अंधारातला दिवा

© वर्षा पाचारणे
आज रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. रविवारची सकाळ असल्याने कदाचित सगळे शहरच निवांत असावे, असे वाटत होते. रखमा रोजच्या प्रमाणे तिच्या दीड वर्षाच्या लेकराला घेऊन कामावर निघाली.
रोजच ती चार घरची धुणी भांडी आणि दोन घरी स्वयंपाकाचे काम करायची.
इलेक्ट्रिशियन असलेल्या नवऱ्याचे मागच्या वर्षीच पावसात काम करत असताना विजेचा शॉक लागून निधन झाले होते.

पदरात पाच वर्षाची चिमुरडी अन् आता हे  जेमतेम दीड वर्षाचे लेकरू घेऊन कसं जगावं हा प्रश्न असताना तिने लेकरांकडे पाहून दिवस काढायला सुरुवात केली.
रोज छोट्याशा मुक्तेकडे हे चिमुरडं भावंडं सोपवून ती मनावर दगड ठेवून कामाला जात होती.
शिक्षण, कपडालत्ता या गोष्टींचा विचार करणेही आता तिला परवडण्यासारखं नव्हते. जिथे रोजचं जगणं मोठ्या मुश्किलीने जगावं लागत होते, तिथे शिक्षणासारख्या गोष्टी तिला जणू नसते चोचले वाटत होते, आणि त्यामुळेच घरातली चूल पेटवायची असेल, तर मुक्तेला लहान बाळाला सांभाळण्यासाठी शिक्षणाला कायमचं मुकावं लागणार, हे आता तिने मनाशी पक्क केलं होतं.

वस्तीतली लहान लहान लेकरं जवळच्या सरकारी शाळेत वेळ मिळेल तसं जाऊन हजेरी लावायची, परंतु मुक्ताला मात्र छोट्या विरूसाठी ताईऐवजी आई व्हावं लागत होतं.
आई कामाला गेली की विरुला खेळवणं, तो रडायला लागला की त्याला वस्तीत एक चक्कर मारून आणणं, आई येईपर्यंत त्याची काळजी घेणं, त्याला झोपवणं या सगळ्या गोष्टी हे पाच वर्षाचं लेकरू अगदी जबाबदारीने पार पाडत होतं.
पण आज मात्र मुक्ताच्या अंगात ताप असल्याने ती बिचारी अगदीच मलुलपणे पडून होती.
तिला गरम गरम मऊ भात देऊन आईने विरूलादेखील खायला दिलं. पण नुकतच झोपेतून उठलेलं ते लेकरू खायचं नाही म्हणून रडून घर डोक्यावर घेऊ लागताच, मग मात्र आईने दोन फटके देत त्याला कडेवर घेतलं आणि तशीच पायात चपला अडकवून ती तरातरा कामावर निघाली.

तितक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. पण वाटेत थांबणं आता शक्य नव्हतं, कारण कामावर उशीर झाला तर मालकीण ओरडणार, या भीतीने ती झपाझप चालू लागली. अशातच रस्त्यात चप्पल तुटल्याने तिने दोन्ही चपला सोबत असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकल्या आणि कशीबशी कामावर पोहोचली.
रोज शिंदे काकूंच्या घरचं पहिलं काम असल्याने  तिने दारावरची बेल वाजवली.
दारात रखमा सोबत कडेवर तिचं लेकरू दिसताच काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यात रखमाचे भिजलेले कपडे आणि पायात चपला नसल्याने खराब झालेले तिचे पाय पाहून काकूंचा पारा चढला. त्यांनी तिला पाय स्वच्छ पुसून यायला सांगितले.

काकूंच्या चेहऱ्यावरील रागाकडे दुर्लक्ष करत रखमाने तडक बाथरूम गाठले आणि बाथरूमच्या एका कोपऱ्यात विरुला बसवून ती कपडे धुऊ लागली.
शिंदे काकूंची नजर मात्र सतत रखमाच्या कामाकडे होती. रोजच्याप्रमाणे अगदी स्वच्छ कपडे धुऊनही शिंदे काकू मात्र रखमाला बडबड करू लागल्या.
“अशी शेंड्या लावायची काम करायची असतील, तर नाही आलीस तरी चालेल आणि तुझ्या मुलांना वगैरे पुन्हा घेऊन आलेलं मला चालणार नाही” असं म्हणत रखमा दाराबाहेर पडताच शिंदे काकूंनी धाडकन दार आपटलं.

