© सौ. प्रतिभा परांजपे
अबोली ने आज हाफ डे सुट्टी घेतली , कारण आज तिला विराज च्या आधी घरी पोचायचे होते.
आजच्या विशेष दिवशी तिने ठरवले होते की विराज च्या आवडीची स्पेशल डिश बनवून त्याला सरप्राइज द्यायचे.
तिला आठवलं की लहानपणी जेव्हा सुमी आत्याचे लग्न ठरले होते तेव्हा आज्जी तिला सांगायची “बघ सुमे, नवर्याचे प्रेम मिळवण्यासाठी फक्त सौंदर्यच पुरेसे नाही, त्यांच्या मनात शिरायला एक वाट अजून असते, जी पोटा कडून जाते. तू जर त्यांच्या आवडीचे, चांगले व स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालशील तर त्याच्या मनात तुझी जागा पक्की असे समज”
त्या वेळी ऐकलेले आजी चे बोलणं,त्याचा अर्थ अबोली ला आता उमगला.
आज अबोली आणि विराज च्या लग्नाला बरोबर एक महिना झाला.
लग्नानंतर आठ दहा दिवस हनिमूनच्या गोड गुलाबी वातावरणात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही.
पण दोघांचीही नवीनच नोकरी होती, त्या मुळे सुट्टी जास्त नसल्याने दोघंही लवकरच कामावर जॉईन झाले.
सकाळी घाईघाईत चहा, ब्रेड बटरचा नाश्ता खाऊन ऑफिसला पळत, दुपारचे लंच ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये मिळत असे.
अबोलीचे ऑफिस दूर असल्याने संध्याकाळी तिला घरी परत पोहोचायला रात्री आठ वाजत.
पण विराज चे आफिस सहा साडेसहा पर्यंतचे , त्या मुळे आधी घरी पोहोचल्यावर तोच काही तरी बनवून ठेवायचा.
तर कधीकधी दोघं मिळून काही, पास्ता, नुडल्स वगैरे बनवायचे किंवा बाहेरूनच मागवायचे.
नवे लग्न, नव्या नवलाईचे दिवस दोघंजण छान एन्जॉय करत होते.
विराज अबोली ची खूप काळजी घ्यायचा, तिला प्रेमाने सोना, बेबी, पिल्लू म्हणायचं मग अबोलीही तसेच बालिशपणे वागायची.
एकूण मॅरिड लाईफ मस्त चालले होते.
अबोली ला विराज ची आणि तिची पहिली भेट आठवली.
अबोली, कारखानिसांच्या घरातलं शेंडेफळ.,. कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.
काॅलेज, अभ्यास ह्या व्यतिरिक्त दुसरा काही विचारच नव्हता डोक्यात, ऐन परीक्षेच्या सुमारास काकाचे लग्न ही झाले.
अबोलीला त्या लग्नात काहीच मजा करता आली नाही. शेवटचा पेपर संपला तशी तिने सुटकेचा श्वास सोडला.
रिझल्ट लागताच कॅम्पस सिलेक्शन मधे अबोलीला बेंगळुरूला जाॅब लागला.
आई, आजी दोघी काळजीत, पोरीला काहिच शिजवता येतं नाही, काय करेल,काय खाईल?
पण बाबा म्हणाले करेल मॅनेज.
आफिस मधली तिची कलिग सोनाली बरोबरच रूम शेअर करून रहायची व्यवस्था झाली.
दोघी बरोबरच आफिस जात येत , लंच आफिस मधे होत असे.
एक दिवस शनिवार रविवार आॅफ होता.
अबोली लॅपटॉप घेऊन बसलेली होती , सोनालीच फोन वर कुणाशी तरी चॅटिंग चालले होते.
