प्रत्येक वेळी तोच कसा चुकेल??

©शुभांगी मस्के
रिधिमा, प्रथमेश दोघांच्या सुखी संसारात, कशाचीच कमी नव्हती. दृष्ट लागावी असा संसार होता दोघांचा.
रिधिमा दिसायला सुंदर, नीटनेटक  राहणीमान, फॅशनची जाण असलेली स्वभावाने हट्टी, वर देखल्या गोष्टींना महत्व देणारी.
प्रथमेश मनमिळाऊ, सुस्वभावी.
संसारवेल दोन निरागस गोड लेकरांमुळे बहरलेली होती. त्यामुळे घराचं खऱ्या अर्थाने गोकुळच झालं होत.

सून, पत्नी, आई, बहीण रुपात.. घरात लक्ष्मी नांदते. म्हणतात
गृहलक्ष्मी रुपात घरातली स्त्री सुखी असावी.. ती सुखी असली की, सुख दारात पायघड्या घालते.. आणि घरातली स्त्रीचं समाधानी नसेल तर, सगळं असूनही.. घरात शांतता नांदत नाही.  असमाधानी वृत्ती, एकमेकांच अनुकरण करण्याची  सवय, घरातल्या आनंदी वातावरणावर परिणाम करून जाते.
चला तर बघू, रिधीमा आणि प्रथमेशच्या संसारात काय चाललयं.. 

स्वयंपाक घरात घनघोर युद्ध सुरु असल्यासारखे रिधीमाच्या हातून भांडे पडत होते.
छोट्या छोट्या गोष्टीवरून, पोरांवर उगाचच ती चिडत असल्याचं प्रथमेशला जाणवलं.
इतर वेळी हुडदंग मचवणारी पोरं आईचा ओरडा बसू नये म्हणून कोपऱ्यात चिडीचूप बसून होती. 
ऑफिसमधून आल्यापासून, घरात असच सुरू होत.. डायनिंग टेबलवर  ताटाकडे बघून जेवणाचे घास फक्त मुकाट्याने गिळले जात होते. ताटात वाढलेल्या जेवणाने पोटभरीचे काम केलं होत.

लेकरांना अस चिडीचूप गप्प गप्प बघून,  प्रथमेशला कससच झालं.
बाळांनो उद्या शाळा आहे ना!  सकाळी लवकर उठायचयं. चला झोपायला!  म्हणत तो पोरांना  झोपवण्यासाठी बेडरुममध्ये घेवून गेला. 
छानशी छोटीशी गोष्ट ऐकवताना,  सांगितली गोष्ट ऐकता ऐकता दोघे ही कधी झोपले प्रथमेशला कळलंच नाही. 
त्याने दोघांच्याही अंगावरच पांघरूण व्यवस्थित केलं. 

रिधीमाची आदळआपट सुरूच होती. 
पोरं झोपली तशी,  न राहवून प्रथमेश स्वयंपाक घरात गेला. 
रिधीमा ओटा आवरत होती. फनफन सुरुच होती तीची.
त्याने आणलेला भाजीपाला, निवडून ठेवलेली भाजी,  फ्रिजमध्ये ठेवायच्या निमित्ताने त्याने फ्रिज उघडला.
इकडची वस्तू तिकडे आणि तिकडची वस्तू उगाच इकडे तिकडे सरकवली. फ्रिज मधली बॉटल काढून, घटाघटा पाणी प्यायला.

रिधीमाच्या मूडचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता..
“काय झालं तुला? कसली एवढी चिडचिड ? सकाळपासुन बघतोय, गप्प गप्प आहेस, कित्ती ती आदळआपट… सणासुदिच्या दिवसात, काय गं हे!! राग येण्याचं कारण तर कळू देशील” रिधीमाकडे एकटक बघत सौम्य शब्दात संवाद साधण्याचा प्रथमेश प्रयत्न करत होता.
ओट्यावर होती नव्हती, ती सगळी भांडी रिधिमाने बेसीनमध्ये दचडली, तनफनतच ओट्यावरुन कापड फिरवलं.
‘माझ्या मेलीचं नशीबच फुटकं..’ काहीशी बरळतच,  सिलेंडरची बटन झटक्यात बंद केली आणि हॉलमध्ये सोफ्यावर येवून बसली.

