वारसा

© अपर्णा देशपांडे
पहाटे पाचलाच गीताक्का बाहेर बागेजवळ आल्या . बागेत घमघमाट करणारा मोगरा फुलला होता . कदंबा अण्णाने सुगंधी दवणाची पानं ,अबोली आणि मोगऱ्याची फुलं तोडून परडी देवडी वर ठेवली होती . आपल्या ओल्या केसातील टॉवेल झटकून त्यांनी दोरीवर वाळत घातला , दाट केसांचा घट्ट आंबाडा बांधून परडी हाती घेतली आणि पूजाघरात गेल्या . कदंबा ने पूजेची सगळी तयारी केली होती .पूजा आटोपून धम्म पिवळ्या सोनचाफ्याची फुलं नटराज्याच्या मूर्तीला वाहून गीताक्का बाजूच्या नृत्यशाळेच्या मोठ्या सभागृहात गेल्या . 
तिथेही हॉल च्या एक कोपऱ्यात नटराजाची मोठी , सुबक मूर्ती आणि सगळीकडे धुपाचा दरवळ होता . त्यांची पट्टशिष्या निलांबरी आलेली होती .

नेहमीप्रमाणे तिच्या हातावर प्रसाद ठेवून अक्काने थाळी चौरंगावर ठेवली . निलांबरीने वाकून नमस्कार केला . धुपाच्या सुगंधा प्रमाणे अक्कांच्या शब्दांनाही सुगंध असतो असे म्हणायची निला .
” अरंगेत्रम ची तयारी कुठपर्यंत झाली ? ” अक्कांनि विचारलं . 
“होत आली गुरुमा . आता आज बाकी सगळ्या मुली येतील त्यांचा ””शारदाअष्टकं”” चा नृत्याभ्यास सुरू झाला की बोलावणे पाठवते.”
अक्का स्वयपाक घरात गेल्या .

राजंम्मा ने गायीच्या दुधाची गरम गरम कॉफी अम्मा समोर ठेवली . 
” चार गुलाब आणून ह्या फुलदाणीत खोच ग . ” कॅलेंडर कडे निरखून बघत अम्मा म्हणाल्या .
” हो अम्मा . रोज काय बघता कॅलेंडर अम्मा ? . त्याने दहा तारीख जवळ येणार आहे का ? ” 
” नाही ग , तितकच समाधान . अजून दोन दिवसांनी येईल न श्रवणी ?….पूर्ण एक वर्ष झालं तिला भेटून . ह्यावेळी महोत्सवासाठी श्रीकांत आणि विद्या नाही येणार . नीता आणि जावई नुसतेच कार्यक्रम बघायला आले होते , तेही दोन वर्षानपूर्वी . मुलगा आणि सुने पेक्षा नातीलाच जास्त ओढ आहे ग इथली . ह्या नृत्यशाळेला जिवंतपणा येतो बघ ती आली की . ……….कदंबा , दिवाणावर नव्या चादरी घाल रे बाबा . झोपाळ्याच्या पितळी कड्यांना पॉलिश करून टाक . “

नंतर दुपारच्या जेवणापर्यंत अक्का मुलींची तालीमच घेत होत्या .
आज दुपारच्या वर्गात ‘वर्णम’ चा रियाज करवून घ्यायचा होता . संध्याकाळी ‘ अलरीपू’ ची तयारी करवून घ्यायची होती . महोत्सव काही दिवसांवर आला होता .
गेल्या तीस वर्षांपासून अम्मा इथे नृत्य कलामंदिर चालवत होत्या . भारतनाट्यम , कुचिपुडी , कथ्थक आणि इतर शास्त्रीय नृत्यकलेत प्रभुत्व असलेल्या , पदमविभूषण सन्मानित , अनेक देशात कार्यक्रम करून नृत्यप्रसार करणाऱ्या अक्कांच्या मुलांनी हा वारसा जपण्यात स्वारस्यच दाखवले नव्हते . मुलगा श्रीकांत आणि मुलगी नीता ह्या दोघांनाही कुठल्याच कलाप्रकाराची ओढ नव्हती . हां , श्रीकांतची मुलगी श्रवणी मात्र वयाच्या पाचव्या वर्षा पासून भरतनाट्यम शिकत होती. इथे भारतात असेपर्यंत गीता अक्कांना श्रवणी च्या प्रगतीकडे कडे बारकाईने लक्ष देता येत असे. पण अमेरिकेला गेल्यानंतर सगळं गणितच बदललं होतं , मात्र तिने आपले विशारद पूर्ण केले होते .

