जगावेगळे नाते आपुले

©आर्या पाटील
” आई, ह्या गोळ्या घे पाहू..” विद्याताईंच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास आणि औषधे धरत सलोनी म्हणाली.
” सलोनी, तु जा ऑफिसला.. मी घेते नंतर औषधे.. जावईबापू खाली वाटत पाहत असतील. उशीर होईल तु जा..” विद्याताई हातात औषधं घेत म्हणाल्या.
” अजिबात नाही..तू वेळेवर औषधे घेत नाहीस.. शरिराची हेळसांड करतेस.. नाहीतर आजारी पडली नसतीस..” हट्ट करत सलोनी म्हणाली.

” बरं बाई घेते.. मी बरी आहे गं आता.. फक्त अशक्तपणा आला होता बाकी काही नाही.. जागा बदलली की त्रास होतोच..” म्हणत विद्याताईंनी औषधे घेतली.
” नंदिनी, आजीला त्रास नको देवू.. दुपारी औषधे घेते की नाही लक्ष दे..” आपल्या आठ वर्षांच्या लेकीला समजावत सलोनीने मोर्चा किचनकडे वळवला.
” आई, दुपारचा स्वयंपाक तयार आहे.. फक्त गरम भात लाव दोघींना. बकुळा उशीरा येणार आहे.. ती आल्यावर आवरेल सगळं.. तु फक्त आराम करायचा.. पाटील काकू येतीलच गप्पा मारायला..” म्हणत सलोनीने बॅग उचलली आणि घराबाहेर पडली.

” सलोनी निघालीस का बेटा..? सावकाश जा.. मी आहे तुझ्या आईजवळ.काळजी नको करूस..” समोरच्या फ्लॅटमधून पाटील काकू आत येत म्हणाल्या.
त्यांचे आभार मानून सलोनी निघाली.. एव्हाना रुपेशने गाडी स्टार्ट करून ठेवलीच होती.. बाल्कनीतून विद्याताई आणि छोटी नंदिनी दोघांना न्हाहाळत होत्या.
” सावकाश जा रे.. पोहचल्यावर फोन करा..” त्यांना निरोप देत विद्याताई म्हणाल्या आणि पाटील काकूंजवळ येऊन बसल्या.

” विद्याताई खूप नशिबवान आहात.. मुलगी सांभाळते तुम्हांला. जावई ही भला माणूस आहे.. नाहीतर आमचं.. वंशाला दिवा पाहिजे म्हणून अट्टाहास केला आणि दिव्याने चांगलाच उजेड पाडलाय आयुष्यात. सुन आली आणि पोरगा बदलला.. तुमचं चांगलं आहे मुलगा पण नाही आणि सुनेची कटकट पण नाही..” हृदयातलं बोचरं दु: ख विद्याताईंकडे मांडत पाटील काकू म्हणाल्या.
मुलाचा विषय निघताच विद्याताई हळव्या झाल्या.. आठवणीचे ढग डोळ्यातून अश्रू बनून बरसून गेले.

” माफ करा विद्याताई.. माझ्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर..? आहो, मुलगा मुलगी सारखेच.. तुमची मुलगी मुलापेक्षा कमी नाही..” धीर देत पाटील काकू म्हणाल्या
” ताई, सलोनी माझी मुलगी नाही सून आहे.. माझा मुलगा हेमंत आणि सलोनी एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.. कॉलेजच्या दिवसांत मैत्रीपासून सुरु झालेली त्यांची गाडी प्रेमाच्या स्टेशनवर कधी येऊन पोहचली कळलेच नाही.
हेमंत खूप लहान असतांना त्याचे वडिल गेले.. हेमंत माझ्याबाबतीत खूप हळवा होता.. त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याशिवाय परिपूर्ण होत नसायची.. प्रेमाची भावनाही त्याने न लपवता कबूल केली आणि त्या दिवसापासून मी त्यांच्या प्रेमाची साक्षीदार बनले. 

इंजिनिअरिंग पूर्ण करत दोघांनी एकाच कंपनीत नोकरीही मिळविली. प्रेमाच्या हळव्या नात्याला सात जन्मासाठी सप्तपदीच्या साक्षीने पवित्र बंधनात बांधण्याची वेळ आली होती.
सलोनीचे घरचे पिढीजात श्रीमंत त्यामुळे प्रथम दर्शनी त्यांनी या विवाहाला विरोध केला. पण मुलीच्या सुखासाठी त्यांनी हट्ट सोडला आणि लग्नाला मान्यता दिली.. अगदीच मोजक्या लोकांत विवाह करून लग्नसोहळ्यातील काही रक्कम दोघांनी स्वखुशीने अनाथाश्रमाला दान केली.
त्यानंतरचा प्रत्येक दिवस अत्तरासारखा सुगंधित होता.. माझ्या घरी सून नव्हती लेकच आली होती..
हेमंतचे बाबा गेल्यानंतरचा माझा संघर्ष तिने हेमंतच्या डोळ्यांतुन अनुभवला होता.. आम्ही सासू सून कमी मायलेकीच जास्त बनलो होतो.

