© समीर खान
चित्रशालेत आज खळबळ माजली होती. या चर्चेचे कारणंही तसेच खास होते.
चित्रशाला म्हणजे कर्पुरनरेश महाराज अमरसिंहाच्या राजमहालातील चित्रकार, शिल्पकार, नृत्यकार, संगितकार ते विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांसाठी महाराजांनी फक्त त्यांनाच समर्पित केलेली एक स्वतंत्र, भव्य दिव्य आणि कर्पुरनरेशाच्या वैभवाला शोभेल असा भव्य महाल होता.
राजमहालाच्या मुख्य वास्तूपासून अगदी जवळच काही अंतरावर चित्रशाला होती. राज्यकारभाराच्या शिणवट्यातून काहीशी उसंत मिळावी म्हणून आपला काही खास वेळ महाराज अमरसिंह ईथे घालवत असत.
कधी कधी मुख्य महाराणींसमवेत तर कधी एकटे तर कधी खास अतिथींसोबत.
चित्रशालेला महत्त्व प्राप्त होण्याचे आणखी एक कारण म्हणजे वस्तूतः कुठल्याही राजमहालातील राजकारण हे राणीवसातून, हरम मधून चालत पण कर्पुरनरेशाचा राजमहाल यास अपवाद होता.
ईथलं राजकारण चित्रशालेतून चालत असत आणि केवळ याच कारणामुळे मुख्य महाराणींसमवेत इतरही ऊपराण्यांचा बराच रोष चित्रशालेवर होता.
मात्र महाराजांच्या अत्यंत विश्वासू, ईमानदार सेवक, सेनापती अजाणबाहूपूढे राणीवसाच काय राज्याचा अगदी शत्रूही डोळे वर करून वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नसे.
चित्रशालेसोबत आणखीही बर्याच वदंता जोडल्या गेलेल्या होत्या ज्यात बर्याच अंशी सत्यही होते.
पण सत्य काय असत्य काय याचा उलगडा करणं महाराणींनाही शक्य नव्हतं तिथे सामान्यांची काय व्यथा?
चित्रशालेतले आणखी एक गुढ म्हणजे खुद्द चित्रलेखा होती.
जिच्या नावावरच या संपूर्ण वास्तूचे नामकरण चित्रशाला करण्यात आले होते.
मुख्य महाराणी प्रियंवदांची जितकी ख्याती पसरलेली होती त्यापेक्षा काकणभर जास्तच वलय चित्रलेखेभोवती निर्माण झालेले होते.
नृत्यनिपुण, अपार सुंदरी ,चौतीसही कलांमध्ये माहीर त्याहीपेक्षा कुठल्याही पदावर नसूनही कर्पुर राज्यातले सर्वात गुढ, वलयांकित व्यक्तीमत्व. तिच्या विषयी एक वदंता अशीही होती की ती पुर्ण स्री नाही. मग पुरूष? छे छे.. होऊच शकत नाही.
तिच्या सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. तिचा व्देष करणार्यांनी या अफवा पसरविल्या आहेत अशीही एक मान्यता होती.
कुणी म्हणत असे की तिला मोहिनीविद्या येते. तर कुणी सांगे की ती मायावी आहे.
याविषयी दबक्या आवाजातल्या चर्चा खूप रंगत असे मात्र या चर्चा तिथल्या तिथेच विरून जाई.
काहीही असले तरी तिचा कर्पुर राज्यातला प्रवेशही तितकाच विस्मयकारी होता.
ती येण्याआधी सर्वदूर पट्टराणी महाराणी प्रियंवदेचा बोलबाला होता. का नसणार? प्रियंवदा चांद्रवंशीय महाराज शिवदत्तांची एकुलती एक पुत्री होती.
कर्पुरनरेशांशी तिचे लग्न होतानाच शिवदत्तांचे संपूर्ण राज्य महाराजांना आहेरमध्ये मिळाले होते.
हे दोन्ही राज्य आणि महाराजांनी आपल्या पराक्रमाने मिळवलेले आणखी मोठमोठे राज्य जोडून कर्पुर साम्राज्य निर्माण झाले होते.
संपन्न, सधन शेती, भरभराटीला आलेले व्यवसाय, मोठमोठे व्यापारी ते प्रत्येक कला आपल्या चरम स्थानावर होती कर्पुर साम्राज्यात. अशीच भरभराटीची वर्षे जात असतानाच आणि कर्पुर साम्राज्याला कुठलाही प्रतिस्पर्धी नसताना एक नवीन आव्हान ऊभं ठाकलं ते भद्रांचे.
आदिशक्ती भद्रकाली चे ऊपासक असणारे यांचे पुण्यवान पूर्वज कर्पुरनरेशांच्या पूर्वजांशी अत्यंत ईमानी होते.
मात्र अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या अभद्राने या कबिल्याची सत्ता हाती घेतली आणि नावाप्रमाणेच या कबिल्याचा अंत करतानाच त्याच्यासारखेच क्रूर लोकं जमा करत त्याने मोठी सेना जमवली होती.
