अट्टाहास


© धनश्री दाबके
टीव्हीवर नवीनच प्रोग्रॅम सुरू झाला होता. सुशिला मन लावून तो पाहात होती आणि प्रताप तिथेच बसून लॅपटॉपवर काम करत होता.
टीव्हीवरच्या बाबाला विचारलं,”अंगाखांद्यावर खेळवलेली, प्रेमाने खाऊ घातलेली लेक दुसऱ्या घरी जाणार काय वाटतं?” वातावरण भावूक झालं. बॅकग्राऊंडला व्हेंटिलेटरमधलं ‘बाबाचं’ वाजणारं गाणं अजूनच भर घालत होतं. टीव्हीतला हळवा झालेला बाबा बोलू लागला आणि इकडे अख्खं घर शांत झालं.

इतका वेळ लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेला प्रताप उगाच चुळबुळल्यासारखा वाटला. त्याच्या डोळ्यांचे काठ ओलावले. पोरींचे आणि बाबाचे नाते असतेच तसे. अगदीच खास…
प्रतापच्या श्रेया आणि मीराही अशाच .. त्याच्या जीव की प्राण.. हा आता बाबांच्या लाडाने दोघी थोड्या लाडावलेल्या आहेत पण तरी त्याच्या शब्दाबाहेर नाहीत दोघी. त्याचं सगळं ऐकतात पण सुशिलाचं मात्र त्यांना काही ऐकायचं नसतं.

बऱ्याचदा ती रागावते त्याच्यावर.
मग प्रतापचं आपलं एकच, “लहान आहेत गं अजून. तोवर करु देत लाड.”
“अरे, दोघी मोठ्या झाल्यात आता. शिक्षणाला, नोकरीला बाहेर पडतील तेव्हा काय करशील?”
“तेव्हाचं तेव्हा बघू. त्या विचाराने आताचा वेळ का वाया घालवायचा.?” म्हणत तो लेकींना जपत रहायचा.

कधीतरी सुशिलेला म्हणायचा, “माझा शांतपणा, हळवेपणा पोरींमध्ये नको यायला. तुझ्यासारखं बिनधास्त वागायला, बोलायला शिकव त्यांना. बाहेरचं जग फार वेगळं आहे. त्यात टिकून राहता यायला हवं.”
तो असं बोलला की, तिच्या ही पोटात खड्डा पडायचा. पोरी आपल्यापासून दूर जाणार म्हणून.
‘हं.’ म्हणत ती पण वेळ मारून न्यायची.

आताची पिढी स्मार्ट आहे. त्यांची आकलनशक्ती अफाट आहे. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात. आणि घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात.
श्रेया, मीरा दोघीही चौफेर हुशार होत्या अगदी. मेरीट वगैरे नाही पण 75 ते 80% मार्क्स वगैरे असायचे.
श्रेयाने BSC IT करून मुंबईतच नोकरी मिळवली. मीरा मात्र पुण्याला गेली.. MBA साठी..

श्रेयाचं नोकरीतलं व्यस्त रूटीन सुरू झालं आणि मीरा पुण्यात हॉस्टेलवर राहू लागली. दिवसभर लेकींच्या चिवचिवाटाची सवय असलेल्या सुशीलेला दिवस खायला उठू लागला. पण कधी ना कधी ही वेळ यायचीच असं म्हणत हळूहळू तिने स्वतःच मन रमवलं. प्रतापचं ऑफिसचं रूटीन सुरू होतं.
मीराचे MBA पूर्ण झाल्यावर तिने पुण्यातच नोकरी घरली.

दोन्ही लेकी कमवायला लागल्या आता त्याच्या लग्नाचं बघायला हवं असं म्हणेपर्यंत श्रेयाने तिच्याच कंपनीतल्या सुजीतवर तिचे प्रेम असल्याचे सांगितले.
लेकीच्या लग्नाची वेळ आली या विचारानेच प्रतापच्या मनात कालवाकालव होऊ लागली. सुजीतला भेटून प्रतापने त्याची history geography समजून घेतली. सगळं all well आहे याची खात्री झाल्यावरच दोघांचे लग्न ठरवले.

