© admin
माझी लेखणी
मनोहररावांनी गाव सोडलं आणि काही काम मिळेल या आशेने ते तालुक्याच्या ठिकाणी राहायला आले. पडेल ते, मिळेल ते काम करत गेले. हातात पैसे यायला लागले.
त्यातली काही रक्कम गावी पाठवून उरलेले पैसे मनोहरराव बाजूला काढून ठेवू लागले. त्यासाठी कधी पोटाला चिमटेही घ्यावे लागले पण मनोहरराव डगमगले नाहीत. थोडेफार पैसे गोळा झाल्यावर त्या जोरावर त्यांनी स्टेशनरीचं दुकान सुरू केलं. सुदैवाने हाताला यश आलं आणि मग मनोहररावांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही.
बायको आणि दोन्ही मुलींना गावातून बोलावून घेतलं. मनोहरराव आणि रमा ताईंना दोन मुली. शैलजा आणि स्वाती. शैलजा हुशार आणि देखणी. तशीच मनमिळाऊ. स्वाती पण हुशार. उभयतांनी मुलाची आशा न करता दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलं होतं.
मुली शहरातल्या चांगल्या शाळेत जाऊ लागल्या.
मुलीच्या शाळेजवळ म्हणजे शहरातल्या मध्यवर्ती भागात जागा घेऊन मनोहररावांनी त्या प्लॉटवर चार खोल्यांचं मोठं घर बांधलं. आजुबाजुला ऐसपैस जागा असल्याने मनासारखं मोठं छान अंगण करून घेतलं.
दिवस भराभर सरत होते. शैलजा मोठी होत होती तशी थोडी स्वप्नाळू बनत चालली होती. ती एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे कवितेच्या रचना वगैरे करू लागली. बारावी होऊन कॉलेजला जायला लागली.
लहानपणापासून एक ओळखीतल्या काकू होत्या, त्या बोलतांना नेहमी एका मुलाची फार तारीफ करायच्या. तो मुलगा म्हणजे सौरभ, त्यांच्याच आळीत रहायचा.
काकुंमार्फतच शैलजाची सौरभशी ओळख झाली. सौरभ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता.
आधी ओळख, मग गप्पा असं करत करत हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
कधी कधी ती सौरभला समोर ठेवून कविता लिहायची, त्याला वाचून दाखवायची.
तो ही त्या कवितांना छान छान दाद देत तिचं खूप कौतुक करायचा.
एक दिवस घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली. मोहनरावांनी ठाम नकार दिला. शैलजा हट्टाला पेटली.
“मी त्यांच्यासोबतच लग्न करणार आणि तुम्ही ते तुमच्या संमतीने करून द्या” म्हणून सांगून तिने टाकलं.
मनोहरराव आणि रमाताई दोघंही तिला समजावून थकले पण शैलजा काही ऐकायला तयारच नव्हती.
इकडे आईवडील ऐकत नव्हते तर तिकडे “मी तुझ्याशीच लग्न करणार, फक्त तू घरच्यांना समजावून सांग आणि त्यांना आपलं लग्न करून द्यायला सांग.” असं म्हणत सौरभ बऱ्याचदा रुसून राहू लागला.
त्याची समजूत घालता घालता शैलजाला जीव नकोसा व्हायचा. ती पार मेटाकुटीला यायची.
शैलजाच्या या हट्टीपणामुळे मनोहरराव कायम टेन्शनमध्ये असायचे.
“तो मुलगा चांगला नाही, आपल्या जातीतला नाही. कमाईचं काही साधन नाही त्याच्याकडे. तू लग्न करून करशील काय?? फार फरफट होईल तुझी. त्याचा नाद सोड.” त्यांचा बाबाचा जीव नेहमी समजावून सांगायच्या मूडमध्ये असायचा.
शेवटी यातून काहीच तोडगा निघत नाही. आता घरच्यांना समजावत बसण्यात काही उपयोग नाही असा विचार करून शैलजाने आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे सौरभसोबत पळून जायचा.
पण सौरभ मात्र “पळून जायला” नाही म्हणाला.
“तुझ्या घरच्यांना लग्नाला तयार कर” असंच तो शैलजाला सांगत राहिला.
इकडे मनोहरराव तिच्यासाठी स्थळं पाहायला लागले.
माझ्या घरचे अजिबात तयार नाहीत असं सांगून “आपण पळून जाऊन लग्न करुं” असा निरोप देत तिने सौरभला भेटायला बोलावलं.
घरच्यांची नजर चुकवून शैलजा कशीबशी ठरल्या ठिकाणी पोचली.
खुप वेळ वाट पाहिली तरी सौरभ आलाच नाही.
शेवटी कंटाळून ती घरी निघून आली. त्यानंतर ही तोच रुसून बसला होता.
शैलजा बेचैन झाली. तिचं पहिलंच प्रेम ते, मनापासून त्याच्यावर केलेलं.
जवळ राहत असूनही सौरभ त्यानंतर एकदाही तिला भेटायला आला नाही किंवा तिच्या घरी येऊन त्याने तिच्या घरच्यांची समजूत घातली नाही किंवा तिला मागणी ही घातली नाही.
