राजयोग ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा
© समीर खान
रम्य संध्याकाळ घेऊन येणारा चित्रशालेचा प्रत्येक दिवस त्या संध्याकाळसोबत कातरवेळ घेऊन आला होता.
मंत्रीमंडळाची बैठक संपली असली तरी पुढील खलबतासाठी महाराज अमरसिंह, महाराणी प्रियंवदां , शिवदत्त, सेनापती अजानबाहू आणि स्वप्नसुंदरी चित्रलेखा चित्रशालेच्या भव्य कक्षात ऊरले होते.
चित्रलेखेने भर सभेत जो प्रस्ताव मांडला होता त्याने महाराज अमरसिंह काळजीत पडले होते.
का पडणार नाहीत? चित्रलेखा त्यांचा जिव की प्राण होती.

अग्निचे सात फेरे त्यांनी प्रियंवदेसोबत घेतले असले तरी चित्रलेखेसोबत गंधर्व विवाह केला होता. साक्षात मृत्यूच्या दारातून चित्रलेखेने त्यांना सोडवून आणले होते.
एका युद्धप्रसंगात रणभूमीवर मुर्च्छित होऊन पडले असता सैनिक वेषातील चित्रलेखाच त्यांच्या साठी देवदूत म्हणून हजर झाली होती. त्या वेळी ही तिने स्वतःविषयी काहीच सांगितले नव्हते. मात्र तिचे महाराजांवर पाहताक्षणीच प्रेम जडले होते आणि महाराजांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यानंतरही तिने आपल्या बुद्धीकौशल्याने कितीतरी दिवसांपासून धुमसत असलेले बंड क्षणात तोडगा काढून मिटवून कर्पुरदेश आणि अग्निव्दीप मध्ये सामंजस्य घडवून आणले होते.

अजानबाहूला सेनापतीपद बहाल करण्यात ही चित्रलेखेचा महत्वाचा वाटा होता.
एकुणच महाराज अमरसिंह साठी ती तप्त वाळवंटात थंड हवेची झुळूक बनून आली होती. यामुळेच ती कमी कालावधीत वलयांकित व्यक्तीमत्व झाली होती.
या कठिण समयी ही चित्रलेखेने हा प्रस्ताव मांडला तर त्यामागेही नक्कीच तिचे काही विशेष प्रयोजन असणार याची खात्री महाराजांना होती. 
” महाराज, कर्पुरदेशाची पश्चिम बाजू म्हणजे महाराज शिवदत्तांकडून आंदण मिळालेला प्रदेश आहे आणि… “

” म्हणजे तुम्हाला हे सांगायचंय की या सर्व प्रकरणामागे महाराज शिवदत्तांनी जो प्रदेश दिलाय तीच कर्पुरदेशाची सर्वात मोठी समस्या आहे? ” महाराणी प्रियंवदां कुत्सितपणे चित्रलेखेला थांबवत ऊद्गारली. 
” अगदी बरोबर प्रियंवदा, हीच समस्या आहे. अभद्र आणि अभद्रसेना ईथूनच कर्पुरदेशात प्रवेश करत आहेत. मध्ये शांभवी नदी धो धो वाहत आहे नाहीतर ते कधीच चित्रशालेवर धडकले असते. ” शिवदत्त गरजले.
वडीलांसमोर प्रियंवदा काहीच बोलू शकली नाही. 

” चित्रलेखेने अभद्राशी प्रत्यक्ष भेट घ्यावी हे व्यवहार्य नाही महाराज ” सेनापती अजानबाहू ऊद्गारला. 
” मी असं कुठं बोलले सेनापती अजानबाहू की मी अभद्र शी  प्रत्यक्ष भेटणार आहे? मी ईतकंच बोलले की त्यांना तसं फक्त निरोप पाठवा. ” चित्रलेखेच्या या ऊत्तरावर सगळेच आश्चर्यचकीत झाले. 
” शिवराज पर्वतराजीत महाराज शिवदत्तांचा पडीक किल्ला आहे. तिथून जवळच शांभवी नदी आहे. शिवाचं स्थान असलेलं ते प्राचिन मंदिर स्वतःच एक आश्चर्यकारक रचना आहे. तिथल्या प्रत्येक आडवाटेशी मी परिचित आहे महाराज. भेटीचं ठिकाण तिथेच निश्चित करावं महाराज. सेनापती अजानबाहू आणि आपण सोबत असल्यास मला माझी यत्किंचितही पर्वा नाही.

