© अपर्णा देशपांडे
कलकत्ता ते मुंबई असा कंटाळवाणा प्रवास करून निलय थकला होता . बिजूच्या रूम वर जाऊन मस्तं आराम करावा असे त्याला वाटले , पण निग्रहाने त्याने तो विचार झटकला .
आजच विरार मधील सेनगुप्ता ने सांगितलेल्या सदनिकेत जाणे आवश्यक होते . नाहीतर मालक ती सदनिका दुसऱ्या कुणाला भाड्याने देऊन मोकळा होणार होता . अंगातला आळस झटकून पत्ता शोधत निलय पोहोचला , आणि त्याने हुश्श केलं . त्याला आवडली ती विरारची जागा .
मुंबई मधील तो विशिष्ठ गुदमरवून टाकणारा कोंदटपणा नव्हता इथे . छान मोकळी हवा होती .
विशेष म्हणजे इथून ऑफिस विसच मिनिटाच्या अंतरावर होते . फार अपेक्षा ठेवू नयेत , माणूस सुखी राहातो हे त्याचे आनंदाचे सूत्र होते , जे इथेही लागू होतेच .
मुंबईत मोकळे राहायला मिळतेय हेच खूप होते त्याच्यासाठी.
काही दिवसातच तो तिथे रुळला .
संध्याकाळी साडेसात पर्यंत तो घरी पोहोचे तेव्हा येतांनाच ‘ साई ‘ मधून पोळी भाजी चे पार्सल आणले की जेवण्याची चिंता नसे . आठ वाजेपर्यंत जेवायचे आणि मग मनसोक्त तबला वादन ……तबला , ……त्याचा श्वास !!
मुंबईला बदली झाल्याचे कळाले तेव्हाच त्याने बिजू मार्फत तबला डग्गा पुढे मुंबईला पाठवून दिला होता.
कला परम साधन ,
त्या विना व्यर्थ जीवन
ह्यावर त्याचा ठाम विश्वास होता .
त्याला कलकत्ता हे कलेशी बांधिलकी बाळगणारं शहर वाटे . त्याच्या मते फक्त तिथेच कलाकाराला योग्य सन्मान मिळून त्याला जिवंत ठेवले जाते …बाकी ठिकाणी तर .. पण आता इथे मुंबईत तसे कलाकार नव्याने शोधणं आलं .
त्याचा रियाज इतका तगडा होता की कलकत्त्यात तो मोठमोठ्या गायकांच्या मैफिलीत तो साथीला जात असे .
आजही त्याने तबला ‘ जमवला ‘ , वादी ठोकून घेतल्या , मोबाईल वर गोहरजान ची ठुमरी लावली आणि ताल धरला. वाजवत असतांना कुठून तरी विलंबित लयीतील आलाप कानी आला .
नकळत त्याचे कान त्या आवाजाकडे लागले ….आवाज खूप गोड होता …राग ….मारवा …ऐकून कळत होतं की रियाज जबरदस्त असणार …
भारावल्यासारखा तो खिडकीपाशी गेला . शेजारच्या फ्लॅट मधून कुणी गात होती . …….
इतके दिवस इथे रहातोय पण आजच कसा आला हा आवाज ?…. इतकी तयारी ? …सुरावर पक्की पकड .
कुणी कसलेली गायीका असणार . त्याने इकडून तिकडून बघायचा प्रयत्न केला .
बाहेरच्या खोलीत कुणी महिला गात होती . काचेतून फक्त तंबोरा आणि हात दिसत होता . तिथेच उभे राहून त्याने ते सूर आतपर्यंत झिरपू दिले … भिंतीला टेकून डोळे मिटून ….
अचानक तंद्री मोडली , गाणे थांबले होते . त्याची नजर पुन्हा समोर गेली .
कुणी पुरुष आलेला दिसत होता . असं दुसऱ्याच्या घरात वाकून पहाणे किती असभ्य आहे हे समजूनही चुकार नजर सारखी तिकडेच वळत होती .
नंतरचे दोन दिवस त्याने सतत कान देऊन ऐकले , पण गाण्याचा आवाज नाही आला . गॅलरीत कपडे वाळत घातले होते , फक्त पुरुषाचे .
