काळजी की काळजीचा दिखावा

©शुभांगी मस्के
“किती ती मस्ती… आणि उगाच दंगा करता करता रावीची खेळणी इकडे लपव तिकडे लपव… या खेळण्याला हात लाव तर कधी त्या खेळण्याला हात लाव..’बाऊ… बाऊ’…करता करता मग एवढी मस्ती अंगात येते की काय सांगू?  कुठे धडपड धडपड नुसती. ताई, लहान लहान करता करता चांगलाच डोक्यावर बसलाय तो आता. रावी लहान आहे, तिला काय कळतं? तिला काय मस्ती  करायची, तेवढंच काय हवं असतं”… मस्ती करायला खूप आवडते तिला. रागवलं, मारलं, दाम दापट केलं नाही तर आपल्यासारखं मस्तीखोर बनवेल हा तिला..  मला नकोय बरं, माझ्या मुलीने एवढी मस्ती केलेली.

नको… नको… खूप समजावलं…ऐकलं नाही अखेर….  मारणं भाग पडलं… तो मस्ती करत होता म्हणून, एरवी किती काळजी करते मी त्याची… माझ्या अंगाखांद्यावर खेळलाय तो.. मला तरी वाटेल का उगाच त्याला मारायला?” निलूने, साळसूदपणे क्षमाच्या, तिच्या मोठ्या जावेच्या मुलाला म्हणजेच, राघवला मारल्याच कबूल केलं.
“अगं काळजी आहे म्हणतेस ना! आणि वय काय त्याच? ते तरी लक्षात घे… पाच वर्षांच पूर्ण पण नाही ग ते लेकरू. काळजी आहे म्हणतेस आणि वळ उमटेस्तोर मारतेस. कसलं ग हे काळजीचं स्वरूप?

काळजी असती तर, असे गालावर, पाठीवर वळ उमटेस्तोर मारलं असतंस का तू? आज जरासा वेळ झाला मला ऑफिसमधून यायला, तर लेकरू असं रडत रडत उपाशी वाट बघत झोपेलं.
काळजी होती ना तुला, मग बरं उपाशी झोपू दिलसं तू? 
सॉरी राग येईल तुला पण आज स्पष्टच बोलते!!. 
आज खरचं वाईट वाटलं मला.” क्षमा आज चांगलीच चिडली होती.

“मी ही रागावते, वेळ पडली तर मारावं ही लागत. पण नंतर जवळ घेऊन प्रेमाने समजवावं ही लागत लेकरांना! समजतात लेकरं …आज तू, राघव ला,  प्रेमाने जवळ घेऊन समजावलं असतंस, स्वयंपाकासाठी माझी वाट बघत न बसता, साध्या खिचडीचा कुकर लावून लेकराला चार घास भरवले असतेस.. तरी मला बरं वाटलं असतं.
आहेच राघव बदमाश… तरीच म्हणत होते मी.. फार लाड करू नकोस त्याचे.. हक्क समजून लाड पुरवून घेईल, हट्ट करेल.. आणि मग त्रास होईल तुलाच..

मी म्हणायची.. दहा काम परवडली बाई… पण लेकरांना सांभाळणं महाकठीण. त्यावर तू म्हणायचीस.. कामांची सवय नाही मला.. घरातली ढीगभर काम करण्यापेक्षा राघवशी खेळायला मला जास्ती आवडतं. मला वाटलं चला आता, आईंचा भार जरासा कमी होईल. मग काय, तो आणि तू ! तासनतास, बाहेरच्या झोपाळ्यावर झोके घेत बसायचात. त्याला नको गं जास्ती.. मोबाईलचं वेड लावूस.. म्हणून मग मीच तुला ओरडायचे”.  
क्षमाच बोलणं नीलू निमूटपणे ऐकून घेत होती.. कारण क्षमा सगळं खरं खरं बोलत होती…

“तुझं लग्न झालं आणि तू माप ओलांडून घरात आलीस. बहीण नाही मला, वाटलं.. बऱ्याच  प्रतिक्षेनंतर का होईना पण आपल्याला बहीण मिळाली. पहिल्याच दिवशी, तुझा हात हाती घेतला आणि म्हटलं, नीलू, मी तुझी मोठी जाऊ नाही बरं का! मला तुझी मोठी ताईच समज, आजपासून आपण बहिणी बहिणी.. तू, नमस्कार करायला खाली वाकली.. मी तुला मिठीत घेतलं, बिलगून गेली होतीस छोट्या लेकरासारखी.
मग मीच ठरवलं, आजवर सगळं सांभाळलच ना, इथून पुढे ही सांभाळायचं. उगा नको हिला दडपण एवढ्यात कशाचं.