या सेनेचे नाव होते अभद्रसेना. अत्यंत क्रूर, रानटी आणि कुठल्याही साम्राज्यावर टोळधाडीसारखी तुटून पडणारी ही सेना.
कुठलेही युद्धनियम न पाळणारी. त्यांची संख्या ही काही हजारांमध्ये होती.
कर्पुर साम्राज्य बलाढ्य आणि सुसज्ज सेनायुक्त असले, अजाणबाहू सारखा सेनापती लाभला असला तरी राज्याची पश्चिम बाजू तटबंदीने सुसज्जित नव्हती.
त्याला कारणही तसेच होते. शिवदत्तांकडून आंदण म्हणून मिळालेल्या राज्यातील बराच मोठा भाग घनदाट वनांनी, मोठमोठ्या पर्वतराजींनी व्यापलेला होता.
हे राज्य कर्पुर साम्राज्याला जोडले गेले तेव्हाही ही बाजू तटबंदीने सुरक्षित करणे याच कारणामुळे अशक्य होते म्हणून ही पश्चिम बाजू तशीच राहीली होती.
तिथला योग्य तो बंदोबस्त सेनापती अजाणबाहूने ठेवला असला तरी अभद्राच्या नजरेत या साम्राज्याची हीच कमकुवत बाजू डोळ्यात भरली होती.
कर्पुर साम्राज्याला टक्कर देणे अवघड जरी असले तरी अशक्य नाही हे त्याने हेरले होते.
लालची, कामपिपासू अभद्रासाठी कर्पुर देश म्हणजे सोने, चांदी, हिरे, मोती सोबतच आणखी एक बहुमुल्य वस्तूवर त्याचा डोळा होता ती म्हणजे “चित्रलेखा”.
साक्षात स्वप्नसुंदरी आणि या सुंदरीचा महाल म्हणजे चित्रशाला.
कर्पुरनरेश महापराक्रमी असले तरी अभद्रा ही कमी नव्हताच.
त्यात क्रुरपणा त्याच्या नसानसात भिनला होता. त्याच्यादृष्टीने दुसरी बहुमुल्य वस्तू होती ती महाराणी प्रियंवदां . लक्ष्मीचं दुसरं रूप. प्रियंवदा प्राप्त झाली म्हणजे साक्षात लक्ष्मी अंकीत केल्यासारखं होतं.
गुप्तहेर बातमी घेऊन सेनापती अजाणबाहूकडे आला.
एक लखोटा त्याच्या हाती देत तातडीने तो रवानाही झाला.
लखोट्यातील मजकूर वाचताच सेनापती अजाणबाहूच्या चेहर्यावर चिंतेचे ढग दाटून आले.
तातडीने महाराजांकडे निरोप देतानाच मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. अर्थातच बैठक चित्रशालेतच भरवली गेली. सोबत महाराणी प्रियंवदां होत्याच.
मोठ्या मुख्य मधोमध सिंहाधिष्टीत सिंहासनावर विराजमान होत कर्पुरनरेश महाराज अमरसिंह आणि आजूबाजूला एकीकडच्या कक्षात महाराणी प्रियंवदां तर दुसरीकडच्या कक्षात मोत्यांच्या पडद्याआड चित्रलेखा विराजमान होत्या.
महाराजांसोबतच प्रियंवदेचे वडील महाराज शिवदत्तही या सभेत उपस्थित होते.
नात्याने कर्पुरनरेश अमरसिंहांचे सासरे असले तरी ते एक ऊत्तम शासक, मुरलेले आणि अनुभवी राजकारणी, मुत्सद्दी होते.
कुठलाही निर्णय घेण्यास अमरसिंह स्वतंत्र असले तरी ते शिवदत्तांचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेत नसत.
महाराजांसमोर सर्व मंत्रीमंडळ स्थानापन्न झाले होते. तर सेवक गुप्तहेराने दिलेला लखोटा महाराजांना वाचून दाखवत होते.
एक एक शब्दांगणिक सगळेच अधिकाधिक चिंतेत पडत होते.
” गुप्तहेराचा संदेश आहे की अभद्राची वाकडी नजर कर्पुरदेशावर पडली आहे. राज्याची कमकुवत पश्चिम बाजू त्याच्या डोक्यात भरलेली आहे आणि तिथूनच त्याची अभद्रसेना कर्पुरदेशाच्या दिशेने येणार असल्याची पक्की बातमी आहे. क्रुर, रानटी असणारी अभद्रसेना वरवंट्यापेक्षा कमी नाही हे सर्वांनी पाहिलं आहेच. मिथिला नगरीवर केलेलं आक्रमक आणि तिथली त्यांची बिभत्सता कुणाच्याही नजरेतून सुटलेली नाहीये. त्यावेळी आपली मदत पोहचायला ऊशीर झाला असला तरी या घटनेचाही बराच रोष अभद्राचा कर्पुरदेशावर आहे. यासोबतच त्याची आणखी एक मनिषा आहे. ती म्हणजे… ती म्हणजे… ” संदेश वाचणारा सेवक तिथेच अडखळला.