घरात लग्नाची तयारी सुरू झाली. श्रेयाच्या पाठवणीच्या वेळी प्रतापची काय अवस्था होईल या विचाराने सुशीलाच्या जीवाला घोर लावला. बघता बघता तो कठीण क्षण समोर येऊन उभा राहिला. मोठ्या मुशकिलीने स्वतःला शांत ठेवत प्रतापने कन्यादान पार पाडले आणि श्रेयाची पाठवणी केली.
पुढचे वर्ष श्रेयाच्या सणावारात भराभर सरले.

श्रेयाच्या लग्नाला वर्ष होत नाही तर मीरा आपल्या भावी जोडीदाराला घरी घेऊन आली. तिचीही निवड योग्य असल्याची खात्री करून घेत प्रताप आणि सुशीलाने तिच्याही लग्नाचा बार उडवून दिला.
एक वर्षाच्या फरकाने दोन्ही लेकींची लग्न झाली. त्या आपापल्या संसारात अडकल्या.

श्रेया मुंबईत तर मीरा पुण्यात राहात होती. दोघींच सगळं छान चाललं होतं. दोघीही शिकलेल्या स्वंतत्र विचारांच्या कर्तृत्ववान मुली होत्या. तरीही प्रतापला, लेकींना सासरी त्रास तर नाही ना काही, याची काळजी असायचीच.
लग्नानंतर दोन अडीच वर्षांत श्रेया सासुसासऱ्यांपासून वेगळी झाली आणि पुन्हा एकदा त्याचा नव्या पिढीच्या निर्णय क्षमतेवर विश्वास बसला. आपण जसं तडजोड करत किंवा मान खाली घालून राहिलो, सहन केलं, तशी ही मुलं नाहीत. लोकं काय म्हणतील या विचारातच अख्खं आयुष्य गेलं आपलं. तसं मुलांचं नाही.

श्रेयाच्या नवऱ्याला कंपनीने अमेरिकेत पाठवायचे ठरवले. श्रेया, तिचा मुलगा श्रेयांश आणि सुजीत जायला निघाले तसं प्रताप, सुशिलाचा जीव कालवला. पोरं दूरदेशी गेली. अभिमान वाटला तरी एक पोकळी निर्माण झाली.
पण मग ती पोकळी मीराने आणि तिच्या दोन लेकरांनी भरून काढली. दोघांच्या मुंबई- पुणे- मुंबई फेऱ्या वाढल्या.

पुण्याहून आल्यावर नातवंडांच्या आठवणीत आठवडा आठवडा छान जायचा. दिवस तसाही कामात जायचा पण रात्री सगळा भूतकाळ तरळत रहायचा. एकमेकांचा हात हातात घेऊन, धीर देत झोपण्याचा प्रयत्न सुरू असायचा.
चार वर्षांत मीरासुध्दा लंडनला गेली आणि मनातल्या मायेची पोकळी टाहो फोडू लागली.

तिकडच्या, इकडच्या वेळा सांभाळत व्हिडिओ कॉल्सवर नातवंडं दिसायची. रात्री बारानंतर ही कॉलसाठी वाट पाहत मोबाईल ढवळत दोघे बसून रहायचे. बोलणं उरकून झोपायला एक दीड वाजायचा. सकाळी आठशिवाय डोळा उघडत नसे.
सुशिलाने सुरुवातीपासूनच स्वतःला बऱ्याच उद्योगांत अडकवलं होतं. प्रतापला मात्र कठीण जात होतं सगळं.

त्यात पोरींचे केलेले लाड आठवायचे. कधी कधी आठवणींचा अल्बम चाळला जायचा. जुने फोटो छातीपाशी धरून रडणं व्हायचं. कधीतरी लेकींना आवडणारा पदार्थ मुद्दाम बनवून खाल्ला जायचा‌.
आज दिवसभर सुशीला महिला मंडळाच्या ट्रीपला गेली होती. प्रताप घरी एकटाच होता. जेवण खाण झाल्यावर प्रतापने नेहमीप्रमाणे मुलींच्या लग्नातले अल्बम काढले. दोघींचे हसरे फोटो पाहून त्याचे डोळे भरून आले आणि तो परत भूतकाळात रमला.