त्याने आपल्या बिल्डिंग च्या सचिवांना त्याबद्दल विचारले .
” काय बाबू ? तुमचाही नंबर लागलाय का ‘ तिकडे ‘ ? ” छद्मी हसत सचिव महाशय बोलले .
” प्रत्येक वेळी कुठल्या महिलेबद्दल चौकशी केली की असाच अर्थ काढता का तुम्ही ? मी काय विचारतोय …तुम्ही काय बोलताय !! ” चिडून बोलला निलय .
एक दिवस बिजू जातांना त्याला निरोपादाखल हात दाखवायला तो बाल्कनीत गेला , तेव्हा समोरच्या ग्यालरीत एक महिला दिसली . अतिशय सात्विक रूप …. साधी सुती साडी …. ह्या काळातही केसांचा अंबाडा ….चाळीशीच्या आतलीच असावी . खास गृहिणी सारखी .
” तुम्ही निलय बाबू न ? “
तो आवाक ! माझं नाव माहितेय हिला ?
” हो … तुम्ही कसं ओळखलं ? “
” उस्तादजींनी सांगितलं . तुम्हाला ओळखतात ते . “
” उस्ताद अमन खां ? तुम्ही भेटलाय त्यांना ? फार सिद्धहस्त आहेत ते ! “
” हो आमच्या मैफिलीत तेच असतात साथीला . “
” वाटलंच मला त्या दिवशी तुमचं गाणं ऐकून . पण फक्त एकदाच ऐकलं मी …” उत्तर न देताच
अचानक ती आत गेली ……दारावर कुणी आले होते बहुतेक .
निलंय तिची वाट बघत तिथेच थांबला होता , त्याला तिच्याविषयी जाणून घ्यायचं होतं .
पण ती पुन्हा बाहेर आलीच नाही . तिचे वागणं गूढच वाटलं त्याला .
*****
आज निलय घाई घाईत आणि उत्साहात घरी वापस आला .
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रावणी सहानी यांच्या मैफिलीत तालिमीला साथ करायला बोलावणे होते .
साक्षात श्रावणीताईंचे गाणे असे जवळून ऐकायला मिळणार होते . तो अत्यंत खूष होता .
ही तर तालीम होती , खरा कार्यक्रम एक महिन्यानी होता .
ताईंच्या घरी सगळी वादक मंडळी जमली होती , गाण्याच्या जुगलबंदी साठी .
अधीर मनाने तो वाट बघत असतांना श्रावणीताई आल्या आणि ….आणि ..पाठीमागून…..ह्या.. .कोण ?……..ह्या तर …आपल्या समोरच्या बिल्डिंग मधील …त्या …..
तो आ वासून बघत होता …
” निलय , ह्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई . ” ताईंनी ओळख करून देत म्हटलं .
” नमस्कार ” त्याने अचंब्याने हात जोडले ….
अश्विनी ने देखील हसून उत्तर दिले .
” हो मी ओळखते , आमच्या समोरच्याच फ्लॅट मध्ये रहातात . ” त्याच्या मनाचा गोंधळ होत होता .
‘ ह्या अश्विनी ? सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका ? …..मग आपल्या सोसायटी चे लोक ह्यांच्याबद्दलअसे का बोलत होते ? ‘ त्याच्या मनात गोंधळ चाललेला असतांनाच ताईंनी मैफिल सुरू करायला सांगितले .
मस्तं जुळवलेला तानपुरा , ताईंचा कसलेला आवाज आणि त्याला अश्विनीच्या स्वराची साथ !! आहाहा !!
रुठे सैया , मानत नाही
ही यमन रागातील बंदिश !!!
आज तर तबला देखील गाण्याच्या रंगात बुडाला होता . खुलून साथ करत होता . तबल्याला देखील मूड लागतो साथ देण्यासाठी . कधी कधी कितीही हात फिरत ठेवला तरी मनासारखे बोल येतच नाहीत .
ऐकणाऱ्याला लक्षात येत नसेल , पण वाजवणारा असमाधानी असतो .
आज मात्र मस्तं जमलं होतं सगळं .
