पुनश्च ( भाग 3)

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 2 इथे वाचा
तसं तर अमेयची कंपनी त्याला लॉंगटर्म साठी अमेरिकेत पाठवायला तयार होती. पण अमेयला अजिबात लॉंग टर्मसाठी अमेरिकेत राहायचं नव्हतं कारण त्याचा जीव त्याच्या ममामध्ये अडकला होता.
तो गेल्यानंतर ती अगदीच एकटी पडणार होती. जी अवस्था ममाची होणार तिच थोड्याफार फरकाने डॅडची होणार होती.
आत्तापर्यंत ममा आणि डॅड आपल्यामुळे का होईना एकमेकांशी जोडलेले आहेत. पण एकदा अमिताशी लग्न करून आपण इथून लांब गेलो की ममा व डॅड एकमेकांपासून परत खूप दूर होतील. अगदी एकटे पडतील.

तेव्हा लग्नाचा विचार मी थोड्या दिवसांनी अमेरिकेहून आल्यावर करू असा पवित्रा त्याने घेतला.
लग्न नको आत्ता तर निदान एंगेजमेंट तरी करून घेऊ या अमिताच्या आईवडलांच्या आग्रहामुळे थाटामाटात दोघांची एंगेजमेंट पार पडली.
अमिताला अमेयचा लग्न पुढे ढकलण्या मागचा विचार कळत आणि पटतही होता.
पण तरीही फक्त लग्न पुढे ढकलून हा प्रश्न कायमसाठी सुटणार नाही असं तिला वाटत होतं.
कारण आज नाहीतर उद्या ही अशी वेळ येणारच होती.  

पुढे भविष्यात करीअरच्या दृष्टीने ती आणि अमेय ममापासून लांब जाऊ शकत होतेच.
खरंतर पहिल्यांदा ममा आणि डॅडना भेटल्यावरच हे दोघं made for each other आहेत अशी तिची भावना झाली होती. आणि अमेयने तिला जेवढं सांगितलं होतं त्यावरून तिला हे समजलं होतं की दोघंही अमेयच्या जबाबदारीच्या बाबतीत कमिटेड आहेत,  दोघांच्याही आयुष्यात इतक्या वर्षात दुसरं कोणी आलेलं नाही म्हणजे वेगळे झाले असले तरी दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करतायत.
उतारवयात सोबतीची गरज प्रत्येकालाच असते.. तशी ती ममानांही असणार आणि डॅडनाही.
तेव्हा आपल्या लग्नाआधी त्या दोघांना एकत्र आणायला हवे.

अमिताने तिची ही इच्छा अमेयला सांगितल्यावर अमेयने इमोशनल होऊन ‘अगदी माझ्या मनातलं बोललीस’ म्हणून तिला मिठीच मारली.
अमिताच्या आईवडलांनाही स्वतःच्या सुखाआधी आपल्या आईवडलांचा विचार करणाऱ्या या मुलांचा खूप अभिमान वाटला.अमेय आणि अमिताने ममा आणि डॅडशी याबाबत बोलायचं ठरवले.
लगेच दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी अमेय आणि अमिता शंतनूला भेटायला गेले.

शंतनू नुकताच ऑफिसमधून घरी आला होता.
शंतनू आता एका छोट्या फर्ममधे पार्ट टाईम कन्सलटंट म्हणून काम पाहात होता.
या दोघांना असं अचानक आलेलं पाहून शंतनूला एकदम आनंद झाला.
“अरे.. आज लैला मजनू अचानक इकडे? काय विशेष?” त्याने हसून विचारले.

“काय हो डॅड !  असंच आलो तुम्हाला भेटायला.” अमिता म्हणाली.
मग इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर अमेय म्हणाला, “डॅड तुम्हाला एक विचारायचं होतं”
“अरे बोल की बिंधास्त.. विचार काय विचारायचंय ते!”
“डॅड, तुम्ही इतक्या वर्षात परत लग्न का नाही केलंत?” अमेयने खरंच बिनधास्तपणे विचारलं.
“अमेय.. हे काय मधेच अचानक? मला वाटलं तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल बोलायला आला असाल.”

“सांगा ना डॅड प्लीज..” अमिताने गळ घातली.
“हे काय चालवलंय तुम्ही दोघांनी? तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायला हवा आता आणि तुम्हाला हा प्रश्न पडलाय? ” शंतनू वैतागून म्हणाला.
“याआधीही हा प्रश्न अनेकदा पडला होता मला डॅड पण मी कधी विचारायची हिम्मत नाही केली.. पण आता”
अमेयचं बोलणं मधेच तोडत शंतनू म्हणाला, “आता काय? आता जास्त शहाणा झालास का?”
“तसं नाही डॅड… पण तुम्हाला जोडीदार मिळाल्याशिवाय आम्ही लग्न नाही करणार.. म्हणजे तशी आमची अटच आहे समजा..” अमेय ठामपणे म्हणाला.

