© कांचन सातपुते हिरण्या
” दोघांनी राहायचं सुख वेगळंच . तिसऱ्या कुणाचं बंधन नाही . सासू-सासर्यांची नजरकैद नाही . कामाचं , खाण्याचं हवं तसं नियोजन .सगळंच स्वातंत्र्य . तुला काय वाटतं रे अमित ? हे असं..” नेहाचं हे बोलणं कानावर पडलं आणि पुढचं ऐकायला रोहिणीताई खोलीच्या बाहेर थांबल्याच नाहीत म्हणजे त्यांना उभंच रहावेना .
खरंतर उद्याचा रविवार सकाळी बाहेरून नाश्ता , दुपारी हलकं काहीतरी , संध्याकाळी मस्त शॉपिंग आणि मग बाहेर जेवण हे प्लॅनिंग अमित नेहाला सांगायला त्या गेल्या होत्या.
पण बेडरूमच्या बाहेर त्या दोघांचं मोठ्यानं बोलणं कानावर पडलं आणि भरल्या डोळ्यांनी त्या पटकन बाल्कनीत आल्या.
“काय मग होममिनिस्टर सांगितलंत का लेकाला सुनेला उद्याचं प्लॅनिंग ?” मनोहररावांनी मोबाईलमधे बघतच रोहिणीताईंना विचारलं.
समोरून काहीच उत्तर नाही म्हणून बघितलं तर डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याला थोपवायचा त्यांचा निष्फळ प्रयत्न.
” अगं काय झालं ? नको बोलले का ते दोघं ? मग आपण करू उद्याचं काहितरी प्लॅन. त्यांना दोघांना पण त्यांचा वेळ हवा असेल .”
” नाही .”
” मग काय झालं ? थांबा मीच विचारून येतो .”
” नको आता उगाच आणखी वाद .”
“आणखी वाद म्हणजे ? अहो सौभाग्यवती नीट सांगा तरी काय झालंय ?”
” नेहा अमितचं बोलणं माझ्या कानावर पडलं .” आणि जे काही ऐकलं ते त्यांनी मनोहररावांना सांगितलं .
“तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल , खात्री नको का करून घ्यायला ? थांब मी बघतो .”
“नको अहो ,एवढं सगळं नेहाच्या तोंडून ऐकल्यावर कसला हो गैरसमज. मला वाटायचं वर्षभरात नेहानं आपल्याला आपलंसं केलंय. नातेवाईक शेजार पाजार सगळ्यांना आपली सून गुणी , समजूतदार वाटते पण तसं काही नाहीये हे आज कळालं मला .मी आता ठरवलंय त्या दोघांना वरच्या मजल्यावर वेगळं ठेवायचं . वेगळंच व्हायचंय ना त्यांना तर तसं .” रोहिणीताई बोलता बोलता रडत होत्या.
“अहो किती हौसेनं हा बंगला बांधला आपण . पुढे वाढतं कुटुंब म्हणून पण आता हे असं..”
” धीरानं घ्या . काहीतरी उपाय निघेल घाईघाईत काही ठरवू नका .”
मनोहररावांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
विचारांनी रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही .
रविवार असूनसुद्धा पहाटेच दोघांनी उठून निम्मी भांडीकुंडी वर हलवली . रोहिणीताईंनी मनोहररावांना तसं तयारच केलं. आठवड्यातली रविवारची सुट्टी म्हणून नेहा नेहमीप्रमाणे निवांत न्हाऊन किचनमध्ये आली .
“गुड मॉर्निंग आई.”
पण रोहिणीताई एक नाही की दोन नाही .
” आई बरं वाटत नाहीये का तुम्हांला ? ” मी करते ना आपल्याला मस्त पोहे .”
तरीही काहीच उत्तर नाही . तिला कळेचना काय झालं ?
“तुमचं सामान वर नेऊन ठेवलंय तिथे जाऊन काय करायचं ते करा .” एवढं बोलून रोहिणीताई बेडरूममध्ये गेल्या .
नेहाने पटकन जाऊन अमितला उठवून त्याला सांगितलं त्यालाही कळेना काय झालं .
“आई अगं दार तरी उघड . आपण बोलू समोरासमोर बसून .”
पण त्यांचा काहीच प्रतिसाद नाही .
“बाबा आईला फिरकी घ्यायची लहर आली की काय सकाळी सकाळी .”
अमितसोबत नेहाला बघून मनोहरराव म्हणाले ,”अमित बघितलंस , एवढा जीव लावून या झाडांना वाढवलं पण या काही वेलांना कुंपणाबाहेर जायचंय तर कसं अडवणार त्यांना ?”
