चकवा

© वैशाली जोशी
“शाळेतून घरी परतत असताना रस्त्यात एक वयस्कर भिकारी दिसला. माझ्याकडे बघून काही खायला मागू लागला. मला दया आली अन् मी त्याला जवळच्या कॅन्टीनमधून दोन समोसे आणून दिले.
आता मात्र तो ते न खाता पाणी मागू लागला…. मला जरा विचित्रच वाटलं … मी तिथून निघून जाऊ लागले तर तो भिकारी माझ्या मागे येऊ लागला.
“तहान तर तुलाही लागली असेलच ना! चल पाणी पिऊ” असे म्हणत तो आता पुढे झाला अन् त्याने इशाऱ्याने मला आपल्या मागे येण्याची खूण केली.

अचानक काय झालं माहित नाही पण मी देखील अगदी भारावल्यासारखी त्याच्या मागे-मागे जाऊ लागले. किती वेळ, किती अंतर चालले असेन मला माहित नाही. त्या माणसाने मला तलावाजवळ नेले आणि पाण्यात ढकलून दिले.
पुढचं मला काहीच आठवत नाही…. जागी झाले तेव्हा मी एका अनोळखी ठिकाणी होते…. अगदी निर्मनुष्य भागात… जणू जंगलच!”
रमणीनं आपलं बोलणं संपवलं अन् पोलीसबाईंनी खूण करताच समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला.

“चकवा तो! चकवाच लागला होता माझ्या सोनूला!!”आजी जवळजवळ किंचाळलीच…”देवाची कृपा म्हणून पोर सुखरूप आहे हो! नाहीतर आधीच एकुलती एक… आईबापानं काय केलं असतं?” आजीनं वर बघून हात जोडले अन् हाताची दहाही बोटं कानशीलावर मोडत नातीची अलाबाला घेतली. लगेच देवघरात जाऊन अंगारा आणला अन् तिच्या कपाळावर लावला.
पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत जामनिक आणि त्यांच्या सहायक हवालदार सुमित्राबाई काळे विनायक महाजन ह्याच्या प्रशस्त हॉलमधील सोफ्यावर बसून हा सगळा प्रसंग लक्षपूर्वक पाहत होते.

रमणी चौदा वर्षांची… आईबाबांची एकुलती एक मुलगी…. दिसायला गोरीपान, नाजूक जिवणी, केसांचा बॉबकट … अगदी अप्सराच जणू!
तिचे आईबाबा दोघेही आपापल्या कामात व्यस्त… दोघेही खोऱ्यानं पैसा ओढत. घरी म्हातारी आजी अन् कामाला नोकर-चाकर… पैश्याने सधन असल्याने रमणीच्या सगळ्या गरजा आणि हौशी पूर्ण होत!
दोन दिवसांपूर्वी शाळेत गेलेली रमणी रात्र झाली तरी घरी आलीच नाही. पाच वाजता शाळा संपली की मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार असं सांगून गेलेली आपली नात रात्री आठपर्यंत घरी आली नाही म्हणून आजी घाबरली अन् आपल्या मुला-सुनेला फोनवरून ह्याची कल्पना दिली.

रमणीचे आईबाबा सगळी कामं सोडून तातडीने घरी आले. सगळीकडे शोधाशोध सुरु केली. तिच्या मोबाईलवर फोन केला तर फक्त रिंग जात होती… फोन उचलल्या जात नव्हता.
तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली. कुणालाच रमणीबद्दल काहीच माहिती नव्हती. ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिला फोन केला तर आज तिचा वाढदिवस नाही असं कळलं.
सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी करून झाली, शाळेतदेखील बघून झालं… रमणी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पण गेली नाही हे कळताच विनायकरावांचा धीर सुटला…

रात्रीचे अकरा वाजले तरी रमणी घरी परतली नव्हती…. तिचा फोन बंद येत नव्हता हाच काय तो एकमेव दिलासा.
एव्हाना रमणीची गावात राहणारे काका-काकू पण रमणीच्या बेपत्ता होण्याची बातमी कळताच हजर झाले.
भावाच्या सल्ल्याने विनायकरावांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
पोलीस निरीक्षक प्रशांत जामनिक ह्यांनी सगळी केस लिहून घेतली… रमणीची माहिती, वर्णन, मोबाईल नंबर आणि फोटो मागवला.

