ती एक पवित्र जास्वंदी

© डॉ मुक्ता बोरकर – आगाशे
“काकू मी जास्वंदीची फुलं तोडते हो” म्हणत अगदी गेट उघडून आत आलेली ती इकडेतिकडे न बघता आपल्याच नादात मस्त परडीभर फुलं तोडून घेऊन गेली.
दिवाणखान्यात बसलेला तो हे दुरूनच न्याहाळत होता. 
दुसऱ्याही दिवशी ती तशीच आली. आज तर अगदी न्हालेले केसं तसेच एका बाजूला घेतलेले. कसलाच शृंगार नाही पण एका अनामिक सौंदर्याने तळपणारा तिचा चेहरा…..!

काल तिला पाठमोरेच पाहिलेले त्याने. पण आज अगदी समोरून तिचे दर्शन झालेले.
या अशा अवतारात सुद्धा कुणी इतकं सुंदर दिसू शकतं? भान हरपून बघतच राहिला तो!
आज पण ती फुलं तोडेल अन् बाहेरच्या बाहेरच जाईल असे त्याला वाटत असतांनाच तिचा मोर्चा अचानक घराकडे वळला.
काकू काकू करतच ती दारात आली…!

अचानक त्याला समोर बघून अवघडल्यासारखी झाली.
त्याने सुद्धा नकळतच आत बोट दाखवले अन् ती आत गेली.
ती गेली अन् कोण ही? हा प्रश्न त्याला सतावू लागला.
नकळतच आत असलेल्या मामीला त्याने विचारले “मामी कोण हो ही?”
“अरे ही समोरची सुमी नाही का? विसरलास इतक्यातच! हो तसेही बरेच वर्ष झाले म्हणा तू इथे आला नाहीस ते” मामी म्हणाल्या.

ही अन् सुमी? त्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. 
सुमी म्हणजे सुमती समोरच्या आळीत दोन घरापलीकडे राहणारी.
तो, मामाची मुलगी क्षमा अन् सुमी काय धूम खेळायचे बालपणी.
अन् आज तिच सुमी एकदम सुस्वरूप यौवना बनून त्याच्यासमोर आली होती…..!
हो ना, गेल्या आठदहा वर्षात इकडे फिरकलाच नव्हता की तो….!

बाबा गेले अन् आईनी नीट संगोपन व्हावं, योग्य संस्कार व्हावे म्हणून त्याची रवानगी एका सुप्रसिद्ध बोर्डिंग स्कूलमध्ये केली होती. कारण बाबा गेल्यामुळे आता सारी जबाबदारी तिच्यावरच पडली होती अन् स्टाफ नर्स सारखं वेळ अवेळीचं प्रोफेशन असल्याने त्याला कुणाच्या भरोशावर सोडावे हा एक प्रश्नच होता.
त्यामुळे त्या एका क्षणापासून त्याचे लहानपण, नाती सारे सारे बदलले होते. पण दुसरा पर्याय नव्हता.

आठ दहा दिवसांनी क्षमाचं लग्न होतं आणि नुकतेच त्याचे कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे जॉब प्लेसमेंट झालेले. joining ला असलेला अवधी अन् मामेबहीण क्षमाचे लग्न हे दोन्ही साधून तो यंदा मामाकडे आलेला.
दुसऱ्या दिवशीच क्षमा पण आली. काही वेळाने सुमी पण आली फुलं न्यायला बिचकतच!
बाहेरूनच फुलं तोडून जाणार तोच क्षमानी आवाज दिला..”ये सुमे बाहेरूनच जाशील का? मला न भेटताच.” क्षमाचा आवाज ऐकुन ती थबकली अन् समोर उभ्या असलेल्या त्या दोघांना बघतच राहिली..

“अग ये ना आत” तरी तिथेच थबकलेल्या तिला बघून क्षमा म्हणाली “अगं हा होय..! हा राजन ग आत्याचा मुलगा. लहानपणी काय धूम खेळायचो न आपण तिघे..!”
त्याच्या ओळखीची खूण पटली अन् सुमीची कळी खुलली.
मग काय पुढचे आठ दिवस ही मैत्री पुन्हा बहरून आली.
जुनीच मैत्री पण आता तारुण्याचा संदर्भ ल्याली होती…!

एक प्रकारचा बुजरेपणा दोघांच्या मैत्रीत डोकावला होता. अन् तारुण्यसुलभ आकर्षण दोघांमध्येही ओढ घेऊ लागलं होतं. …
आठ दिवस असेच निघून गेले. मैत्री आता मस्त मुरली होती.
लग्नाच्या आदल्या दिवशी तिघांनीही पुन्हा परत पुढल्यावर्षी असेच भेटायचा पक्का वायदा केला अन् तिघेही आपापल्या जागी कार्यरत झाली.
तो आता आपल्या कामाला लागला होता. पण मधे मधे सुमिची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. हे नेमकं असं कां होते त्याला कळलेच नव्हते.