दोन दिवसात आपला दुत अभद्राशी भेटेल, चित्रलेखा त्याच शिवमंदिरात भेटेल असा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचताच कर्पुरदेश युद्धाआधीच शरणागती पत्करतोय या भ्रमात अभद्र आणि अभद्रसेना पडेल. तुम्ही आणि सेनापती माझ्यासोबत असतील याबाबत मात्र गुप्तता पाळली जावी. महाराज शिवदत्त या भेटीत माझ्यासोबत असतील ईतकाच निरोप अभद्रापर्यंत पोहचवावा. “

” वाह चित्रलेखा, ते मंदिर म्हणजे आमचं आराध्यदैवताचं आहे. आमच्या पुर्वजांनी ईथूनच आपल्या पराक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र या मंदिराच्या त्या रहस्याविषयी तुम्हाला कशी माहिती आहे? ” शिवदत्त ऊद्गारले. 
या प्रश्नाने काहीशी गोंधळलेली चित्रलेखा लगेच सावरत आपल्या भुगोल आणि वास्तूज्ञानाचा दाखला देत तिने शिवदत्तांचे समाधान केले.  काय होते या मंदिराचे रहस्य? ऊपस्थित सर्वांनाच ते माहित होते. आपल्याला हे माहित असूनही आपल्या लक्षात ही योजना का आली नाही या विचाराने प्रियंवदेचा जळफळाट झाला पण ती काहीच करू शकत नव्हती.

शिवमंदिरात होणारी चित्रलेखा आणि अभद्राची भेट कर्पुरदेशाचे भविष्य निर्धारित करणार होती.
एकीकडे चित्रलेखेचा आब म्हणजे कर्पुरदेशाची मानमर्यादा होती तर याच राज्याला वाचवण्यासाठी चित्रलेखेने हा धाडसी निर्णय घेतला होता.
शिवदत्तांच्या राज्याशी चित्रलेखेचे असे कोणते नाते होते की ती अगदी त्या शिवमंदिराच्या रहस्याविषयीही ज्ञात होती? तीने त्यानंतरची अशी कुठली योजना आखली होती ज्या आधारे ती आपलं ईर्सिप्त साध्य करणार होती ? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ च देणार होता.

भेट कुठं आणि कशी होणार हे जरी सर्वांसमक्ष ठरवले असले तरी त्यापुढे काय करायचे याची मसलत फक्त महाराज अमरसिंह आणि चित्रलेखेत होणार होती.
महाराजांनी ” एकांत ” शब्द ऊच्चारताच सगळयांनी तिथून निरोप घेतला. प्रियंवदा मात्र फणकार्याने तिथून चालती झाली. 
या घटनेने थकलेल्या महाराजांनी आपला राजमुकुट काढून मंचावर ठेवला आणि मंचकावर काहीशा आराममुद्रेत बसले.  चित्रलेखा जसं जसं या योजनेची बांधणी महाराज अमरसिंह यांना ऐकवत होती तसं तसं महाराज अमरसिंह यांच्या चेहर्‍यावर निश्चिंततेचे भाव ऊमटत होते. 

” वाह चित्रलेखा.. आम्ही तुमच्या बुद्धिची दाद देतो.. ” म्हणत प्रेमाने चित्रलेखेच्या कपाळावर चुंबन दिले. 
“तुमच्याशी विवाह करताना आम्हाला काय काय ऐकावं लागलं होतं पण लग्न केल्यानंतर ते आजपावेतो तुम्ही फक्त आणि फक्त आनंदच घेऊन आला आहात.तुमचा भूतकाळ जितक्या सच्चेपणाने तुम्ही आमच्या समोर मांडला तितक्याच तन्मयतेने तुम्ही हे नातं निभावलं आहे चित्रलेखा. ” महाराज अतिशय आनंदात होते. 
कमरेपर्यंत रूळणारे दाट केस, सपाट पोट, नाजूक हातपाय, मासोळी डोळे, सरळ नाक, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे ओठ मुर्तिमंत सौंदर्याचे जिवंत ऊदाहरण होती चित्रलेखा.  तीचे उन्मत्त सौंदर्य पाहून जगातला कुठलाही पुरूष तिच्या लालसेत लालायीत होईल असं रूपडं होतं ते. 

महाराज अमरसिंह ही तिच्या याच रूपावर भाळले होते आणि तीने तिचा भूतकाळ सांगूनही त्यांना काहीही फरक पडला नव्हता. ते तर तिला महाराणींचा दर्जा देण्याचा विचार करत होते पण देशाची महाराणी बनण्यासाठी कुल, गोत्र सर्व सांगावं लागणार होतं मात्र तिला हे सांगणं म्हणजे जळत्या निखार्यांवर चालण्यासारखं होतं.
जे गुपीत तिने ईतकी वर्षे सांभाळलं ते ऊघड करणं शक्य नव्हतं.
ती पण राजघराण्यातलीच होती. एक राजकन्या ..पण अनौरस संतान. राजमहालातील कुणा दासीपासून उत्पन्न झालेली राजाची लेक. ज्यात तिचा काहीच दोष नव्हता त्या चुकीची शिक्षा भोगणारी अभागी जिव. 