काही वेळातच तिच्या मोबाईलचं लोकेशन मिळाल्याचा निरोप आला अन् इन्स्पेक्टर प्रशांत त्यांच्या टीममधील स्त्री सहकारी सुमित्राबाई, एक हवालदार आणि रमणीच्या वडील आणि काकांसह त्या लोकेशनच्या दिशेने निघाले.
भिरंगी तलावाजवळ मोबाईलचं लोकेशन मिळालं तिथे पोहचताच टॉर्चच्या उजेडात त्यांना रमणी दिसली. तलावाच्या काठाजवळ गुढघ्यात तोंड खुपसून बसलेली.
बाबांना पाहताच तिचा धीर सुटला अन् पटकन जाऊन त्यांच्या कुशीत शिरली.

तिचा पहिला आवेग ओसरताच इन्स्पेक्टर प्रशांत ह्यांनी सूत्रं हातात घेतली. त्यांनी आदेश देताच हवालदार सुमित्राबाईंनी तिचं निरीक्षण करायला सुरुवात केली.
अंगात पोलकी डॉट्स चा गुडघ्यापर्यंत असलेला . ओलसर आणि बाहीमध्ये जरा उसवलेला भारीतला फ्रॉकवजा ड्रेस,विस्कटलेले केस, रडून सुजलेले डोळे आणि हातापायावर लालसर खुणा…. हवालदार सुमित्राबाईंनी इन्स्पेक्टर प्रशांतकडे सुचक नजरेनं बघितलं!
विनायकरावांच्या विनंतीवरून इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीला थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन न जाता त्यांच्या घरीच नेण्याची परवानगी दिली.

रमणीनं घरी पोचल्यावर सगळी आपबीती सांगितली. एव्हाना पहाटेचे चार वाजत आले होते. सगळ्यांना आराम करायला सांगून पोलीसांच्या चमूने विनायकरावांचा निरोप घेतला.
जाताना इन्स्पेक्टर प्रशांत हॉलमधून डाव्या हाताला असलेल्या आजीच्या खोलीत सहज म्हणून डोकावले अन् मनाशी काहीतरी विचार करत उजव्या हातातली छडी डाव्या तळहातावर आपटत निघून गेले.
दुसरे दिवशी दुपारी तीन वाजता इन्स्पेक्टर प्रशांत हवालदार सुमित्राबाईसह पुन्हा विनायकरावांच्या बंगल्यावर हजर झाले त्यामुळे समोरच सोफ्यावर लोळत असलेली रमणी जरा घाबरली अन् तोंड लपवत आतल्या खोलीत निघून गेली.

“आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार इन्स्पेक्टर साहेब! आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली. आता ही केस बंद करूया!” विनायकरावांनी सूचना केली.
“नाही… ही केस इतक्यात नाही बंद करता येणार! मला ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल” इन्स्पेक्टरने ठामपणे सांगितलं अन् हॉलचा पडदा भीतीने थरथरला.
“रमणीला बोलवा” सोबत आलेल्या हवालदार सुमित्राबाईंनी हाक दिली.

काही वेळातच रमणी तिच्या आजीच्या पदराशी चाळा करत हजर झाली.
“हम्म… तर तो म्हातारा भिकारी कुठे भेटला म्हटलीस?”
“उम्म… शाळेजवळ” रमणी चाचरत उत्तरली.
“अच्छा! मग त्या भिकाऱ्यासाठी समोसे कुठल्या हॉटेलमधून आणलेस?”
“सुरज कॅफे मधून”….

