त्या रात्री आशुतोष अतिशय हताश होऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडला.
त्याच्या डोळ्यासमोर अंधार होता,जणू त्याचं सगळं भविष्यच अंधारात होतं.
इतका हताश त्याला पूर्वी कधीही वाटलं नव्हतं निराशेच्या छायेने त्याला पूर्णतः वेढलं होतं.
रडून रडून त्याचे डोळे आता कोरडे पडले होते.
तो तसाच गाडीजवळ आला. थोडावेळ गाडीजवळ घुटमळून त्याने गाडी काढली व वाट दिसेल तिथे जाऊ लागला.
रात्रीचा एक वाजला होता, सिग्नल बंद होते, पुण्याचे ते रस्ते भलतेच मोकळे झाले होते.
अचानक काहीतरी विचार त्याच्या मनात आला, गाडीचा स्पीड वाढला व रागातच त्याने गाडी सारसबागेच्या पार्किंग जवळ पार्क केली.
तो उतरला व तडक मंदिराकडे चालत निघाला.
मंदिरा जवळ जाताच त्याच्या मनातील त्या भावना पुन्हा जागृत झाल्या.
तो तसाच पायरीशी बसून राहिला. काय चुकलं देवा माझं? का दिलीस एवढी मोठी शिक्षा?
म्हणून पुन्हा रडू लागला.
आशुतोष व वसुधा खूप सुखी जोडपे.
लग्नाला ३ वर्षे होऊन गेली तरी घरात मूल नव्हते.
वसुधा चांगली शिकलेली तर अशितोष गावात सोन्याचा व्यापारी. पैशाची अजिबात कमी नव्हती.
वसुधाला मुलांची खूप हौस होती.
तीन वर्षांनंतरही मूल होत नाही हे पाहून त्यांनी बरेच दवाखाने,पूजा-पाठ,दानधर्म केले होते.
तेव्हा कुठे वसुधाला हवी असलेली गोड बातमी त्यांना मिळाली होती.
गेली काही महिने किती प्रेमाने जपलं होतं तिला सगळ्यांनी.
तिची ती चोर ओटीची गंमत, थाटामाटातील डोहाळजेवण, गोंडस लहान मुलांच्या फोटोजने सजलेली त्यांची खोली सगळे त्याच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहीले.
त्याने त्याच्या फोनवर स्क्रीन सेवर म्हणून देखील झोपाळ्यात पोटावर हात ठेवून हसणाऱ्या वसुधाचा डोहाळे जेवणातला फोटो ठेवला होता.
आणि आज देवाने आपल्या बरोबर अशी खेळी खेळावी?
तो आज देवाला जाब विचारण्यासाठीच तेथे आला होता.
त्याचे विचारचक्र चालूच होते,तेवढ्यात त्याच्या फोनच्या रिंगने त्याची तंद्री भंग पावली.
आईचा फोन होता त्याच्या.
त्याने तो कट केला. फोन उचलूनही तो तिला काय सांगणार होता?
सुनेचे किती कौतुक होते तिला !
गावात चांगल्या प्रकारे तिची डिलिव्हरी होईल की नाही या भीतीने तीने सुनेला माहेरी, पुण्याला पाठवले होते.
नाहीतर “सुनेचे बाळंतपण येथेच करून नातवंडाचे तोंड पाहिल्यावरच सुनेला माहेरी पाठवीन.” असे ती म्हणायची.
पण ऐन वेळेस जर काही इमर्जन्सी आलीच तर गावातल्या सोयी कमी नको पडायला ह्या आशुतोषच्या भीतीपायी तिने सुनेला बाळंतपणसाठी पुण्यास पाठविले होते.
सगळे व्यवस्थित चालू असतांना अचानक आठव्या महिन्यात वसुधाच्या पोटात दुखू लागले.
तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं.
सासू-सासर्यांनी आशुतोष ला फोन करून कळवताच तोही लगेचच सगळं काम सोडून पुण्याला आला.
वसुधाला अचानक लेबर पेन सुरू झाले होते. आठव्या महिन्यातील डिलिव्हरी म्हणजे एक तर आई किंवा बाळ.
सगळ्यांच्या चेहरऱ्याचा रंग उडाला होता.
वसुने सुंदर मुलाला जन्म दिला. पण…….. पण त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवण्यात आले.