श्रेया आणि मीराची लहानपणाची अनेक रूपं डोळ्यांसमोर तरळून गेली.
पाच खोल्या पुरत नव्हत्या लेकींना तेव्हा.. घर किती लहान वाटायचं तेव्हा. आणि आता.. एवढ्या मोठ्या घरात आपण दोघंच. लेकी परदेशात बोलावतात पण तिकडंच खाणंपिणं, राहणीमान जमत नाही. आपल्या घराची, देशाची प्रकर्षाने आठवण येत राहते. त्याला आठवलं, तो जेव्हा पहिल्यांदा पोटापाण्यासाठी मुंबईत आला तेव्हा आई किती रडली होती.

आता जशी ह्याची लेकरं वर्षातून एकदा येतात तसाच हा जायचा गावी. आता जसं ह्याला परदेशात जमत नाही तसंच आईलाही शहरात जमत नसे. आता जशा लेकी नोकरीमुळे भारतात लवकर येत नाहीत तसाच हा पण नोकरीमुळे गावी जात नव्हता जास्त. आई अशिक्षित होती आणि हा उच्चशिक्षित होता तरीही दोघांची परिस्थिती काही वेगळी नव्हती.
मुलींच्या आणि आईच्या आठवणींनी प्रतापचं मन अजिबात थाऱ्यावर नव्हतं. इतक्यात सुशिला घरी आली. आल्याआल्या प्रतापने तिचा हात पकडला आणि तिला खुर्चीत आणून बसवलं.

“आपण उद्याच्या उद्या गावी जातोय सुशिला. तशीही आई एकटीच असते. तिला सोबत होईल. निदान तिला तरी आपलं लेकरुं आपल्या जवळ असल्याचा आनंद मिळू देत.” प्रताप म्हणाला.
नाहीतरी दोन्ही लेकी परदेशी गेल्यापासून सुशीलाचं आयुष्यही अगदी एकसुरी झालं होतं आणि तिला प्रतापची मनस्थितीही माहीत होती. त्यामुळे कसलेही आढेवेढे न घेता सुशीला म्हणाली, “हरकत नाही. आपण जाऊया. पण मी थोडे दिवस इकडे आणि थोडे दिवस गावी राहीन. एक रुम आपल्याला ठेवून बाकी घर भाड्याने दिलंत तरी माझी काही हरकत नाही.”

“हं…. पुढच्या महिन्यात पाहू कसं काय करायचं ते. चल बॅग भरायला घे लवकर..” त्याने सांगितलं आणि तिने ऐकलं..
दोघं सामानाची बांधाबांध करत होते. ती करतांना प्रतापच्या मनात राहून राहून हा एकच विचार येत होता की….. आयुष्याच्या संध्याकाळी जर हेच प्रारब्ध होतं तर, कशासाठी केला हा इतका अट्टाहास?
*******
वाचकहो,
असे बरचसे प्रताप आणि सुशीला आपल्या आजूबाजूला, नातेवाईकांमधे आणि कधी कधी आपल्या स्वतःमधेही राहात असतात. नाही का?
मुलं लहानाची मोठी होणार आणि आपापल्या आयुष्यात रमणार हे सत्य सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही ते प्रत्यक्षात स्वीकारतांना मात्र आपण कच खातो आणि निराशेच्या गर्तेत जातो.
आयुष्यभर प्रगतीसाठी केलेला अट्टाहास आयुष्याच्या संध्याकाळी जर अशी निराशा घेऊन येत असेल तर ती इतर कोणाची नसून फक्त आपलीच चूक असते.
तेव्हा तरूण वयात फक्त घर, संसार, मुलंबाळं यातच रमून राहाण्यापेक्षा आपल्या आयुष्याच्या अट्टाहासात उतारवयात सोबत करतील अशा काही छंदांनाही जागा द्यायला शिकायला हवे. नाही का?
तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधून आम्हाला जरूर कळवा.
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!