” पुढे वाचावे.. ” महाराजांनी दटावणीच्या सुरात आज्ञा केली.
” सेवकाची जीभ रेटत नाहीये महाराज क्षमा असावी. ” म्हणत सेवकाने तो लखोटा सेनापती अजाणबाहू कडे वाचण्यास दिला.
” क्षमा असावी कर्पुरनरेश पण अभद्राची वाकडी नजर चित्रलेखा, चित्रशाला महाल आणि महाराणी….. ” बोलता बोलता सेनापती अजाणबाहूही अडखळला.
हे शब्द ऐकताच महाराज अमरसिंह सोबतच सगळेच त्वेशाने तलवार ऊपसत डोळ्याने आग ओकत ऊभे राहीले.
“ह्या कठीण प्रसंगी शौर्यासोबतच बुद्धीचाही कस लागणार आहे महाराज. ” शिवदत्त ऊत्तरले.
” कर्पुरदेशाची आणि शिवदत्तांची सेना मिळून एकुण सत्तर हजारांची सेना, घोडदळ, हत्तीदळ,तोफखाना सुसज्जित आहे महाराज. तरीही पश्चिमेकडून धो धो वाहणारी शांभवी नदी आणि ऊंचच ऊंच असणारी शिवराज पर्वतराजी या युद्धातला सर्वात मोठा अडसर असणार आहे आणि नेमकं याचाच फायदा अभद्र आणि त्याची अभद्रसेना घेणार आहे. अशाच वातावरणात राहणारी ही सेना अशा दाट वनराई, नदी, पर्वतांना सरावलेली आहे. कर्पुरदेशाचे घोडदळ, हत्तीदळ ,तोफखाना ईथे पुर्णपणे ऊपयोगात येणार नाही. “
” यावर उपाय आहे महाराज, मला बोलण्याची आज्ञा असावी. ” मोत्यांच्या पडद्याआडून चित्रलेखा ऊद्गारताच पुर्ण सभेचे लक्ष तिकडे वळले.
महाराजांनी डोळ्यांनी ईशारा करताच चित्रलेखा पुढे बोलू लागली.
” अभद्राला भेटण्यासाठी मला पाठवण्याची तयारी करावी महाराज. “
” चित्रलेखा… तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय? कर्पुरनरेश अमरसिंह षंढ नाही जो आपले राज्य वाचवण्यासाठी एका स्री ची बळी देईल. ” महाराजांचे डोळे आग ओकत होते.
” महाराज, चित्रलेखा कर्पुरनरेशांच्या पराक्रमाशी अनभिज्ञ नाही. आपण महाबली आहात यात शंका नाहीच. पण कर्पुरदेशाशी माझंही काही नातं आहे. आपल्या राज्यावर घोंघावत येणारं हे वादळ केवळ या आपल्या एका संदेशाने काही वेळापुरतं का होईना थांबेल आणि आपल्याला या संकटाशी सामना करण्यासाठी बराच वेळ भेटेल. माझी, आपली आणि कर्पुरदेशाची मानमर्यादा याला यत्किंचितही धक्का लागणार नाही याची काळजी पुरेपूर घेतली जाईल याची चिंता नसावी महाराज. ” चित्रलेखेच्या मासोळी डोळ्यात ठाम विश्वास दिसत होता.
संपूर्ण सभा, महाराज अमरसिंह, सेनापती अजाणबाहू, महाराणी प्रियंवदां सोबतच एकुण एक ऊपस्थित लोकं चित्रलेखेच्या या निर्णयापुढे स्तब्ध झाले होते.
महाराज अमसिंहही चित्रलेखेपुढे हतप्रभ होते.
शिवदत्तांकडे नजर करत महाराज संभ्रमित अवस्थेत पहात होते.
” सध्यातरी मलाही केवळ हाच ऊपाय सर्वश्रेष्ठ वाटतोय महाराज. ” शिवदत्त ऊद्गारले.
” चित्रलेखेच्या केसांनाही धक्का लागणार नाही महाराज चिंता नसावी. ” सेनापती अजाणबाहू ऊद्गारला.
हे सर्व संवाद ऐकतानाच महाराणी प्रियंवदेच्या चेहर्यावर एक खुनशी हास्य पसरले जे महत्प्रयासानेही तिला लपवता आले नाही. चित्रलेखा नावाचा काटा आपल्या जिवनातून आपोआपच दूर होणार या विचारांनी ती आनंदली होती.
सभा बरखास्त करताच पुढच्या खलबतासाठी चित्रशालेत केवळ कर्पुरनरेश महाराज अमरसिंह, महाराणी प्रियंवदां ,सेनापती अजाणबाहू, महाराज शिवदत्त आणि स्वप्नसुंदरी चित्रलेखा ऊरले होते.
संकटाची चाहूल घेऊन येणारा कर्पुरदेशाचा हा दिवस काळजीच्या दरीत जाऊन मावळला आणि त्यासोबतच चित्रशालेलाही त्याने आपल्या कवेत घेतले. या अंधारात एकच आशेचा किरण होती ती म्हणजे चित्रलेखा..!!
क्रमशः
© समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.