स्टेटस

© धनश्री दाबके
दुपारपासून आजीवर चिडून बसलेली राधिका, संध्याकाळी करुणा तिला न्यायला आली तरीही रागातच होती.
आज राधिका आईशी काहीच बोलत नाहीये आणि आईही जरा गप्प गप्पच आहे म्हणजे परत यांचं नक्कीच कहीतरी बिनसलंय. पण या आजी नातीच्या जोडीसाठी हे काही नविन नाही. सतत त्यांच्यात हे असे रुसवे फुगवे सुरुच असतात असा विचार करून करूणाने दोघींकडेही दुर्लक्ष केलं. 

नेहमीप्रमाणे आईच्या हातचा एक फक्कड चहा घेत करुणाने आईशी गप्पा मारल्या आणि राधिकाला घेऊन ती  घरी आली. घरी आल्यावर लगेचच करुणा रात्रीच्या स्वैपाकाला लागली. राधिकाही थोड्यावेळ टीव्ही पाहून उद्याच्या अभ्यासाला बसली. 
मग मंगेश ऑफिसमधून आल्यावर तिघांची जेवणं झाली. मागची आवरा आवर आणि उद्याच्या डब्याच्या तयारी करुन करुणा जरा निवांतपणे बसणार इतक्यात आईचा फोन आला.

“आवरलं का ग तुझं सगळं? आणि काय म्हणतायत आपल्या प्रिन्सेस? आज दुपारपासून माझ्यावर चिडून बसली होती जरा म्हणून विचारलं. तुला बोलली असेलच ना?” आईने विचारलं. “हो आत्ताच आटोपलं सगळं. नाही ग राधिकाने मला काहीच नाही सांगितलं. पण मला मगाशीच अंदाज आला होता तिचं काहीतरी बिनसल्याचा. काय झालंय? तुझ्याशी भांडली का आज?? की हट्ट केला कशाचा?”

“आज क्लास कॅन्सल झाल्यामुळे राधिका अचानक आली ना शाळा सुटल्यावर, तेव्हा भुकेलेली होती अगदी आणि तिला पिझ्झा खायची लहर आली होती. 
तू तिला शाळा आणि क्लासच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी जो डबा दिला होतास ना तो खायचा कंटाळा आलाय म्हणाली. मीही म्हंटलं कंटाळतात मुलं रोज डब्यातलं गार अन्न खाऊन. आज आलीये तर द्यावं गरम काहीतरी तिच्या आवडीचं करुन. 
पण तिला पिझ्झाच हवा होता.

पोहे, उपमा, थालीपीठ सगळे प्रकार विचारले पण नाही. ती पिझ्झ्यावरच आडून बसली. 
घरातले चांगले हेल्दी पदार्थ सोडून तो पिझ्झा कसला खायचा सारखा? त्यामुळे मी नाही म्हणाले. तर रागावली माझ्यावर. त्या रागातच डबा उघडला आणि खाल्ला तिने.”
हे ऐकून करुणा म्हणाली “आई तिला आवडतो ना तिला पिझ्झा खूप. त्यामुळे हट्टाला पेटली असेल. चालायचंच ग कधीतरी”
“अगं तिला पिझ्झा किती आवडतो ते मला माहित नाही का? पण गेल्याच महिन्यात तू तिला डायेटिशियनकडे नेलं होतस ना? आत्ताशी चौदावं चालू आहे तरी तिचं वजन खूप वाढतय म्हणून. 

शाळा, क्लास, अभ्यास ह्या सगळ्यांत तिला रेग्युलर एक्सरसाईजसाठी वेळ मिळत नाहीये. त्यात तिची पाळीही नियमित येत नाहीये. 
तुझ्या गायनॅक मॅडमही म्हणाल्यात ना की वजन आटोक्यात ठेवायला हवंय म्हणून? मग इतकं सगळं चालू असतांना तूच सांग हे असे पिझ्झे आणि बाहेरचं जंक फूड द्यायचं का तिला आपण? 
आता तुला वाटेल की एक दिवस लेक आईकडे गेली तर आईने लगेच उपदेशाला सुरुवात केली. पण तरीही जे तिच्यासाठी योग्य आहे ते बोलणारच आहे मी आज. 
तिला तिच्या डायटची आठवण केली तर ती अजूनच भडकली.

मला म्हणाली आजी, मला काही फरक पडत नाही वजनाने. मला मी आहे तशीच आवडते. I love myself. आई मला कधीच असं वजनावरुन बोलत नाही. 
मी कशीही दिसत असले तरी आईला आवडतेच. तिलाही असंच वाटतं माझ्यासारखं. हे बघ आईने तिचं स्टेटस काय ठेवलंय ते. 
असं म्हणून तिने मला तुझं फेसबुक प्रोफाइल दाखवलं. तू I love my body exactly as it is ह्या quote चा फोटो ठेवलायस ना तिथे? अशाच अर्थाचा कुठलातरी body shaming बद्दलचा फोटो whatsapp वरही ठेवलायस. 