मनातून कितीही वाईट वाटलं तरी त्यावर विचार करण्यासाठी रखमाकडे मात्र वेळ नव्हता.
तिने पुढच्या दोन्ही घरची कामं उरकली आणि आता ती स्वयंपाकाचे काम करण्यासाठी नाईक ताईकडे गेली.
नाईक पती-पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असं छोटसं आणि सधन कुटुंब होतं. आज रविवार असल्याने हे लोक निवांतपणे उठणार हे रखमाला माहीतच होत.. रखमाने पोळ्या आणि भाजी केली. आणि गॅसवर दूध तापायला ठेवून ती झाडलोट करू लागली. अशातच विरूला भूक लागल्याने तो रडू लागला.

इतक्यात नाईक बाई तिच्या मुलासाठी दुधाचा ग्लास भरून त्याला देऊ लागताच विरू त्या ग्लासकडे पाहून हट्ट करू लागला. त्यामुळे अशा लाजिरवाण्या परिस्थितीने रखमाने विरुच्या पाठीत धपाटा मारत ,”माझं काम होत आलं आहे, आपण जाऊ लवकर घरी”, असं म्हणत त्याला समजावलं. आणि तितक्यात नाईक बाईच्या मुलाचा धक्का लागून ग्लास पडला आणि सगळं दूध फरशीवर सांडलं… पण त्याचा सगळा राग नाईक बाईने मात्र रखमावर काढला.
“तुम्ही अशी ही तुमची मुलं घेऊन येता, दुसऱ्याच्या खाण्याकडे लक्ष ठेवता, याची लाज वाटत नाही का तुम्हांला?”, असं म्हणत तावातवाने नाईक बाईने विरुला हाताला पकडून नेत एका कोपऱ्यात गप्प बसून राहण्यासाठी दटावले.

रखमा निमुटपणे तिचं काम करत राहीली. परंतु लहानग्या विरुला काहीच कळत नसल्यामुळे तो पुन्हा दुधासाठी हट्ट करू लागला. आता मात्र रखमाने लगबगीने काम आवरून विरूला कडेवर घेतलं आणि ती झपाझप घराकडे निघाली.
वाटेत जाता जाता तिने विरूला बदड बदड बदडला… लेकरू गयावया करत रडत होतं.. बोबड्या बोलात ‘नकोsss, नकोsss’, म्हणून आईला थांबवायचा प्रयत्न करत होतं. परंतु आईचा राग काही केल्या कमी होत नव्हता.

घरी आल्यावर तिने मटकन विरूला एका कोपऱ्यात बसवलं आणि त्याच्यापुढे सकाळी केलेल्या भाताची ताटली जोरदार ढकलत ती म्हणाली,”गिळ काय गिळायचं तेवढं…  आणि त्यानी पोट भरत नसंल तर मला खा.. जीव नकोसा झालाय.. या मेल्यामुळं नको तसं त्या बाईचं बोलणं ऐकायला लागलं… घोटभर दुधासाठी तुझा जीव चालला होता का रे?”, असे रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलत रखमा पुन्हा विरुला धपाधप मारत होती… शेवटी ते लेकरू  बिना खाता पिता कोपऱ्यात हमसून हमसून रडून झोपून गेलं..

आई एवढी का चिडली आहे आणि विरुला का मारत आहे, हे मघापासून चाललेल्या आईच्या बडबडीवरून मुक्तेने ओळखलं. तिने आईला पाणी दिलं. तिने आपल्या इवल्याश्या हातांनी  रडणाऱ्या आईचे डोळे पुसले.
“आई, तूच म्हणतेस ना आपण रडलो तर बाबांना आवडणार नाही”.. असं म्हणत तिने बाबांच्या फोटोकडे हात दाखवत आईला समजावलं आणि म्हणाली ,”बघ, बाबा तुझ्याकडे बघतायेत, त्यांना आवडेल का तू रडलेली?”…
तिचं बोलणं ऐकून रखमा गहिवरली..

