पर्व सुखाचे

© धनश्री दाबके
आज वेदांगीच्या मनात आनंदाचे मोर नाचत होते. मनाच्याच वेगाने तिचे हातही काम करत होते.
कधी एकदा सागर, सुधा काकू आणि मोहन काकांना घेऊन घरी येतोय असं तिला झालं होतं.
गेल्या कित्येक वर्षांपासून ती या क्षणाची वाट बघत होती.
आज तिने पाहिलेले एक सुरेख स्वप्न साकार होणार होते.

गेल्या महिन्याभरापासून म्हणजे सुधाकाकू आणि मोहनकाकांचा व्हिसा आल्यापासून वेदांगीची त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची मनातल्या मनात कितीतरी वेळा उजळणी करून झाली होती.
वरच्या मजल्यावरची गेस्ट बेडरूम स्वच्छ करून घेतली होती. खिडक्यांना नवे पडदे लावले होते, बेडवर नवी जास्त कंफर्टेबल असेल अशी मॅट्रेस आणली होती. नवा वॉर्डरोब आणून ॲसेंबल करून झाला होता.
बाथरूम मधे उठता बसतांना आधार मिळावा म्हणून बाथरूमच्या भिंतीवर आणि कमोडच्या दोन्ही बाजूंना स्टीलची हॅंडल्स बसवून घेतली होती.

आपल्या घरात काका काकूंची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यायचा वेदांगी आणि सागरचा प्रयत्न होता.
शेवटी कितीही म्हंटलं तरी भारतातली लाईफस्टाईल आणि इथली ऑस्ट्रेलियातली लाईफस्टाईल यात बराच फरक होता. आणि त्या फरकाचा कमीतकमी त्रास काका काकूंना व्हावा हीच दोघांचीही इच्छा होती.
कालपासून वेदांगीची आजच्या साग्रसंगीत स्वैपाकाची तयारी सुरू होती. घरी केलेले गुलाबजांब, मसाले भात, मटकीची उसळ, टोमॅटो सार, कोशिंबीर, पोळ्या. शिवाय पापड, कुरडया. अगदी जंगी बेत आखला होता.

गौरवही तितक्याच आतुरतेने या येणाऱ्या आजी आजोबांची वाट बघत होता आणि आईच्या बरोबरीने त्यांच्या स्वागताची तयारी करत होता. आईला कामात मदत करत होता. त्याने एक सुरेख वेलकम ग्रीटींगही बनवले होते, जे तो आल्या आल्या आजीआजोबांना देणार होता. घरात अगदी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.
शेवटी वाट पाहाण्याची कंटाळवाणी फेज संपली आणि सागरच्या गाडीचा आवाज आला. “आई आजी आजोबा आले ग ” गौरवचा आवाज ऐकून वेदांगी लगबगीने बाहेर आली.

गाडीतून उतरणाऱ्या काकूंना पाहून तिचे डोळे भरून आले.
ते भरकन पुसत ती गौरवच्या मागोमाग बाहेर गेली. काकूंनाही वेदांगीला इतक्या वर्षांनी प्रत्यक्ष पाहून भरून आलं होतं.
काही न बोलता वेदांगीने काकूंचे हात हातात घेतले आणि त्यांना घेऊन ती आत आली. आज दोघींनाही शब्दांची गरजच नव्हती.
काकांशी शेकहॅंड करून गौरव त्यांना घेऊन आला.
सागर आणि गौरवने मिळून दोघांच्या बॅगा आत आणल्या.