“अबोली अगं तुझं हे काय चाललंय , मी केव्हांची विचारते आहे…… पण तू कामात बुडलेली…….. ,सोड ना ते काम आज बॅचलर्स पार्टी आहे आपण दोघी जाऊया. “
“तू जा,…. अगं, माझं खूप काम पेंडिग पडले आहे…,”
“सोड गं, होईल उद्या” ….. असे म्हणत तिने अबोलीला उठवले.
“अगं ,पण मी सूट प्रेस ला दिले आहेत.तिथे पार्टीमध्ये घालू काय?”.
“ते माहित आहे मला, पण तू काय सलवार कमीज घालून पार्टी ला येणार होती? वेडाबाई बॅचलर्स पार्टी आहे ती, तिथे फॉर्मल काही लागत नाही,… फिर दोस्त कब काम आयेंगे, “माझा एक ड्रेस घाल .”
सोनाली ने अबोलीला छान मेकअप करून तयार केलं.
वॉव, काय मारु दिसतेस गं आज कोणाची तरी कत्तल होणार पहा…. नक्की.”
पार्टीमध्ये सोनालीचा बाॅयफ्रेंड तिची वाटच पाहत होता त्यामुळे अबोली एकटीच उरली.
आजुबाजुला दुसर्या आफिसेस मधले बरेच जण होते.त्यांचे हाय… हैलो सुरू झाले.जो तो आपापल्या मित्र-मैत्रिणी सोबत छोट्या छोट्या ग्रुप मध्ये वाटले गेले .
अबोली ला आता मात्र कंटाळा येऊ लागला.
आपण परत घरी जावे काय…. असा विचार करत असताना तिला “हैलो, मी विराज,” असा आवाज आला.
तिनें वळून पाहिले गहिरे डोळे, उंच, नेव्ही ब्लू सूट मध्ये असलेला विराज तिच्याशी शेकहॅन्ड करायला हात पुढे करून उभा होता. “इफ यु डोन्ट माईंड, तुम्हाला माझी कंपनी चालेल काय मी देखील इथे एकटाच आहे….. फारसं कुणी ओळखीचं नाही.”
अबोली ने शेक हॅंड करत हो म्हटले.
त्या पार्टी त झालेली ओळख हळूहळू वीकेण्डच्या आणि नंतर संध्याकाळच्या भेटीं मध्ये व हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली, हे दोघांना ही कळले नाही.
विराज ने अबोली चा फोटो त्याच्या घरी पाठवला. त्याच्या घरच्यांनाही अबोली पसंत पडली पुढचे सगळे मग पटापट घडत गेले आणि लवकरच दोघेजण लग्नबंधनात अडकले.
हे सर्व आज अबोलीला आठवले आणि म्हणूनच ती आज विराजला खुश करु पहात होती
आज अबोलीतली गृहिणी जणू एकाएकी जागी झाली होती. तिने मनातल्या मनात ठरवले होते की विराजला आवडतो म्हणून खास मसाला डोसा बनवायचा.
डोशाचे बॅटर तिने सकाळीच आणून ठेवले होते, आल्याआल्या तिने सांबार व चटणी बनवले, आता फक्त डोसा बनवायचा उरला होता.
विराज च्या घरी येण्याची चाहूल लागताच अबोली मोहरली. त्याच्या हातात केकचा बॉक्स होता.
“विराज मी काहीतरी स्पेशल बनवते आहे”.
“वा- वा- मस्त वास येतो आहे……., भूक ही खूप लागली आहे….मी पाहू का…”
“ना S ही…,कोरोना प्रोटोकॉल…. तू आधी फ्रेश तर हो…..”– त्याला बाथरूम कडे ढकलत ती म्हणाली.
इकडे प्लेटमध्ये सांबर व चटणी ठेवत तिने तव्यावर डोसा चे बॅटर पसरले, पण कुणास ठाऊक ते सर्व एकाच जागी गोळ्या सारखे चिकटून बसले !!! जसे तसे त्याला पसरवून अबोली ने त्यावर झाकण ठेवले.
