हे सगळं तुझंच तर आहे

© धनश्री दाबके
सकाळी मंगेश जागा झाला तोच कापराच्या आणि होमाच्या सुगंधाने.
आज गुरुजी लवकर उठले वाटतं… गुरुजी…स्वप्नीलच्या मित्रांसारखे आपणही त्याला गुरुजीच म्हणायला लागलोय की हल्ली. या विचाराने स्वतःशीच हसत मंगेश उठून बाहेर आला तर देवांच्या खोलीत..हो काळ्यांच्या घरातली एक खोली खास देवघरासाठी राखीव होती. त्यासाठी कविताने किचनला ओपन किचनमधे बदललं होतं..तर देवांच्या खोलीत स्वप्नील अतिशय सुरेख लयीत, स्वच्छ उच्चारात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणत होता आणि तिथेच खुर्ची टाकून बसलेले आबा मन लावून ते ऐकत होते.

स्वप्नील ते म्हणतच असे होता की देव्हाऱ्यातल्या फुला माळांनी सजलेल्या मूर्तींचे चेहरे आज अजूनच तेजस्वी भासत होते. आजची सकाळ एका वेगळ्याच प्रसन्नतेने सजली होती.
मंगेश, कविता आणि आबा तिघांसाठीही ही अनुभूती काही नवी नव्हती. स्वप्नील बरेचदा पहाटे उठून अशी साग्रसंगीत पूजा करायचा. अंगारकी, एकादशी, महाशिवरात्री, नवरात्री, गौरी गणपती हे आणि यासारखे अनेक असे अनेक खास दिवस असायचे. तेव्हा स्वप्नीलचा उत्साह अगदी बघण्यासारखा असायचा.
देवांना तो इतकं सुंदर सजवायचा की पूजा करावी तर फक्त त्यानेच असा भाव आपोआपच बघणाऱ्याच्या नजरेत उमटायचा आणि देवघरातल्या प्रसन्नतेने मन भारावून जायचे.

लहानपणापासूनच स्वप्नील देवपूजेत रमायचा. आबा पूजा करायले लागले की त्यांच्या मागे मागे असायचा. ते करत असलेले अभिषेक, होम हवन सगळं अगदी निरखून बघायचा.
आबा म्हणत असलेले मंत्र सारखे कानावर पडून पडून पाठ झाल्याने त्यांच्या बरोबर ते म्हणायचे प्रयत्न करायचा.
मोठा झाला तसा रोजची पूजा, कुळाचार सगळं काही स्वप्नील आबांसारखंच साग्रसंगीत करायला शिकला होता. अगदी एकाग्र होऊन स्वप्नील देवपूजा करायचा.
खरंतर काळ्यांच्या घरात तसे सगळेच देवाचं करणारे होते. आबा, आई, मंगेश स्वतः आणि त्यांच्यासोबत राहून कविताही.. सगळेच कुळाचार, देवधर्म, व्रतवैकल्ये अगदी मनापासून करायचे. पण स्वप्नीलची गोष्ट काहीतरी वेगळीच होती.

आबा तर म्हणायचे की त्यांचे भिक्षूकी करणारे वडीलच स्वप्नीलच्या रूपाने परत आले आहेत.
आजही मंगेश स्वप्नीलने केलेली सुरेख पूजा पाहात होता. हल्लीच्या काळात जिथे तरूण मुलामुलींना देवाला साधा नमस्कार करायचीही आठवण करून द्यावी लागते तिथे हा आपला इतकी देवभक्ती करणारा हुशार मुलगा पाहून मंगेशचा उर भरून आला. बरं फक्त हेच नाही तर अभ्यासातही स्वप्नील हुशार होता. गेल्याच वर्षी चांगल्या मार्कांनी इंजिनिअर झाला होता. मात्र सध्याच्या अफाट स्पर्धेच्या युगात थोडासा मागे राहिला होता.

गेले वर्षभर नोकरीसाठी प्रयत्न करत होता स्वप्नील पण काम होत नव्हते. त्याच्या मित्रांसारखा तो कॅम्पस इंटरव्हूमधे पास झाला नव्हता. तेव्हापासूनच बाकीचे सगळे पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो ही भावना त्याला छळत होती.
आईवडलांनी इतक्या कष्टांनी फी भरली आणि मी मात्र शिकून त्यांच्यावर फक्त ओझं बनून राहिलोय याचा त्याला त्रास होत होता. कधी कधी त्याचा तो त्रास इतका उफाळून यायचा की मंगेश आणि कविताला फार अपराध्यासारखं वाटायचं. आपलंच वागणं ती दोघं चेक करत राहायची.

