- पुनश्च ( भाग 1)
- पुनश्च ( भाग 2 )
- पुनश्च ( भाग 4 अंतिम )
- पुनश्च ( भाग 3)
भाग 3 इथे वाचा
© धनश्री दाबके
या मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. अमेयच्या हट्टामुळे शालिनीच्या जीवाला चैन नव्हतं. आपल्या लेकाच्या सुखामध्ये आपण अडथळा बनून उभे आहोत हा विचार तिला अस्वस्थ करत होता.
शिवाय अमिता आणि तिचे आईवडील जरी काही म्हणत नसले तरी आपण त्यांचेही अपराधी आहोतच असंही वाटत होतं. इकडे शंतनूही अस्वस्थ होता. स्वतःच्या एकटेपणापेक्षा त्याला अमेय आणि अमिताचं लग्न होणं जास्त महत्वाचं होतं. पण ते दोघं वेडे स्वतःच्या सुखापेक्षा त्यांच्या ममा आणि डॅडच्या भविष्याची चिंता जास्त करत होते.
काय करावं? सरळ जाऊन शालिनीशी बोलावं का की, ‘तू अमेयला समजव म्हणून’ .. पण तो आपलाच लेक आहे.. हट्टी.. शेवटी आपली मुलं आपल्यासारखीच तर असतात.. एकेकाळी आपण तरी कुठे शालिनीचं काही ऐकलं?
तिला समजून घेण्यात आपण कमीच तर पडलो. आणि अमेय म्हणतोय ते तरी चुकीचं कुठे आहे? तो अमिताशी लग्न करून परदेशी गेला तर मी आणि शालिनी दोघंही एक एकटेच तर पडणार आहोत.
हो नाही करत शेवटी शंतनूने शालिनीला फोन केला आणि तिला भेटायला येशील का म्हणून विचारलं.
शालिनीनेही कसले आढेवेढे न घेता होकार दिला आणि तिच्या ऑफिसजवळच्या एका रेस्टॉरंटमधे भेटायचं ठरले.
शालिनी येण्याआधीच शंतनू तिथे जाऊन बसलेला होता.
रेस्टॉरंटमधे शिरल्यावर एका कोपऱ्यातल्या टेबलवर तिला शंतनू बसलेला दिसला.
स्काय ब्लू कलरचा हाफ स्लीव शर्ट, त्यावर ऑफव्हाईट पॅंट, शर्टवर समोर अडकवलेला गॉगल आणि अवस्थपणे पाय हलवत असलेल्या शंतनूला पाहून शालिनीला लग्नापूर्वी तिची आतुरतेने वाट बघत बसलेला शंतनू आठवला. तेव्हाही तो असाच बसायचा आणि गेल्या गेल्या आलीस? असं विचारून भराभरा बोलायला सुरवात करायचा.
आत्ताही तसंच झालं. शालिनीला पाहून शंतनूने “thank you ! तू आलीस” म्हणत घाईघाईने बोलायला सुरवात केली, “तुला असं भेटायला बोलावतांना जरा ऑडच वाटत होतं.. पण या अमेयने अटच अशी विचित्र घातलीये की काय करणार?”
“हो ना.. सगळीच कोंडी झालीये. अमिताच्या आईचा मधे मधे फोन येतो. त्या आपल्या इकडचं तिकडचं बोलतात. लग्नाबद्दल काहीच विचारत नाहीत. पण मलाच अपराध्यासारखं वाटतं रे !
कधीपासून त्या आणि मिस्टर साठे आपल्या लेकीच्या लग्नाचं स्वप्न बघत असतील ! आपलं बिनसलेलं नातं अमिताच्या सुखाच्या आड येतंय असं वाटत असेलच की त्यांना.”
“पण त्यांच्या दृष्टीने बघितलं तर ते खरंच आहे ना शालिनी..”
“हो पण या दोघांचा हट्टीपणाही तितकाच कारणीभूत आहे ना या परिस्थितीला !”
“तो आहेच ग. आधी मीही तर तेच केलं. फक्त हट्टीपणा केला, तुला समजून नाही घेतलं आणि आता अमेयही तेच करतोय. तुला काय वाटतंय, काय हवंय याचा विचार तो करतच नाहीये.”
“आणि तुझा? तुला काय वाटतंय?”
“माझं सोड ग ! मला नेहमीच आपली हॅपी फॅमिली हवी होती, पण सगळी गणितं चुकतच गेली..” शंतनूने पॉज घेतला..
“असो.. जे झालं ते झालं.. आपल्या नशीबात एकटेपणाच होता असं म्हणायचं” शालिनी म्हणाली.
