अपेक्षा… न कळणाऱ्या… न संपणाऱ्या

“माझा पाय घरात की दारात, लग्गेच सासूबाई नभाला माझ्याकडे सोपवतात अन् मग निवांत टीव्ही बघत बसतात.” विभा शेजारणीशी बोलत होती.
“अरे, तुम्ही घरीच असता ना दिवसभर! आम्ही ऑफिसमधून थकूनभागून घरी येतो.. तर चहा घेण्याचीदेखील उसंत देत नाहीत यार ” विभाचा त्रागा सुरूच होता.
जसजसा विभाचा आवाज वाढू लागला तसतसं प्रभाताई अजूनच खजिल झाल्या. त्यांनी रिमोटने टीव्ही बंद केला अन् खोलीत जाऊन लवंडल्या.

त्यांच्या आयुष्याचा चित्रपट त्यांच्या नजरेसमोर आला. एकेक प्रसंग, घटना… आयुष्याचा जमाखर्च…
विभा म्हणजे प्रभाताईंची धाकटी सून. प्रभाताई मुख्याध्यापिका म्हणून बारा वर्षांपूर्वीच निवृत्त झाल्या.
निवृत्तीनंतर त्यांनी ठरवून टाकलेलं की आपल्या नोकरीमुळे मुलांची फार आबाळ झाली.. आता तशी नातवंडांची नाही होऊ द्यायची. आणि खरंच होतं ते… नितीन, सचिन आणि शोभा ह्या तीनही मुलांचे फार हाल झालेत तेव्हा.

त्यांच्या सासूबाई त्यांच्याकडे येऊन राहिल्याच नाहीत कधी… सून नोकरी करते तर सगळ्या कामाचा आणि नातवंडांचा भार आपल्यावर येईल ह्या धाकाने म्हणा किंवा काय पण त्यांनी येणं टाळलंच.
प्रभाताईंची आई त्यांच्या लहानपणीच गेली. त्यामुळे घरी येऊन राहण्यासारखं हक्काचं कोणीच नव्हतं.

म्हणूनच प्रभाताईंनी ठरवलेलं की आपल्या मुलांची झाली तशी नातवंडांची आबाळ नाही होऊ द्यायची.
आपण स्वतः लक्ष घालायचं नातवंडांच्या संगोपनात…
त्या निवृत्त झाल्या आणि सहा महिन्यातच त्यांच्या यजमानांचं निधन झालं. तीस वर्षांची जोडीदाराची साथ संपुष्टात आली.
धाकट्या मुलीचं शोभाचं लग्न झालेलं तोवर फक्त… बाकीच्या जबाबदाऱ्या प्रभाताईंच्या एकटीच्या अंगावर आल्या.

तसं यजमानांची पेन्शन, त्यांची स्वतःची पेन्शन आणि दोघांचे निवृत्तीनंतर मिळालेले पैसे अशी भक्कम जमापुंजी गाठीशी होतीच. पण “आपल्या माणसाचं” काम पैसा नाही करू शकत प्रत्येकवेळी.पतीनिधनानंतर मुलांच्या आग्रहामुळे त्यांनी आपलं गावी असलेलं घर सोडून मुलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या पश्चात वर्षभरात थोरल्या नितीनचं लग्न झालं आणि एमएस्सी झालेली आणि बँकेत नोकरी करणारी आभा सून म्हणून घरात आली.
यथावकाश नितीनला मुलगा झाला… त्याची पत्नी आभा बँकेत नोकरी करणारी… प्रभाताईंनी स्वतःहून नातवाची आदित्यची जबाबदारी स्वीकारली.

छोटा आदित्य आजीच्या मायेच्या सावलीत वाढू लागला.
त्याला आज्जीचा इतका लळा की आई घरी आल्यावरही तो आजीला सोडत नसे… त्याचे जेवण, खेळणं, झोपणं सगळं आजीच्या हातून…नातवाचे प्रेम बघून प्रभाताई सुखावून जात. शिवाय त्याची जास्तीतजास्त जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करीत.

पण आभाला हा सासूचा तिच्या संसारातील हस्तक्षेप वाटू लागला. तिनं सासूबाई मुलाला तिच्यापासून तोडत आहेत असा कांगावा सुरु केला आणि मग घरी रोज कटकटी नि भांडणं!
तरीही आदित्य शाळेत जाईपर्यंत प्रभाताईंनी नेटानं सांभाळलं नातवाला…
पण मग आभानं आदित्यला आजीपासून दूर ठेवण्याच्या आणि त्यांच्या सर्वांगीण (?) विकासाच्या दृष्टीने त्याला बुद्धिबळ, चित्रकला, नृत्यकला, तबला अश्या विविध क्लासेसला घातलं आणि प्रभाताई बऱ्याच निवांत झाल्या.