शांभवी नदीत मरण्यासाठी सोडून दिलेलं ते सुंदर बाळ. राजघराण्याला कलंक नको म्हणून टाकून दिलेली ती संतान. ज्या शांभवीत तिला बुडण्यासाठी टाकून दिले होते त्याच शांभवीने तिला वाचवले.
धो धो कोसळणारा जलप्रपात शिवमंदिराजवळ अत्यंत संथ होतो त्या संथ प्रवाहाकडे शांभवी नदीने या बाळाला आणून सोडले आणि निःसंतान असलेल्या पुजारी दांपत्याने ईश्वराचा प्रसाद म्हणून तिला सांभाळले.
भर जंगलात असलेलं ते मंदिर महाराज शिवदत्तांच्या पुर्वजांनी वसवलेलं होतं ईकडे वर्षातून एकदा राजघराण्याचे लोकं पूजाअर्चा साठी येत तर काही ठराविक गावकरी येत त्यामुळे चित्रलेखेकडे कुणाचं लक्ष जाणं अशक्य होतं आणि गेलं तरी कुणासही शंका येऊ नये याची पूर्ण खबरदारी पुजारी दांपत्याने घेतलेली होती.

त्या तान्ह्या बाळासोबत आणखी एक वस्तू त्या दांपत्यांना सापडली होती ती म्हणजे थैलीभर सुवर्णमुद्रा. याचा सरळ अर्थ एकच होता. राजपरिवाराशी संबंधितच या बाळाचे नाते होते.
त्यांना जर या बाळाला ठारच मारायचे असले असते तर रेशमी दुपट्यात टोकरीत बाळासोबत सुवर्णमुद्रांची थैली ठेवली गेली नसती. पुजारी अत्यंत ज्ञानी पुरूष होते. त्यांनी तिला प्रत्येक कलेत पारंगत केले.
अशीच एकदा योगायोगाने महाराज अमरसिंह हे जखमी अवस्थेत पडलेले असताना तिने त्यांना आपल्या कुटीत आणून नवजिवनदान दिले आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

महाराजांची तिच्यासोबत विवाह करून प्रियंवदेप्रमाणेच तिला पट्टराणी करण्याची मनिषा होती मात्र चित्रलेखेने आपलं गुपीत महाराजांसमोर ऊघड केलं तरीही महाराजांवर या गोष्टीचा यत्किंचितही फरक पडला नाही.
ते आपल्या निर्णयावर ठाम होते.
मात्र कर्पुरदेशाच्या प्रथेप्रमाणे धर्मसंसदेने तिला कधीच स्विकारले नसते. कुल, गोत्र चा प्रश्न तर नंतरचा होता मात्र तिचा पिता कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता. केवळ आणि केवळ त्या सुवर्णमुद्रांच्या थैलीवरून हे सिद्ध होत नव्हते की ती राजपरिवारातीलच होती.

तरीही शंभुमहादेवाच्या साक्षीने महाराज अमरसिंह आणि चित्रलेखेचा गंधर्व विवाह त्याच मंदिरात संपन्न झाला. दिवंगत आईवडिलांच्या आठवणीत चित्रलेखा धाय मोकलून रडली.
योगायोगाने महाराज अमरसिंह यांचे सासरे महाराज शिवदत्त यांच्या पर्यंत ही खबर पोहोचली की अमरसिंहाने दुसरे लग्न केलंय आणि ते त्यांच्याच आंदण दिलेल्या प्रदेशात आहेत. त्याकाळच्या प्रथेनुसार राजपुरूष बहुपत्नीत्वाचं पालन करू शकत होता म्हणून त्यांच्या या लग्नाला विरोधाचं काही कारण नव्हतंच.