आधी गरम गरम कॉफी घेऊन काका काकू त्यांची आन्हिके आवरायला गेले.
एवढ्या लांबच्या विमान प्रवासाने दोघंही थकून गेले होते. इतका वेळ एकाच जागी बसल्याने काकूंच्या पायांवर थोडी सूजही आली होती. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर दोघांनाही जरा बरे वाटले.
मग हसत खेळत जेवणं पार पडली. वेदांगीने आपली आवडनिवड लक्षात ठेवून मनापासून केलेले सगळे पदार्थ पाहून काकू अगदी भारावून गेल्या. परत त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

गौरवने प्रेमाने केलेले ग्रीटींग, त्याचं आजी आजोबा म्हणत म्हणत करत आजूबाजूला असणं, दोघांना आदराने नमस्कार करणं हे सगळं पाहून दोन्ही वयस्क जीव सुखावत होते. आपण कोणाला तरी हवे आहोत ही भावनाच त्यांना खूप आनंद देत होती.
विमानप्रवासामुळे झोप पूर्ण न झाल्याने दोघंही आधीच थकले होते त्यात पोटात इतकं सुग्रास अन्न गेल्यानंतर काकांचे डोळे लगेचच मिटायला लागले आणि ते जाऊन झोपलेही.

काकू मात्र वेदांगीचं मागचं सगळं आवरेपर्यंत स्वैपाकघरातच बसून होत्या.
सगळं आवरल्यावर वेदांगीने काकूंच्या पायांना तेल चोळून दिले आणि ती त्यांना झोपायला वरती घेऊन गेली.
आज कित्येक वर्षांनी इतक्या आपुलकीने कोणीतरी काकूंची सेवा केली होती आणि कदाचित त्यामुळेच काकूंना आज अगदी शांत झोप लागली असावी. पडल्या पडल्या त्या घोरायलाही लागल्या.
त्यांच्या अंगावर पांघरूण घालून वेदांगी तिच्या खोलीत आली झोपायला.

पण आज अति आनंदाने वेदांगीला झोपच लागेना.
तिचं मन जुन्या आठवणींत रमलं आणि तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ सरकू लागला.
आई, बाबा, स्वरांगी आणि आणि तिच्या पाठोपाठ आलेली वेदांगी. चौघांचे अगदी दृष्ट लागावी असे कुटुंब.
बरेचदा लहान भावंड आल्यानंतर आपलं घरातलं महत्व कमी झालंय किंवा आईबाबांचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय असं वाटल्याने मोठ्या भावंडाला धाकट्याचा राग येतो. तसंच स्वरांगीच्या बाबतीत झालं पण दुर्दैवाने तो राग कधी कमी झालाच नाही.

त्यात दोघी सख्ख्या बहीणी असूनही त्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, विचार करण्याची पद्धत यात कशातच जराही साम्य नसल्याने दोघींच कधीच एकमेकींशी पटलंच नाही.
एकाच खोलीत राहूनही दोघी दोन वेगवेगळ्या बेटांवर राहात असल्यासारख्या मोठ्या झाल्या.
दोन सख्ख्या बहीणी कशा नसाव्या याचं उत्कृष्ट उदाहरण होत्या स्वरांगी आणि वेदांगी.
स्वरांगी एकपाठी, अभ्यासात अतिशय हुशार आणि वागा बोलायला स्मार्ट आणि बिंधास्त. गणित आणि सायन्स हे तिचे आवडीचे विषय.

तर वेदांगी लाजरीबुजरी, भाषा आणि इतिहास हे विषय आवडणारी, अभ्यासात जेमतेम. स्वरांगी हुशार आणि खूप बडबडी असल्याने सतत आईच्या मागे मागे असायची. वेदांगी बद्दल सतत काहीनाकाही तक्रारी करत राहायची. आणि आईलाही त्या खऱ्या वाटायच्या. स्वरांगीचं ऐकून आई वेदांगीला नेहमी ओरडायची. बाबांकडे काही ऐकून घ्यायला वेळच नसायचा.
त्यामुळे वेदांगीला खूप एकटं एकटं वाटायचं. राग यायचा.. रडू यायचं..आणि ती रडायला लागली की रडूबाई म्हणून तिला स्वरांगी खूप चिडवायची.
बिचारी वेदांगी भरल्या घरात एकटी पडायची.