“हो डॅड.. बरोबर बोलतोय हा.. मलाही तसंच वाटतं..” अमितानेही अमेयचीच री ओढली.
“अरे.. डोकी फिरलीयेत का तुमची? माझ्यासाठी जोडीदार शोधताय? तुम्हाला असा कितीसा अनुभव आहे रे या नात्याचा? मला शिकवताय ! लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला.?
आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मला जोडीदाराची गरज आहे म्हणून?” शंतनू खरंतर खूप भडकला होता पण तरीही अमितासमोर ही चर्चा होत असल्याने त्याने स्वतःवर ताबा ठेवला होता.

“डॅड, काही गोष्टी न सांगताही कळतात. आणि जोडीदार शोधायची वगैरे गरजच नाहीये.. ती तर तुमच्या समोरच आहे. मला माहीती आहे डॅड, आजही तुमचं ममावर तेवढचं प्रेम आहे आणि तिचंही तुमच्यावर.” अमेय म्हणाला.
“आता हे तुला कसं कळलं? ममाने सांगितलं?”
“नाही डॅड, कोणी सांगायला कशाला हवंय? आज इतक्या वर्षांनंतरही तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाहीये यावरून काय ते समजलंय मला. तुमच्याही आणि ममाच्याही..जेव्हा की तुमच्या दोघांसाठीही ते खूप सहज शक्य होतं.”

“डॅड…तुमच्या ऑफिसमधल्या त्या अर्चना मॅम..त्यांच्यासाठी तुम्ही कधीच फक्त त्यांचे बॉस नव्हतात.
ते मला तेव्हा समजत नसलं तरी आता जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो तेव्हा मला हेच वाटतं की त्या तुमच्याशी नातं जोडायला खूप उत्सूक होत्या आणि त्यासाठी प्रयत्नही करत होत्या .
पण तुम्ही ममाशिवाय कधी दुसऱ्या कोणाचा विचार करूच शकला नाहीत.. हो ना?”
“अमेय, आज फार बोलतोयस रे तू.. आणि तेही  या तुझ्या होणाऱ्या बायकोपुढे !”

“हो, कारण फक्त मलाच नाही तर इतक्या कमी दिवसांत तिलाही हेच जाणवलंय डॅड..”
“काय?”
“हेच की तुम्ही आणि ममांनी पुन्हा एकत्र यायला हवं.” अमिता धीटपणे म्हणाली.
“डॅड, आतापर्यंत माझ्यामुळे तुमच्या आणि ममामध्ये एक बंध होता. माझी सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी तुम्ही कमिटेड होतात, एकत्र होतात. आता जेव्हा मी अमिताबरोबर माझं नवं आयुष्य सुरू करेन तेव्हा कितीही म्हंटलं तरी माझ्या प्रायोरिटीज बदलतील.. आमचं असं एक वेगळं जग निर्माण होईल.. आणि तुमचं आणि ममाचं जग मात्र सुनं सुनं होत जाईल. तुमच्या वाढत्या वयात जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा तुम्ही अजूनच एकटे पडत जाल. तेव्हा आम्ही जे सुचवतोय त्याचा प्लीज प्लीज विचार करा.” अमेय मनापासून बोलत होता.

अमेय जे काही म्हणत होता त्यात काहीच खोटं नव्हतं.
अमेयच्या ग्रॅज्युएशननंतरच आता अमेयच्या बाबतीतल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपत आल्या आणि आता आपला शालिनीशी संपर्क राहाणार नाही हा विचार शंतनूच्या मनातही  घोळत होता. पण तरीही अमेयचं म्हणणं मोकळेपणाने मान्य करणे शंतनूला जमलं नाही. तो एकदम गप्प झाला.
डॅड काहीच बोलत नाहीत पाहून शेवटी अमेय आणि अमिता निघून गेले.

तसंही डॅड लगेच हे मान्य करणार नाहीत याची त्यांना कल्पना होतीच.. पण निदान डॅडपुढे आपलं म्हणणं मांडल्याने ते या बाबतीत विचार तरी करतील या आशेवर दोघं आपापल्या घरी गेले..पण आता ममाशी बोलायचं हे ठरवूनच.
दुसऱ्या दिवशी दुपारी जोडी ममाच्या ऑफिसमध्ये पोचली.
ऑफिसमध्ये एवढ्याचसाठी की ममाला शांत राहून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावेच लागेल, नाहीतर ममाचा राग कसा असतो ते अमेयला माहीतच होतं.
तसंही ममाला तिच्या कुठल्याही बाबतीत कोणी फारशी ढवळाढवळ केलेली आवडत नाही.

पण आता अमिताही बरोबर असल्याने अमेय ममाशी बोलण्याचं धाडस करणार होता.
दोघांना असं अचानकपणे ऑफिसमध्ये आलेलं पाहून शालिनीला थोडं आश्चर्यच वाटलं.
काय बरं असेल यांच्या मनात असा विचार शालिनी करतच होती तेवढ्यात इकडचे तिकडचे दोन तीन प्रश्न विचारून अमेयने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला.
अमेयची स्वतःच्या लग्नाआधी ममाचा एकटेपणा घालवायची ही अट ऐकून शालिनी चाट पडली आणि अमिताचीही त्याला साथ होती.