“हम्म… मग पुढे…”
“सांगितलं ना त्यानं पाणी मागितलं… मी निघाले तर तो माझ्या मागे मागे येऊ लागला…. मला खूण केली… मग मी त्याच्या मागे मागे…”
“अरे हो! तू हे सांगितलंस आम्हाला रात्री… नाही का!” इन्स्पेक्टर प्रशांतने तिचं बोलणं अर्ध्यातच तोडलं.
“सूरज कॅफेच्या मालकाचं लग्न होतं काल म्हणून कॅफे बंद आहे तीन दिवसांपासून” हवालदार सुमित्राबाईंनी बॉम्ब फोडला अन् रमणीच्या तोंडाचा आ वासलेलाच राहिला…

“शिवाय रमणी गेल्या चार दिवसांपासून शाळेत जात नाहीये…तिच्या सरांनी माहिती दिलीय. आणि हा सुशांत कोण आहे?” इन्स्पेक्टर प्रशांतने शेवटचा घाव घातला अन् रमणी नखशिखान्त हादरली.
“सुशांत… मला नाही माहित… म.. मा.. झा… काय संबंध? मला चकवा लागलेला…. त्यानंच मला पाणी मागितलं अन् तलावात बुडवलं! हो… हो.. ना… आजी…!”
“चकवा वगैरे असं काही नसतं! आता खरं काय ते तू सांगतेस की मी सांगू?” इन्स्पेक्टर प्रशांतने दरडावणीच्या सुरात विचारलं.

आता मात्र रमणीचा धीर सुटला अन् ती ओक्साबोक्शी रडू लागली.
“सुशांत माझा शाळेतला मित्र. मला दोन वर्ष सिनियर…. एक वर्षांपूर्वी आमची ओळख झाली…. तो माझी खूप काळजी घेतो… त्याच्या सहवासात मला एकटं नाही वाटत. नाहीतर घरी मी एकटीच… माझ्या आईबाबांना माझ्यासाठी वेळ नाही पण सुशांत माझ्या सोबत असतो… त्याला माझा सहवास आवडतो अन् मला तो…
मागच्या महिन्यात त्यानं मला प्रपोज केलं. मी तर अक्षरशः हवेत होते. आम्ही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्याने मला त्याच्या घरी नेलं. 

त्याचं घर अगदी लहान आहे…. दोन खोल्यांचं…ते….त्या पलीकडच्या झोपडपट्टीमध्ये…. पण त्यांचं मन मात्र फार मोठं.त्याची फॅमिली खूप आवडली मला …माझ्या स्वप्नातलं माझं कुटुंब! त्याच्या आईने मला ‘सूनबाई’ अशी हाक मारली अन् मी अगदी हरखून गेले.
आता आम्ही शाळा बुडवून बाहेरही फिरू लागलो. अर्थातच माझ्या घरी कळू न देता…. कारण आमची श्रीमंती आपल्या प्रेमाच्या आड येऊ शकते असं सुशांत म्हणाला. म्हणून आजीचा डोळा चुकवून आम्ही भेटत असू… मोबाईलवर तासन्तास गप्पा मारत असू.”
“ह्याबाबतीत तुम्हाला काही माहिती आहे?” इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीच्या आईला वीणाताईंना विचारलं तर त्यांनी मान खाली घातली तर हे सगळं ऐकून विनायकरावांचा पारा चढला होता.

ते काही बोलणार इतक्यात इन्स्पेक्टर प्रशांतने विनायकरावांना रोखलं अन् रमणीला पुढे बोलण्याची खूण केली.
“आईला कसं माहित असणार हे सगळं? ती सतत तिच्या ऑफिस मध्ये अन् नंतर मोबाईल मध्ये बिझी असते. माझ्याकडे पाहायला वेळ कुठाय तिला?” रमणी उपहासानं बोलली… अन् बाबा त्यांच्या बिझनेस डील्स मध्ये गुंग असतात त्यांना मुलीपेक्षा टर्नओव्हर महत्वाचा!”
“त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तू गावाच्या बाहेर कशी गेलीस ते सांग ” विनायकराव दातओठ खात ओरडले. रमणीनं काल जी घटना सांगितली त्यात काहीतरी गौडबंगाल आहे ह्याची कल्पना एव्हाना त्यांना येऊ लागलेली….

“काल सुशांतचा वाढदिवस होता. त्यानं मला गिफ्ट मागितलं… मला आईबाबा भरपूर पॉकेटमनी देतात. त्यातून एक छानसा शर्ट घेणार होते मी त्याला… पण तो म्हणाला त्याला त्याच्या पसंतीचं गिफ्ट हवंय म्हणून! त्याला गिफ्ट म्हणून माझा “वेळ” हवा होता! त्याच्या वाढदिवसाची संध्याकाळ आम्ही सोबत व्यतीत करावी अशी त्याची इच्छा होती.
मग मी माझ्या मैत्रिणीच्या सलोनीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी जाणार असं आजीला सांगितलं. अन् सुशांत सोबत “ड्रीम डेट” साठी त्याच्या बाईकवर निघाले.

