जिवंत आहे तोवर

© कांचन सातपुते हिरण्या
आबांनी रोजसारखी देवपूजा केली . देवांना फुलं वाहिली . दिवा धूप लावला आणि नमस्कार करून उठणार तोच छातीत जोरात कळ आली .
इतकी जीवघेणीच ठरली की त्यांना माईंना एक हाक मारायची संधीही मिळाली नाही .
वाटीत देवासाठी दूध साखर घेऊन आलेल्या माईंच्या तोंडून आवाजच फुटेना .

दातखिळी बसली त्यांची आबांना निपचित बघून . एका क्षणात सगळं संपलं .
नुकतीच सत्तरी पार केलेल्या आबांचं असं चालता बोलता जाणं मित्रपरिवार , नातेवाईक सगळ्यांनाच चटका लावून गेलं . 
सगळी कार्य पार पडली . दहावा तेरावा झाला .
आईला सावरायला , भावाला वहिनीला आधार द्यायला आलेल्या सुलभानं निघताना अभयला विचारलं ,” अभय आईला नेऊ का रे थोडे दिवस माझ्याकडे ?

तुम्ही दोघं आता ऑफिस जॉईन करणार . सोनलचं कॉलेज एकटीच पडेल घरी माई दिवसभर . इतके दिवस आबा तरी होते पण आता..”
अभयनेही लगेच होकार भरला .
“ताई ने माईला तूझ्याकडं पण सात आठ दिवसांनी मी येतो न्यायला . आम्हांला सुध्दा करमणार नाही गं तिच्याशिवाय. एकतर आबापण कधी न येण्यासाठी निघून गेलेत .”
बाजूला बसलेल्या माई मूलांचं बोलणं ऐकत होत्या . 

“माझी मूलं खरंच किती माया करतात माझ्यावर .आता त्यांच्याकडं बघून पुढचे दिवस ढकलायचे .”
जोडीदाराच्या अशा अचानक जाण्यानं खचलेल्या माई सुलभाकडं गेल्या खरं पण एका खोलीत शांत बसून असायच्या दिवस दिवस .
पाचव्या दिवशी अभयचा फोन आलाच .
” ताई मी येतो गं उद्या माईला घ्यायला.”
पण सुलभाची लेक मीना पहिल्या बाळंतपणासाठी आईकडे येणार होती .

सुलभानं अभयला लगेचच सांगून टाकलं .
“अभय आता आल्यासारखी राहू दे माईला आणखी थोडे दिवस इथंच. मीना पण येणारे . तिचे दिवस भरत आलेत. तिचं मन रमेल रे पतवंडाचं करण्यात . “
आणि महिन्याभरातच मीना बाळंत झाली .
माईंच्या दुःखावर काही प्रमाणात का होईना फुंकर घातल्यासारखं झालं .

येणारे पाहुणे रावळे , बाळ बाळंतिणीची आंघोळ , तिचं खाण्यापिण्याचं पथ्य बाकीचं करायला सुलभाला त्यांची खूपच मदत झाली . 
अधेमधे अभय रेशमा येऊन जात होते भेटून .
दोन महिने कसे गेले कळालंच नाही .
मीना सासरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी सुलभानं अभयला फोन लावला .
” अभय अरे माईला कंटाळा येईल आता इथं . कधी येतोयस तू तिला घ्यायला ?”

पण अभयनं ,” अगं आम्ही उद्या काश्मीरला चाललोय आठ दिवस जरा चेंज हवा म्हणून . मी आल्यावर लगेच नेतो माईला . आत्ता ती एकटीच राहिल अगं घरात आली तरी . आधी तरी सांगायचं होतं तू .” असं सांगितलं .
आणि हे ऐकून सुलभाची चांगलीच चिडचिड झाली .
हे सगळं सुलभानं नवऱ्याला सांगताना माईंच्या कानावर पडलं आणि इतकी वर्षे ऐकलेल्या बघितलेल्या जगरितीचा प्रत्यक्ष अनुभव आला .

” सुलभा आता मला घरी नेऊन पोहोचव गं . असं जावयाच्या दारात किती दिवस राहायचं ? आणि मीना पण गेली की सासरी .” म्हणून त्यांनी हट्ट धरला . पण मनातून खूपच दुखावल्या गेल्या माई .
” जोपर्यंत हे होते तोवर मान आदर प्रेम होतं . ते सगळंच आटलं यांच्या अचानक जाण्यानं . ईश्वरा मला पण का नेलं नाहिस रे यांच्यासोबतच .” काय काय विचार येत होते मनात त्यांच्या .
सुलभाकडून आल्यापासून अभय रेशमाचं वागणं  खूपच बदललं माईंबरोबर .

