पारंब्यांचं ओझं

© वर्षा पाचारणे
रत्ना आणि राघव म्हणजे अगदी दृष्ट लागण्या इतकी गोड लेकरं. या दोन्ही लेकरांभोवती महेश आणि मंजिरीचं आयुष्य बांधलं गेलं होतं. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी शक्य तेवढी बचत करणं दोघांनीही सुरू केलं होतं.
‘एक वेळेस आपल्याला दोन घास कमी मिळाले तरी चालेल, परंतु मुलांच्या आयुष्यात मात्र सुखाची भरभराट व्हावी’, यासाठी जसे प्रत्येकच आईबाप झटत असतात तसंच हे जोडपं.

शहरातल्या नावाजलेल्या शाळेत रत्ना आणि राघव दोघेही शिकू लागले. रत्ना आणि राघव अभ्यासात तसे ठीकठाकच असले, तरीही आईच्या शिस्तीमुळे अभ्यासात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जात नव्हता.
एखादी गोष्ट मागता क्षणी लगेच मिळण्याऐवजी काही काळाने मिळणार याची आई-बाबांनी मुलांना सवयच लावली होती.. त्यावरून अनेकदा राघव आणि रत्ना दोघेही हिरमुसून जायचे. पण संसाराचे आर्थिक गणित सांभाळताना मागता क्षणी वस्तू देणे अगदी शक्य देखील नसे. अन् मग मुलांची समजूत काढताना , त्यांचे मन सांभाळताना अनेकदा आईला भारीच कसरत करावी लागत असे.

हळू हळू दिवस सरत होते. वन रूम किचनमधून आता वन बीएचके पर्यंतचा पल्ला गाठला होता.
घरासाठी घेतलेले कर्ज पुढील अनेक वर्षांपर्यंत फेडावे लागणार होते. त्यामुळे पुन्हा आर्थिक तारांबळ, हौसे मौजेला मुरड हे सगळे ओघाने आलेच.
यंदा रत्ना बारावी अन राघव दहावीत शिकत होता. दोघांनाही प्रायव्हेट ट्युशन लावल्याने जास्तीचा खर्च वाढला होता. पण मुलांच्या भविष्यासाठी इतके वर्ष केलेली तरतूद आता थोड्याफार प्रमाणात का होईना पण कामी येत होती.

कॉलेजमध्ये दररोज बदलणाऱ्या फॅशनप्रमाणे कपडे घालणाऱ्या मुलींना बघून रत्नाला स्वतःचीच लाज वाटू लागली होती.
“आई, मी रोज तेच तेच कपडे घालून कंटाळले आहे. आज-काल मुली बदलत्या फॅशन प्रमाणे घड्याळ, सँडल्स कानातले, ब्रेसलेट अशा कितीतरी वस्तू मॅचिंग वापरतात आणि मी मात्र दर आठवड्याला अगदी ठरलेल्या वाराप्रमाणे तेच तेच कपडे घालून जाते”. “कंटाळा आलाय गं मला असल्या या जगण्याचा”…. “कधी सुधारणार आपली परिस्थिती?”.. “का आयुष्यभर असंच मन मारत जगत राहायचं?”.  कसली हौस नाही, कधी हॉटेलिंग नाही, कधी कुठे दोन-चार दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जाणं नाही.. काय मजा आहे असल्या लाईफमध्ये?”

“रत्ना, हे बघ मला पटतंय तुझं म्हणणं. पण बाळा या गोष्टी सध्या तरी आपल्याला शक्य नाहीत”, असं म्हणून आई स्वयंपाक घरात जाणार तितक्यात रत्नाने आणखी एक बॉम्ब फोडला.
“आई, हे बघ मला हे असं सारखं ऐकून वैताग आलाय. आमच्या कॉलेजची ट्रिप जाणार आहे आणि मला त्या ट्रीपला जायचंय… कसंही करून तू बाबांना समजव आणि त्यांना परमिशन द्यायला लाव”..
म्हणजे आज पुन्हा या बाप लेकीच्या मध्ये मी कात्रीत सापडणार हे आईने जाणले.