इतक्या सुरेल समाधी चा भंग करत मधेच अश्विनीचा फोन वाजला .
ती एकदम घाबरून उठली . फोन घेऊन बाहेर अंगणात गेली .
ताईंनी गाणे चालू ठेवा अशी खूण केली असल्याने तालीम थांबली नाही , पण निलंय चं लक्ष मात्र उडालं .
अश्विनी आत आली , घाईघाईने पर्स उचलली , आणि ताईंना निरोपाचा हात दाखवून निघाली देखील .
निलय ला थोडे विचित्र वाटले .
‘ कलाकार थोडे मनस्वी आणि विक्षिप्तच असतात ‘ असे आई मला म्हणायची . ते खरेच असावे बहुदा , असा विचार आला त्याच्या मनात .
तो साथ करत होता , पण लक्ष उडाले होते . तालीम झाल्यावर त्याने ह्याबद्दल ताईंना विचारले .
” अश्विनी चे आयुष्य एक ‘ रोलर कोस्टर राईड ‘ आहे . तुला काही बाही बोलतील लोकं . पण मी सांगते , विश्वास ठेवू नकोस अजिबात .” ताई पण गुलदस्त्यातच बोलली .
त्यानंतर अश्विनी पुन्हा आलीच नाही रियाझ करायला .
समोरच्या घरातही हालचाल जाणवली नाही .
जवळपास दोन महिने गेले असतील …
एका रात्री निलय गाढ झोपेत असतांना दारावर थाप ऐकू आली , आणि बेल पण.
दारात अश्विनी , अतिशय घाबरलेली .
” निलंय , प्लिज माझी मदत कर , हे काही दिवस तुझ्याकडे ठेव . मी जमेल तसे येऊन घेऊन जाईन . तुला नसेल जमत तर सकाळी ताईंकडे नेऊन दे …प्लिज !! ” हातातील डबा पुढे करत ती म्हणाली .
तिचा काकुळतीचा स्वर , आणि अवस्था बघून तो म्हणाला ,
” इतक्या रात्री तुम्ही कुठे निघालात ? “
” विरार च्या साई कॉलनीत माझी मैत्रीण राहते , तिच्याकडे जमते का बघते . “
” आत्ता अडचण असेल तर इथे माझ्या फ्लॅट वर राहू शकता . “
” अ s……नको ….मी करेन माझी सोय .”
” बारा वाजलेत मॅडम , एकट्या इतक्या दूर जाण्यापेक्षा इथेच राहा . “
” चालेल तुला ? म्हणजे सोसायटीतील लोक …. ” तिच्या आवाजात कंप .
” तुमची सध्याची अडचण सोडवणे जास्त महत्वाचे . बाकी चिंता मी करत नाही . ”
ती बिचकतच आत आली . लगेच बाजूच्या दोन फ्लॅट चे लाईट्स लागलेले दिसले .
त्याने बेफिकीर पणे तिकडे दुर्लक्ष केले , आणि तिच्या हातातील बॅग घेतली , आणि आत गेला .
आतल्या खोलीत तिला एक गादी टाकून दिली , आणि स्वतः बाहेर आला त्याचे पांघरूण घेऊन .
” तुम्ही झोपा आत . एक कॉट आहे . दार लावून घ्या . मी बाहेर झोपतो . “
तो बाहेर पहुडला , पण झोप लागेना .
‘का आली असेल ही इतक्या रात्री ? आपणही काहीच विचारले नाही .
‘का ? का नाही विचारले ? अलिप्तता म्हणून की प्रश्न विचारून तिला अडचणीत टाकू नये म्हणून ? ‘ तो स्वतःशी बोलत असतांनाच ती बाहेर आली .
” झोप येत नाहीये न ? मला पण नाही येतंय .” ती .