वसू प्रत्येक क्षणी रडत होती.”आशु….आपलं बाळ वाचलं पाहिजे आशु”. असं म्हणत जिवाचा आकांत करीत होती.
तोही पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. पैशाची कमी नव्हतीच त्याला,कमी होती ती फक्त बाळाची.
वसुला मातृत्वाची तर त्याला पितृत्वाची.
“वसुने बाळाला जन्म दिला,पण…….पण बाळ सध्या इन्क्युबेटर मध्ये ठेवण्यात आलं आहे.” एवढेच काय तो आईशी बोलला होता आणि आईच्या हातातील फोनच गळून पडला.
त्या दिवसापासून ती देव पाण्यात ठेवून बसली होती.
आज दोन दिवस झाले तिलाही चैन पडत नव्हता.
रात्र असो वा दिवस दर दोन-तीन तासांनी अशितोष ला फोन करून ती बाळाची व वसुच्या तब्येतीची विचारपूस करत असे.
तिकडे रडून-रडून वसुने स्वतःची तब्येत आणखीच खालावून घेतली होती आणि आता ११.०० वाजता तर सगळ्याच आशेवर पाणी फेरले गेले होते.
आपल्या हाताने आपल्या नवजात बालकाला त्याने…………..त्याला रडू आवरेना.
त्याच्यात तर वसुशी सामना करण्याची पण हिंमत नव्हती.
काय बोलणार होता तो तिच्याकडे जाऊन?
तो पायरीवरून उठला,पण वर देवळात जाण्याची त्याची इच्छा झाली नाही.
तो तसाच मागच्या बाजूने बाहेर निघून मिळेल त्या रस्त्याने चालू लागला.
थोडे पुढे जाताच त्याला रस्त्याच्या बाजूला झोपलेले भिकारी,त्यांची मुले असे दृश्य दिसू लागले.
त्या मुलांना पाहून तर त्याला आज भिकार्याचाही हेवा वाटू लागला.
तो तसाच चालत राहिला.
एक स्त्री तिच्या नवजात बालकाला घेऊन बसली होती.थोडं पुढेच तिचा नवरा झोपला होता.
दिवसभराच्या कष्टाने थकला असावा बहुतेक.
बाळ रडत होते, बाळांतीण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण भुकेले बाळ काही शांत होत नव्हते.
त्या बाईच्या शेजारी फाटक्या गोधड्यांवर तिचे आणखी तीन छोटी मुले झोपलेली होती.
त्याला आधी तिचा हेवा वाटला, मग दया आली आणि परमेश्वराचा रागही.
तिला गरज नसतांना भरभरून दिलं होतं त्याने आणि आपली ओंजळ मात्र रिकामीच.
तो तसाच चालत राहिला.
“आपली ओंजळ रिकामीच……”या विचाराने त्याची छाती धडधडू लागली.
वसू व आईचा चेहरा त्याला सतावू लागला.
तो मागे फिरला व त्या बाईकडे जाऊन काही मदत हवी का? ते विचारू लागला.
तिच्यासाठी हे नवीन होतं.ती थोडी गोंधळली पण लगेच म्हणाली,”पैसा…… पैसाच मदत करू शकतो आम्हाले,चार-चार पोरं पोसायची…..नवरा दिसभर मर-मर मरतो पण समदयांच पोट कुठं भरतं? त्यात आता अजूक एकाची भर.” असे म्हणताच तिच्या गालावरून एक अश्रु वाहून गेला.
पण फक्त एकच. तिने दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरले.
त्याने खिशातले सगळे पैसे तिच्या पुढ्यात ठेवले.
तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले,”देव तुमाला सुखी ठेवो!” तिने आशीर्वादाने पैशाची परतफेड केली.
“सुखी……….हं!………” तो पुटपुटला.
त्यानेच तर सुख हिरावून घेतले.
तो तिथेच फुटपाथ वर बसला.
त्याचं मन नक्कीच मोठ्या आघाताने दुखावलं गेल्याची तिची खात्री पटली,नाही तर खिशातले एवढे पैसे कुणी असे भिकाऱ्याला देतं का?
“काय झालं सायब?” असे तिने त्याला विचारले.
पण तो काहीच बोलला नाही.