नेहा रडवेली झाली ,” बाबा अहो एका रात्रीत काय झालं असं तुम्हाला दोघांना ?”
” आम्हांला नाही काही झालं , तुम्हांलाच वेगळं व्हायचंय ना दोघांना. रोहिणीनं ऐकलंय तुमचं बोलणं काल रात्री .”
अमितनं कपाळावर हात मारून घेतला .
नेहाला हसावं की रडावं कळेना .
दोघांनी रोहिणीताईंचा कसं गैरसमज झालाय हे सांगितलं . तिघांनाही आता हसू येत होतं पण..
” आता तिच्या मनात आलंय तर राहा बाबांनो चार दिवस वेगळे . करा मजा . मग बघू पुढे..” मनोहररावांनी त्यांना सांगितलं .
आधीच हळव्या रोहिणीताईंनी मनाला खूपच लावून घेतली ही गोष्ट .
कशातच मन लागत नव्हतं त्यांचं . दिवस दिवसभर झोपून राहत होत्या.
एकाच घरात वर खाली राहून अजिबात बोलणं नाही . दोघं सकाळी जात ऑफिसला ते रात्री उशिराच परत येत .
मनोहररावही चार दिवस शांतच होते .
आज सकाळपासून तर रोहिणीताई खूपच अस्वस्थ होत्या .
सकाळपासून फोन येत होते शुभेच्छांचे पण जेवढ्यास तेवढं बोलून त्या ठेवत होत्या .
” सौभाग्यवती हा घ्या तुमचा लाडका सोनचाफा आणि तयार व्हा नेहमी होता तशा . कुठेतरी जाऊ दोघं .”
” तुम्हांला काहीच वाटत नाही का हो . मला नाही साजरा करायचा वाढदिवस . तो चाफा देवाला वहा .”
“असं कसं ? पन्नासावा वाढदिवस म्हणजे सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे .”
समोर अमित आणि नेहा .
रोहिणीताईंनी तोंड फिरवलं .
“आई पुरे गं आता . तुझं मन राखण्यासाठी चार दिवस राहिलो ना वेगळं .”
” माझं मन का तुमची हौस रे . “
कोणाचा तरी फोन आला नेहाला तेवढ्यात .
“बघ बघ , आताही हिला फोन महत्त्वाचा वाटतोय .”
“हॅलो रेशमा बोल गं . आलं का तुझं डोकं ठिकाणावर ? कळलं ना आता वेगळं राहायचं सुख भारी कि एकत्र राहायची गोडी . अगं तुला समजावताना आमच्या घरात केवढा गोंधळ झाला माहितीये का ? “
सगळ्यांसमोरच नेहाने सांगितलं , तिच्या ऑफिसमधली मैत्रीण वेगळे रहायला निघाली तेव्हा तिला कसं समजावलं .
त्या रात्री ती रेशमाचंच बोलणं अमितला सांगत होती आणि रोहिणीताईंनी नेमकं तेच अर्धवट बोलणं ऐकून त्यांचा गैरसमज झाला.
रोहिणीताईंना खूपच अपराधी वाटलं .
” आई तुमची काही चूक नाही . जे ऐकलं त्यामुळंच हा गोंधळ पण तुम्हाला असं कसं वाटलं की आम्ही ..”
“पुरे आता अजून नका लाजवू मला . चुकलंच माझं .”
” तुमचं नाही , माझं चुकलं . इतर वेळी मी तुम्हांला सगळं मनातलं सांगते . यावेळीच हे रेशमाचे प्रकरण सांगायचं राहिलं पण आता तिला सुद्धा कळालं महिनाभर लांब राहिल्यावर एकत्र राहणं आणि वेगळं राहण्यातला फरक .
बरं चला आवरून घ्या पटकन . ही बघा साडी , तुमचा आवडता रंग . मी अंबाडा घालून देते छान . सगळे वाट पाहत असतील हॉटेलवर .” नेहा बोलत होती .
मनोहरराव अमित हसत होते .
” म्हणजे तुम्हांलाही माहित होतं सगळं ..”
” तू ऐकून घेणार होतीस का तेव्हा ? तूला अतिघाई . मग म्हंटलं चला आपणही बघू कसं काय असतं वेगळं राहायचं सुख ते .”
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
samajudaar chaan panaa…kathaa chaan ahe..
mi nehamichwaachat asate….wishay chaangala aahe.
bhaashaa prawaahi aahe..abhinandan………..
मनापासून धन्यवाद