काहीतरी बिनसलयं, प्रथमेशच्या लक्षात आलं होतच, त्याने टि.व्ही. वर ती रोज बघत असलेल्या मालिकेचं चँनल लावलं आणि रिमोट तिच्या समोर ठेवला. 
“डोकं वगैरे दुखतयं का? कामं जास्ती झालीत का? कुणी काही बोललं का? माझ काही चुकलं का?” प्रथमेशने काळजीने विचारलं. 
“काय झालं?” तिच्या उत्तराच्या प्रतिक्षेत तिच्याकडे बघत, तिच्या बाजूला सोफ्यात येऊन बसला.
हळूच तिचा हात हाती घेतला.
तिने झटक्यातच त्याच्या हातून, स्वतःचा हात काढून घेतला. 

गाल फुगवून, शून्यात हरवल्यासारखी रिधीमा टीव्हीकडे एकटक बघत राहिली.. प्रथमेश ही अधूनमधून तिच्याकडे तर मध्येच टीव्हीकडे बघत बसला. ही जीवघेणी शांतता त्याला नकोशी वाटत होती. 
खरं तर खूप काही सांगायचं होत त्याला आज. आजची मीटिंग, ऑफिस मधली कट-कारस्थान, मनमिटाव आणि त्यामुळे होणारी त्याची चिडचिड. मन मोकळं करायचं होत त्याला आज.
परंतू काहीच फायदा नव्हता सांगून.. प्रथमेश गप्पच बसला.

मालिका संपली तशी पाय आपटतच, रिधीमा बेडरुममध्ये गेली.. बऱ्याचदा तिच्या पैजनांची रुणझुण, दोघांच्या मोहक क्षणांची साक्षीदार असायची.. टीव्ही, लाईट बंद करून,  तिच्या पाठोपाठ प्रथमेश ही बेडरुममध्ये गेला.
बेडच्या एका कोप-यात रिधिमा आपल्या जागी एका कडावर झोपली होती.
प्रथमेश तिच्या बाजूला येवून झोपला.
हळूच रिधीमाच्या अंगावर त्याने हात टाकला, तिच्या मानेवर हळूच ओठ टेकले. पुन्हा एकदा तिच्या रागाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रिधीमाने झटक्यातच त्याचा हात बाजूला केला आणि कड पलटला.
“काही नको ही लाडीगोडी, दिखावा आहे फक्त.  बायकोला काय हवं नको ते बघितलयं का कधी.  इतर बायकांचे नवरे बायकांसाठी काय काय करतात. आणि एक तुम्ही.” 
“काय करत नाही मी? प्रेम करत नाही की काय?” तिच्या केसांमधून तो हळुवार बोट फिरवू लागला. 
“प्रेमाने पोट भरलं असत तर अजून काय हवं होत! “रीधिमा रागतच बोलली.

“सगळं तुझ्या मनासारखं तर चालतं, खायला प्यायला, कपडा लत्ता.. काय कमी करतो का मी? मग अजून काय हवंय” इतरांची बरोबरी माझ्याशी करण्या इतपत झालंय तरी काय?” प्रथमेश रागातच बोलला..
“खायला प्यायला तेवढं… पुरेस आहे का? होऊन जातं का तेवढ्याने ?”. रिधीमाची फणफण सुरूच होती.
काळजात जाऊन रुततील अशा शब्दात रीधीमा बोलत होती.
“सणासुदीचे दिवस म्हणे..दिवाळी आलीय, आपल्या बायकोने साडी घेतलीस का? साधं एका शब्दाने विचारलं का तुम्ही? बिल्डींगमध्ये सगळ्यांच्याच जोरदार खरेद्या सुरू आहेत. रोज जावून मोठमोठ्या पिशव्या घेवून येतायत सगळ्या बायका आणि एक मी, लंकेची पार्वती.” 

“लंकेची पार्वती काय गं ??  चांगले गळ्यात कानात, पायात सोन्याचांदिचे दागिने आहेत न तुला? आणि खरेदीचं म्हणशील तर, झाली ना आपली दिवाळीची खरेदी, पोरांचे कपडे घेवून झाले. तुच नाही का म्हटलं होतं. मुलांना मोजकेच कपडे हवेत, वाढीच्या वयात, छोटे होतात म्हणून. किराणा सामान ही आणून झालायं… आणखी काय हवयं तुला, कळू तरी दे एकदा! तुझ्या साडीचं म्हणशील तर, पावसाळी सेलमधून घेतल्या ना तू साड्या. चांगल्या तीन चार घेतल्याचं आठवतंय,  दाखवल्या होत्या तू मला. 