आधी जवळपास साठ मुली पूर्णवेळ इथे राहून नृत्य आराधना करीत . हे असे गेले वीस वर्षे त्यांनी जीवापाड सांभाळले . अनेक वेळा स्वतःचे पदरचे पैसे घालून , कधी दागिने विकून त्यांनी नृत्य कलामंदिर साठी आयुष्य वेचले होते . 
अनेक मानसन्मान , अनेक पुरस्कार मिळाले , कितीतरी जाहिराती , लघुपट यासाठी मागणी असे तरी त्यांनी कलेशी तडजोड केली नाही . असे केल्यास फार व्यावसायिकता झाली असती , जी त्यांना नको होती .
जिथे पैश्याशी संबंध येतो , तिथे नृत्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागतो असे त्यांचे मत होते. आपल्या विद्यार्थिनींसोबत फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देशात जाऊन त्यांनी ह्या प्राचीन भारतीय कलेचा प्रचार केला होता .

यातील काही मुली तर सलग पंधरा सोळा वर्षे त्यांच्या छायेखाली होत्या . पण हा प्रभाव सगळ्याच मुलींवर सारखाच होता असे नाही. बाहेरील चकचकीत जगाची भुरळ अनेकींना सिने सृष्टीकडे घेऊन गेली . त्यात काही वाईट आहे असे अक्कांचे
मत नव्हते , पण ते करतानाही शास्त्रीय नृत्याची बैठक असायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता .
नृत्य मंदिराची गुरुकुल पद्धती , तिथे शिकवायला येणारे देशभरातील ज्ञानी गुरुजन आणि सगळे शास्त्रीय नृत्य प्रकार …..यांचा अभ्यास करायला विदेशातून अनेक अभ्यासक , पत्रकार , टी .व्ही चॅनेल वाले खूप मोठ्या संख्येने तिथे येत . 

अक्कांना आता हा सगळा व्याप सांभाळणे अवघड झाले होते . पण आता कुणीच जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने निवासी नृत्यशाळा त्यांनी बंद करून टाकली होती . इतक्या वर्षांची गुरुकुल पद्धत आता संपुष्टात आली याचे त्यांना फार दुःख होते .
“आम्ही जाऊ गुरुमा ?” निलंबरी विचारत होती . 
” हो , उद्या सगळ्यांचे घुंगरू आणि दागिने नीट तपासून ठेवा . या आता .” 
अक्का पुन्हा विचारात गढल्या . ही निलांबरी , रेवती , गौतमी ,राधिका …..ह्या सगळ्या कोण लागतात आपल्या ?……किती प्रामाणिक आहेत आपल्या कलेशी ?……आणि आपल्याशी सुद्धा !……मग कोणते नाते खरे ?……पोटचे मुलं इतक्या दूर ….अडीअडचणीला कधीच न येऊ शकणारे ……..की हे सतत अवतीभवती राहून आपला स्नेह दाखवणारे??