शहराच्या बाहेर जाताच आडमार्गाला गाडी थांबवून सुशांतने माझ्याशी लगट करायला सुरुवात केली तशी मी घाबरले. त्याचा स्पर्श मला शाळेत शिकवला तसा “बॅड टच” वाटू लागला आणि असह्य होऊ लागला. मी घाबरले अन् त्याला नीट वागण्यासाठी बजावलं पण तो काही ऐकेनाच. मी घाबरले अन् आरडाओरडा करत वाट दिसेल तिकडे पळत सुटले.”
रमणीने बोलणं थांबवलं अन् एक मोठ्ठा पॉज घेतला. “… सुशांतला माझ्यासोबत वेळ घालवायचाय म्हणजे खूप गप्पा, फिरणं, हसणं खिदळणं, हातात हात घेणं, हॉटेलमध्ये जेवण आणि खूप मोट्ठी शॉपिंग असंच वाटलेलं मला….हेच तर खरं प्रेम असतं ना… नवराबायकोमधलं…सुशांतचं माझ्यावर ‘खरं’ प्रेम आहे असंच वाटलेलं मला पण सुशांत तर काहीतरी वेगळंच”….नुसत्या आठवणीनंही रमणीच्या अंगावर काटा आला.

“मग पुढे काय झालं?” सुमित्राबाईंच्या आवाजाने ती भानावर आली.
“सुशांत जबरदस्ती माझे कपडे काढू लागला तशी मी घाबरले त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला अन् वाट फुटेल तिकडे पळत सुटले. रस्ता संपला तिथे एक तलाव होता… मी तिथे खूप वेळ बसून राहिले. घरी जाण्यासाठी माझ्याकडे काही साधन नव्हते आणि आईबाबांना तोंड दाखवायची हिम्मतही….
आता तर घरून एकसारखे कॉल येऊ लागलेले… माझी कुणाशीही बोलायची हिंमत होईना. शेवटी मला शोधत तुम्ही आलात अन् मी घरी आले.”

“आणि मग घरी हे सगळं कळू नये म्हणून बनाव केलास… होय ना?”
“हो. माझी आजी देवभोळी… नेहमी भुताखेतांपासून माझं, घरादाराचं रक्षण व्हावं म्हणून वेगवेगळे तोडगे, टोटके करत असते. तिनेच मला एकदा माझ्या पणजोबांना चकवा लागल्याची गोष्ट सांगितलेली… मी तलावाकाठी बसल्याचे पाहिल्यावर तुम्हाला पटेल म्हणून मी चकव्याची गोष्ट रचून तुम्हाला सांगितली.”
“पण संध्याकाळी सात-साडेसात पासून रात्रीपर्यंत ऊन नसतं ना बेटा… की चकवा तुला पाण्यात बुडवेल आणि तुझे ओले कपडे खडखडीत वाळतील.” इन्स्पेक्टर प्रशांतने केसची उकल करायला सुरुवात केली.

” रमणीचं निरीक्षण केल्यावर तिचा उसवलेला ड्रेस, हातापायावरच्या खुणा ह्यावरून आम्हाला संशय आलाच होता. म्हणून शाळेत आणि रमणीच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर आम्हाला सुशांतबद्दल माहिती मिळाली.
एक नंबरचा बदमाश आहे हा सुशांत… तीन वर्षांपासून एकाच वर्गात आहे. चोरी, जुगार, श्रीमंताच्या मुलींना नादी लावणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हे त्याचे उद्योग… “
“बापरे!” रमणी आता धास्तावलेली होती. आपण क्षणिक प्रेमाच्या मोहात केव्हढी मोठी चूक केली असती ह्या जाणीवेने हादरली.

