बायकोची वसंत पंचमी

© सौ. प्रतिभा परांजपे
प्रशांत आरशासमोर उभा राहून दाढी करत होता.
प्रियंका, त्याची बायको –आपल्या कुठल्याशा मैत्रिणीशी फोनवर बोलत होती.
“अग हो मॅडम चा फोन होता’ , त्याचाच विचार करतेय,! अगं वसंत पंचमीच्या इव्हेंट साठी एक छोटं भाषण तयार करताना मला आठवलं की मला पिवळया रंगाची साडी पण नेसावी लागेल.
मी व्हाईस प्रेसिडेंट, त्यामुळे ड्रेस कोड मीच जर फॉलो नाही केला तर कसे बरे दिसेल”???

तिकडून काय बोलणे झाले ते काही प्रशांतच्या कानावर आले नाही.
‘एक घेऊनsच यावी झालं साडी, या निमित्ताने,लग्नातली खूपच ओल्ड झाली ग’!
“साडी “शब्द कानावर पडताच प्रशांतने कान टवकारले.
“आजच जाईन बाजारात तेव्हाच तर सगळी छान तयारी होईल ना ! बर मला सांग तु कोण ती साडी नेसणार आहेस?”  प्रियंकाचा  प्रश्न?

मैत्रीण तशी अगदीच भोळी भाबडी नसावी..
“कां ग?”
“अगं काय आहे जरी पिवळी साडी नेसायची असली तरीही इतरांपेक्षा जरा वेगळी हवी नाही कां?( नाहीतर माझे वेगळेपण कसे काय दिसणार हा मनातल्या मनात विचार केला असावा).
“आपल्या प्रेसिडेंट  वर्षा, त्यांची तर सगळ्यात स्पेशल साडी असेल . त्यांच्या खालोखाल तरी माझी असायला हवी म्हणून विचारते.” इति प्रियंका.

“मागच्या संक्रांतीच्या कार्यक्रमात मॅडम ची साडी काय भारी होती न? तेव्हांच मी ठरवल पुढच्या वेळी आपण बाजी मारायची.”
“अग मागच्या वर्षीचे फोटो पहा ना कार्यक्रमाचे.  कोणी कोणत्या साड्या नेसल्या ते दिसेलच .”
“त्यातलीच थोडी ना नेसतील त्या या वेळी. म्हणूनच मलाही नवीन घ्यायची आहे सगळ्यांपेक्षा डिफरंट अशी.
आज च जाते बाजारात. बापरे अजून किती तरी तयारी करायची आहे.
बरं- बरं- ठेवते ग आता, अजून टिफिन भरायचा आहे ग याचा, भेटू मग.”

“अहो –ऐका ना” प्रियंका चा आवाज मधाळ झाल्यासा वाटला प्रशांतला.
‘हं, बोल– काय सेवा’??
‘आज लवकर घरी ये  ना रे’!
“कां ग ? क्या- इरादा है ! पियू”.
“अरे- मला एक साडी घ्यायची आहे’.

“साडी??– पण तू तर फारशी नेसत नाही, सूट,जीन्स—“
प्रशांत ला मध्येच थांबवत—” हो रे, पण क्लबमध्ये वसंत पंचमी चा कार्यक्रम आहे ना, त्यात ठरले आहे ना म्हणून घायचीये”
प्रशांत नी मनाशी हिशोब केला मागची दोन वर्षे लॉक डाऊन मध्ये प्रियंकाने खूपच साथ दिली.
काहीही म्हणून मागितले नाही तेव्हा. आणि आता सगळं व्यवस्थित सुरू आहे, कालच मिटिंग मध्ये टार्गेट पूर्ण झाल्याने बॉस पण खुश आहे, प्रमोशनचा पण चान्स आहे, त्या आनंदात एक साडी तो कुछ भी नही.

संध्याकाळी प्रियंका, प्रशांत जोडी ने साड्यांच्या दुकानात गेले.
प्रशांत एका सभ्य नवऱ्या प्रमाणे खुर्चीवर बसून साड्या नेसवलेल्या पुतळ्यां कडे पाहतांना विचारात पडला, ” पुतळ्यातल्या बाईला कुठलीही साडी नेसवली तरी सुंदरच कशी काय दिसते? तीच साडी या बायकां कां बरे घेत नाहीत.”?
प्रियंका चोखंदळ ग्राहक प्रमाणे गादीवर बसून साड्या पाहत पाहत दुकानदाराला सांगत होती.
“पीली साडी, बसंती रंग की बताना”.
दुकानदाराने पिवळ्या साड्यांचा ढीग लावला.

“इस मे ज,sरा बडी बॉर्डर बताना, और टर्मरिक यल्लो सितारो वाली भी बताना.”
पहिला गठ्ठा एका बाजूला  सरकला.
आणि मोठी बॉर्डर व चमकधमक वाल्या साड्या येऊन पडल्या.
 त्या चमचम चांदण्यांनी प्रशांत चे डोळे दिपून  गेले. एकाच रंगाच्या इतक्या साड्या ?
पण प्रियंका ची नजर अजूनही भिरभिरत होती.
क्लब च्या बायकांना इंप्रेस करेल, थोडक्यात जळवेल अशी साडी अजून एकही नव्हती.