जेव्हा त्यांना समजलं की पुजारींच्या पुत्रीशी अमरसिंह ने विवाह केलाय तेव्हा त्यांनी पुर्ण राजसी ईतमामात चित्रलेखेची पाठवणी केली. प्रियंवदेला ही गोष्ट खटकलीच नाही तर तिने शिवदत्तांशी काही वर्ष बोलणं देखील पसंत केलं नाही पण शिवदत्त अत्यंत धोरणी, मुत्सद्दी, न्यायप्रिय व्यक्ती होते.
लाडाकोडात वाढवलेल्या प्रियंवदेला त्यांनी राजधर्म समजावत तिची नाराजी दूर केली.
पुजारी दांपत्य महाराज शिवदत्त यांच्या पिढीजात मंदिरात नियुक्त होते.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पुत्रीचे उत्तरदायित्व त्यांचे स्वामी आणि संपूर्ण प्रदेशाचे महाराज या नात्याने त्यांनी चित्रलेखेची पाठवणी केली हा युक्तिवाद प्रियंवदेला पटला आणि तीची नाराजी दूर झाली.
शिवदत्तांच्या या वागण्याने महाराज अमरसिंहच्या नजरेत त्यांच्याविषयीचा आदर कित्येक पटींनी दुणावला. 
अभद्राला कर्पुरदेशाकडून निरोप पाठवला गेला होता की चित्रलेखा त्यास शांभवी नदीकाठी असणार्‍या शिवमंदिरात भेटणार. या निरोपाचा अपेक्षित तोच परिणाम झाला. कर्पुरदेशाकडे वळणारी त्याची अभद्रसेना तिथेच थबकली.

चित्रलेखा आणि चित्रशाला महाल अंकीत झाल्याचे तो स्वप्ने रंगवू लागला.
ईकडे स्वतः महाराज अमरसिंह, महाराज शिवदत्त, सेनापती अजानबाहू आणि चित्रलेखा यांनी सेना, घोडदळ, हत्तीदळ आणि निवडक तोफखान्यासहीत शिवदत्तांच्या पडीक किल्ल्याकडे कुच केली.
आधीच काही माणसं पाठवून तिथे सर्वांना थांबता येईल अशी व्यवस्था करण्यात आली.
रसद भरण्यात आली. येणार्‍या अष्टमीला ही भेट ठरवण्यात आली. ज्या मंदिरातून महाराज शिवदत्तांनी चित्रलेखेला कन्येप्रमाणे तिची सासरी पाठवणी केली होती आज त्याच मंदिरात या दैत्याशी भेट घेणं चित्रलेखेला क्रमप्राप्त झालं होतं. लहानाची मोठी तिथेच झालेल्या चित्रलेखेला तिथली खडा नं खडा माहीती होती. 

अखेर तो दिवस ऊगवलाच.
दिवसाच्या संध्याप्रहराला ही भेट निश्चित होती. अभद्र काही निवडक लोकांसमवेतच येणार होता पण ही भेट फक्त अभद्र आणि चित्रलेखेतच होणार हे निश्चित झाले होते. तिथे कुणाही सेवकासही प्रवेश नसेल हे निश्चित होते.
सकाळपासूनच महाराज अमरसिंह आणि शिवदत्त यांनी मंदिरात यथासांग पूजाविधी मांडला होता.
सेनापती अजानबाहूने सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला होता . सुर्य पश्चिमेकडे जात संध्यासमयीची सुचना देत होता तशी तिथे लगबग वाढली.

रक्तवर्णीपोशाख आणि सुवर्ण अलंकारांनी नखशिखांत सजलेली चित्रलेखा आत गाभाऱ्यात अशा ठिकाणी थांबली होती जिथून तिला सर्वकाही स्पष्ट दिसत होते मात्र ती कुणासही दिसणार नाही.
त्या मंदिराची रचनाच अशी अद्भुत होती.
अभद्र आपल्याच मदमस्तीत काही निवडक सुरक्षारक्षकांसमवेत तिथे आला.
महाराज शिवदत्त ऊपस्थित होतेच.

राजसी संकेतांप्रमाणे त्याचे नाराजीतच का होईना स्वागत झाले.
महाराज अमरसिंह चित्रलेखेप्रमाणेच गुप्त जागेत थांबले होते जिथून ते सर्वांना पाहू शकत होते पण त्यांना कुणीही पाहणार नाही. शिवदत्तांनी अभद्राला मंदिराच्या प्रवेशद्वारावर सोडले.
भव्य मंदिर प्रांगणात नंदीची विशाल मुर्ती होती. गर्भगृह तितकंच देखणं आणि असंख्य महिरपी, घंटा आणि कलमदलं रेखाटलेलं होतं. आतमध्ये मधोमध ऊंच आणि भव्य शिवलिंग विराजमान होतं.