एव्हढ्यात त्यांना दुसरी गोड बातमी मिळाली… त्यांच्या मुलीला शोभाला मुलगी झाली अन् प्रभाताईंची स्वारी ह्या चिमणीकडे वळली.
खरं तर मोठ्या सुनेची वागणूक पाहता त्यांना धाकच पडला नातवंडं सांभाळण्याचा…पण मुलीची माया स्वस्थ थोडीच बसू देते? मुलीच्या सासूबाई वर्षभरासाठी अमेरिकेत लेकीकडे गेल्या त्यामुळे ह्या नातीला सांभाळण्याची जबाबदारी प्रभाताईंनी आनंदाने स्वीकारली.

पण एव्हाना प्रभाताईंनी वयाची पासष्टी गाठली त्यामुळे त्यांच्याने फार उठबस होत नसे… त्यात जावयाचं घर… त्यामुळे सगळं टापटीप, नीटनेटकं असावं असं एक अनामिक बंधन होतं त्यांच्यावर… त्यात येणार जाणार… त्यांची सरबराई… त्यांना दिवसभर कामं पुरत.

तसं स्वैपाकाला मदतनीस ताई होत्या पण घरात कामं कमी का असतात? त्यात शोभाला बाळंतपणानंतर बराच अशक्तपणा आलेला. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देणं,नातीचं संगोपन, घराची आवरासावर, स्वैपाकाची तयारी ह्यात त्या थकून जात.
त्यात जावयांचं नोकरीतलं पद मोठं! रोज दोघेही ऑफिसमधून आले की नेहमीच कुठे पार्टी, क्लब, गेट टुगेदर तर कुठे लॉन्ग ड्राइव्ह असे कार्यक्रम असत अन् दोघेही उशिरा घरी येत.. तोपर्यंत त्यांची चिमणी आजीच्या हातून जेवून झोपी जात असे…
शोभाचा हा दिनक्रम प्रभाताईंच्या पचनी पडेना.

“दिवसभर ही पोरगी ‘मी थकले, मी थकले’ करत लोळत राहते आणि संध्याकाळी नवऱ्यासोबत खुशाल फिरायला जाते.” प्रभाताईंना नेहमी खटकायचंच शोभाचं वागणं! पण सांगणार कुणाला? आपलेच दात अन् आपलेच ओठ !”
तसं त्यांनी आडून आडून शोभाला त्यांच्या असमर्थतेबद्दल सांगितलं आणि तिनं संध्याकाळी चिमणीची जबाबदारी घ्यावी असंही सुचवलं.
पण जावई मात्र फार रसिक… प्रभाताईंच्या सांगण्यावरून शोभानं नवऱ्याला संध्याकाळी घरी थांबण्याबद्दल सुचवलं  पण उच्चभ्रू सोसायटीतल्या इव्हेंट्समध्ये तिचा सहभाग त्यांच्यासाठी अगदी कंपलसरी होता अन् चिमणीची त्यात अडचण.

एकदाच प्रभाताईंच्या आग्रहामुळे एका फंक्शनला शोभा बाळाला सोबत घेऊन गेली  तर तिनं कार्यक्रमात रडून रडून गोंधळ घातला अन् त्यांना कार्यक्रम अर्धवट सोडून परत यायला लागलं
मग जावयाची लेकीवर झालेली चिडचिड प्रभाताईंना सहन झाली नाही.
नवऱ्यासमोर तिचं काहीच चालत नाही हेही कळलंच त्यांना आणि मग त्यांनी निमूटपणे चिमणीची पूर्ण जबाबदारी घेतली ती घेतलीच.
असंच दीड वर्ष निघून गेलं… एव्हाना शोभाच्या सासूबाई अमेरिकेहून परतल्या अन् प्रभाताई स्वतःच्या घरी….

आतापर्यंत त्यांनी दोन नातवंडांच्या संगोपनाचा अनुभव घेतला होता. त्यामुळे आता सचिननं त्याच्या मुलीकरिता मुंबईला बोलावलं तेव्हा त्यांनी नकारच दिला.
पण विभानं, धाकट्या सुनेनं आकांडतांडव केलं की “दोन मुलांकडे जाता येतं आणि आमच्याकडे का नाही?” सरतेशेवटी प्रभाताई धाकट्या लेकाकडे मुंबईला जाण्यास राजी झाल्या…
पण मागच्या अनुभवावरून त्यांनी ठरवलेलं की मुलाच्या संसारात आपला हस्तक्षेप नको…

मोठया सुनेसारखा मुलाला आईपासून तोडल्याचा आळही यायला नको आणि लेकीनं घेतला तसा आपला गैरफायदा देखील घेऊ द्यायचा नाही ह्यांना.. बस्स झालं!त्यांनी सचिन-विभाला नभाला सांभाळण्यासाठी बाई लावायला सांगितलं आणि मी फक्त देखरेख करणार हेदेखील स्पष्ट केलं.. पण दोघांनी अनेक कारणं देत बाई ठेवायला नकार दिला…

इथे विभाचा स्वभाव आभाच्या अगदी विरुद्ध होता.
तिला आपल्या मुलीने दिवस रात्र आजीजवळ राहण्यास काहीच हरकत नव्हती.
उलट तिचं सगळं आजीनेच करावं अशी विभाची अपेक्षा असे…. तर इकडे दुधाने तोंड पोळल्याने प्रभाताई आता ताकही फुंकून प्यायला लागल्या होत्या…

