तूच माझी आई

© सौ. प्रतिभा परांजपे
सायलीला जाग आली, बाबा आणि आजी बोलत होते.
आजी बाबांना परत परत म्हणत होती “अरे एकदा पाहून भेटून तर घे काय हरकत आहे पाहायला? मलाही आता झेपत नाही रे –सोनू किती लहान आहे आणि सायली अशी अडनिड्या वयाची.”
” अगं पण आई …”
“नको इतका विचार करू, मी भेटले तिला. ती तुझ्यासारखीच पोळलेली आहे. चार वर्षांपूर्वी एक्सीडेंट मध्ये तिचा नवरा गेला, आणि त्या धक्क्याने पोटातलं बाळ  ही, खूप वाईट प्रसंगातून गेली आहे रे “समजून घेईल तुला. समदुःखी आहे.”

 “बघतो, भेटतो उद्या, ठीक.?”
सायलीला आजी नेमके काय दाखवणार आहे  बाबांना ते कळत नव्हते .
दोन-चार दिवसांनी ती– घरी आली!
आजीने खूपच कौतुक केले तिचे. सायलीने दुरूनच पाहिलं.
” ही सायली, आजीने ओळख करून दिली, आणि हा सोनू”!

सोनूला तिने उचलून घेतले. सायलीला नाही आवडले.
कोण कुठली ती, आपल्या सोनूला का बर आजीने दिले तिच्याजवळ?
सायलीने सोनूला ये आपण खेळू म्हणत जवळजवळ तिच्याकडून  ओढूनच  घेतले.
आजीने तिला पूर्ण घर दाखवले, चहा पाजला बराच वेळ ती  घरात होती. 
सायली ला आवडल नाही, ती उठून बाहेर येऊन उभी राहिली.

रात्री बाबांनी तिला विचारले” आज ज्या आपल्या घरी आल्या होत्या त्या कशा होत्या?”
“मला नाही आवडलं त्यांनी सोनूला घेतलेलं मग मी काढून घेतलं त्यांच्याजवळून”
बाबा काहीच बोलले नाही ,आजीने इशाऱ्याने बाबांना मी पाहते असे म्हटले.
दोन दिवसांनी रविवारी सकाळी सकाळी   सायली झोपून उठली तर घरात गडबड दिसत होती .

बाबा जरा छान कपडे घालून बसले होते .
“आपण कुठे जाणार आहोत का?”
“नाही बाबा जात आहे,  आज सीमाला घेऊन  येतील बाबा.” आजीने सांगितले.
बाबा घरी परत आले तोपर्यंत आजीने स्वयंपाकिण काकूंना काहीतरी गोड म्हणून शिरा करायला सांगितले.

बाबा दोन तासाने आले त्यांच्याबरोबर ती पण होती .
आजीने दोघांना ओवाळले, तिने आजीला नमस्कार केला आजीने ये म्हणून घरात घेतले. 
” काकू ही सीमा” म्हणून तिची ओळख  स्वयंपाक करणार्‍या काकूंना करून दिली.
” छान आहे तुझी नवी आई हो “—स्वयंपाकिण काकू म्हणाल्या, तशी  सायली हिरमुसली आणि धावत आपल्या खोलीत गेली व आईच्या फोटोला घट्ट धरून बसून राहिली.

थोड्यावेळाने आजी आत आली तोपर्यंत सायली फोटो छातीशी धरून झोपून गेली होती .
गालांवर ओघळलेले अश्रू दिसत होते.
तिच्या हातातला फोटो हळूच बाजूला ठेवत आजीने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला तशी सायलीला जाग आली ,”आजी मला माझीच मम्मा हवी आहे ही नकोय “म्हणत सायली उठून बसली.
“अगं न जेवता झोपत का कोणी? चल बरं” म्हणत आजीने प्रेमाने तिला जेवण भरवलं तशी मग सायली च मन थोड शांत झालं.

आता रोजच तिची नवी आई तिला डोळ्यासमोर दिसत होती, पण सायलीला तिची आई छान आठवत होती.
आई  तिचे खूप  खूप लाड करायची  सायू– सायू म्हणताना तिच्या चेहरा कौतुकाने भरलेला असायचा, काही  वर्षांत सोनू झाला, आणि सर्व बिघडलं.
सोनू झाल्यापासून तिला आई कमीच मिळत असे,
माझ्यापासून दूर रहात जा म्हणायची .

नेमक तिला काय होत होते कळत नव्हते , सतत थकलेली दिसायची.
एक दिवस आईला दवाखान्यात नेलं आणि मग ती कधीच आली नाही.
त्या नंतर आई कधीच दिसली नाही. सायलीचे डोळे भरून आले.
‘ सायली दूध पिऊन घे’, तिच्या आवाजाने सायली भानावर आली.
दुधाचा कप घेऊन बाल्कनीत  जाऊन उभी राहिली .

 समोर तिची क्लासमेट रूपा राहत होती .”सायली उद्या पेरेंट टीचर मिटींग आहे माहित आहे ना?
“हो”– सायली विचारात पडली, बाबा इथे नाही मग– उद्या कोण येणार?
शाळेच्या मधल्या रिसेस मध्ये रूपा आणि सिमरन भेटल्या.
“ए सायली तुझी मम्मा किती छान आहे ग ! मॅडमशी बोलताना पाहिलं एकदम स्मार्ट आणि हुशार वाटली मॅडम पण खूप इंप्रेस वाटल्या.”