अभयनं तर कुलूपच लावलं होतं तोंडाला .
रेशमानं पोळ्या करायला येणाऱ्या मावशींपासून वरकामाच्या दुसऱ्या मावशींनाही येऊ नका म्हणून सांगितलं.
लहान मोठी करता करता घरातली कितीतरी कामं तिनं हळूहळू माईंवर टाकली एकेक करून .
दिवस पुरेना माईंना आता .
आता एवढी दगदग थोडीच झेपणार होती त्यांना .

आधीच मधुमेह त्यातून खाणं पिणं , औषधं पथ्य न पाळल्यामुळं माईंना त्रास होऊ लागला . पण घरात त्यांच्याकडं लक्ष द्यायला त्यांचं ऐकून घ्यायला आता कुणाकडंच वेळ नव्हता . 
त्यात भर म्हणून एक दिवस मंदिरातून येताना माईंना पायाला ठेच लागल्याचं निमित्त झालं .
त्यांनी घरातलं मलम वगैरे लावून बघितलं पण जखम काहि बरी होईना , खूपच चिघळली .
कितीतरी वेळा अभय रेशमाच्या कानावर घालूनही ,
” काहीतरी मलम लाव . एवढ्या तेवढ्यासाठी कुठे सारखं दवाखान्यात जायचं आणि तू बघतेस ना माई वेळ तरी असतो का गं मला .”म्हणून अभयनं टाळाटाळ केली ती चांगलीच महागात पडली .

पायाला झालेलं इन्फेक्शन एवढं वाढलं की जेव्हा अभयनं माईंना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला चांगलीच समज दिली , पण शरीरात इन्फेक्शन पसरू नये म्हणून पायाचं ऑपरेशन करावं लागेल सांगितलं .
ऑपरेशननंतर माई आणखीच गळाल्या . यावेळी सुलभा अगदी पाहुण्यासारखी भेटून गेली .
आईसाठी जरासुद्धा कणव दाटली नाही तिच्या मनात .
घरातली सगळ्यांची चिडचिड वाढली .

त्यांच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलायलाही वेळ नव्हता कुणाकडं .
वयोमानामुळं आणि ऑपरेशन , माईंच्या हालचालींवर खूप मर्यादा आल्या . त्यांनी अंथरूणच धरलं .
शरिराआधी मन खचलं .
आता जगायचं तरी कुणासाठी ?
अंथरूणावर पडलेल्या माई आबांना आठवत सारखा हाच विचार करत .

आणि काही महिन्यांतच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली शरीर आणि मनाने खचलेल्या माईंनी या जगाचा निरोपच घेतला शेवटी .मुलगा ,सून , मुलगी , नातवंडं सगळ्यांनी जगरितीप्रमाणे आसवं ढाळली काही दिवस .
तेराव्याच्या दिवशी अभयनं आचारी बोलावून स्वयंपाक करून घेतला .
रेशमा सुलभा येणाऱ्या जाणाऱ्यांना ,” माईंनी किती कष्टातून आयुष्य सावरलं ,” हे डोळ्याला पदर लावून सांगत होत्या .

अभयनं तेराव्याचा विधी झाल्यावर कावळ्याला घास ठेवला . कावळा काही येईना .
सगळे कंटाळून गेले .
” सगळं तर आहे ताटात आणि आता माईची काही इच्छासुध्दा राहिली नव्हती . मग काय झालं गं ?”
सुलभा रेशमाच्या कानात हळूच पुटपुटली .
कितीतरी वर्षांपासून आबा माईंचा शेजार असलेल्या शेजारच्या साठे आज्जी पुढे आल्या .

त्यांनी छोटी बाजरीची दामटी त्यावर तूप गुळाचा खडा ठेवून  ताटाशेजारी ठेवली आणि पटकन कावळा आला .
न बोलता सगळेच समजून गेले काय ते .
स्वार्थ साधणाऱ्या मुलांनी ठेवलेल्या ताटापेक्षा शेवटच्या दिवसांत प्रेमाने चार शब्द बोलणाऱ्या , दोन घास भरवणाऱ्या साठे आजींनी ठेवलेली भाकरी कावळ्यानं लगेच उचलली .
साठे आज्जी डोळे टिपत कोणाशी काही न बोलता निघून गेल्या पण तिथे असलेल्या प्रत्येकालाच नकळत धडा मिळाला .
जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा गेल्यावर कितीही मेवा ठेवला तरी तो व्यर्थच .
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!