कारण महिना अखेर असल्याने उगाच हौसे मौजे खातर ट्रीप ला जाण्यासाठी बाबा पैसे देणार नाहीत हे आईला माहीतच होतं. त्यामुळे संध्याकाळी बाबांना न विचारताच आईने रत्नाला नकार कळवून टाकला.
आईने नकार देताच रत्ना धाडकन दार आपटून बेडरूममध्ये गेली. पण आईला हे काही नवीन नव्हतं कारण कॉलेजला जायला लागल्यापासून रत्नाच्या वागणुकीत प्रचंड बदल झाला होता.
आईला ते जाणवतही होतं. वेळप्रसंगी आई तिला समजही द्यायची परंतु ‘हे वयच असं आडनिड असतं’, असं समजून आई-बाबाही विषय सोडून द्यायचे.

पण कधी कुठल्या मैत्रिणीचा वाढदिवस तर कधी गेट-टुगेदर असे कारण देत रत्नाला मात्र सतत पैसे हवे  असायचे. पैसे मिळाले नाही की आदळ आपट, आई-बाबांबरोबर अबोला, आणि आपण मध्यमवर्गीय असल्याने किती लाज वाटते यावर पुन्हा नको तेवढी बडबड करायची तिला सवय लागली होती.
रत्नाचं वागणं बघून राघव देखील तिचे तंतोतंत अनुकरण करायला लागला होता.
दहावीत शिकत असतानाच त्याला स्वतःचा मोबाईल, क्लासला जाण्यासाठी गाडी, हातात स्मार्ट वॉच अशा सगळ्या गोष्टी हव्या होत्या.

आपल्या मुलांचा अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त कल आहे हे आई-बाबांनी जाणलं होतं. अन् वेळोवेळी समजवून देखील मुलांना समज म्हणून येत नव्हती.
आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे होणारी ओढाताण जेवढी त्रासदायक होती त्यापेक्षा कित्येक पटींनी मुलांचे हे वागणं आई-बाबांसाठी त्रासदायक ठरत होता.
कशीबशी मुलं ग्रॅज्युएट झाली. स्वतःच्या पायावर उभी राहिली.
कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर का होईना पण नोकरीला लागली.

पहिल्या पगाराची मजा काही औरच असते. मुलांचा पहिला पगार देवासमोर ठेवून देवाचे आभार मानावेत, अशी इच्छा असलेल्या आईचा रत्नाच्या पहिल्या पगाराच्या वेळेस मात्र हिरमोड झाला.
कारण ऑफिसमधून येतानाच बाईसाहेबांनी पहिल्याच दिवशी तासाभरात संपूर्ण पगार नवीन कपड्यांच्या खरेदीत संपवला होता. आणि आता पुढचा महिनाभर तिला ऑफिसला जाण्यासाठीदेखील आई-बाबांकडूनच पैसे घ्यावे लागणार होते.
तिच्या अशा वागण्याने घरात व्हायचे ते शाब्दिक कलह झालेच, परंतु स्वतःच्या पैशाच्या खरेदीत केलेल्या आनंदात ती इतकी बुडाली होती की तिला आता कशाचीच पर्वा नव्हती.

“रत्ना, मला वाटलं अगं पहिला पगार देवासमोर ठेवशील.. पण कसलं काय! तुम्हाला आजकालच्या मुलांना कशाची किंमत म्हणून नसते. पैसे काय झाडाला लागलेत का?”.. असं म्हणून आई तावातवाने बोलत असतानाच रत्ना तिला मध्येच अडवत म्हणाली.
“ए आई, बास झालं तुझं.. सतत काय पैशांवरून भुणभुण करत असतेस. आणि आता मी कमावते आहे त्यामुळे माझे निर्णय मला घेऊ देत. उगाच त्यात लुडबुड नको”..
तिचे असले शब्द ऐकून आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. वाटलं खाडकन लेकीच्या मुस्काटात ठेवून द्यावी पण आईने रागावर आवर घातला.

बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते. दारात असतानाच त्यांच्या कानावर हे शब्द पडताच ते रत्नाच्या अंगावर धावले.
“रत्ना, ही काय बोलायची पद्धत झाली का?”..  “आई आहे ती तुझी.. इतके वर्ष काटकसरीने संसार केलाय तिने म्हणून ती बोलते.. जीव जळतो आमचा एक एक पैसा खर्च करताना आणि तू तासाभरात अख्ख्या पगाराचा चुराडा केलाय?”…
संतापलेल्या बाबांना पाहून तरी रत्न शांत बसेल असं आईला वाटलं परंतु  झालं मात्र उलटच..

“बाबा, मी अशी खरेदी काय दर महिन्याला करते का?”.. आज पगाराच्या दिवशी केली थोडीफार खरेदी तर कुठे बिघडलं? आणि तसंही मी माझा पगार कधीही घरी देणार नाहीये. ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि त्यांचं काय करायचं हे मी ठरवणार. आजवर मला जे जे मिळालं नाही ते मी सगळं माझ्या पैशात खरेदी करणार. अगदी मला वाटेल तेव्हा आणि मला वाटेल तसं”..
रत्नाच्या प्रत्येक शब्दांशब्दाने बाबांचा पारा चढत चालला होता.

नुकत्याच चार कवड्या कमवायला लागलेल्या लेकीला बापाशी कसं बोलावं याची देखील समज राहिली नव्हती. ‘ज्याने आयुष्यभर आपल्यासाठी जीव जाळलाय त्या वडिलांशी उद्धटपणे वागताना रत्नाला थोडीदेखील शरम वाटली नाही.
वातावरण तापलेलं असतानाच राघव घरी आला..  तो इतक्या उत्साहात आणि आनंदात आला होता की आई-बाबांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे  त्याचे यत्किंचितही लक्ष नव्हते.

“बाबा, बघाना.. मन्याने काय मस्त बाईक घेतली आहे.. सॉलिड स्टायलिश दिसते ना.. बाबा प्लीज आपण पण घेऊ या ना असली बाईक. तशीही तुमची ती स्कूटर आता खटाराच झालीये.. मग तुम्हाला ऑफिसला सोडून मी तसाच पुढे कॉलेजला जात जाईल.. सॉलिड आयडीया आहे ना”..
राघवचे हे बोलणे ऐकताच बाबा संतापले. मनात उसळलेला रागाचा डोंब आता बाहेर पडू पाहत होता.

अशातच बाबा राघवच्या अंगावर धावले आणि म्हणाले,
“माझी स्कूटरच काय थोडे दिवसांनी मला सुद्धा भंगारात जमा करायला तुम्ही मागेपुढे पाहणार नाही”.. “अरे बस करा तुमच्या या डिमांड. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून तुम्हाला लहानाचं मोठं केलं, हौस मौज नसेल करता आली आम्हांला तुमची, परंतु शक्य तितकं चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.. आणि आज तुम्ही त्याची ही फळं देताय.. मध्यमवर्गीय असल्याची लाज वाटते ना तुम्हांला, मग एकाच दिवसात असा सगळा पैसा उधळून दुसऱ्या दिवशी काय भीक मागणार आहात का?”

“नाहीतरी आजवर दिलेच काय तुम्ही आम्हांला.. कुठलीही गोष्ट मागितली की नंतर घेऊ हे एकच लेबल आमच्या तोंडावर चिकटवून तुम्ही आम्हाला शांत करायचात बाबा. आज माझ्या पैशात मी वाटेल ते करेल.. आणि मुलांसाठी सगळं काही करणं हे आई-बाबांचं कर्तव्य असतं ना.. मग सतत त्या काटकसरीचा बागुलबुवा का पसरवायचा.. सतत खर्च करताना खिशाकडे पाहून मन मारत राहायचं.. पण मला मात्र माझ्या मर्जीने जगायचंय.. मी आता इंडिपेंडेंट झाली आहे.. त्यामुळे माझ्या कुठल्याही खर्चाच्या गोष्टीत तुम्ही लुडबुड करू नका”.