नाही, हे तुझे विचार तुझ्या वयातल्या matured बायकांसाठी अगदी बरोबर आहेत. स्वतःवर प्रेम करावंच ग प्रत्येकाने. पण त्या प्रेमाच्या आहारी जाऊन आपली सगळी wealth लुटू नये. 
Wealth म्हणजे health ची wealth बर का ग. नाहीतर म्हणशील आई म्हातारी झालीये आणि काहीही बोलतीये. ” आईने आज आपली शाळा घ्यायचा घाट घातलाच आहे हे ओळखून करुणा गप्पच राहिली.

आईच पुढे म्हणाली ” नाही म्हणजे ते quotes चुकीचे आहेत असं नाही म्हणत मी. पण आजकालच्या आयांचे स्टेटसही त्यांच्या मुलांसाठी फार महत्वाचे असतात ग. 
सतत तुम्ही आणि तुमची मुलं सोशल मिडीयावर गुंतलेले असता. मुलं प्रत्यक्षात जितकी तुम्हाला फॉलो करतात तितकीच तिथेही करत असतात. त्यामुळे तिथे सुद्धा तारतम्य आणि सतर्कता फार आवश्यक आहे. 

लेकीला डाएट चालू करुन तू हे असले quotes ठेवलेस जे समजून घेण्याची तिची पात्रता नाहीये अजून. तर मग काय होणार? मी आहे तशीच छान आहे हा विचार एकाच अंगाने करुन ती काय साधणार? तिने तुझे स्टेटस दाखवल्यावर मी तिला काही बोलले नाही कारण मला जाणवलं की ह्यात चूक तिची नाहीच तर तिच्या आईची आहे. 
तूच जर हे असे विरोधाभासी विचार तिच्या मनात पेरलेस तर त्यातून अजून दुसरं काय उगवणार? मी नाही म्हणत की आपण जसे आहोत ते बदलण्यासाठी किंवा फक्त छान दिसण्यासाठी व्यायाम आणि डायट करुन झीरो फिगरच्या मागे धावावं. 

पण मी आहे तशीच मला आवडते म्हणत स्वतःचा बेशिस्तपणा गोंजारत तब्येतीचं नुकसानही करुन घेऊ नये. कारण health is wealth. बाकी कशापेक्षाही आपली ही wealth प्रत्येकाने जपायलाच हवी. अगं माणसाच्या शरीरा इतके उत्तम दुसरे कुठले यंत्र नाही या जगात. तेव्हा त्याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. नाही का? माझंच उदाहरण बघ.

मी माझं वजन आटोक्यात ठेवलंय म्हणूनच माझं knee replacement इतकं सोपं आणि सक्सेसफुल झालयं. तू स्वतः आधी हे समजून घे आणि राधिकालाही समजव. 
दोघी रोज थोडावेळ चालायला जा किंवा योगासनं करत जा. वेळ काढला तर मिळतोच ग. मी तर म्हणते तू पण तिच्या बरोबर डायट फॉलो कर थोड दिवस. तू तुझी लाईफ स्टाईल बदललीस तर राधिकाही बदलेल बघ. 

वजन फक्त आपण छान दिसावं म्हणून नाही तर आपण हेल्दी राहावं म्हणून कंट्रोल करायला हवं. मग पाहिजे ते खाण्यासाठी झुरावं लागणार नाही. 
बाकी, एक पिझ्झा आज मुझे लेक्चरर बना गया. पर वो भी जरूरी था. 
आपण लावलेलं झाड कितीही फोफावलं, फळाफुलांनी डवरलं तरी माळी त्याची राखण करणं सोडत नाही ना. हे पालकत्वही तसंच ग. लेकीची लेक वयात आली तरी आजीतल्या आईला जागरुक राहावं लागतच. आधी आपल्या लेकीबाबत आणि मग तिच्या लेकीबाबत. 

बरं चल, ठेवते आता फोन. उशीर झालाय बराच. उद्या बाईसाहेबांचा राग निवळला की बोलेन तिच्याशी. बाय. Good night.”
आईने केलेल्या कान उघडणीमुळे करुणा चांगलीच विचारात पडली. 
खरंच किती सहजतेने आपण एखादा विचार आवडला तर ते स्टेटसला ठेवतो. पण आपली प्रत्येक गोष्ट टीप कागदासारखी अलगद टिपून घेणारी आपलीच प्रतिकृती सतत आपल्याला पाहात असते. 
त्यामुळे असं भान सोडून चालणार नाहीच आपल्याला. कधीच.

आई आजही सजग पालकत्व निभावतेय आणि मी माझ्याच स्टेटसमधे गुंग. 
नाही मलाच आधी स्वतःला बदलायला हवे तरच राधिकाही बदलेल. आईच्या विचारांनी भारलेली करुणा मनाशी निश्चय ठाम करुन झोपायला गेली.
आणि तिच्यातल्या बदलाची सुरवात स्टेटसपासून झाली हे तुमच्यासारख्या सूज्ञ वाचकांना सांगायला नकोच. नाही का?
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!