आपल्या तोंडुन स्वप्नीलला लागेल असा एकादा शब्दही जाऊ नये यासाठी धडपडत राहायची. आताही मंगेशने ह्याच्या नोकरीचं काम लवकर होऊ दे रे गजानना असं म्हणून हात जोडले आणि तो स्वैपाकघरात आला.
“आज काय विशेष? महाराज इतक्या लवकर पूजेला लागलेत ते? ” त्याने पोळ्या लाटणाऱ्या कविताला विचारलं.
“अरे..आज पासून तो अभ्यंकर गुरुजींबरोबर जायचं म्हणतोय ना. त्यांचा असिस्टंट म्हणून. परवा आपल्याला सांगत नव्हता का की त्यांनी विचारलंय म्हणून” कविता म्हणाली. त्यावर काहीच न बोलता कविताने ठेवलेला चहाचा कप उचलून मंगेश हॉलमधे निघून गेला.

थोड्याच वेळात स्वप्नीलला अभ्यंकर गुरुजींचा ते बिल्डींगखाली आले असल्याचा फोन आला. येतो म्हणून स्वप्नील त्यांच्याबरोबर त्यांच्या टू व्हीलरवर बसून निघून गेला.
“आबा, आता हा ऐकत नाही म्हणून. नाहीतर मला याचा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. इतकी काही गरज नाहीये लगेच पैसे कमवायची. आपण आहोत ना त्याच्या पाठीमागे समर्थपणे..आणि तो करतोयना तो फायनॅन्सचा कोर्स. मग मिळेल की नोकरी. कधी कधी ना फारच विचित्र वागतो हा मुलगा. आता काय हा पौरोहित्य करणार का?” वैतागून मंगशने मन मोकळे केले.

“अरे, त्याच्या पैशांची गरज तुला नाहीये पण त्याला आहे ना.. तुझे सुरवातीचे दिवस आठव जरा..मीही तुला हेच सांगितलं होतं ना.. बॅंकेच्या परिक्षा देतोयस तर होईल तिथे काम.. पण तरी तो रिझल्ट लागेपर्यंत तू केलंसच ना माझ्या मित्राच्या दुकानात काम..मलाही तेव्हा असंच वाटायचं की मी जे कमावतोय ना मग तुला काय गरज अशा छोट्यामोठ्या नोकऱ्यांची. पण तुला तेव्हा ते पटलं होतं का? तसंच आहे हे. स्वप्नीलची ही अस्वस्थता, तगमग, मागे राहिल्याची टोचणी हे सगळं तुझंच तर आहे..तुझ्याकडूनच गेलंय ते त्याच्याकडे. खाण तशी माती..आणि त्याला खरंच आवड आहे या सगळ्याची. परवाच आपले ते वरचे..कोण ग कविता ज्यांच्याकडे लघुरूद्र झालं ते?.” आबांनी विचारलं..
“वरचे कुलकर्णी, आबा” कविताने आतूनच सांगितले.

“हा ते कुलकर्णी म्हणाले की परवा आमच्याकडे लघुरूद्र होतं तेव्हा स्वप्नीलने अगदी गुरुंजीच्या तोडीसतोड सगळे मंत्र म्हंटले. किती पाठांतर आहे त्याचं. अगदी विशेष आहे हो..नाहीतर माझा लेक. साधं आचमन करायचाही उजेड आहे त्याचा. तेव्हा ज्याला जे आवडतं त्याला ते करू द्यावं. स्वप्नीलने अगदी पूर्णवेळ पौरोहित्य केलं तरी काय हरकत आहे?
हल्लीच्या जगात मनापासून चांगली पूजाअर्चा करणाऱ्यांची गरज आहेच समाजाला. स्वप्नील अतिशय छान करतो सगळं. मंत्रांचे उच्चारणही अगदी तुझ्या आजोबांसारखं शुद्ध आणि स्पष्ट असतं त्याचं. तेव्हा उगीच त्रागा न करता त्याला समजून घे. जसं मी आणि आईने तुला घेतलं होतं तसं.
मला खात्री आहे तो जे काही काम करेल ते मेहेनतीने आणि सचोटीने करेल. मग ती नोकरी असो किंवा पौरोहित्य. दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने गेला तरी त्याची भरभराटच होणार.”

आबांचं बोलणं ऐकून मंगेशला स्वप्नीलमधे स्वतःचच प्रतिबिंब दिसलं. उलट स्वप्नीलला माझ्यापेक्षा जास्त कॉंपिटिशनला सामोरं जावं लागतयं. त्यामुळे मलाही आबांपेक्षा जास्त समजूतदारपणा दाखवायला हवा. बरं झालं आबांनी आज मला आरसा दाखवला ते.
“बरोबर आहे आबा तुमचं म्हणणं.. मला स्वतःचे दिवस आठवायला लावलेत ते फार बरं झालं..मी उगीचच चिडलो त्याच्यावर. चुकलंच जरा” असं म्हणून मंगेश परत देवासमोर जाऊन उभा राहिला,
‘देवा जे माझा लेक जे करेल त्यात त्याला यश मिळू दे रे आणि मला त्याचा बाप म्हणून जास्त समजूतदारपणाही मिळू दे.. शेवटी आम्ही सगळे तर फक्त निमित्तमात्र आहोत. हे आमचं म्हणून जे काही आहे ते सगळं फक्त तुझं आणि तुझंच तर आहे.’
********
© धनश्री दाबके
या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करतांना कृपया नावासकटच शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!