“रत्ना, एवढा माज बरा नव्हे, अगं कोणाशी बोलते आहेस याचं तरी भान ठेव जरा”… अगं लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तुम्हाला.. आणि आज त्या प्रेमाची अशी किंमत करता तुम्ही”…  आईला अश्रूंचा हुंदका अनावर झाल्याने बोलणेही जड जात होते…
मित्रासोबत एकदम एक्साईटमेंटमध्ये असलेला राघव बाबांचे हे असले बोलणे ऐकून मित्राला म्हणाला,”चल, काय मूडमध्ये आलो होतो आपण! पण आमचा हा फॅमिली ड्रामा आयुष्याला पुरलाय आमच्या….. बाईक ऐवजी एखाद्या दिवशी हातगाडी घेऊन देतील आमचे पिताश्री”.. असं म्हणत कुत्सितपणे हसत, हात झटकत राघव धडकन दार आपटून निघून गेला.

आता तिन्ही सांजेला घरात जणू स्मशान शांतता पसरली होती. आजवर आपण केलेले संस्कार मातीमोल ठरले, या असह्य विचाराने आई कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसली होती.
इतका वेळ क्रोधाग्नीने भरलेला बाबांचा चेहरा अश्रू लपवू शकत नव्हता. जिव्हारी लागलेल्या वेदनांच्या झळा तप्त अश्रूंच्या रुपात बरसत होत्या.
“काय चूक झाली गं आपली? घराचं कर्ज आत्ता कुठे फिटलंय. जरा कुठे आर्थिक चणचण कमी होईल असं वाटत असतानाच मुलांनी नुसता उच्छाद मांडलाय. आईबाप म्हणून आपण खरंच कमीच पडलो वाटतं यांच्या संगोपनात”.

“रोज कामाला जाताना वाटायचं मुलं मोठी होतील, हळूहळू का होईना पण त्यांना समज येईल. त्यांना आई बापाचे कष्ट जाणवतील. पण सगळ्या आशा अपेक्षा फोल ठरल्या गं.. आणि अपेक्षा तरी कशा करू त्यांच्याकडून… काय दिले मी आजवर त्यांना? दोन वेळचं जेवण, डोक्यावर छप्पर आणि अंगावर घालायला कपडे दिले, म्हणजे माझं कर्तव्य संपलं असं वाटायचं मला. कारण तेवढीच ऐपत होती गं माझी.. पण आज कळतंय की मुलांच्या नजरेत मी बाबा म्हणून पुरता हरलोय”..

त्यांना हवा असलेला सुपर हिरो, मागताक्षणी वस्तू पुरवणारा , ऐशोआरामी जीवनशैली देणारा, त्यांच्या स्वप्नांतला बाबा मी कधीच होऊ शकलो नाही. आज लाज वाटते मला कि मी घरासाठी झटतोय अशा गैरसमजात वावरत होतो… आयुष्यभर या एका विचारात जगत होतो की मी माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी राबतोय.. पण आज कळतंय मला की ते राबणं, ते कष्ट म्हणजे गाढव काम ठरलं आहे इतरांच्या नजरेत”..

मुलांच्या शाब्दिक घावाने झालेल्या जखमा कधीही भरून न येण्यासारख्या होत्या. दोघांच्याही डोळ्यांतून केवळ अश्रूधारा वाहत होत्या.. ‘कसल्या सुखाची अपेक्षा केली होती आणि काय पदरी पडलं होतं’, या विचाराने दोघांनाही या आपल्याच पारंब्यांचं आज ओझं वाटू लागलं होतं.. एखाद्या महाकाय वटवृक्षाचा जसा उन्मळून अंत होतो तसेच  वर्षानुवर्ष उराशी बाळगलेल्या आशा अपेक्षा क्षणात धुळीला मिळाल्या होत्या..

‘वाचकहो,
बाहेरच्या जगातील प्रलोभनांना भुलून जेव्हा अपत्यांकडून अशा प्रकारचे आघात सोसावे लागतात, त्यावेळी आयुष्यभर कुरवाळलेल्या या आपल्याच पारंब्यांचं ओझं जीवघेणं ठरतं. अन मग जीवापाड जपलेले हे तळहाताचे फोडच जीवघेणी दुखणी बनवून समोर यायला वेळ लागत नाही.. भावनिक कमजोरीचं कारण ठरलेल्या याच पारंब्या उन्मळणाऱ्या वृक्षाला पुन्हा कधीही सावरू शकत नाहीत’.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!