ताम्रकलशातून निरंतर शिवलिंगावर पडणारं तीर्थ, बेलाची पानं आणि धुप,चंदनाच्या गंधाने त्या जागेत साक्षात शिवाचा वास अनुभूतीत होत होता.
ईतक्या गंधीत वातावरणातही अभद्राच्या डोळ्यात वासना होती.
चित्रलेखेला अधाशीपणे तो शोधत होता. चित्रलेखाही धुर्त होती. तो काही बोलणार याआधीच तीने आपला डाव मांडला. 
” साक्षात शिवाच्या व्दारी येऊनही आपण काय शोधत आहात? ” आपल्या मोहक आवाजात ती ऊद्गारली. ईतका सुंदर आवाज येऊनही काही क्षणासाठी अभद्र भेदरला कारण आवाज ऐकू येतोय पण दिसत कुणीच नाही. 

” हा ऽऽहाऽहा.. घाबरलात? मीच आहे चित्रलेखा.. ” चित्रलेखेने पुढची खेळी खेळली.
सुंदर स्त्री चं हसणं आणि हसण्याचा तो मोहक आवाज पुर्ण गाभाऱ्यात घुमत होता. 
” शिवदर्शन झाले आता देवीच्या दर्शनासाठी आतुर आहे आम्ही.. ” अभद्र गरजला. 
काही क्षणातच गाभाऱ्यात लख्ख ऊजेड पडला. त्या भव्य गाभाऱ्याच्या भिंती आणि छतावर अनेक छोटे मोठे कलाकुसरीचे असंख्य आरसे बसवले गेले होते. त्यातल्या बर्याचशा आरशात स्वप्नसुंदरी चित्रलेखेचे प्रतिबिंब दिसत होते. मात्र ती नेमकी कुठं ऊभी आहे हे कळण्यास वाव नव्हता.

ती छवी पाहताच तो डोळे फाडत बघतच राहिला. रक्तवर्णी पोशाखात सजलेली सालंकृत सुंदरी. पुढे पुढे ईकडे तिकडे या आरश्यातून त्या आरशाकडे तो धावपळ करू लागला. शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूस येताच चित्रलेखेने ती थांबल्या ठिकाणचं कमलदल गोलं फिरवताक्षणीच गडगडत अभद्र खोल भुयारात पडला.
काही समजण्याआधीच त्याचं शीर धडा वेगळे करण्यात आले. ईकडे बाहेरही सोबत आलेल्या अभद्राच्या सुरक्षारक्षकांना यमसदनी धाडण्यात आले.

लांबून हत्ती चित्कारण्याचे आवाज आणि तोफांचे आवाज घुमू लागले. गर्भगृहात महाराज अमरसिंह, चित्रलेखा आणि शिवदत्त यांनी शंभुमहादेवासमोर या दैत्याचा संहार झाला यात साक्षात शिवानेच त्यांची मदत केली यासाठी कृतज्ञतेने ते तिथे नतमस्तक झाले. पुढच्या काही प्रहरांपर्यंत तोफांचे, हत्तींचे आवाज कमी झाले. मंदिरा जवळून वाहणारी शांभवी रक्ताने रक्तवर्णी झाली होती. काहीवेळाने अजानबाहू अभद्रसेनेला संपवल्याचा निरोप घेऊन आला आणि कर्पुरदेश चित्रलेखेच्या या चाणाक्षपणामुळे अभद्राच्या वक्रदृष्टीतून मुक्त झाला.

त्या प्रदेशाची धुरा पुन्हा ईमानी व्यक्तिंकडे सोपवून महाराज अमरसिंह चित्रलेखा समवेत शाही लवाजम्यासह कर्पुरदेशाच्या दिशेने रवाना झाले. 
ईकडे शिवदत्त महादेवाच्या पिंडीवर आपला अश्रुअभिषेक करत होते.
जिला अनौरस संतान म्हणून हिणवले गेले, एवढुश्या बाळाच्या जिवावर ऊठलेल्या त्यांच्याच पट्टराणींपुढे हतबल होऊन याच हाताने शांभवी नदीच्या स्वाधीन केले गेले तरीही “राजयोग” तिच्या नशीबी होताच.

राजज्योतिषाने हेच तर भविष्य वर्तवले होते. ही बालिका प्रचलीत सर्व नियम मोडीत काढेल. मृत्यूला हरवेल आणि तुम्ही कितीही नाकारलं तरी “राजयोग” तिच्या नशीबात आहेच. पित्याच्या घरचा वनवासच तिच्या ऊज्वल भविष्याची नांदी असणार आहे. राजज्योतिषाचं हे भाकीत खरं ठरलं होतं आणि आदिशक्ती चं हे रूप चित्रलेखा च्या रूपाने कर्पुरदेशाची महाराणी बनून “राजयोग ” भोगणार होतं. 
समाप्त. 
© समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!