” ओह ! या ना . बसा . ….एक विचारू ? “
” इतक्या रात्री घर सोडून का आले हेच ना ? “
” नाही , तुम्हाला त्रास होणार असेल तर राहु देत . “
” सगळ्या त्रासाच्या पलीकडे गेलेय मी आता . दोन महिन्यांपूर्वी मी तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहात होते . तो माझा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट होता . “
” होता म्हणजे ? “
” कैलास ने , माझ्या नवऱ्याने परस्पर विकला तो . आज थोड्या वेळापूर्वी समजले मला . माझ्या सह्या त्याने कधीच घेतल्या होत्या ,मला फसवून . “
” पण गेले दोन महिने तुम्ही कुठे होतात ? “
” युरोप दौरे करत होते . खूप मोठी कहाणी आहे …. सांगायला लागले तर सकाळ होईल . “
” श्रावणी ताईंना पण माहिती नव्हते तुम्ही कुठे होता ते ? “
” नाही . त्या दिवशी तालीम सुरू असतानाच मला एक फोन आला होता , आठवतं ? …..तो कैलासचाच होता . त्याने मला न सांगता युरोप टूर ठरवला . आठ शास्त्रीय गाण्याच्या मैफिलींचे पैसे स्वतःच ऍडव्हान्स घेतले देखील . “
” तुम्हाला आधी न सांगता ? “
” हं !! मला? कधीच नाही !! माझे सगळे कार्यक्रम तोच ठरवतो ……पैसेही तोच घेतो . कधी कधी योगेंद्रनाथ त्याच्या कडे न देता रक्कम मला देतात , इतकंच .”
” तुम्ही नकार द्यायचा न मग ..नाही गाणार म्हणावं …म्हणजे .. जर इच्छे विरुद्ध असेल तर .. “
” काश ऐसा हो पाता . “
” ….?? “
” माझ्या एका वचना मुळे गप्प आहे मी . ..मी मूळची भुवनेश्वर ची . आमचं घराणच गाणारं . …ती सांगू लागली …..
अश्विनी भुवनेश्वर मधील एका प्रसिद्ध घराण्यातील ज्येष्ठ संगीत साम्राटाची मुलगी . तिच्या वडिलांचे बालमित्र पंडित आनंद श्रीवास्तव हे देखील अतिशय प्रसिद्ध गायक . भुवनेश्वर मध्ये त्यांचा दबदबा .
अशा स्थितीत अश्विनीवर देखील संगीत क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्याची जबाबदारी होती .
तिला तिच्या कुमार वयातच धृपद गायकीत नाव कमावण्यासाठी ग्वाल्हेर ला पाठवण्यात आले . तिथे उस्ताद अमिनुद्दीन कागर यांच्या कडे तिचे शिक्षण सुरू झाले . वय फक्त बारा वर्ष . इतक्या लहान वयातही तीला गाण्याची आणि आपल्या घरच्या परिस्थिती ची खूप जाणीव होती .
अशातच एका अपघातात तिचे वडील आणि लहान भाऊ गेले . आई विना वाढलेली पोर पोरकी झाली होती .
मग वडिलांचे परम मित्र आनंद श्रीवास्तव तिला आपल्या कडे घेऊन गेले . ते देखील नावाजलेले गायक होतेच . अश्विनी च्या वडिलांची प्रॉपर्टी , तेथील मौल्यवान वस्तू आणि तिच्या आईचे दागिने ह्याची ती एकटी मालकीण होती .
आनंद काकांकडे तिचे मन रमत नव्हते .
पण भुवनेश्वर च्या तिच्या एव्हढ्या मोठ्या घरात एकटी रहाण्याची सोय नव्हती .
मधेच आठवण आली की ती आनंद काकांना सोबत घेऊन आपल्या घरी जाई .
एकेकाळी वैभव मिरवलेली वास्तू आता फार उदासवाणी वाटे . तिच्या घरा शेजारीच दीपेन रहायचा ….
” दीपेन कोण ?” अश्विनीची कहाणी मन लावून ऐकणाऱ्या निलंय ने विचारले .
” भुवनेश्वर मध्ये आम्ही एकाच वर्गात होतो , . त्याची आई , भावी काकी माझे खूप लाड करत असे . मग मी वारंवार दीपेन कडे जाऊ लागले . तो सतार उत्तम वाजवत असे . …त्यांची गुलाबाची शेती होती…आयुष्यात कुणाचा तरी प्रेमळ आधार शोधणारी मी …दीपेन च्या प्रेमात पडले . ….”
“मग?”