मोठ्या मुशकिलीने स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवत शालिनीने , “हे बघा, माझा एकटेपणा निभावून नेण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. आणि मला कशाला एकटं वाटेल? माझी ही कंपनी आहे की माझ्यासोबत ! तेव्हा तुमचा हा मला आणि तुमच्या डॅडला एकत्र आणायचा विचार तुम्ही सोडून द्यावा यातच सगळ्यांचं भलं आहे. कळतंय का तुम्हाला?” धारदार आणि ठाम आवाजात दोघांना सुनावलं.
त्यावर काय बोलावं ते न सुचल्याने अमेय गप्प बसला.

पण अमिता मात्र आपला मुद्दा पुढे रेटत बोलत राहिली, “तुमची ही कंपनी असेलच ममा.. पण प्लीज विचा करा, ही कंपनी तुमची उतारवयातल्या सोबतीची गरज पूर्ण करू शकेल? आपल्या माणसाच्या मायेची उब देऊ शकेल? मी माझ्या आजी आणि आजोबांचे शेवटचे दिवस पाहिलेत ममा.. त्यावरून मी इतकंच म्हणू शकते की आपल्या माणसाच्या भक्कम आणि प्रेमळ सोबतीची उणीव इतर कशानेही भरून निघत नाही. आई खूप काळजी घ्यायची आजी आजोबा दोघांचीही.. पण तरीही आपल्या जोडीदाराच्या मानसिक शांततेसाठी दोघं आपापल्या परीने स्वतःच्या तब्येतीला जपायचे.”

“एकमेकांच्या आनंदासाठी समरसून जगायचे.. शेवटच्या दिवसांतही उद्या आपल्याला काय करायचय याचे प्लॅन्स आखायचे.. they both had something to look forward every day.. अशी सोबत तुम्हाला जगातली कुठलीही कंपनी करू शकणार नाही ममा. आणि तुम्हाला सांगू ? मी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला आणि डॅडना एकत्र पाहिलं ना तेव्हापासून मला हेच वाटत आलंय की you both are made for each other.. तुम्ही लांब राहूनही एकमेकांवर प्रेम करताय.. फक्त तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये.. पण trust me ममा, ते एवढं कठीण नाही.. आपण ते सगळं सोपं करू.. तुम्ही फक्त पॉझिटीव्हली विचार करा..कराल ना ममा? प्लीज?”

अमिताच्या या बोलण्याने शालिनी एकदम गप्प झाली.
“आम्ही डॅडनाही आमची हीच अट सांगितली आहे, आता आमचं लग्न कधी लागेल ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे” अमेयने सांगितले आणि तो अमिताला घेऊन तिथून निघाला.
पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले. आता कोणीच या विषयावर काहीच बोलत नव्हते.
ना अमेय ना शालिनी..
अमेयच्या लग्नासाठी आपण आपली सुटलेली गाठ परत बांधायची हा विचारच शालिनीला रूचत नव्हता.

आपण आपली इच्छा ममा आणि डॅडना सांगितलं आहे आता त्यांना त्यांच्या निर्णयासाठी वेळ द्यायला हवा असा विचार करून अमेय आणि अमिता शांत होते.
अमेयचे नव्या प्रोजेक्टवर काम सुरू झाले होते. क्लायंटला त्याचं काम खूप आवडत असल्याने कंपनीने निदान पुढच्या सहा महिन्यांसाठी तरी त्याने लगेच अमेरिकेला जावे असं त्याला सांगितले होते.
अमेयच्या व्हिसाचे प्रोसेसिंग सुरू होते.

अमेय आणि अमिताच्या हट्टापुढे कोणाचच काही चाललं नाही. थोड्याच दिवसांत अमेयचा व्हिसा आला आणि त्यानंतर आठवडाभरात अमेय अमेरिकेत जाऊन पोचला सुद्धा.
बघता बघता चार पाच महिने गेले आणि अमेयची परत यायची वेळ जवळ आली.
अमेयने तयारी दाखवली असती तर त्याला अजूनही काही महिने तिथे राहाता आले असते. पण अमेयने परतीचा निर्णय घेतला होता.
क्रमश:
अमेय अमेरिकेत असतांना इथे काय काय घडत होते? शालिनी आणि शंतनू अमेयच्या ह्या अटीबद्दल काय ठरवतील? या प्रश्नांंची उत्तरं वाचा पुढील भागात
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
या कथेचे कुठल्याही स्वरूपाचे व्हीडीओ बनवण्यास लेखिकेची परवानगी नाही, इतरांच्या कथांवर स्वत:चे यू ट्यूब चॅनेल चालवणार्‍या व्हीडीओकारांनी याची नोंद अवश्य घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Series Navigation<< पुनश्च ( भाग 2 )

1 thought on “पुनश्च ( भाग 3)”

Leave a Comment

error: Content is protected !!