एवढंसं लेकरू ते! पण किती समंजसपणाने वागतंय, हे पाहून तिचा मघापासून झालेला संताप निवळला.. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती, आलेली संकटं, समाजातल्या लोकांच्या नजरा आणि दोन वेळेला पोटाची खळगी भागवण्यासाठी करावे लागणारे कष्ट, या साऱ्यामुळे खरंतर तिचा जीव मेटाकुटीला आला होता आणि त्यामुळेच तिची सतत मानसिक घुसमट चिडचिड अशा प्रकारे उफाळून येत होती.. एवढ्याशा लेकरावर आपण हात उगारायला नको होता, या विचाराने तिने झोपलेल्या विरूच्या केसातून मायेनं हात फिरवला..

विरूचं अंग भलतंच तापलं होतं.. तिने त्याच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.
त्याला उठून बसायला सांगत पुन्हा गरम गरम भात खायला घालण्याचा प्रयत्न केला, परंतु  तापामुळे ग्लानी येत असल्याने वीरू काही केल्या तोंड उघडेना..
दोन्ही लेकरं तापाने फणफणलेली असताना दवाखान्यात घेऊन जावे, या विचाराने तिने मांडणीतला कोपऱ्यातला डबा उघडून त्यात पैसे आहेत का पाहिले. केवळ शंभर रुपये पाहून तिच्या मनात धस्स झालं..

‘अजून तर पुरता महिना जायचा आहे’, या विचाराने तिने शेजारणीकडे पैसे मागून पाहिले.. पगार झाला की परत देईन अशी हमी देऊनही कोणीही तिला पैसे देत नव्हतं.. तापात असलेल्या विरुला जुलाब उलट्यांनी देखील हैराण केलं होतं.. तिने कामावर जाऊन सगळी परिस्थिती सांगून मालकीणीकडे पगाराची रक्कम आगाऊ मागून पाहिली.
परंतु महिना पूर्ण झाल्याशिवाय पैसे मिळणार नाही म्हणून मालकिणीने तिला हुसकावून लावलं.

रडत रडत पुन्हा कामाचं ठिकाण ते घर अशी पायपीट करत रखमा घरी पोहोचली…’आईsss, हा बघ ना लईच कसंतरी करतोय’.. असं म्हणत विरूकडे बोट दाखवत घाबरलेली मुक्ता आईला बिलगली…
लेकराने डोळे पांढरे केले होते.त्याच्या घशाला कोरड पडली होती.तिन्ही सांजेची वेळ..
विरुला दोन्ही हातात उचलून रखमा थेट पळत सुटली..
आईच्या मागे इवलीशी मुक्ता रडत रडत ,”आईss, थांब ना. आईss थांब ना”, म्हणत धावत होती.

मध्येच अडखळून पडत होती… पण रखमाला मात्र आता लवकरात लवकर सरकारी दवाखाना गाठायचं, हेच दिसत होतं. दवाखान्यात पोहोचल्यावर धापा टाकत रखमा डॉक्टरांना सांगू लागली.
“त्याने काही खाल्लं नाही त्यामुळे जुलाब, उलट्या आणि ताप आलाय… आणि आता तर डोळे पण फिरवतोय”.. असं म्हणत ती रडायला लागली..
डॉक्टरांनी विरुला तपासताच रखमाचा हात हातात घेत डॉक्टर बाई म्हणाल्या…”उशीर झाला ताई आणायला… आधीच कुपोषित आणि त्यात जुलाब, उलट्या आणि ताप यात लेकरू गमावलंस तू”.