सासूबाई म्हणायच्या… क्षमा साधी आहेस तू… दोन बायका म्हटलं तर भांड्याला भांड लागणारचं.. हेवेदावे, मतभेद होणारच तेव्हा मनभेदाला खत पाणी घालण्यापेक्षा, वेळीच मिटवलेले बरे असतात बरं का!.. नाही तर उगाच भांडण, वादावादी आणि मनमिटाव वाढीस लागतात आणि घराचे दोन तुकडे होतात.. जप हो बाई या घराला… सगळं एकटी सांभाळतेस… थोडा भार तिच्यावर ही टाक.. दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाची जबाबदारी तुलाच कशाला. तुला ही ऑफिस असतं. साधी भोळी, सोशिक आहेस तू…

तुला लोक तसे ही गलंडवतात आणि तू गलंडतेस… फायदा घेतात लोक तुझा,सांभाळून राहा हो.. डावपेच कळत नाही तुला.. आजकालच्या पोरी हुशार असतात खूप.. शाळेतल्या, मुलांना शिकवण्या एवढं सोपं नसतं… बरं का हे माणसं वाचण्याच, तंत्र शिकून घे तू आता. सासूबाईंच्या काळजीचा सुर कळायचा मला!.. 
मग, मीच म्हणायची… “जाऊ द्या हो आई, छोटी आहे ती अजून, नुकतंच नवीन नवीन लग्न झालंय…  जबाबदारी काय आयुष्य भर पेलायचीच आहे. वेळ देऊ या तिला.

मग मीच, सासूबाईंना समजवायची, तुम्ही सून नाही लेक मानलं ना मला, मग मी जाऊ नाही बहीण समजलं तर हरकत ती काय?.. छोटी बहिण असती तर.. केला असता का दूजाभाव, नाही ना!  का कुणास ठाऊक, सासूबाई.. फक्तच.. हसल्या होत्या.
न राहवून म्हणाल्या, सांभाळून घेशीलच तू तिला , माहिती आहे गं मला, पण वेळ येईल तेव्हा गप्प बसू नको बरं का?”
सासूबाईंनी बोललेल क्षमाला जसं च्या तसं आठवतं होतं, क्षमा बोलत होती..
दुखावली गेल्याचं लक्षात येत होतं, नीलू निमूटपणे क्षमा चं बोलणं ऐकत होती.

“एकटी होते गं मी, मला ना आई ना बहीण, आजीकडे राहून लहानाची मोठी झाले… बहीण भाऊ या नात्यांपासून पारखीच होते.  सासरी आले आणि, इथे मात्र आयुष्यात असलेली, होती नव्हती, पोकळी भरून निघाली. 
सासूबाईंच्या रुपात आई, सासरे वडिलांच्या जागी, भाऊजीच्या रुपात भाऊ मिळाला आणि आता तुझ्या रुपात बहिणही,  भरून पावले होते मी!!.. राघवच्या रुपात, गोकुळ फुललं घरात… हेच तर खरं सौभाग्य होतं. बोलताना क्षणाला गहिवरून आलं होतं.
“तुला आठवतं, तू आल्या आल्या, सगळं सामान कपाटात ठेवलं आणि कपाटाला लॉक लावलं.

सासूबाई म्हणाल्या.. बघितलं क्षमा, आजवर कुलूप नाही लागलं घरातल्या सामनाला, नव्या सूनबाईने सुरू केली हो नवी प्रथा…मी, फक्त… हसले होते त्यांच्या बोलण्यावर.
तू उशिरा उठायचीस,  माझी सकाळची सगळी काम आटोपलेली असायची. ऑफिसमधून आल्यावर ही तू एकटीने स्वयंपाक केलेला आणि मी बसलेली पटायचं नाही मला. मग मी तुला मदत करायची. फार कशाचा भार तुझ्यावर येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करायची..घर मोठं घरात सासू, सासरे, दिर आम्ही नवरा बायको, घरात छोटं लेकरू. आला गेला पै पाहुणा, खटलाच म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यात नवी नवी आलेली तू , बावरली होतीस, सगळं पाहून.. 