मग का करतो माणूस इतका आटापिटा? आपले अस्तित्व कुठल्या न कुठल्या रुपात जपून ठेवण्याचा अट्टाहास की आपली कला जिवंत ठेवण्याची धडपड ? ……नेमकं काय साध्य करायचंय ? गेल्या दोन वर्षात तर फारशा कुठे गेलोच नाही आपण .
आताशा पेपरवाले , चॅनेलवाले कोणीच येत नाहीत . म्हणजे आता लोक विसरताएत का आपल्याला ? आताशा आपली दखल नाही घेतल्या जात .. ..असं होतंय म्हणून आपला जीव तुटतोय का ? …की आपला वारसा कुणीतरी पुढे न्यावा ह्या आंतरिक इच्छेपायी जीव जळतोय ?
बराच वेळ अक्का बंगई वर बसून होत्या . आताशा त्यांना सतत स्वतःच्या अस्तित्वाची चिंता सतावत असे .

” अव्वा !!! “
श्रवणी च्या हाकेने त्या भानावर आल्या . 
” आली का ग माझी बबडी s s “
म्हणत त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले . छान साडेपाच फूट उंची , एका नुत्यांगनेला शोभेल असा रेखीव बांधा , आणि दाट कुरळे केस . तिच्या लोभस दर्शनाने हरखून तंद्रीत गेलेल्या अक्कांना श्रावणीने जागे केले .
” अव्वा s ! आय नीड युअर ब्लेसिंग” ” श्रवणी नमस्कार करत म्हणाली .
” यशवंत हो बाळा , ये ये , बस . ….राजंम्मा ,कॉफी आण लवकर .” …..इतक्या वर्षांनी नात आलीये म्हणून त्यांचा जीव थाऱ्यावर नव्हता.  

कादंबा ने तिचे सामान आत नेऊन ठेवले . त्यातील एक बॅग तिने उघडली . श्रीकांत आणि विद्या ने काय काय पाठवले होते . अक्कांसाठी एक स्मार्टफोन , मऊ लोकरीचा कोट , अनेक प्रकारचे दागिने , सुगंधी उदबत्त्या , मेक अप चे सामान , अगदी खरे वाटावेत असे गजरे आणि हार ……तिथे अशा वस्तू मिळतात याचेच आश्चर्य वाटले अक्कांना . शिवाय अनेक प्रकारची सुंदर कृत्रिम फुले पण पाठवली होती . 

आता हे सगळं घेऊन काय करायचंय ही भावना दाबून टाकत त्यांनी सगळ्या वस्तूंची खूप तारीफ केली . हे बघून
त्यांना आपल्या मुलीची निताची आठवण आली …..तिला फार आवडायचं असं आर्टीफिशियल फुलं सजवायला .सकाळचा नाश्ता आणि कॉफी घेऊन श्रवणी तिच्या साठी खास सोय करून ठेवलेल्या प्रशस्त खोलीत गेली .काहीतरी विचारायचं म्हणून अक्का तिच्या खोली जवळ गेल्या आणि अर्धवट बंद दाराशीच थबकल्या . आतून पाश्चात्य संगीताचा आवाज येत होता . त्यांनी किंचित डोकावून पाहिलं , श्रवणी अतिशय लयबद्ध पद्धतीने ‘हिप हॉप’ नृत्य करत होती.

अक्कांना जगातील अनेक नृत्यप्रकार माहीत होते …..त्या एखाद्या शैली च्या विरोधात होत्या असेही नाही . तरुण पिढीचा आवाज ओळखून होत्या त्या . तरीही आता श्रवणीला बघून कुठल्याशा अमंगळाची चाहूल लागल्या सारखं वाटलं त्यांना . 
दुपारच्या जेवणानंतर आजी आणि नात जुने अल्बम बघत बसल्या . आपल्या आज्जी ला किती मान सन्मान मिळालेत , ती किती देशात फिरून आलीये , किती नाव कमावलं , सगळं पुन्हा एकदा पाहून झालं . 
दोघी नृत्यशाळेत गेल्या . निलांबरी आणि काही मुली तिथे सराव करत होत्या . अक्कांनि मुद्दाम श्रवणीला समोर बसवले . मुली मन लावून ताल धरत होत्या …..एक मुलगी थोडी चुकत होती ….ती चुकली की श्रवणी आजी कडे बघे …..तिने सुचकपणे आजीकडे पाहिलं आणि अक्क्यांनी “जा ” असे खुणावले , तशी श्रवणी पुढे आली . तिने तेवढा भाग स्वतः करून दाखवला . 