“व्हायचं होतं ते झालंच..पण हा एकटेपणा खूप काही शिकवून गेला मला. तेव्हा जर मला तुझ्या यशात सहजपणे सामील होता आलं असतं ना तर.. पण नाही जमलं मला ते.. आजतागायत हा गिल्ट मला छळतो शालिनी.. अगदी रोजच्या रोज.. तू लांब गेल्यानंतर बरेचदा वाटायचं की तुला हे सगळं सांगावं पण तू कशी रिॲक्ट होशील या विचाराने मी गप्प राहिलो. कधी वाटायचं तू समजून घेशील तर कधी वाटायचं आता अमेयच्या निमित्ताने तरी माझ्याशी बोलतेस तेही बंद करशील.. i am really sorry for everything शालू.” शंतनू भावूक होऊन बोलत होता.
“जाऊ दे शंतनू.. करीअर आणि घर याचा समतोल साधण्यात मीही तर कमीच पडले.. बाबांनी मला खूप समजवायचा प्रयत्न केला पण मीही तर हेकेखोरपणाच केला तेव्हा. पण आता ते सगळं आठवून काय उपयोग?
आपण खूप पुढे निघून आलोय आता.. आणि हा अमेय पुनश्च आपल्याला त्याच गाठीत बांधायला निघालाय.”
“तू तुझ्या पद्धतीने समजव ना त्याला”
“अरे..काही ऐकतच नाही तो..बरं त्या अमिताचंही मला आश्चर्य वाटतं.. तिलाही हे पटतंय.. त्यात अमेरिकेत दिवस असतो तेव्हा आपली रात्र.. त्यामुळे निवांत असं बोलताही येत नाही सध्या अमेयशी.. पण तरीही आता या रविवारी बोलतेच मी त्याच्याशी.. फार ऐकून घेतलं त्याचं.. आता बास हा हट्ट..” शालिनी निग्रहाने म्हणाली.
“हो बोल आणि मला कळव.. मग मीही माझ्या परीने सांगेन त्याला.” शंतनू म्हणाला आणि पुढ्यातली कॉफी संपवून दोघं दोन दिशांना पांगले.
शालिनी बोलेन म्हणाली तरी पुढचे दोनही वीकेंड अमेय त्याच्या मित्रांबरोबर जवळपासच्या ठीकाणी ट्रीपला गेल्याने शालिनीचं त्याच्याशी या विषयावर बोलणं होऊच नाही शकलं.
पण या दरम्यान शंतनू मात्र तिला मेसेज करत होता. बोलणं झालं का ते विचारण्यासाठी.
त्यादिवशी शालिनीसमोर मन मोकळं केल्यापासून शंतनू थोडा मोकळा झाला होता.
शालिनीही त्याच्याशी स्वतःहून दोन चार शब्द अधिक बोलत होती.
अमेयच्या हट्टा व्यतिरिक्तही त्यांच्यात थोडा संवाद होत होता.
पूर्वीचा औपचारिकपणा हळूहळू गळून पडत होता. दोघं आवर्जून एकमेकांची चौकशी करत होते.
नकळतपणे एकमेकांच्या जवळ येत होते. आधी अमेयच्या संगोपनासाठी दोघं एका टीममधे होते तर आता अमेयचा हट्ट हाणून पाडण्यासाठी.
खरंतर लांब असूनही दोघं नेहमी एकत्रच होते.
फक्त ते त्यांना मान्य करायचं नव्हतं.
शेवटी तिसऱ्या रविवारी शालिनीला अमेयशी निवांतपणे बोलता आलं.
“आता पुरे झाले हा हट्ट..तू तुझा हा हट्ट सोडावास आणि परत आल्यावर लगेच अमिताशी लग्न करावस असं आम्हाला दोघांनाही वाटतंय अमेय. मी अमिताच्या आईवडलांशी बोलून लवकरच पुढचं ठरवायला लागते. म्हणजे तू आलास की लगेच तुमचं लग्न लावून देऊ. तुझ्या या विचित्र प्रस्तावामुळे माझी झोप उडाली आहे, मला काहीच सुचत नाहीये.. आणि तुझ्या डॅडचीही तीच अवस्था झालीये. शिवाय अमिताच्या आईवडलांसमोर जातांना अपराधी वाटतं ते वेगळंच.” शालिनीने सुनावले.
“परत सुरू झालीस ममा.. अमिता तिच्या आईवडलांशी बोलली आहे.. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये.. शिवाय ही माझी एकट्याचीच इच्छा नाही ममा.. अमिताचीही हीच इच्छा आहे. आणि आमचं ठरलंय.”
