षा इंजिनिअरिंग मध्ये आपले करिअर करायचे होते.
शेवटी त्याच्या इच्छेनुसार त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनिअरींग करायला संमती दिली.
रवी आणि निशा यांची भेट कॉलेज मध्ये झाली होती.
दोघेही एकाच वर्गात होते. दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर कधी झाले हे यांनाच कळले नाही.

तसे तर कॉलेजमधील खुप मुली रवीच्या अवतीभवती फिरायच्या त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी हवे तसे फॅशनचे कपडे गॉगल घालून यायच्या.
पण रवी कधीही त्यांच्याकडे पहायचा नाही. त्याला साधी राहणी उच्च विचारसरणी असणारी निशा खूप आवडली होती.
दोघेही प्रत्येक सेमीस्टर मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे.
बघता बघता फायनल सेमिस्टरध्ये कॅम्पस सिलेक्शनसाठी वेगवेगळ्या कंपन्या आल्या.
दोघांचेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले.

फायनल इयर संपले निकाल जाहीर झाला तसे दोघांनी आपापल्या कंपन्या जॉईन केल्या.
संध्याकाळी आॅफिस सुटले की दोघे एका कॅफे मध्ये भेटायचे. हे आता यांचे दोघांचेही रोजचेच रुटिन होते.
आता दोघांच्या घरात लग्नाची बोलणी सुरू झाली तसे या दोघांनी आपल्या प्रेमाबद्दल सांगितले.
काहीशी कुरबुर झाली दोघांच्या घरात पण खऱ्या प्रेमाने घरातील मोठ्यांची मने जोडण्याचे काम केले.

लग्न अगदी धुमधडाक्यात झाले. हनिमूनला आठ दिवसांसाठी हे नवजोडपे केरळला गेले.
आठ दिवस अगदी आठ मिनिटांत संपले असेच वाटले.
हनिमून वरून दोघे परतले. आता दोघांनी परत आपापल्या कामाला जायला सुरुवात केली.
लग्नाला तीन महिने झाले तोच घरात नवीन पाहुणा येणार याची चाहूल लागली. निशाचे रुप अजून खुलले.

निशाचे आॅफिस घरापासून काहीसे दूर होते. तिथे कॅबची व्यवस्था नसल्यामुळे तिला लोकलनेच जावे लागायचे.
तिला नोकरी सोडून दे काय कमी आहे आपल्याला असे रवीची आई म्हणायची.
पण ती जोपर्यंत होईल तोपर्यंत जाईल नंतर सुट्टी घेईन असे म्हणायची.
आता ती सातव्या महिन्याच्या उंबरठ्यावर उभी होती. पोट पण तिचे दिसू लागले होते.

आता घरात सगळेजण तिची खूप काळजी करत होते.
सातव्या महिन्यात तिची ओटी भरणी करायची. मोठा समारंभ करायचा.
सगळे आप्तेष्टांना नातेवाईकांना बोलावयाचे असे आता घरात बोलले जाऊ लागले.
त्यासाठी चांगला पार्टी हॉल, कॅटरिंग, नवीन साड्या दागिने यांची लिस्ट रवीच्या आईने काढली.
निशापण सातवा महिना संपला की मेटरनीटी लिव्ह घेणार होती.

दोन दिवसांवर कार्यक्रम होता. जवळपास सगळी तयारी झाली होती.
काही एखाददुसऱ्या वस्तू आणायच्या होत्या. निशाची रविवार असल्याने पार्लरची अपॉईंटमेंट घेतली होती. र
वी आपल्या आईला आणि निशाला घेऊन मार्केट मध्ये गेला.
आईला काही साड्या खरेदी करायच्या होत्या.
पार्लर समोर साडीचे शो रुम होते.

” हे बघ रवी मी आता साड्या आणायला जाते तोपर्यंत तू निशाला पार्लर मध्ये सोडून ये. हळूहळू रस्ता ओलांडून जा रे. बघ इकडे रहदारी खूप आहे. सांभाळून बाळा.” असे म्हणत रवीची आई साडीच्या शो रुम मध्ये गेली.
निशा रवी बरोबर पार्लर मध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडून पुढे जात होती इतक्यात समोरून एक भरधाव वेगाने येत असलेल्या बाईकने काही कळायच्या आत जोरात निशाला धडकले तशी ती धाडकन उडून जमीनीवर जाऊन आदळली.

” सॉरी रवी निशा इज नो मोअर…..!!!!!!”
दवाखान्यात एकच स्मशानशांतता.
त्या शांततेला चिरणारी एकच आर्त किंकाळी रवीची.
तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला.
रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

“निशा….!!!!! असे कसे तू मला सोडून जाऊ शकतेस. आता तर आपली संसार वेलीवर फुल लागणार आहे.
संसार वेलीवर बहर येत आहे तू तो बहर यायच्या आधीच त्याची पानगळ करु नकोस न.” असे म्हणत रडत रडत तो हातामध्ये निशाचा फोटो घेऊन त्याचे पापे घेऊ लागला.
आता हे रोजचेच झाले होते.
निशाचा रोजच आभास क्षणिकच होता पण…. त्याच्या हृदयात अगदी खोल वर जखम करून देत होता.
अशी जखम जी कधी ही भरण्यासाठी….!!!!

© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!