इतक्यात विराज किचनमध्ये आला.तिने पॅन वरील झाकण काढून डोसा पलटण्याचा प्रयत्न केला…… पण हाय रे देवा,ते पॅन डोसा सोडायला तयार नव्हते !…. जणू काही दो बदन एक जान, साथ ना छुटे कभी..,…. .
आता अबोलीने उचटण्याने पुर्ण जोर लावून त्याला काढायचा प्रयत्न केला पण त्याचे तुकडे तुकडेच झाले.” दिल के टुकडे टुकडे करके चल दिये”…… प्रमाणे .
दुसऱ्याचे ही तेच हाल, “छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे.” विराजला जवळ पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली.
“बघ ना रे काय झालं….. ? मी सर्व नीट करत होते.”
“रडू नको बेबी…… चल बाहेर बसु,…..मग पाहू ह्याचे काय करायचे ते “अबोलीला प्रेमाने जवळ घेत विराज म्हणाला.
“अगं,या सर्वांची काय गरज होती…….. आपण बाहेरून काही मागवले असते ना.”.
अरे…पण मी विचार केला कि तुझ्या, म्हणजे नवऱ्याच्या मनात राज्य करायचा एक मार्ग पोटाकडून सुद्धा जातो तो मला पक्का करायचा होता. म्हणजे आजी असे म्हणत असे…”
“अच्छा …. म्हणून हा सारा खटाटोप तर !
“येडाबाई ये दिल ही क्या मेरे पूरे वजूद पर तुम्हारा ही हक है.” असं शायराना अंदाज मध्ये म्हणत विराजने अबोली चे डोळे पुसले आणि म्हणाला “बरं,तू तयार होऊन ये चटकन.”
अबोली तयार व्हायला खोलीत गेली, थोड्या वेळाने ती बाहेर हाॅ्ल मधे आली.
पूर्ण हॉलमध्ये मंद लाईट, खूप सार्या कॅण्डल जगमग करत होत्या.
टिपॉयवर केक सजवला होता. पूर्ण खोलीत हार्ट शेप चे बलून्स पसरले होते.
नेव्ही ब्लू कलर ची शेरवानी घालून , हातामध्ये लाल गुलाबांचे बुके घेऊन विराज उभा होता.
विराज ने अबोली कडे पाहिलं तिने तिचे चमकदार केस मोकळे सोडले होते. हाफशोल्डर वाला गुलाबी गाउन घातला होता जो त्याने तिला पहिल्या भेटीत भेट म्हणून दिला होता .ओठांवर ग्लॉसी लिपस्टिक डोळ्यात मस्कारा…… एखाद्या सुंदर परी समान ती भासत होती.
अबोलीच्या हातात गुलाबाचा बुके देत विराजने ” मुबारक हो आज का दिन” म्हणत अबोलीला जवळ घेतले. दोघांनी मिळून केक कापला व एक दुसर्याला खाऊ घातला.
” जरा म्युझिक प्लेअर आॅन कर, लेटेस्ट सांग्स लाव, तुझ्या आवडीचे, मी आलोच”, म्हणत विराज किचनमध्ये गेला. अबोलीने प्लेअर ऑन केला.
काही वेळाने विराज बाहेर आला. हातात एक प्लेट मध्ये मसाला डोसा ,सांबर चटणी घेऊन.
अबोली आश्चर्याने पाहत म्हणाली ‘तू बनवला काय?…कसा ..??”
“अगं मी एकटा राहत होतो ना, मम्मा ने शिकवलं होतं.” व पुढे मिस्किलपणे म्हणाला “….आणि कोणाच्या तरी आजीने म्हटले होतं ना की मनात घर करायला एक वाट पोटाकडून ही जाते, मग मी विचार केला त्याच मार्गाने मी तुझ्या मनात—” असे म्हणत एक घास त्याने अबोलीला भरवला तशीअबोली लाजून त्याच्या मिठीत शिरली.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.