त्यातली एखादी असेलच ना, तीच नेसणार असशील दिवाळीला, म्हणून नाही मी विचारलं.  घ्यायची होती साडी तर, पोरांचे कपडे घेतले तेव्हाच नाही का बोलायचसं. घेऊन दिली असती. घरातली स्त्री म्हणजे गृहलक्ष्मी चे रूप असते. दिवाळीच्या तोंडावर घरातली गृहलक्ष्मीच जर आनंदी नसेल तर, काय फायदा ?” प्रथमेश थोडा चिडूनच बोलला.
मी दिवसभर काम करायचं. दिवसभर बाहेर आणि रात्री घरी यायचं, तर हे असं… एवढ्याशा तेवढ्याशा कारणाने रागात येवून घरातलं वातावरण खराब झालेलं आवडतं नाही मला.” स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवत, प्रथमेशने रिधिमाला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला..

प्रथमेशचा रागवल्याचा सूर ऐकताच, रिधीमाने मौन सोडलं.
“जुलै महिन्यात घेतल्या होत्या चार साड्या.. चार महिने झाले. त्यातली एक साडी राखीला, एक हरतालिकेला बाकीच्या उरलेल्या दोन साड्या, नवरात्रात रंगांची थीम ठेवली होती, महिला मंडळाने…  पेपरमध्ये फोटो आले होते आमचे, त्या फोटोशुटच्या निमित्ताने नेसले होते.
चारही साड्या नेसुन झाल्यात माझ्या, सगळ्यांनी पाहिल्यात त्या साड्या.  त्याच त्याच साड्या नेसायच्या का मी? त्याच त्याच साड्यांवर फोटो निघतात मग. आजकाल फेसबूक, व्हॉट्सॲप स्टेटसवर फोटो टाकावे लागतात.. एकच एक साडी नाही का दिसणार मग फोटोत. मला नाही आवडतं ते, त्याच त्याच साड्यातले फोटो” रिधीमा ठसक्यात बोलली.

“आणि आजकाल काय सुंदर सुंदर इमिटेशन ज्वेलरी आलीय बाजारात, अगदीच ठसठशीत, स्वस्त आणि मस्त.. या चिटूकल्या सोन्याला मागे टाकते ती ज्वेलरी.”  रिधीमा बोलली.
“मागच्याच महिन्यात नाही का, वन ग्रॅमचं ठसठसशी मंगळसूत्र मागवलस तू ऑनलाईन? चुटूक बटुक हल्ली ऑनलाईन शॉपिंग चे पार्सल येतच असतात. ग्रॅमचे काय, ऑक्सीडाईज काय? मोत्याचे काय? घेतच तर असतेस. आणि, एवढं कोण कोणाच्या साड्यांकडे बघतं. 

आजकाल बघतोय, प्रत्येक कार्यक्रमाला तुला वेगवेगळ्या साड्या हव्या असतात.  कपाट साड्यांनी खचाखच भरलंयं, ठेवायला जागा नाही…  पण साड्या घेणं काही थांबत नाही तुझं… 
नकली दागिन्यांवर पैसे कशाला उधळायचेत, काय फायदा ती नकली ज्वेलरी मिरवून?  मला ती इमिटेशन ज्वेलरी म्हणजे पैशाचा अपव्यय वाटतो.. 
मी तर कधीच नाही घेत दिवाळीत ड्रेस, कपाटातलाच एखादा कुर्ता पायजमा किंवा एखादा ड्रेस घालतो… मला तर नाही पडत काहीच फरक आणि माझ्या त्याच त्याच कपड्यांमधल्या तुझ्या सोबतच्या फोटोनी तुझं स्टेटस कमी होतं, अस मला नाही वाटत” इति प्रथमेश

“तुम्हाला कोण बघतयं, माणसांच्या कपड्यांत काय असतं बघण्यासारखं, तेच तेच असतात. नवे काय नी जुने काय? रंग ही तेच ते!”  रिधीमाने प्रतिउत्तर दिलं.
रिधीमाचं साड्या, ईमिटेशन ज्वेलरी  घेण्यामागचं लॉजिक मनाला पटत नसलं तरी उगाच, सणासुदीच्या समोर घरात भांडणं नकोत. शब्दाने शब्द वाढतो म्हणून अखेर त्याने गप्प बसायचं ठरवून, उद्या एक नवी साडी घेऊन ये, दिवाळीसाठी म्हणून कबूल केलं..
नव्या फॅशनची ऑर्गेंझा.. की घेऊ सिल्क साडी जरीची, की घेऊ एक एरकल पैठणी…या विचारात रिधीमाने, प्रथमेशशी लाडीगोडी करत, त्याच्या दिशेने कड पलटून..  रिधीमा क्षणात झोपून गेली होती. 
हजार, दोन हजाराच्या.. का होईना पण हिच्या एका साडीने महिन्याभऱ्याच्या बजेटचा धिंगाणा लागणार.. महिनाभर ओढाताण होणार या विचारात, प्रथमेश मात्र… गर गर फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत महिन्याभराच्या घर खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या विचारात गुंतला.
*******