सुमी ! तिला आवडणाऱ्या अगदी टपोऱ्या जास्वंद फुलासारखी भासणारी सुमी….
तेवढीच सुंदर, तेवढीच प्रसन्न, डौलदार अन् तेवढीच सोज्वळ!
त्याच्या मनात केव्हा घर करून गेली त्याला कळलेच नाही.
आपल्या मनात सुमीच्याबद्दल प्रेमांकुर निर्माण होऊ लागलाय याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली.
अन् आता ते अव्यक्त प्रेम व्यक्त करण्याची ओढ सुद्धा….!!

वर्षभराने भेटण्याचा वायदा असूनही यावेळी मात्र तो दिवाळीतच मामाकडे गेला होता.
बस ! वाट होती सूमीच्या येण्याची.
वेळ होऊन गेली तरी सुमी आली नव्हती…
शेवटी मामीला त्याने सुमीबद्दल विचारलेच..!
सुमीचे दोन महिन्यापूर्वी लग्न झाल्याचे त्याला मामीकडून कळले अन् ऐकूनच मन कडवट झाले त्याचे..

जास्वंदीकडे लक्ष जाताच ती ही कोमेजली दिसली त्याला….
मामीनीच पुष्टी जोडली मग ” एवढी गुणाची पोर पण काही विचार न करताच बापाने बिजवराच्या गळ्यात बांधली!”
हे ऐकुन तर अगदी सुन्न झाला तो…!
आईविना असलेली सुमी, दारुड्या बापाने एक ओझे म्हणून बिजवराला दिली…..
कुणीतरी घणाचे घाव डोक्यावर घालत आहे असे वाटले त्याला…

दुसऱ्याच दिवशी तिथून काढता पाय घेतला त्याने..
मन घट्ट करून निराशेच्या हिंदोळ्यावर तो तसाच झुलत राहिला !!!!!
उन्हाळ्यात मामाचा एक दिवस अचानक फोन….!
जरुरी कामासाठी मामाने त्याला अन् त्याच्या आईला गावी बोलवले. शेतीच्या काही कागदपत्रांचे काम असल्याने जाणे भागच होते. नाईलाजानेच आला तो!

मामाची मुलगी सुद्धा सासरहून आलेली.
मामीने अचानक बॉम्ब गोळा फोडावा तशी सुमीचा नवरा अगदी तीन महिन्यातच गेल्याची अन् पांढऱ्या पायाची म्हणून सासरच्या लोकांनी तिला माहेरी परत पाठवल्याच सांगितलं.
दोघेही सुमीला भेटायला गेले. सुमी दुःखाच्या अनपेक्षित धक्क्याने कोमेजलेली.
पण तरीही देवावर अढळ श्रद्धा असलेली …!

देवघरात गणपतीला वाहिलेली टपोरी जास्वंदी तिच्या श्रद्धेची च साक्ष देणारी…
आता मात्र त्याने मनात निर्धार केलेला.
मनातले त्याने क्षमा जवळ बोलून दाखवले. तिनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
वैधव्यात होरपळणाऱ्या आईला पण त्याने अनुभवलेले.

घरी जाताच त्याने आई, मामा, मामी सगळ्यांसमोर मन मोकळे केले.
“मी सुमती सोबत लग्न करायचे ठरवले आहे.”
क्षणभर सारे स्तब्ध, कारण विधवा सुमी अन् उपवर तो …!
परंपरेला छेद देणारे भासत होते ते..
कित्येक चांगली स्थळं त्याच्यासाठी हात जोडून उभी असलेली अन् हा एका विधवेशी लग्न करायचा विचार करतोय…!!!!!

“हो , सुमी चांगलीच आहे अगदी मान्य, पण ती विधवा आहे हे विसरून चालणार नाही” मामांनी शेवटी इशारा दिलाच!
“पण मला सुमिशीच लग्न करायचं आहे, मला आधीपासून आवडते ती.” याचा पुन्हा बॉम्ब गोळा.
मामा मामी वैतागत ,”अरे पण लोक काय म्हणतील?”
एवढा वेळ चूप असलेली त्याची आई मात्र यावेळी बोलली, ” मला हे मंजूर आहे. लोकं काय म्हणतील यापेक्षा माझ्या मुलाच्या भावना महत्त्वाच्या! अन् एका विधवा स्त्री ला काय सोसावे लागते ते मला माहित आहे. तिला मदत करायच्या वेळी कुठे जातात हे लोकं? माझ्या मुलाला याची जाणीव आहे याचा मला खरंच अभिमान वाटतोय!”

क्षमाने पण दुजोरा दिला अन् मग सारा विरोध मावळला….
सुमी अन् त्याच्या लग्नाचा निर्णय पक्का झाला..
सुमीचा देवही तिला पावला!
अगदी जास्वंदी सारखी पवित्र ,निर्मळ सुमी पण नियतीच्या चक्रात फसलेली! पण गणेशाला अर्पिलेली जास्वंदीच आज तिला पावलेली!
घडणाऱ्या घटनेने सुमीच्या मनाचा गाभारा पुन्हा उजळून आला अन् पर्णकोषात दडलेला ,कोमेजलेला जास्वंद पुन्हा नव्या टवटवीने बहरून आला…!
© डॉ मुक्ता बोरकर – आगाशे

मुक्तमैफलसदर कथा लेखिका डॉ मुक्ता बोरकर – आगाशे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment

error: Content is protected !!