“आनंद काकांना हे आवडत नव्हते . त्यांना वाटे की माझ्या प्रॉपर्टी साठी भावी काकी मुद्दाम मला आणि दीपेन ल प्रोत्साहन देतात . काकींचा माझ्या प्रॉपर्टी वर डोळा आहे असा गैरसमज झाला होता त्यांचा . त्यांनी मला ताकीद दिली की मी दीपेनशी जवळीक वाढवली तर माझी रवानगी महिला आश्रमात करतील.
नंतर काही महिन्यात मी अठरा पूर्ण झाले .
काकांचा भाचा कैलाश नेहमी त्यांच्याकडे येत असे . अत्यंत वाह्यात , जुगारी आणि घाणेरडा कैलाश , पण काका मात्र त्याच्यावर खूष होते .
कैलाश आपल्या काकांकडे मुद्दाम रहायला आला , आणि मला त्याचा त्रास होऊ लागला .
तशातच काकांचा आजार खूप बळावला .
मी त्यांची खूप मनापासून सेवा केली , पण त्यांना आपला शेवट दिसू लागला असावा.
……आज बऱ्याच काळानंतर अश्विनी कुणाजवळ मन मोकळं करत होती .
बाहेर मुसळधार पाऊस बरसत होता , आणि आत अश्विनीच्या आठवणी .
‘निलंय ने दोघांसाठी कॉफी बनवून आणली .
‘अश्विनी’ हे कोडं हळू हळू उलगडत होतं .
कॉफी घेता घेता त्याने विचारले , “कैलाश मधील दोष काकांना दिसत नव्हते का ? “
” दिसत असतीलही कदाचित , पण ते गलीत गात्र झाले होते …….एक दिवस काकांची तब्बेत खूप खराब झाली , श्वास अडकला , मी पळत जाऊन डॉक्टर ला फोन केला . कैलास ने त्यांना एका अंगावर वळवले . मी त्यांच्या जवळ गेले , त्यांचा हात हातात घेतला . कैलास शेजारीच होता . अचानक त्यांनी माझा हात उचलून कैलाश च्या हातात दिला .”
” ओह नो !!” निलय ची स्वाभाविक प्रतिक्रिया .
” त्याला म्हणाले , वचन दे तू हिला कधीच अंतर देणार नाहीस . …..मी हात सोडवायचा प्रयत्न करत होते तर मलाही तसंच वचन मागितलं ….मी हो म्हणत नव्हते …..त्या काही सेकंदात माझं आयुष्य बदलण्याची ताकद होती . ….मी काही बोलणार इतक्यात …त्यांच्या छातीत एक असह्य कळ आली आणि मी घाबरून हो म्हणाले ….त्यांनी काही क्षण स्थिर बघितलं आणि …”
” हा तर आयुष्याचा सौदाच झाला .”
” माझ्यासाठी ते सगळंच फार भयानक होतं ……खरं सांगू? मी वचन तोडून टाकणार होते . दीपेन आणि भावी काकी असतांना हे असलं काही सामोरं येईल अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती .
पण कैलाश ने वारंवार विनंती करून खात्री दिली की तो सगळ्या वाईट गोष्टीपासून दूर राहील . मला खूप सुखी ठेवील ……आणिक एक म्हणजे हे की तेव्हा दीपेन तिथे नव्हता . शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर होता .
शिवाय त्याने मला कधीच त्याच्या भावना बोलून दाखवल्या नव्हत्या . तो गप्पच होता . त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होते हे मी त्याच्या वागण्यावरून जाणले होते , पण तो लग्नाबाबत किती गंभीर होता ….माहीत नव्हतं..” तिने सुस्कारा सोडला .
” त्या वेळेला दीपेन ची प्रतिक्रिया काय होती ? “
” त्याने मला कधीच त्याच्या मनातलं काहीच बोलून दाखवलं नाही …..मी आतून कोलमडले होते . काकी नी सरळ बोलून दाखवलं की त्यांची इच्छा होती मला सून करून घेण्याची . …तरीही मी कैलाश शी लग्न केलं ……लगेचच माझ्या प्रॉपर्टी चे सगळे कागदपत्र कैलाश ने त्याच्या ताब्यात घेतले . इतकच काय , अधिकार दाखवला माझ्या गळ्यावर , गाण्यावर , कार्यक्रमाच्या निवडीवर सगळ्यावरच !!! आता माझाच पैसा मलाच महाग झालाय . शिवाय माझ्या चारित्र्याबद्दल वाट्टेल ते बोलतो . मी कुठलीही ‘तडजोड’ करून गाण्याचे कार्यक्रम मिळवते, त्यासाठी वाटेल त्या थराला जाते असे ही पसरवले त्याने . खूप हिम्मत लागते हे सगळं पचवायला.”