डॉक्टर बाईंचे शब्द जणू तापलेल्या शिश्याप्रमाणे रखमेच्या कानात शिरले.. बधीर झालेली रखमा काही केल्या शुद्धीवर येत नव्हती..
आई मागे पळून पळून धापा टाकत कशीबशी मुक्ता दवाखान्यात पोहोचली.
विरूला दवाखान्यातल्या खाटेवर निपचित पडलेला पाहून आता तिचे लक्ष आईकडे जाताच ती आईला गदागदा हलवू लागली… “आईsss, उठ ना अगं.. विरू झोपला शांत आता”.. “आईsss , ए आईsss”, असं म्हणत इवल्याशा गालांवरुन ओघळणारे अश्रू कसे बसे फ्रॉकच्या बाहीने पुसत मुक्ता आईला उठवायचा प्रयत्न करत होती..

जबरदस्त धक्का बसलेली रखमा डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर थोड्या वेळात शुद्धीवर तर आली, परंतु शुद्धीवर असूनही तिला आजूबाजूला काय घडतंय, हे काहीच कळत नव्हतं.. इवल्याशा मुक्तेची रडून रडून गांगरलेली अवस्था पाहून सारं हॉस्पिटल हळहळत होतं..
“बाळा, तुला काही खायचं आहे का? असं म्हणून आजूबाजूचे लोक तिला खायला घालण्याचा प्रयत्न करत होते, समजावण्याचा प्रयत्न करत होते.

‘जोपर्यंत आई उठत नाही आणि विरू आणि आई माझ्यासोबत घरी येत नाही, तोपर्यंत मला काही नको’, असे तिचे बोबडे बोल उपस्थित साऱ्यांचेच हृदय पिळवटून टाकत होते..
शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मदतीने विरूचे सारे सोपस्कार उरकून रखमाला पुन्हा एकदा मुक्तेसाठी आणि तिच्यासाठी जगणं भाग होतं.. नवरा गमावला, लेकरू गमावलं, आता आयुष्याचा एकुलता एक आधार असलेली ही पोटची लेक तिला गमवायची नव्हती.. त्यामुळे सगळं दुःख बाजूला सारून रखमा तिसऱ्या दिवशीच संकटाशी दोन हात करून, कंबर कसून कामावर निघाली.

पण जग रहाटणी कशी असते ना की गरिबाला धड जगूनही देत नाहीत..
जशी रखमा कामावर निघाली, तशी शेजाऱ्या पाजाऱ्यांची कुजबुज सुरू झाली.. ‘अजून लेकराला जाऊन दोन दिवसही झाले नाहीत आणि ही बया सरळ कामाला निघाली’.. असे शब्द कानावर पडत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणं रकमाला भाग होतं.. काय समजावणार होती ती अशा लोकांना?..

कारण अजूनही ती कामावर गेली नाही तर तिला पैसे मिळणार नव्हते, तिची चूल पेटणार नव्हती.. आणि कुपोषितपणाचा राक्षस तिच्या लेकीला गिळायलादेखील कमी करणार नव्हता, हे सांगूनही खरंच अशा लोकांची तोंडं बंद होणार होती का?
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रखमा शिंदे काकूंकडे पोहोचली..
“अग घरात अशी घटना झालेली असताना आलीसच का तू कामावर?.. सुतक वगैरे काही असतं की नाही तुम्हाला लोकांना?.. उगाच आमच्या भरल्यासरल्या घरात काही विघ्न नको यायला… हा घे तुझा मागच्या महिन्याचा पगार”.. असं म्हणत दोन नोटा हातावर टेकवत त्यांनी रखमाला इथून पुढे कामावर येऊ नको असे दटावले आणि धाडकन दार लावून घेतले.

इतर कामांवरही रखमाला अगदी तसाच अनुभव आला.. मनात असंख्य प्रश्न घेऊन रखमा खिन्न मनाने घरी परतली.
राहतं घर भाडेतत्त्वावर असल्याने रखमाला लवकरच ते घर सोडावं लागलं. कुठल्याही प्रकारचं काम नसल्याने आज तीच रखमा रस्त्यावर भीक मागत, कोणी समोर टाकलेलं, शिळं, खराब झालेलं अन्न खाऊन स्वतःचं आणि लेकीचं पोट भरते आहे.. ‘कोणी काम देता का काम?’, असं म्हणत या माय लेकी गावोगाव वणवण भटकत आहेत..