विभाला मुलीचा सहवास मिळावा म्हणून आणि पालकांना मुलांची जबाबदारी समजावी ह्या दुहेरी दृष्टीकोनातून त्या मुलगा-सून घरी आल्या आल्या नातीला त्यांच्याकडे सोपवून देत. तर आता घरात त्यावरून वितंडवाद आणि कटकटी सुरु झाल्यात !
कसं वागावं हेच त्यांना कळेना.
सरतेशेवटी हा सगळा न कळणाऱ्या अन् न संपणाऱ्या अपेक्षांचा खेळ आहे हे प्रभाताई समजून चुकल्या अन् ह्या खेळाचा शेवट कसा होणार ह्याचा विचार करत त्यांचा डोळा लागला.

प्रभाताईंना जाग आली तीच मोबाईलच्या रिंगने. त्यांनी मोबाईल हातात घेत वेळ बघितली. रात्रीचे आठ वाजलेले.
मोठ्या सूनबाईचं नांव स्क्रीनवर झळकलं तशी त्यांच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली.
“आभा एरव्ही कधी फ़ोन करत नाही, फक्त हॅपी दिवाळी आणि हॅपी बर्थडे एव्हढाच काय तो तिच्याशी संवाद! मग आता काय काम निघालं असावं?” असा विचार करतच त्यांनी मोबाईलचं हिरवं बटन दाबलं… मनाशी काहीतरी विचार करून फ़ोन स्पीकरवर टाकला.

“हॅलो आई, कश्या आहात?” आभाच्या मधाळ सुरातलं रहस्य जाणून घ्यायच्या दृष्टीने प्रभाताईंनी कान टवकारले.
“किती दिवसात नव्हे दीड वर्ष झालं आमच्याकडे आलातच नाही तुम्ही… ऐका ना….ह्यांना ऑफिसचं प्रोजेक्ट आलंय दुबईला… पंधरा दिवसासाठी जायचंय पुढच्या महिन्यात तर मी म्हटलं की मी पण येते तुमच्यासोबत… मलाही दुबई दर्शन! सध्या बँकेतून रजा मिळायला पण काहीच प्रॉब्लेम नाहीये मला.

पण काये ना आदित्यची परीक्षा आहे नेमकी म्हणून नितीन नाही म्हणताहेत मला.
तम्ही इथे येऊन राहिलात तर मला जाता येईल दुबईला. मी गाडी पाठवेन तुम्हाला घ्यायला…तयारी करून ठेवा “
“माझ्या ऑफिसचं ऑडिट आहे नेक्स्ट मंथ ला… आई तिकडे गेल्या तर काय करू मी?” विभा सचिनजवळ कुजबुजली.
“एक काम करूया तसंही नभाला आईंचा लळा आहेच तर तिला देऊया पाठवून त्यांच्यासोबत. जाऊबाईंची नड भागेल आणि माझं पण काम होईल” विभा स्वतः काढलेल्या तोडग्यावर जाम खूष झाली.

दुसरे दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी प्रभाताईंनी दक्षिण भारत यात्रेचं एका नामवंत टुरिस्ट कंपनीचं पत्रक सचिनच्या हातात दिलं.
“अहो, पण नभा-आदित्य चं कसं होणार? तुम्ही नंतर जा ना ट्रीपला. आता कसं जमेल तुम्हाला? वहिनींना दुबईला जायचंय आणि माझं ऑडिट! भलत्या वेळी भलतंच काय! नातवंडांची काही काळजी आहे की नाही ”  विभा चिडली तसं सचिनने तिच्याकडे रागाने बघितलं.

“हे बघा, जशी माझी नातवंडे आहेत ना तशी तुमचीही मुलं आहेत ना ही. त्यामुळे मी आता तुमच्यासाठी स्वतः ला बांधून नाही घेणार आता. “तुमची मुलं तुम्ही सांभाळा. आणि हो! ह्या ट्रीपनंतर निवांत गावी जाऊन राहणारे मी… माझे छंद जोपासायला, माझ्या मनाप्रमाणे जगायला.”  हां… अगदीच अडचण असेल तर येईनही मी पण नेहमीसारखं गृहीत धरू नका मला आता ” प्रभाताईंनी ठामपणे सांगितलं अन् त्यांच्या मोबाईलवर टुरिस्ट कंपनीचा नंबर डायल केला.
©सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

3 thoughts on “अपेक्षा… न कळणाऱ्या… न संपणाऱ्या”

  1. खरच, अगदी बरोबर वागल्या प्रभाताई. गोड लागला की आज कालच्या मुली मुळासकट पिळून काढतात हो सासू सासऱ्याना.

    Reply
    • हो ना… कुठल्याही नात्यात बॅलन्स नसला की पिळवणूक होतेच.. कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

      Reply

Leave a Comment

error: Content is protected !!