सुंदर मौखिक अभिनय , बोलके डोळे , अप्रतिम पदलालित्य , शब्दांची जाण हे सगळं घुंगरू पायात नसतांनाही खूपच तालबद्ध आणि नजर खिळवून ठेवणारं !त्या मुलीला तिची चूक कळाली आणि अक्कांना आपल्या नातीची तयारी ! …..त्यांचे मन भरून आलं ….आता थोड्या वेळापूर्वी आलेलं मळभ दूर झालं होतं . श्रवणीचे यु ट्यूब विडिओ नेहमी बघायच्या त्या . पण तिचे बहुतेक व्हिडीओज हे पाश्चात्य नृत्याचेच होते आणि त्याला प्रचंड प्रेक्षक वर्ग होता. तेव्हा भारतीय नृत्यशैली मधील तिची आवड कमी होतेय का ह्या शंकेने त्यांना अस्वस्थ वाटत असे . ….पण आता पद्धतीने अतिशय सफाईने तिने नृत्य केले की अक्का धन्य झाल्या .

” श्रवू , तू कोणते कोणते नृत्य प्रकार शिकतेस ग ? ” दुपारी निवांत असतांना अक्कनी विषय छेडला .
” बरेच ! …म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्यात कथ्थक , भरत नाट्यम आणि मणिपुरी …मग….बॅले … हिप हॉप ….असंच काही . तिथे खूप ‘ह्युज’ अकॅडमी आहे , खूप इंडिअन ‘स्टुडंट्स’ आहेत . …बाय द वे अव्वा , ह्या फेस्टिव्हल मध्ये मी कोणता ‘परफॉर्मन्स करू ? ” 
” अ ? …… “”जननी जगतकारिणी””” कर … किंवा…..””श्रीरंगा””….नाहीतर..””कर्णवध”””….तुझं जे नीट बसलय ते कर .”
मग इतर मुलींबरोबर श्रवणी देखील सराव करू लागली . त्या तीन चार दिवसात त्या गावात अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले . दक्षिणेतिलच नाही तर इतर राज्यातील अनेक कलाकार आणि गुरू आले होते .

प्रमुख पाहुणे म्हणून एक फिल्मी नृत्य शिकवणारे सर होते . त्यांचा मुंबईत ‘डान्सक्लास’ खूप जोरात चालत होता . अनेक चित्रपटासाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं . वर्तमान पत्रात ह्याची पान भरून बातमी होती . आणि मधल्या पानावर कुठेतरी कोपऱ्यात शास्त्रीय नृत्य संमेलनाची बातमी होती .
” अव्वा , तू असतांना तुला न बोलावत इतर कुणाला हे कसे बोलावतात ग? तुला पण बोलवायला हवं होतं न ?”
हे खरं तर अक्कांच्या मनातलं बोलली होती श्रवणी . अलीकडे अक्कांकडे लोकांचे लक्ष्य जाईनासे झाले होते . शाळा , कॉलेज , संस्था , किंव उद्घाटन समारंभ ह्यात कुठेही त्यांना बोलावणे येत नसे . 

” आजकाल अभिजात कलेला पहिल्या सारखा मान नाही राहिला ग ! ….आणि सारखं माझं कौतुक किती वर्ष करतील ते .” अक्क्यांनी असं बोलून स्वतःचीच समजूत काढली होती . 
नृत्य संमेलन खूपच थाटात पार पडले . दर वर्षी अक्का खास छोटी बस करून मुलींना तिथे घेऊन जात . ह्यावर्षी तर श्रवणी आली होती. 
तिच्या नृत्याची खूप तारीफ झाली . अक्का तर भरून पावल्या होत्या. संमेलनात त्यांना नेहमी सारखा बहुमान मिळाला नाही , पण आपल्या नातीच्या प्रगतीने त्या खूष होत्या .