विरोध होता सर्वांचा, तरी कामाला बाई लावून घेतली, म्हटलं.. आजवर निभावलं.. पण उगाच भार नको कसलाच तूझ्यावर. मला सवयचं होती,  हा खटला सांभाळायची..
लवकरच, तुला दिवस राहिले मग काय?? छोटी बहिणचं होती तू माझी.
तुझी काळजी, तुझे डोहाळे, तुला हवं नको ते बघणं, तुझे लाड, माझं कर्तव्य समजुन केलं सारं… 
घरात बाळ आलं आणि रावीच्या रुपात.. राघवला बहीण मिळाली..वाटलं, वाढतील दोघे सोबत सोबत.. 

सासूबाई सांगतच होत्या, एवढ्यात तुझी चिडचिड वाढलीय खूप. “छोट्या छोट्या गोष्टीवरून राघवला हिडीसव्हाडीस करतेस हल्ली. पण मीच दुर्लक्ष केलं!! म्हटल, रागावत असलीस तरी त्याच्या चांगल्यासाठीच ना! 
कशाला उगा तुला टोकायचं.. माझं लेकरू ही काही कमी नाही, चुकतंच असणार त्याच ही!
सासूबाईंच्या बोलण्यावर काहीच रीॲक्ट न होता, मी तूझ्या पोस्ट पार्टम ब्लुज.. म्हणून मी बाळंतपणानंतरच्या तुझ्या मूड स्विंगचे कारण पुढे करून त्यांना समजवायचे.

तूच सांगतेयसं… अवनीच्या खेळण्याला हात लावला, म्हणून.. तू आज राघव ला मारलसं..पण…”पाच च्या पाच बोटे उमटलीत गं, लेकराच्या गालावर आणि पाठीवर. लाल, वळ उमटावे एवढा,  मोठा गुन्हा नव्हता न केला त्याने? ” बोलताना क्षमाचा कंठ दाटून आला आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. 
आवंढा गिळत क्षमा बोलली… “नीलू, प्रामाणिकपणे आज फक्त, एका प्रश्नच उत्तर दे! मी अवनीला असं हिडीसव्हाडीस केलेलं, गालावर वळ उमटेस्तोर मारलेलं चालणार आहे का तुला?
काळजी करणं आणि काळजी आहे दाखवणं ह्यात फरक असतो बरं का नीलू.

स्वभावाने साध्या, सोशिक असलेल्या… माणसाला ही तो कळतो बरं का? कारण तो मूर्ख नसतो.”
गेल्या दीड दोन वर्षात, मोठ्या बहिणीची माया करणाऱ्या क्षमा ताईंच… परखड रूप, नीलूने पहिल्यांदाच पाहिलं होतं.. 
राघवच्या बहाण्याने कामापासून सुटका करून,  तासनतास मोबाईलमध्ये तोंड खुपसून..  कामचुकारपणा करणारी नीलू… स्तब्ध एका जागी, मान खाली घालून उभी होती…   
हक्क समजून, लेकरासाठी न्याय मागणारी.. लेकराचं भलंबुरं डोळसपणे बघणारी, लेकरासाठी झगडणारी, तरी नात्यांना जपू पाहणारी.. निर्भेळ, निर्मोही तेवढीच परखड क्षमा आज सासूबाईंना जास्ती भावली होती… 

नाते टिकवण्यासाठी… ओढाताण नको तर, स्पष्ट बोलून.. नात्यातली पारदर्शकता टिकवली जाण जास्ती महत्वाचं असत… आज सासूबाई खूप खूश झाल्या होत्या.
“सॉरी ताई.. चुकलं माझं”, म्हणत नीलुने क्षमा मागितली…  आणि क्षमाने, छोट्या बहिणीप्रमाने असलेल्या… नीलूला मोठ्या मनाने माफ केलं होत…
“काळजी करणं आणि काळजी आहे दाखवणं यात खूप फरक असतो”. क्षमाने नीलूसोबत, मोकळेपणाने संवाद साधत दोन मधला फरक दाखवून देण्याचा प्रयत्न केलाच होता.
काय मैत्रिणींनो, नात्यात पारदर्शकता हवी का नको! एखाद्यावर प्रेम करताना, चूक झाली असता थोड परखड होत, स्पष्ट समजावून सांगून त्याला चूक दाखवून देणं ही तेवढंच गरजेचं असतं! तुम्हाला काय वाटतं… जाणून घ्यायला नक्की आवडेल.. 
©शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!