“काय ठरलंय?”
“तेच जे आम्ही तुम्हाला सांगितलय.. आधी तुमचं आणि मगच आमचं लग्न..”
“अरे अमेय आता कसं सांगू तुला की हे शक्य नाही म्हणून.. आणि लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार केला आहेस का रे तूं?”
“ममा लोक कोण काही म्हणणारे? त्यांचं फक्त काहीतरी म्हणायचच काम असतं.. वेळेला हे काही म्हणणारे लोक नाही तर आपली हक्काची माणसं कामाला येतात.. बरं चल मी ठेवतो आता.. मला ग्रोसरी आणायला बाहेर जायचय..” असं म्हणून अमेयने फोन ठेवला सुद्धा.
रविवार संपत आला तसा शालिनीला शंतनूचा फोन आला. अमेयशी बोललीस का ते विचारायला.
अमेयशी झालेलं सगळं बोलणं समजल्यावर हा मुलगा आता आपलं लग्न लावणारच असं शंतनूचं मत झालं.
जिथे आपण त्याच्या लग्न जुळवायला हवं तिथे हाच आपलं लग्न जुळवायला निघालाय या विचारावर शंतनू अगदी मनसोक्त हसला.
“बरं.अजून त्याला यायला वेळ आहे. बघू परत प्रयत्न करून” असं म्हणून शंतनूने फोन ठेवला आणि शालिनीला एकदम त्यांचे पूर्वीचे आनंदाचे दिवस आठवले.
शंतनू असाच खळखळून हसायचा जे तिला खूप आवडायचे.
खरंच किती खेळकर होता शंतनू. भरपूर मजा मस्करी करून सगळ्यांना हसवायचा. नेहमी माणसांमधे रमायचा. खूप स्वप्न पाहायचा. पण माझ्याशी होणाऱ्या सततच्या भांडणांनी त्याचा खेळकरपणा जणू हरवूनच गेला आणि आजूबाजूला सतत माणसं हवी असणाऱ्या शंतनूच्या नशीबी एकटेपणा आला. कायमस्वरूपीचा. या एकटेपणाला मीही तितकीच जबाबदार आहे.
अमेय आणि अमिता म्हणतात ते काही खोटं नाही..त्यानेही कधीच दुसऱ्या कोणाचा विचार केला नाही आणि मला तर ते शक्यच नव्हतं. आयुष्यात खरं प्रेम हे एकदाच तर होतं. जसं माझं होतं.. आणि शंतनूचंही.
हॅपी फॅमिली हवी असलेल्या शंतनूला माझ्यामुळे आयुष्यभरासाठीच्या एकटेपणाची शिक्षा मिळाली.
नेहमी स्वतःचच बरोबर वाटणाऱ्या मला आज का हे असं सगळं वाटतंय? तसं पाहिलं तर चूक काही माझी एकटीची नव्हती. त्याने सुद्धा मला तितकंच दुखावलं होतं. पण आई म्हणायची तसं मीच समजूतदारपणा दाखवायला हवा होता का? पण फक्त मीच का?
उलटसुलट विचारांनी शालिनीच्या मनाचा तळ ढवळून निघाला.
झालेली चूक आता सुधारावी का? शंतनूची सोबत मला खरंच गरजेची आहे का? आणि असलीच अगदी तरी ही मधली इतकी वर्ष पार करायला जमेल का मला आता ?
आईबाबा जे सांगायचे तेच आता अमेयही सुचवतोय.. म्हणजे नियतीची हीच इच्छा आहे का?
विचार करून करून शालिनी हैराण झाली.
काही दिवस अशाच बेचैनीमधे गेले. अमेयशी जास्त बोलणे होत नव्हते.. अमिताही तिच्या व्यापांमधे बिझी होती. शंतनूचाही काही मेसेज नव्हता.
शेवटी शंतनू कसा आहे याची चौकशी करायला शालिनीनेच त्याला मेसेज केला तर शंतनू ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेल्याचं समजलं.
त्याने जातांना साधं कळवलंही नाही याचा शालिनीला आधी राग आला आणि मग स्वतःच्या या अपेक्षेचं आश्चर्यही वाटलं.
मी काही त्याची बायको थोडीच आहे की तो मला सांगून जाईल.. शालिनी अस्वस्थ झाली.
दिवसरात्रींच चक्र नेहमीप्रमाणेच चालू होतं पण शालिनीला आता फारच एकटं एकटं वाटत होतं.