तिच्याकडे पैसा नाही म्हणून ती अशी इथे बसली आहे आणि माझ्याकडे सुख नाही म्हणून मी.
तिच्यात व माझ्यात फरक तरी काय? तिच्याकडे बाळ आहे पण पैसा नाही माझ्याकडे पैसा आहे पण बाळ नाही.
तेवढ्यात कसल्याशा विचाराने त्याचे डोळे चमकले.
व्यापार, लहानपणापासून एकच गोष्ट शिकला होता तो व्यापार.
तो त्याला अतिशय उत्तम जमत होता.
“पण….. नाही….. हे पाप आहे, कोण कसं तयार होईल? नाही….नाहीच.” तो स्वतःशीच पुटपुटू लागला.
त्या बाईने आता नवऱ्याला उठवलं. त्याला पैसे दाखवत ती आशुतोषकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होती.
तसा तो आशुतोष कडे आला.
“ओ सायब…. जावा, घरला जावा.” असं त्याने दरडावून सांगताच आशुतोष उठला व त्याच्या जवळ जाऊन थरथरत्या आवाजात, “मला भिक घालता का?” असे म्हणू लागला.
आशुतोष दारू प्यालेला नाही हे त्याने ओळखले.
पण हा नेमका काय बोलतोय त्याला कळेना तरीही माणुसकी म्हणून त्याने आशुतोषच्या खांद्यावर हात ठेवला व बसायला सांगितले. “काय झालं?” विचारताच “माझं मूल गेलं हो!”असं म्हणून आशुतोष ओक्साबोक्शी रडू लागला.
इतक्या वेळा पासून हा माणूस येथे का थांबला हे ध्यानात येऊन आईने बाळाला घट्ट उराशी धरलं.
ते बाळ अजूनही अधून मधून रडतच होतं.
त्याचं पोट भरत नव्हतं म्हणून त्याला झोपही येत नव्हती. त्या बाईने पैसे उचलले व बाळाला घेउन तीच्या ताडपत्रीच्या छोट्याशा झोपडीत गेली.
आशुतोष शांत झाला आणि आता त्याच्यातला व्यापारी सज्ज झाला.
हे पाप आहे हे त्याला कळत होतं, पण त्याच्या डोळ्यासमोरुन वसुचा चेहरा हलत नव्हता.
प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? असे म्हणून त्याने त्या व्यक्तीस समजावयास सुरुवात केली.
“हे पहा….माझ्याकडे पैसा आहे पण मुल नाही तुमच्याकडे मुल आहे पण पैसा नाही.मी तुमची गरज पूर्ण करू शकतो, तुम्ही मला भिक घाला.” म्हणून हात जोडू लागला.
सुरुवातीला गोंधळून गेलेल्या त्या माणसाला मुलांचे भविष्य दिसू लागले.
आयुष्यभर अशा झोपडीत संसार कसा करायचा? अजून किती कष्ट केले म्हणजे सगळ्यांची पोट भरतील? ह्या विचारांचं वादळ त्याच्याही मनात निर्माण होऊ लागलं.
त्या वादळाला आणखी हवा देण्याचं काम मोठ्या शिताफीने आशुतोष करू लागला. त्याने त्याची सगळी ताकद, सगळं कौशल्य पणाला लावलं.
त्या माणसाला आधी आशुतोषचा राग व नंतर दया येऊ लागली.
तो काहीही न बोलता झोपडीत शिरला.
त्या स्त्रीने सगळे पैसे नवर्याच्या हातात दिले व बाळाला आणखीनच घट्ट कवटाळून बसली शेवटी ती पण आई होती.
गरीब असली म्हणून काय? तिनेही नऊ महिने बाळ पोटात ठेवून वाढवलं होतं. “आपुण पायजे तेवडे कष्ट करू, रक्ताचं पाणी करू,पण… बाळ न्हाय देणार.” असं तिने नवर्याला ठणकावून सांगितलं.
“अगं आता मंग काय कमी करतूया का आपुण?जरा हिकडं तरी बघ, तुझ्या लेकरांचं आयुष्य, तुला तर बाळ नकु हुतं ना? तूच म्हनत होती, काय खाईल? कसं जगायचं? एवढ्यात कसं भागायचं?”
