निसर्गाचे वाण

© सौ. प्रतिभा परांजपे
पल्लवी ऑफिस मधून घरी आली स्कूटर स्टॅन्ड ला लावून लिफ्ट कडे जाण्यास वळली, समोर देशपांडे काकूंच्या किचन च्या खिडकीतून खमंग तीळ भाजल्या चा सुवास पसरला होता.
ओ– दोन दिवसावर संक्रांत आली आपली तर काहीच तयारी नाही अजून.
या नव्या मल्टि मध्ये येऊन पल्लवीला दोन महिने झाले होते. आत्ता कुठे घर नीट लागले होते जुन्या घरातून येताना कितीतरी जुन्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे तिने कामवालीला दिले. इथे आल्यावर नवीन घेतले .

सध्या संक्रांत आल्याने बाजार ही रंग बिरंगी प्लास्टिकच्या वाणांच्या वस्तूंनी भरलेला होता.
पल्लवीच्या ऑफिसमधल्या कितीतरी मैत्रिणींनी असे रंगबिरंगी प्लास्टिकचे डबे संक्रांतीसाठी म्हणून विकत घेतले होते.
बऱ्याच मैत्रिणींनी ऑफिसमध्ये वाण देऊनहळदीकुंकू केले.
पल्लवीची या सगळ्या वस्तूंपेक्षा काहीतरी वेगळं घ्यावं जेणेकरून पर्यावरणाला हातभार लागेल अशी इच्छा होती.

पल्लवीला लहानपणीचे आजीच्या हातचे तिळगुळाचे लाडू आठवले आज्जी खमंग तीळ भाजून खलबत्त्यात कुटून लाडू बनवायची.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी आज्जी पल्लवीला  तिळाच्या तेलाने  मालिश करून  न्हाऊ घालायची.
जेवणात भोगी ची भाजी असायची, न आवडणार्या भाज्या ही त्यात छान लागतं.
“ही अशी मिश्र भाजी कां, ?” 
आज्जी चे उत्तर असायचे “सगळंच आवडेल ते मिळत अस नसतं त्यात थोडे नावडते मिसळले तरी दोन्ही ‌चा स्वाद घ्यायचा.

त्या वयात त्यांच्या अर्थ नसे समजत,  पण  भाजी छान लागायची.
संक्रांतीच्या दिवशी आई व आज्जी, दोघी छान लुगडं नेसून, नाकांत नथ घालून, समोरच्या मंदिरात सुगडाच  वाण ताटात घेऊन जायच्या. पल्लवीही  छान फ्रॉक घालून मिरवायची .
मंदिरात जाऊन एक मातीचा सुगड देवापुढे ठेवून मग पांच जणींना वाण द्यायच्या.  

घरी येताना ताटात परत चार वाण असायचे, त्यावर असलेल्या लाडू वरून तिचे व ताई चे भांडण व्हायचे.
उन्हाळ्यात त्या मातीच्या  सुगडात पाणी भरून ‘आमचा छोटा माठ’ म्हणून जेवताना पल्लवी व  ताई घेऊन बसत.
आज्जी गेल्या नंतर काही वर्षांनी बाबांनी नवीन ठिकाणी घर घेतले .
काही दिवस आई जुन्या कॉलनीत जायची पण मग हळूहळू नव्या कॉलनी सर्व जण रमले. आणि काही वर्षात जुन्या पद्धती ही बंद पडल्या.
हळूहळू घरोघरी हळदी कुंकवाची पद्धत कमी होत गेली.

आज ऑफिस मधली सुकन्या काळी साडी नेसून आली ते पाहून तिची पहिली संक्रांत आहे असे लक्षात आले .
मिसेज भट्टाचार्य विचारत होती “काली साडी क्यों??”
“वो हमारे यहां  शादी के बाद पहले साल काली साडी –“
“बापरे – काली? काला रंग तो—“
पल्लवीला  काही उत्तर देता आले नाही.

रात्री आईशी बोलताना तिने हा प्रश्न केला ??
“माहित नाही ग— बाई आम्ही नाही विचार केला,” आईने काहीतरी उत्तर देऊन विषय बदलला.
सकाळी सकाळी बाबांचा फोन आला त्यांनी तिच्या बर्‍याच शंकांचे समाधान केले.
बाबा म्हणाले, “फार पूर्वी प्लास्टिक नव्हतेच आणि प्लास्टिक पिशव्या, प्रकृती साठी विनाशकारीच आहेत. तेव्हा मातीची सुगड आणाली जायची. तेवढीच कुंभारालाही मदत व्हायची”

 पल्लवीने ऑफिसला निघता निघता सोसायटीचा सेक्रेटरी दामले काकांना फोन केला ” काका आजच्या सुविचार च्या बोर्डावर मी काही लिहिले तर चालेल”??
“हो-हो-आवडेल.”.
पल्लवीने बोर्डावर पतंगाचा एक चित्र काढून त्याच्या खाली मेसेज लिहला.
‘नमस्कार,,,
तिळगुळ घ्या गोड बोला.
आज मकर संक्रांत .सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश म्हणजेच संक्रमण म्हणून संक्रांत हा सण, त्याला गोड करायला स्नेहवर्धक तीळ आणि गुळाचा गोडवा म्हणून ही तिळगुळ खाण्याची पद्धत आहे .