खरयं ना मैत्रीणींनो, किती सहजपणे आपण.. साड्या घेताना हा रंग तो रंग, हे पँटर्न ते पँटर्न,  फॅशन इन,  आऊट ऑफ फॅशन.. यावरुन साड्या निवडतो.. 
ब-याचदा कपाटतल्या एक दोन वेळा नेसलेल्या साड्यांना, ओल्ड फँशन म्हणून शिक्कामोर्तब करतो..  मोठ्या हौशीने घेतलेल्या, दोन चार वेळा नेसलेल्या साड्यांना…  त्याच त्या फॅशनच्या साड्या एकमेकींच्या अंगावर दिसल्या की… त्याच त्या साडया बघून बोअर झाले, पैसे वसूल झाले म्हणत… पुढे कधी न नेसण्याच्या लिस्टीत सहज सामील करुन टाकतो.

आज खांद्याला खांदा लावून स्त्री घराचा भार उचलत असली तरी, ती घेत असलेल्या वर्षभ-यातल्या अनेक साड्यांपैकी निदान एक साडी तरी नव-याने घेवून द्यावी अशी अपेक्षा ठेवतेच ठेवते.
यात काही गैर आहे असं मला म्हणायचं नाही..  पण स्त्री नोकरी करणारी असो की साधी गृहीणी, पुरुषांच्या प्रेमाला साड्यांच्या तराजूत तोलणे कितपत योग्य आहे बरं!
अमक्याची अमकी तमक्याची तमकी, हिच्या तिच्या वरुन तिच्या खरेदीवरुन, अनेकदा बायका नव-यांना सुनावतात.   “नवरा असावा तर असा!” नशिब काढलस, “कित्ती ते प्रेम”  साडया दागिण्यांच्या खरीदीवर.. बायका आपल्या नव-यांना एकमेकींच उदाहरण देतात.

नोकरी करणारी असो की साधी गृहिणी, नव-यांच्या कपड्यांच्या तुलनेत बायकांजवळ जरा जास्तीच साड्या दागिने असतात. हे तरी पटतयं ना!
वेगवेगळ्या पँटर्नच्या नवनवीन साड्या फक्तच आता ट्रेंडमध्ये नाही म्हणून तशाच दुर्लक्षित ठेवून नव्या ट्रेंडनुसार, सनासुदिच्या निमित्ताने असो की सेलच्या निमित्ताने बायका साड्या घेताना दिसतातच.
परिस्थिती घेण्याजोगी आहे म्हणून फक्तच खरेदीवर पैसा खर्च करणे हा आजचा ट्रेंडच आलाय की काय असं ही अनेकदा वाटतं. वरवरच्या दिखाव्याला तर आपण बळी पडत नाही आहोत ना! हा विचार घरातल्या  प्रत्येक स्त्रीने करणे गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी पुरुषचं चुकतो असं काही नसतं, छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडण उकरुन काढून, घरातलं वातावरण बिघडवणा-या बहामतब्बर स्त्रीया ही असतात… बायकांचं साड्या, एमिटेशन ज्वेलरीचं वेड अनेकदा पुरुषांना भारी पडतं. कष्टाने कमावलेला पैसा असा उगाच विनाकारण खरेदीवर खर्च होताना बघून त्याला वाईट वाटतं, पण बायकोच्या प्रेमापायी, त्याला अनेकदा गप्प बसावं लागतं.
अनेकदा त्याची बनियान फाटलेली असते.. बुटांना शिवून शिवून घालतो तो..  तो घालत असलेल्या त्याच्या कपड्यांच्यामध्ये कधीच फँशन आडवी येत नाही. त्याचे कपडे त्याचा स्टेटस सिंबॉल ठरत नाही कारण आपल्या बायको पोरांसाठी सगळ्या सुखसुविधा पुरवणारा तो मात्र अंथरुन पाहून पाय पसरवण्यावर विश्वास ठेवतो. 

म्हणतात ना सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही… तो मात्र रात्रीचा दिवस करून, घरादाराच्या सुख समाधानासाठी अव्याहत झटताना दिसतो.
ज्या घरातील पती पत्नी, एकमेकांच्या कामाचा आदर करतात. दोघेही सुख दू:खात, अडी अडचणीत एकमेकांना खंबीर पणे साथ देतात. त्याप्रमाणे काटकसरीने वागतात.. त्याच घरात लक्ष्मी टिकून राहते, अशाच घरात खऱ्या अर्थाने नंदनवन फुलते.. 
© शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!