त्याचे वाक्य ऐकताच आपण अर्धी लढाई जिंकली असे वाटून आशुतोष झोपडीजवळ गेला.
“मी तुम्हाला राहायला घर व पैसे पण देईन. ह्या बाकीच्यांचे तरी आयुष्य पणाला लावू नका. त्यांना तरी शिकवा. त्यांचे तरी भविष्य घडवा असे त्यांना विनवू लागला.
“पर मणुन काय पोटच्या लेकराला….,.,”तिचा कंठ दाटून आला,पुढे काहीही न बोलता ती रडत राहिली.
त्याला आधीच तीन मुले होती. त्यात घर आणि पैसा ऐकून त्यालाही बरं वाटलं.
पण आईच ती….गरीब असली म्हणून काय? तिची समजूत कशी काढायची?
“बाळ माझ्या घरी आलं तर तुमच्या एकाच बाळाचं नव्हे तर सगळ्याच मुलांचे भलं होईल. ह्या बाळाला तर मी काहीच कमी पडू देणार नाही. शिवाय तुम्हालाही असं फुटपाथवर आयुष्य काढायची गरज नाही.” तो समजावतच राहिला.
शेवटी “मी एक घर व दहा लाख रुपये द्यायला तयार आहे, तुमची ओंजळ मी भरतो माझी ओंजळ तुम्ही भरा.” असे त्याने विनवले.
दहा लाखाची रक्कम ऐकून आता मात्र मनावर दगड ठेवून आई-बाप तयार झाले.
पैशासाठी नव्हे तर इतर मुलांच्या भविष्यासाठी. (शेवटी बाप गरीब असो वा श्रीमंत, तो कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांच्याच भल्याचा विचार करीत असतो.)
आशुतोषने लगेच मेव्हण्यास फोन करून दहा लाख रुपये मागवले.
व्यापारी असल्याने पैशाची जमवाजमव करण्यास फारसा वेळ लागला नाही.
आशुतोषने गाडी आणून त्यांच्या झोपडीजवळ लावली व चावी त्या माणसाच्या हातात दिली.
“मी उद्या घराचा बंदोबस्त करतो मग गाडी घेऊन जाईन.” असे त्याने सांगितले.
अजूनही आईची बाळाभोवतीची मिठी सैल होईना.
आपला जीजाजी हे काय करतोय,हे मेव्हण्यास कळेना.
आशुतोषने आपले हात पुढे करत,” मला भिक घाल माय!” म्हंटले व तीने हंबरडा फोडला.
बापाने तिच्या हातातून लेकरू घेऊन आशुतोषच्या हातात ठेवताच तो सुखावून गेला.
“माई आज तु माझ्या पत्नीला मातृत्व व मला पितृत्वाची दान दिलं.” असे म्हणून तो मेव्हण्याच्या गाडीत बसून हॉस्पिटल ला गेला.
हॉस्पिटलच्या स्वच्छ कपड्यात त्याने बाळाला गुंडाळले व तो वसुधाच्या खोलीकडे चालू लागला.
बाळाचे दुपटे बदलतांना बाळ मुलगी असल्याचे त्याने पाहिले होते.
पण आईला आपण बाळ झाल्याचे सांगितले होते,
त्यानंतर बाळ इन्क्युबेटर मध्ये आहे हे ऐकल्यावर आईने, बाळ मुलगा आहे की मुलगी हे विचारलेच नव्हते.
हे त्याला आठवलं व मनातून हायसं वाटलं.
तिकडे वसु शून्यात डोळे लावून बसली होती.
आशुतोषला पाहताच ती भानावर आली.
काही बोलणार तेवढ्यात त्याने बाळ तिच्यापुढे धरले. ते नाजूक,गोंडस बाळ पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आले.
तिने त्या रडणाऱ्या बाळाला छातीशी धरले, त्या स्पर्शाने बाळाची व आईचीही भूक भागली.
तिच्या कोरड्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले.”आपण जिंकलो वसू” असे म्हणून त्याने तिला जवळ घेतले.
जरा वेळाने तो बाहेर आला.
हॉस्पिटल मधल्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहताच त्याचे हात आपोआप जोडले गेले.
एक दीर्घ श्वास घेऊन त्याने आईला फोन लावला.
© पल्लवी घोडके-अष्टेकर.
सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.