काळा रंग हा उष्मा शोषक असल्याने थंडीमध्ये आलेल्या या सणाला नव्या सुनेला किंवा नव्या बाळाला नवे काळे वस्त्र देण्याची परंपरा सुरू झाली असावी. तसेच ही संक्रांत, १४जानेवरी हा दिवस वीर मराठ्यांच्या पराक्रमाची. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढून प्राणांची आहुती दिली त्याची ही आठवण करून देणारा आहे. आनंद  साजरा करताना आपणत्यांना ही शब्दरूपी  श्रद्धासुमने वाहू या.,🙏🙏🙏

एक दिवस संध्याकाळी घरी येतायेता पल्लवी वाटते असलेल्या नर्सरी मधे जाऊन आली.
आॅफिस मधल्या नीनाची वहिनी शिवण काम करते तिच्या कडून पतंगाच्या आकाराचे कापडी बटवे शिवून घेतले.
सर्व तयारी करून झाली तिळगुळाचे लाडू तेवढे करायचे उरले .
प्रशांतने विचारले, “का ग लाडू जमतील का तुला?”

“म्हणजे काय?”
“नाही म्हणजे लाडू  खाय करता की माराय करता बनवते आहे?” हसत हसत प्रशांत ने विचारले?
“काहीतरीच काय रे बोलतोस”!
“अगं माझ्या लहानपणचा किस्सा सांगतो तुला, आमच्या शेजारी साठे वहिनी राहत होत्या त्यांनी कधी लाडू केले नव्हते  पण मनात उत्साह  खूप होता. सगळी तयारी केली लाडू केले पण ते इतके कडक झाले की दाताने तुटे ना. आम्ही मुलांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली दामल्यांचा राजू म्हणाला कंचे खेळायचे जागी लाडूचा उपयोग करावा का? अशी मजा आली होती म्हणून विचारतोय?”

 “येतात रे मला मी काही पाकातले करणारच नाहीये.”
बोलता बोलता पल्लवीने लाडू तयार केले, “बघ झालेत ना?”
दुसऱ्या दिवशी रथसप्तमी च्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू करायचे म्हणून पल्लवीने ऑफिसमध्ये सुट्टी घेतली.
दारासमोर सुंदर रांगोळी काढून घर सजवले
छान लुगडं नेसून नथ घालून तयार झाली.

“वाह क्या बात है!” म्हणत  प्रशांत ने पल्लवीचे निरनिराळ्या पोज मध्ये फोटो काढले.
आलेल्या सर्व मैत्रिणींना पल्लवी ने हळदीकुंकू लावून,  तिळगुळाचा लाडू व चटकदार भेळ खायला दिली.
ओटी च्या खिचडी त बोर, मटारच्या शेंगा, घालून पतंगाच्या आकाराचे कापडी बटवे दिले
सर्व सख्यांना.  वाण काय आहे ची उत्सुकता होती,

पल्लवीने, सुगडाच्या आकाराच्या,रोप लावलेल्या मातीच्या कुंड्या वाण म्हणून सर्वांना दिल्या.
त्या सुबक, फुललेल्या कुंड्या पाहून सर्वांनी कौतुक केले.
“वाssछान कल्पना आहे हं.आता एक उखाणा ही हवा हं”.
“बरं बरं घेते‌ ऐका,
मातीच्या कुंडीत लावून रोप, प्रकृतीचं ठेवा भान,
प्रशांतच नांव घेतें ठेवून सर्वांचा मान.”

सर्व सख्यांनी टाळ्या वाजवून पल्लवी च कौतुक केले. 
वन्स मोर वन्स मोर म्हणत सर्वांनी एकच कल्ला केला
“बरं बरं घेते ऐका,
मातिच्या कुंड्या वापरून प्लास्टिकला करते टाटा,
प्रशांतचा पल्लवीच्या सुखात सिंहाचा वाटा”
सर्व मैत्रिणींनी  क्या बात है क्या बात है म्हणून टाळ्या वाजवल्या व आपापल्या घरी निघाल्या.
*******
मैत्रीणींनो, हल्ली आपण सगळेच पर्यावरण जपण्याबाबत जागरूक असतो. तम्हीही जर कधी पल्लावीसारखंच Eco friendly वाण लुटलं असेल तर आम्हाला कमेंट्समधून अवश्य कळवा.
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!