मग शेजारी सुधाकाकूंकडे जाऊन मन मोकळं करायची. काकू तिला प्रेमाने जवळ घ्यायच्या, बोलतं करून तिच्या मनातलं सगळं शांतपणे ऐकून घ्यायच्या.
आईच्या मायेची उणीव काकू पूर्ण करायच्या आणि तिला शांत करून घरी पाठवायच्या.
जस जशा स्वरांगी, वेदांगी मोठ्या होत गेल्या तशी त्यांच्यातली भांडणं कमी होण्याऐवजी वाढतच गेली आणि वेदांगी काकूंच्या अजून अजून जवळ गेली.

स्वरांगी हुशार असल्याने उत्तम मार्कांनी इंजिनिअर झाली आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर जॉईन झाली. आता तिच्या हुशारीचा आईबाबांबर असलेला प्रभाव अजूनच वाढला.
स्वरांगीच्या कलाने घेत आईबाबा वेदांगीला अजूनच दूर लोटत गेले.
पुढे दोघींची लग्न झाली..
स्वरांगी तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत तर वेदांगी सागरबरोबर ऑस्ट्रेलियात सेटल झाली.

दोघींचेही संसार बहरले. पण आईबाबा आणि स्वरांगी एका बाजूला तर वेदांगी दुसऱ्या बाजूला असे गट पडले.
आईबाबा अमेरिकेत जाऊन येऊन असायचे, सतत स्वरांगीचं कौतुक करायचे आणि वेदांगीशी मात्र फटकून वागायचे.
वेदांगी घरीच तर असते पण स्वरांगीला मात्र घर, नोकरी सांभाळता सांभाळता किती काम असतं.. तरी ती कशी एकटीने सगळं व्यवस्थित मॅनेज करते, तिचं घर किती मोठं आहे.. तिची लेक कशी तिच्यासारखीच हुशार आहे..वगैरे वगैरे.. अमेरिकेतलेच गोडवे गात राहायचे.

खरंतर वेदांगी आणि सागरचंही खुप छान मोठं घर होतं. पण त्याबद्दल किंवा गौरव बद्दल ते कधीच असं भरभरून बोलायचे नाहीत.
गौरवलाही तो फरक कळायचा आणि त्याला हे आजी आबा फारसे आवडायचे नाहीत.
जे आपल्या वाट्याला आलं तेच गौरवच्याही येणार हे ओळखून वेदांगी मग आईबाबांपासून लांबच राहू लागली.
भारतात आली ती फक्त सागरच्या घरी राहू लागली.
वाढदिवसांना, सणासुदीला फोन करण्याशिवाय तिने आईबाबांशी फारसे संबंध ठेवलेच नाहीत.
पण सुधाकाकूंशी मात्र तिचे तसेच जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

इथे ऑस्ट्रेलियात कधी कोणा मैत्रीणीचे आईवडील भारतातून आले की वेदांगीचा जीव खूप तुटायचा. त्यांनी आपल्या लेकींचे, नातवडांचे केलेले लाड, कौतुक पाहिलं की आपल्याला आईवडील असूनही हे सुख का नाही आपल्या नशीबात असं म्हणून ती कुढत राहायची.
कधी कधी तर लहानगा गौरवही मला आजी आबा इथे यायला हवेत म्हणून हट्ट करायचा.
ते का नाही येत आपल्याकडे म्हणून रडायचा.

एकदा तर त्याने, “आई हे आजी आबा येत नाहीत आपल्याकडे तर आपण दुसरे कोणीतरी आजीआबा ॲडॉप्ट करूया का ?” म्हणून विचारलं आणि त्याचा तो निरागस प्रश्न ऐकून वेदांगीचा जीव तीळ तीळ तुटला.
तिलाही लहानपणी हे असेच काहीसे प्रश्न पडायचे आणि सुधा काकू प्रेमाने तिच्या मनातलं सगळं मळभ दूर करायच्या.
गौरवच्या या प्रश्नाने वेदांगीला खूप रडू आलं आणि सुधाकाकूंची तीव्रतेने आठवण आली.