 साईली ला मनातून आवडलं नाही! ही कां आली शाळेत?
दोन दिवसांनी बाबा आल्यावर आईने बाबांना शाळेतली तिची प्रोग्रेस आणि मॅडमचं बोलणं सांगितल.
“बाबा तू का नाही आला शाळेत?
” अगं छानच झालं ना सीमा गेली ते आता तुझा मॅथ्स चा अभ्यास ती घेईल तु डिफीकल्टीझ  तिला विचारत जा .”
सायलीला कसं विचाराव हा संकोच जातच नव्हता.

एक दिवस एक गणित काही केला सुटत नव्हते, मॅडम शाळेत रागवतील ही पण भीती होती.
बराच वेळ गणित करून पाहिले पण शेवटी जीव रडवेला झाला, उठून बाथरूम मध्ये जाऊन आली .
पाहते तर काय गणित पूर्ण स्टेप्स सकट सोडवलेलं अक्षर ही खूप छान व्यवस्थित.
सायलीने नीट पाहिलं आणि तिच्यासमोर जाऊन जाऊन उभी राहिली.

” मला गणित शिकवशील?
तिने हसून “हो” म्हटलं आणि गालावरनं हात फिरवला,
खूप बरं वाटलं सायलीला.
हळूहळू आता तिचा सर्व अभ्यास ती आई घेऊ लागली, आणि बाबा निश्चित झाले.
सोनूला तर तिच्याशिवाय दुसरी कोणी माहीतच नव्हती, तो तिला सारखा चिकटलेला असे

आजी, बाबांशी पण ती आई छान गप्पा मारत काम करत असे,
घरातलं वातावरण एकदम आनंदी असायचं.
सायली मोठी होत होती सोनू ही शाळेत जाऊ लागला.
आला की  आईला शाळेतल्या गमती सांगायचा,खूप बडबड करायचा. ती आई खूप काळजी घ्यायची .

 सायली मात्र शांत असायची. एक दिवस सकाळी  सायली च्या पोटात खूप दुखायला लागले.
सायली ला काही कळेना बाथरूम मध्ये जाऊन आली आणि बाहेर येऊन रडू लागली.
ती आई सगळं काम सोडून आली सायलीला जवळ घेतलं  काही प्रश्न विचारले व सर्व नीट समजावून सांगितलं. 
“आज शाळेत नको जाऊ पड जराशी “, थोड्यावेळाने गरम पाण्याची पिशवी व पॅड आणून दिलं.

त्या दिवशी सायली कितीतरी वेळ तिच्या कुशीत पडून राहिली.
आता हे दर महिन्यात होणार तेव्हा तारीख लक्षात ठेवायची, तिने समजावून सांगितले .
हळूहळू सायले तिच्याशी मोकळी होऊ लागली बरेच प्रश्न मनातले विचारू लागली.
बघता बघता सायलीचे  शालेय शिक्षण  पूर्ण झाले व काॅलेज मधे जाऊ लागली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर कॉलेजमध्ये  ईशान सायलीलाआवडला. त्यांचे ही तिच्या वर प्रेम बसले.
बघता बघता सायली ग्रेजुएट झाली.
आजीने तिच्या साठी तिच्या मैत्रिणीचा नातू पारस पसंत केला होता. बाबांनाही  तो आवडला.
सायली ला कळतं नव्हते कि घरी  ईशान बद्दल कस सांगायचे.

 ईशान अजून नौकरी ला लागला नव्हता.
सायली काहिच बोलत नाही पाहून सीमा ने तिला एकट्या मधे विचारले तेव्हा तिने ईशान व तिचे प्रेम असल्याची कबुली दिली. 
पण तो आपल्या जातीचा नाही तेव्हा घरी कसे सांगावे या विवंचनेत सायली होती .
एक दिवस बाबा आणि आजीदोघांनी सायलीला विचारले” तुला कोणी पसंत आहे कां? आम्ही तुझ्याकरता पारस ला पसंत केले आहे त्याला ही तू आवडली आहे.  पुढच्या गोष्टी ठरवून टाकू?” 

सायलीने ईशान बरोबर तिला लग्न करायचा निर्णय सांगितला.
बाबांनी प्रश्नांची झडच लावली कोण आहे ?आपल्या जातीचा आहे ना?
सायलीला काहीच सुचेच ना.   तिने सीमा आई कडे पाहिलं.
“त्याला एकदा घरी घेऊन ये. आईने सुचवले.

 सायली ईशानला घेऊन घरी आली घरात सर्वांना ईशान आवडला , ईशान च्या घरी ही सायली पसंत होती.
“पण लग्न करायच्या आधी स्वतः च्या पाया वर उभी रहा, एक दोन वर्षे एकमेकांना समजून घ्या” सीमा आई ने सुचवले.
आई बाबा पण ईशान च्या घरी जाऊन पाहून आले
मग पुढचं सगळं सोपं झालं .
बाबाही मग तयार झाले.

सायली व ईशान चे लग्न थाटात पार पडले. मुलाकडचे वरात घेऊन निघाले .
सायलीची पावले जड झाली. आजी बाबा सोनू सगळ्यांना तिने हसून निरोप दिला,  
सीमा आई च्या समोर येताच सायली चे मन भरून आले.  
“आई “म्हणून सायली धावत तिच्या कुशीत शिरली,  खूप रडली.
इतके दिवस  आई साठी परकेपणाचे जो भाव  मनात ठेवला होता तो या  मिठीत विरघळून गेला. 
मन विरह वेदनेने भरून गेले.
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!