कधी कुठल्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं, तर कधी कुठल्या दुकानातली फरशी पुसून देण्याचं काम करून क्वचित तिला पैसे मिळतात. पण अशावेळी इवल्याश्या तिच्या लेकीवर वाईट नजर टाकणाऱ्यांची देखील जगात कमी नाही.. रात्रीच्या वेळी कुठल्यातरी पुलाखाली लेकीला कवटाळून झोपताना तिच्या मनात काय आणि किती भावना उफाळून येतात, याची कल्पना न केलेलीच बरी… या आणि अशा कितीतरी भयानक प्रसंगांना आपली रखमा रोज नव्याने सामोरी जाते आहे.. कधी कुठल्यातरी ट्रॅफिक सिग्नल जवळ, एखाद्या पुलाखाली किंवा मुसळधार पावसात एखाद्या पडक्या छपराखाली हे कणखर व्यक्तिमत्व आपल्या लेकीच्या सुरक्षेसाठी मात्र सदैव तत्परतेने धडपडत आहे. या साऱ्याचा अंत काय आणि कसा असेल हे मात्र त्या देवासच ठाऊक.. पण एक मात्र नक्की की गरिबी श्रीमंतीच्या दरीत माणुसकीचा गळा आपोआप घोटला गेला आहे.

‘वाचकहो, घरातला कर्ता पुरुष गमावल्याने रखमाने स्वतःला कसेबसे सावरून लेकरांच्या भविष्यासाठी उभे राहायचे ठरवले होते.. लोकांच्या नजरा, टोमणे, मुलांची उपासमार या साऱ्याने आधीच बेजार झालेली रखमा आज एवढ्या मोठ्या दुःखाला सामोरे जाऊनही नव्या जोमाने उभी राहू पाहत होती. परंतु समाजातील सुशिक्षितपणाचा बुरखा घातलेले माणुसकीहीन राक्षस तिला गिळंकृत करू पाहत होते.. गरिबाला दुःख व्यक्त करण्यासाठीही वेळ नसतो, ही गोष्टच खरी.. कारण त्यांच्यापुढे केवळ आजचा नाही, उद्याचा नाही तर संपूर्ण आयुष्यभराचा प्रश्न आवासून उभा असतो.

अशातच अनेकदा आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला जातो. आणि पुन्हा गटारातले किडे गटारातच मरतात असं उपहासाने म्हणणारे पांढरपेशे उजळमाथ्याने फिरतात.
अनेकदा जगात भिकारी लोकांकडून वाईट अनुभव येत असतात. त्यामुळेच मदत करायची ठरवली तरीही अनेकदा मन कचरतं. अन त्यामुळेच खऱ्याअर्थाने दुर्लक्षित, संकटांच्या महापुरात भरकटलेल्या लोकांनाही दिशा मिळणं अवघड होऊन बसतं.. पण अशावेळी काळ्याकुट्ट अंधारात हिमतीने आत्मतेजाची ज्योत घेऊन उजळणाऱ्या रखमा सारख्या अनेक दिव्यांना कोटी कोटी सलाम. आता यापुढे कुठल्यातरी चौकात, कोपऱ्यात लेकराला घेऊन उभ्या असलेल्या त्या मळकटलेल्या, दयनीय अस्तित्वाची अवहेलना होण्यापेक्षा त्यात रखमा दिसते का हे मात्र नक्कीच शोधलं जावं ही अपेक्षा.

© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

3 thoughts on “अंधारातला दिवा”

 1. हो मी पण मागील वर्षी सुंदर फुलाचे रोप दिले होते वण म्हणून सगळा मैत्रीणीना खूप आवडले

  Reply
  • मस्तच..खूप भारी…असंच करायला हवं सगळ्यांनी
   खूप धन्यवाद मॅम… कमेंट्साठी
   फक्त ही कमेंट चुकीच्या कथेवर आली आहे 🙂

   Reply
 2. yamage kahi upadesh dyaycha hota la tai tumhala. evadhi dukkhaad goshta ka bara lihita, ki lokanna vait vatel aani tras hoil. please stop it

  Reply

Leave a Comment

error: Content is protected !!