“काल आजींच्या खोलीत डोकावल्यावर मला वेगवेगळी यंत्र, मंत्र आणि ताईत दिसले शिवाय टेबलवर काही गूढविद्येची पुस्तकं… त्यामुळे रमणीला “चकव्याची” कथा सुचण्याची पार्श्वभूमी लक्षात आली”.
“हो, आमच्या सासूबाईंचा विश्वास आहे असल्या गोष्टींवर… त्या काही ना काही नुस्खे करत असतात पण आम्ही त्यांना अडवत नाही… असते ज्याची त्याची श्रद्धा!” वीणाताई प्रथमच बोलल्या.
“तसं पाहिलं तर चकवा आपल्या सगळ्यांनाच लागलाय ना…वीणाताईंना करिअरच्या मागे लागण्याचा, विनायकरावांना बिझनेसमध्ये अफाट पैसा कमावण्याचा आणि रमणीला अगदी लहान वयात प्रेम मिळवण्याचा…

म्हणजे तुम्ही नोकरी सोडून घरी बसा असं माझं म्हणणं नाहीये वीणाताई…” इन्स्पेक्टर प्रशांत आता घरगुती भूमिकेत शिरले होते.
“पण नोकरीतल्या जबाबदाऱ्यांना कुठेतरी आवर घालून मुलीकडे लक्ष द्यायला हवंच ना! फेसबुकवर वाढणाऱ्या लाईक्सपेक्षा आपल्या मुलीचं वाढतं वय ही तुमची प्रायोरिटी असायला हवी. तिचा एकटेपणा तिला बाहेर सोबत शोधायला प्रवृत्त करतोय हे विसरू नका.”
“विनायकराव, आपल्या मुलीला इतक्या लहान वयात मोबाईल घेऊन दिलात, दिमतीला नोकर-चाकर ठेवले, गाड्या-घोड्या दिल्या म्हणजे जबाबदारी संपली असं नाही होत. तिला ह्या अडनिड्या वयात आईइतकीच वडिलांचीही गरज आहे…. तिच्या गरजा समजून घेण्यासाठी… बाहेरच्या जगाशी ओळख करून देण्यासाठी….आणि त्या सुशांतमध्येही ती कुठेतरी तुम्हांला शोधतेय हे लक्षात येतंय का तुमच्या?

इन्स्पेक्टर प्रशांतचं बोलणं ऐकून विनायकराव अंतर्मुख झाले होते.
“झालं गेलं गंगेला मिळालं… नीतिमत्तेचा योग्य मार्ग सोडून गैरमार्गाला लावतो तो चकवा…. आपल्या साध्या भोळ्या समाधानी मनाला फसवून क्षणिक सुखाच्या मागे धावायला लावतो तो चकवा… आणि हा चकवा कुठे बाहेर नसतो तर तो आपल्या मनातच असतो… मनाचा संयम सगळ्यात महत्वाचा… आणि आपले ध्येय साध्य करत असताना कुठे थांबायचं हे कळणं त्याहून महत्वाचं.” आजीनं भरतवाक्य म्हटलं.
“बरं, मग आता ह्या केसचं काय करायचं? काही गुन्हा वगैरे दाखल करायचाय का?”विनायकरावांची शंका

“नाही हो, कसला गुन्हा अन् कसलं काय!” ह्या केसबद्दल जी माहिती मिळाली त्याची माहिती तुम्हाला द्यायला आलो फक्त.. रमणीचा काका ह्या नात्याने … पण पोलिसी वेशात… कारण त्याशिवाय रमणीबाई काही खरं बोलल्या नसत्या… हो किनई!
आणि मलाही तुमच्या रमणी एव्हढीच मुलगी आहे…. ह्यानिमित्याने मीदेखील एक धडा घेतलाय…. आपण पालक पोटापाण्याच्या मागे कितीही व्यस्त असलो तरी घरी गेल्यावर मुलाबाळांना क्वालिटी टाईम द्यायलाच हवा….”
तुम्हाला काय वाटतं?
© वैशाली जोशी
सदर कथा लेखिका वैशाली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 thought on “चकवा”

  1. गोष्ट छानच आहे. विचार करण्यायोग्य आहे…अशा कथा वाचायला नक्कीच आवडतील…मला एक सुचवायचं आहे हीच कथा जर लेखिकेच्या परवानगीने मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली आणि ती लिंक जर ह्या लेखासोबत auduo कोणाला ऐकायचं असल्यास connect केली तर चांगल होईल नाही का…मला आवडतं कथा कथन करायला…इच्छुक असल्यास मला reply द्यावा 🙏🙏

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!