बाजूच्या काउंटरवर अजून काही बायका साड्या पाहात होत्या. 
तिथला वयस्क कर्मचारी रिजेक्ट साड्यांच्या घड्या करत होता.
त्यातली एक पिवळी साडी पाहताच, प्रियंका चे डोळे चमकले
“वो-मस्टृर्ड यल्लो बताना” म्हणतात ती साडी इकडे येऊन पडली.
“इसमें  बारिक बार्डर वाली?”

हां हां म्हणता म्हणता अजून चार साड्या समोर आल्या.
बराच वेळ झाला, त्या फिक्‍या, गडद, पिवळ्या, बसंती कां काय म्हणतात त्या साड्या पाहून पाहून प्रशांतला आपल्याला पिवळ्या झाल्यासारखे वाटू लागले,
“ही सनसेट यलो कशी आहे रे”– म्हणत प्रियंका ने ढिगार्‍यातून एक साडी खेचून बाहेर काढली– 

पिवळ्या ची  इतकी नांव असतात? प्रशांत चक्रावला.
“वा ssमस्तच– एकदम झकासss तुला खूsप खुलेल”, चला सुटलो एकदाचे (मनातल्या मनात म्हणत) प्रशांत  उभा राहिला.
“आपका चॉइस एकदम बढीया है मॅडम” दुकानदाराने  म्हणताच साडी कॅश काउंटर वर गेली. 
साडी पॅक होई पर्यंत  प्रियंका ने अजून दोन तीन साड्यांना उचलून पाहिलं.

बापरे विचार बदलायच्या आधी इथून सटकांवे या विचाराने प्रशांत म्हणाला, “चला झालं ना? आता काहीतरी खाऊ या भूक लागली आहे”.
” हो रे ‘पण अजून ॲक्सेसरीज घ्यायचा आहेत, म्हणजे मॅचिंग बांगड्या, ईयरिंग, पर्स वगैरे.”
“आलिया भोगासी की पिवळ्या पंचमी शी असावे सादर” म्हणत बाकी खरेदीही झाली.
“थकले रे चल आता खाऊनच घरी जाऊ”.

घरी येता येता “अग पण दुसऱ्या रंगाची का नाही घेतली पिवळाच कां?” प्रशांतने विचारलं.
“अरे पिवळा रंग उत्साहाचे प्रतीक असतो. वसंत पंचमी आहे ना , क्लब मध्ये कार्यक्रम आहे….. “
पिवळ्या रंगावर बरेचसे लेक्चर प्रियंकाने प्रशांतला सुनावले , ( जे तिला क्लबमध्ये द्यायचे होते) त्यातले काही त्याच्या कानांवर तर काही गाडीच्या आवाजातच विरून गेले.

दुसरे दिवशी सकाळपासूनच प्रियंका ची पिवळी तयारी सुरू होती.
“प्रशांत पिवळ्या रंगाची मिठाई कोण कोण ती रे? बुंदी चे लाडू– इति प्रशांत.
“हो पण आणखीन?”
“अग पिवळा रंग घालून बरेचसे पदार्थ करतात की म्हणजे केशरी भात, जिलबी रस मलाई…”
“अय्या खरचं कि..बेसन बर्फी, खमण.”
“हे सर्व तू नेणार आहेस?”

“नाही रे  एक मिनिटाचे गेम असतात नाआमचे.. त्या साठी विचारलं. प्रशांत, मला एक पिवळं गुलाबाचं फुल आणून हवंय बाकी सर्व तयारी झाली .”
“आणतो माझ्या पीलू .”
“पीलू –काय रे ?”
“आजचं तुझं नांव.”
संध्याकाळी, प्रशांत बाल्कनीत उभा होता.
समोरून प्रियंका आणि तिच्या क्लबच्या मैत्रिणींचा घोळका येताना दिसला.

त्या पिवळ्या घोळक्यात प्रियंका कोणती तेच प्रशांतला ओळखता येईना.
त्यां  पिवळ्या रंगा चा घोळका  पाहून प्रशांतला आठवले , शाळेत हिंदी विषयात ‘सावन के अंधे को हरा ही हरा नजर आता है’, अशी एक  म्हण होती.
त्याच प्रमाणे” बसंत के प्रेमी को पीला ही पीला नजर आता है” ही नवी म्हण कशी वाटेल?
प्रशांत मनातल्या मनात विचार करु लागला.

‘तरी बर आॅफीस मधे हे फॅड नाही पोचले नाही तर पिवळी पितांबर नेसलेले पुरुष दिसले असते तिथे.
पिवळी पितांबरं नेसलेल्या पुरूषांच्या कल्पनेनेच त्याला हसुं फुटलं.
रात्री बेडरूममध्ये शिरताना प्रशांत विचार करत होता, चला आजची वसंत पंचमी तर झाली. आता प्रियंकावर चढलेला पीतज्वर उतरवून लवकरच  व्हेलेंटाइनचा गुलाबी रंग चढवायला सज्ज व्हायला हवं.
सणावारांच्या निमिताने विविध रंगात रंगलेले आयुष्यच खर्‍या अर्थी सुंदर..नाही का?
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!