सुधा काकूंना मुळबाळ नव्हतं आणि वेदांगीला आईवडलांचे प्रेम.. काका काकू जर इथे आले तर? या विचारानेच वेदांगी सुखावली आणि तिच्या आयुष्यातले काकूंचे महत्व माहीत असलेल्या सागरनेही तिला पाठींबा दिला.
मग ‘काकू तुम्ही जसं माझं बालपण जपलंत तसंच आता माझ्या लेकाचं बालपण जपण्यासाठी इकडे याच. आम्हाला तिघांनाही खूप गरज आहे तुमची” अशी तिने काकूंना गळ घातली.
काकांनाही खूप आग्रह केला. सुरवातीला ते दोघं तयार होत नव्हते.

तिथले राहाणीमान आम्हाला जमेल का? आमचा वेळ जाईल का? तब्येती चांगल्या राहतील का? अशा अनेक शंका त्यांनी घेतल्या. पण ते हो म्हणे पर्यंत वेदांगीने त्यांचा पिच्छा सोडलाच नाही.
शेवटी दोघं वेदांगी आणि गौरवच्या हट्टापुढे हारले आणि आज प्रत्यक्षात वेदांगीच्या घरी येऊन पोचले.
वर्षानुवर्षं आईच्या मायेसाठी झुरणाऱ्या वेदांगीसाठी आज सुधा काकू पुन्हा एकदा उभ्या राहिल्या होत्या.
आधी भूतकाळात आणि नंतर भविष्याची स्वप्न रंगवण्यात वेदांगीची रात्र सरली आणि पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.

उठल्यावर बघते तर काका बंगल्यासमोरच्या बागेत फेऱ्या मारत होते आणि काकू सागरच्या मदतीने सगळ्यांसाठी चहा करत होत्या.
“मला नाही का हाक मारायची सागर.. आणि काकू तुम्ही काय लगेच कामाला लागलात! ” म्हणत वेदांगी स्वैपाकघरात शिरली.
“अगं असू दे ग.. मी कुठे काय केलं? चहा तर तुझ्या नवऱ्यानेच केलाय.. पण आता पोहे मात्र मी करणारे हा… अगं जरा चार माणसं असली आजूबाजूला की करायला उत्साह येतो ग.. चल मला दाखव इथला गॅस कसा लावायचा ते.. ” काकू म्हणाल्या.. आणि चालू दे तुम्हा मायलेकींचं म्हणत सागर चहाचे दोन कप घेऊन बागेत गेला.
उठल्या उठल्या गौरवने आज्जुडी म्हणत काकूंना मिठी मारली.
ते दृष्य डोळे भरून पाहाणाऱ्या वेदांगीला आपल्या आयुष्यात सुखाचे नवे पर्व सुरू झाल्याची अनुभूती मिळाली.
********
समाप्त
कथेतल्या आईवडलांनी स्वरांगी आणि वेदांगीला दिलेली वेगेवेगळी वागणूक ही जरी पटायला अवघड असली तरी दुर्दैवाने ती काल्पनिक नाही. काही घरांमधे खरोखरीच अशी तुलनात्मक वागणूक बघायला मिळते. ‘आपल्याला आजी आजोबांना adopt करता येईल का?’ असा प्रश्न एका लहानग्याने खरंच विचारला आहे ज्यावरून ही कथा मी लिहिली आहे.
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
या कथेचे कुठल्याही स्वरूपाचे व्हीडीओ बनवण्यास लेखिकेची परवानगी नाही, इतरांच्या कथांवर स्वत:चे यू ट्यूब चॅनेल चालवणार्‍या व्हीडीओकारांनी याची नोंद अवश्य घ्यावी.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!