” माझ्या आईला आणि माझ्या बायकोला माझ्यासाठीच वेळ नसावा. किती ही मोठी शोकांतिका.. एवढं सुंदर नातं निर्माण करणाऱ्या देवाचे आभार मानावे की मला एकटं पाडलं म्हणून दोष द्यावा कळतच नाही..” उगाचा रुसवा आणत माझा हेमंत म्हणायचा.
सलोनीच्या येणाने माझ्या रुसलेल्या घराला घरपण आले होते.
आता या घराचे कधी एकदाचे गोकुळ होते हिच आस लागली होती.
” आई, आम्हांला एकमेकांना वेळ देवू दे.. आर्थिक आणि मानसिकरित्या परिपक्व होऊ दे..मग करूया स्वागत नव्यापिढीचं” म्हणत हेमंत नेहमीच वेळ मारून न्यायचा.

मुलांच्या सुखात माझं सुख म्हणून मी ही दबाव आणला नाही..
मी नशिबच फाटकं घेऊन जन्माला आली असणार.
दोघांच लग्न होऊन दोन वर्षाचा सुखाचा कालावधी उलटला असेल तोच माझ्या घरच्या सुखाला एकाएकी नजर लागली… नियतीची..
सकाळी नेहमीप्रमाणे सलोनी आणि हेमंत ऑफिसला गाडीवर एकत्र जात असतांना गाडीला अपघात झाला.. सलोनी दूर गवतात जाऊन पडली.

सुदैवाने तिला खूप थोडी जखम झाली पण काळाने निशाणा साधला होता..तिच्या समोरच माझा हेमंत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता..
हेमंतला अश्या अवस्थेत पाहून पार कोलमडली पोर.. 
त्याचं रक्ताळलेलं डोकं आपल्या मांडीवर ठेवून जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती..
पण काळ जवळ आला होता.
” सलोनी, माझ्या आईची काळजी घे.. तिला एकटं पाडू नकोस..” आरक्त स्वरात म्हणत त्याने देह ठेवला..

डोळ्यादेखत त्या सावित्रीच्या सत्यवानाचे प्राण यमाने वेचले पण हतबल ती काहीच करू शकली नाही..
फुलपाखराप्रमाणे सुंदर आठवणींचे रंग मागे सोडत हेमंत आम्हां दोघींना पोरकं करून निघून गेला.
हसत्या खेळत्या घरातून रडणाचे नाद घुमू लागले.
विधीवत त्याचं कार्य आटोपल्यानंतर सलोनीच्या आईवडिलांनी तिला कायमची माहेरी घेऊन जाण्याचा मानस बोलून दाखवला..

” नाही आईबाबा.. हेमंत गेला म्हणून माझं या घराशी नातं संपलं असं होत नाही. मी अजूनही या घरची सून आहे.. हेमंतच्या आईप्रती असलेलं माझं कर्तव्य मला लेक बनून पार पाडता यावा यासाठी आशिर्वाद द्या.. बाकी काही नको..” म्हणत माझ्या सूनेने माझ्या कोमेजलेल्या कुडीत जगण्याची नवसंजिवनी भरली.
त्या क्षणी ती माझी मुलगी झाली..
हेमंतच्या आठवणींचा हिंदोळा झुलवत आम्ही दोघी एकमेंकीसाठी जगत होतो.. हळूहळू परिस्थिती स्थिरस्थावर होत होती..पण वैधव्याने भारलेला माझ्या लेकीचा चेहरा मला अगतिक करून जायचा.

एकाकी जीवन मी अनुभवलं होतं.. ते माझ्या लेकीच्या वाट्याला नको म्हणून मी तिच्या पुर्नविवाहाचा विषय उचलून धरला.
” आई, तुम्हीं नाही का बाबांच्या आठवणीत आयुष्य घालवलं.. मग माझ्यावर हा अन्याय का..? माझ्या हेमंतच्या आठवणींपासून नका तोडू मला..” आर्जव करित ती म्हणाली.
” बेटा, तेव्हा मी एकटी नव्हते..माझा हेमंत माझ्या जोडीला होता.. त्याच्या भविष्याला आकार देतांना एकटेपणा जाणवलाच नाही कधी किंबहुना त्याने जाणवू दिला नाही..पण तुझा एकाकी प्रवास नाही बघवत या आईला..” म्हणत स्वत:ची शपथ घालत मी तिला लग्नासाठी तयार केले..

” मी लग्न करेन पण अश्याच साथीदाराशी जो माझ्यासोबत माझ्या या आईचाही स्विकार करेल..” जगावेगळी गळ घालत तिने माझ्या पोटी जन्माला न येता माझी कुस उजवली..
त्या क्षणी आमच्यातल्या साऱ्या मर्यादा संपल्या.. आणि उरला फक्त गर्द ओलावा माय लेकीच्या नात्यातल्या.
रुपेशरावही समजूतदार म्हणून आम्हां दोघींचा स्विकार करत त्यांनी सलोनीला नव्याने जगण्याचं बळ दिलं..” डोळ्यांना पदर लावत वेदनादायक इतिहासातील आरक्त आठवणींनी भारलेलं नव्या नात्याच्या परिभाषेचं हळवं पान विद्याताईंनी पाटील काकूंसमोर उलगडलं..
बोलायला शब्दच अपुरे होते.. पाटील काकूंच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू मायलेकीच्या जगावेगळ्या नात्याला अभिवादन करून गेले.
अशीही नाती असतात जी आपल्याला जगणं शिकवून जातात..
©आर्या पाटील

सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार …

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!