” हो , खरच . पण तुमचं भुवनेश्वर चं घर?”
” विकलं त्याने केव्हाच !!”
” पण इतका पैसे कुठे घालवतो तो?”
” त्याला लागतो , कारण त्याचं लग्न झालंय !!! . माझ्याशी लग्न करण्या आधी त्याचं लग्न झालं होतं . मला आणि काकांना त्यानं अंधारात ठेवलं होतं .”
निलंय साठी हा आणखीन एक झटका होता .
हे सगळं ऐकून निलंयला गरगरायला लागलं . कुठून कसा प्रवास झाला हिचा !! काय वादळवाट तुडवलीय हिने !!! तरीही आपल्यातली ऊर्जा कशी तेवत ठेवते ही? अशा स्वरांची ताकद बाळगणाऱ्या स्त्रीने हा कैलाश सारखा गळ्यातील काटा का सहन करावा ? …निलंय ला ते सगळं असह्य झालं .
तो सुन्न बसला होता .
” सकाळ झालीये , मी निघू का ?” तिने आवरतं घेत विचारलं .
” पण जाणार कुठे ?”
” माझे कार्यक्रम आयोजित करणारे …ते योगेंद्रनाथ नाही का ….ते …स्वरसागर महोत्सवात भेटले होते , त्यांच्याकडे जातेय . माझी काही रक्कम त्यांच्याकडे बाकी आहे . शिवाय हे दागिने आहेतच ….त्यानंतर भुवनेश्वर ला जाईन . तिथे मनाला जी शांतता मिळते ती कुठेच मिळत नाही .”
” कैलाश चं काय? तो इतक्या सहजा सहजी सोडेल तुम्हाला ?”
“त्याचं लग्न झालंय हे सांगून त्याने माझ्यावर मोठे उपकार केले आहेत …खरंच !! माझा पवित्राच बदलला . आत्ता मला कळतंय की आमचे मॅरेज सर्टिफिकेट बनवतांना त्याने इतकी दिरंगाई का केली होती . आम्ही कायद्याने नवरा बायको होऊच शकत नाही . मी फार मोठ्या ओझ्यातून मोकळी झालेय . काकांना मरतांना दिलेले वचन मी माझ्याकडून निग्रहाने पाळले होते . हे सगळं मी आजवर फारसं कुणा जवळच बोललेली नाही . आज तुमच्याजवळ बोलून फार हलकं वाटतंय …..तुमचे आभार नाही मानणार , त्या ऋणातच राहुदेत मला .. येते मी .”
” आभार मानण्या सारखं मी काहीच केलेलं नाही . पण एक विचारू ? मॅडम , आज जी ताकद तुम्ही गोळा केलीय ती आधीच काही वर्षांपूर्वी केली असती तर …..”
” पिंजऱ्याचा दरवाजा ऊघडला जाऊ शकतो हे पक्षाला माहीतच नसतं . जर दरवाजा उघडण्याची कला त्याला कळाली तर मग मात्र …” म्हणून मंद हसली ती .
अश्विनी गेली . जातांना तिने निलंय ला तिच्या वडिलांचे गळ्यात बांधायचे साखळीतले घड्याळ भेट दिले .
तिच्या जवळ असलेल्या मोजक्या जीव्हाळ्याच्या वस्तूतील एक ! जातांना चार पावलं पुढे जाऊन मागे फिरली , निलंय चा हात हातात घेऊन थोपटला आणि झपाट्याने बाहेर पडली .
क्रमश:
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
Thodkyat pan sunder katha.. vichar karayla lavel ashi..mast. thank you lihinya sathi.
Thank you so much !