शैलजाला कळत नव्हतं की, नेमकं असं काय झालं की तो अचानक असा वागायला लागला..?
काही दिवस मामाकडे राहून आल्यावर तिला कळलं की, त्याच्या घरी लग्नासाठी मुली पाहणं सुरू होतं.
तिने अस्वस्थ होऊन थोडी खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा तिला कळलं की, त्याचा तिच्या वडिलांच्या दुकानावर डोळा होता. शहराच्या मध्यवर्ती भागात दुकान होतं. बऱ्यापैकी आवक होती. ह्या दोघी बहिणीच, भाऊ नाही. त्यामुळे पुढे जाऊन लेकींनाच मिळणार आहे सगळं.
आपण पळून गेलो तर आपल्याला योग्य तो मान मिळणार नाही. तिच्या माहेराहून काही मिळणार नाही. म्हणून तो तिचा वापर करून तिला तिच्या आईबाबांना लग्नासाठी तयार करायला सांगत होता. थोडक्यात तिच्या खऱ्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा त्याने घात केला होता.
हे सगळं कळल्यावर शैलजाचे डोळे उघडले आणि ती मनोहररावांच्या कुशीत शिरून धाय मोकलून रडली. खुप मोठी चूक करून बसणार होती ती.
“बाबा, बरं झालं तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात. माझ्या हट्टाखातर जर तुम्ही हे लग्न लावून दिलं असतंत तर आपण फसलो असतो..” तिने रडत रडत सांगितलं.
“अगं बाळा, तुम्ही दोघी माझ्या काळजाचा तुकडा आहात. तुमच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने चार पावसाळे जास्त पाहिलेत. माणसं कळतात. त्यांची वृत्ती कळते. तो मुलगा चांगला असता तर मीच लग्न लावून दिलं असतं की! तू आमच्या जवळपास राहिली असतीस तर आम्हांला ही आधारच झाला असता.” मनोहररावांनी लेकीला सांगितलं.
आईने ही समजावून सांगितलं. शैलजा त्या प्रेमातून बाहेर पडली. मनोहररावांनी एक चांगला इंजिनिअर मुलगा पाहून तिचं थाटामाटात लग्न लावून दिलं.
लग्नानंतर शैलजा मुंबईत आली. संसार सुरू झाला.
तिला एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. नोकरी करता करता तिने पार्ट टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
पहिली नोकरी सोडून दुसरी चांगल्या पगाराची नोकरी लागली. मेहनत फळाला आली.
वर्षभरात “गुड न्यूज” आली आणि लग्नाच्या चौथ्या वर्षी एक गोड परी त्यांच्या आयुष्यात आली.
“बाळा, माझ्यासारखी स्वप्नाळू होऊ नकोस. म्हणजे कोणी तुझ्या भावनेशी खेळणार नाही. माझा बाबा तापट होता म्हणून धाकात ठेवलं. पण त्या धाकामुळेच मी एका फसवणुकीपासून वाचले. तुझा बाबा हळवा आहे. गेले नऊ महिने तुला न पाहता ही इतकं प्रेम करतोय. अख्खं आयुष्य तुझ्यापुढे ओतणार म्हणतोय. खुप साधा सरळ आहे. पण तू मात्र आजोबांसारखी हो. खऱ्या खोट्यातला फरक ओळखणारी.” लेकीचा हात हातात घेऊन म्हणाली.
बाजूला उभ्या असलेल्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.
“पोरींनो, वयाच्या अठरा एकोणिसाव्या वर्षांपर्यंत तुम्ही ठाम असता. नंतर आम्हाला अनोळखी असणारा एखादा मुलगा तुमच्या आयुष्यात येतो आणि तुमचे आईवडील तुम्हाला व्हिलन वाटू लागतात. तुम्ही जमेल तेवढं खोटं बोलता. पण एक सांगू का, आईबाप कधीच लेकरांचं वाईट चिंतत नाही. ते विरोध करतात कारण त्यांना आपल्या लेकरांची काळजी वाटत असते….” आई बोलली.
“हो गं आई, कळलं मला ते.” म्हणत शैलजाने आईला मिठी मारली.
आईने तिच्या डोक्यावर थोपटत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
“आता तू आई झालीस ना, आता आमच्या भूमिका कळतील तुला. जेव्हा तू आपल्या लेकीला आम्ही तुला द्यायचो तेच सल्ले देशील तेव्हा.” आई म्हणाली.
आणि नुकत्याच आत आलेल्या मनोहररावांनी लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.
समाप्त
आईवडलांनी मुलांच्या निर्णयाला केलेला विरोध हा प्रत्येकवेळीच जातीपातीमुळे, स्वत:च्या अहंकारामुळे किंवा समाजाच्या भीतीमुळे केलेला नसतो. मुलांनी, ‘आईवडील आपल्याला समजून घेऊ शकत नाहीत’ या सरसकट भावनेने त्यांचे विचार आणि मतं मोडीत काढू नयेत. कारण आईवडील कधीच वाईट चिंतत नाहीत.
© admin
माझी लेखणी