श्रवणी चा अमेरिकेला वापस जाण्याचा दिवस आला . तिने आजीला खूप आग्रह केला सोबत चालण्याचा . तिकडून मुलगा आणि सूनही बोलले . पण अक्का कसल्या बधतात ! कदंबा तिला मुंबईपर्यंत सोबत करायला गेला .
ती गेल्यावर अक्का खूपच एकाकी पडल्या . कशातच इंटेरेस्ट वाटेना . प्रचंड मरगळ आली होती. काही दिवसातच त्यांनी निलांबरी ला बोलावून घेतले . तिला गावात दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली आणि आपला नृत्यवर्ग बंदच करून टाकला .  निलंबरीनं बराच समजावण्याचा प्रयत्न केला , श्रवणीला फोन लावून दिला , तिनंही समजावलं , पण अक्का ठाम होत्या . एकेकाळी दिमाखात आपले वैभव मीरवणारी इमारत आता पोकळ वाटत होती …..आपल्या डोळ्यासमोर हा असा ह्रास ! खूप व्याकुळ मनानं त्यांचा जीव पोखरून जात होता ….हे सगळं असह्य होऊन त्यांनी अंथरूणच धरलं . 

आठ दिवसांनी अमेरिकेहून विडिओ कॉल आला . तिथे श्रीकांत , विद्या , नीता , जावई आणि श्रवणी सगळेच हजर होते . 
” अम्मा , श्रवणीला ‘ युथ सेन्सेशन ‘ अवॉर्ड मिळालंय . ही बघ केव्हढी मोठी डान्स अकादमी स्थापन करतेय ती . इथे अनेक प्रकारचे नृत्यप्रकार शिकवल्या जाणार आहेत . जग भारतातील नामवंत नृत्य शिक्षक येतील कार्यशाळा घ्यायला . उदघाटन तुझ्या हातून करू अम्मा !! आणि भरतनाट्यम , कुचिपुडी हे डिपार्टमेंट तूच संभाळायचं ! यरशील न अम्मा ?”
अम्मा चे डोळे पाझरत होते . कदंबा आणि राजम्मा येऊन बसले होते. 
” अव्वा , बोल न !” श्रवणी 
” ……….” 
” अम्मा , मी येतोय तुला न्यायला . त्या आधी तुझ्या वीझा चं काम करून टाकू . …..अम्मा , तुझी तपश्चर्या वाया नाही जाणार अम्मा , बोल न !” श्रीकांत च्या उत्साहाला उधाण आलं होतं .

कदंबा आशेने अम्मा कडे बघत होता …….
” गीताम्मा , बोला न काही ” राजम्मा म्हणाल्या .
” माझी पूजेतील नटराजाची मूर्ती विमानातून आणू देतील न रे ते ?” अम्मा नं विचारलं , आणि सगळ्यांचे चेहरे आनंदी झाले . श्रवणी ने तर उडीच मारली . 
गीताक्का रोजच्या सारख्या पहाटे उठून निशिगंधाच्या छड्या जवळ गेल्या . पाऊस पडून गेल्याने बाग जास्तच टवटवीत दिसत होती . अक्कानाही नवा हुरूप आला होता . 

आज पासून मोठ्या नटराजाच्या मूर्तीला निशिगंध वहात जा म्हणून सांगितले होते निलंबरीला . ती देखील हरखली होती नृत्यमंदिर पुन्हा सुरू होणार म्हणून . आता इथल्या नृत्यशाळेची जबाबदारी तिच्यावर सोपवून अम्मांना निश्चिंत मनाने इथून जायचे होते .
रोजच्या सारखीच निवात पूजा करतांना अम्मांनी देवाला मनोमन हात जोडले …..त्यांचा समृद्ध वारसा आता परदेशातही जपल्या जाणार होता .
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “वारसा”

Leave a Comment

error: Content is protected !!