ज्या कामाच्या सोबतीचा दावा तिने केला होता त्या कामातही लक्ष लागत नव्हतं.
आला दिवस कसाबसा सरत होता.
तीन चार आठवडे असेच गेले आणि शंतनूचा फोन आला.
“कशी आहेस?” त्याने विचारले.
” मी ठीक. तू कसा आहेस?”
“मी नाहीये म्हणावा असा ठीक.”
“काय झालं?”
“तसं झालं नाहीये काही. मला असं वाटतंय शालिनी..म्हणजे.. आपण तेव्हाही फार ताणलं..आणि आताही परत तेच करतोय. आपलं दोघांचं एकमेकांवर खरं प्रेम असूनही..आपण दूर राहिलो. खरंतर किती सुंदर आयुष्य जगू शकलो असतो आपण. गेले काही दिवस विशेषतः तुझ्याशी परत बोलायला लागल्यापासून राहून राहून माझ्या मनात हाच विचार येतोय शालिनी.
आपला लेक आपल्याला सुखाचा मार्ग दाखवतोय आणि आपण तो मार्ग स्वच्छ दिसत असूनही त्याच्याकडे बघायलाही तयार नाहीयोत. उगीचच आडमुठेपणा करतोय. तू त्या दिवशी मला विचारलंस ना की मला काय हवंय? तेव्हा मला क्लीअर नसलं तरी आता मला माझ्या मनाने कौल दिलाय..
मी परत तुझ्याबरोबर परत नव्याने डाव सुरू करायला तयार आहे शालिनी.. i want you in my life again. Now the call is yours”
इतका वेळ शंतनूचे हे बोलणं ऐकणारी शालिनी आधी गडबडली.. पण त्याचा शब्द न शब्द त्याची खरी मनस्थिती सांगत होता.. जी थोड्याफार फरकाने तिचीही तशीच होती.
शेवटी मनाने बुद्धीवर मात केली आणि मनाचा कौल ऐकत धीर करून शालिनीनेही तिचं मन मोकळं केलं जे आत्तापर्यंत तिने कधीच केलं नव्हतं आणि ” i too want you back in my life Shantanu” असं म्हणून तिने होकार दिला.
“खरंच शालिनी? thank you so much.. ” शंतनूला भरून आल्यामुळे पुढे बोलवत नव्हतं.
शालिनीचीही अवस्था काही वेगळी नव्हती. मग पुढचे काही क्षण शांततेत गेले.
थोडं सावरल्यावर दोघांनी दुसऱ्याच दिवशी भेटायचे ठरवले. दोघं मिळून अमेयला ही खुशखबर देणार होते.
आज परत शालिनी कपाटासमोर उभी होती. शंतनूला भेटायला जातांना कुठली साडी नेसावी या विचारात. बराच वेळ विचार करून मग शालिनीने शंतनूला आवडणाऱ्या बॉटल ग्रीन कलरची सॉफ्ट सिल्कची साडी निवडली.
एका साईडला पदर घेऊन त्यावर मॅचिंग खड्यांचा सेट घालून शालिनी झकासपैकी तयार झाली.
आज आरशात स्वतःच्या चेहऱ्यावरचा हा नूर पाहून शालिनीला स्वतःचच खूप आश्चर्य वाटत होतं.
खरंच अमिता म्हणत होती तसं हे काही खूप कठीण नव्हतं.
किती मोकळं वाटतंय काल शंतनूशी बोलल्यापासून.. हसून शालिनीने स्वतःकडे पाहिलं.. आणि सगळ मनाजोगतं आहे याची खात्री करून शालिनी बाहेर पडली..
प्रेमाचा अर्ध्यावर सोडलेला डाव पुनश्च खेळायला..
समाप्त.
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
या कथेचे कुठल्याही स्वरूपाचे व्हीडीओ बनवण्यास लेखिकेची परवानगी नाही, इतरांच्या कथांवर स्वत:चे यू ट्यूब चॅनेल चालवणार्या व्हीडीओकारांनी याची नोंद अवश्य घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
खुप छान कथा आहे. आज सगळेच स्वतः च्या करिअर साठी आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण घालवून बसतात.
या कथेत मुलांनी आपल्या आई वडिलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी छान प्रयत्न केला .आणि त्यामध्ये त्यांना यश ही मिळाले.
खुप सुंदर आणि मनाला भावून गेली कथा
मनपूर्वक धन्यवाद मॅम.. तुमच्या या कमेंटमुळे पुढच्या लिखाणाला हुरूप आला.
Thank you so much Ma’am