व्हायरलची कमाल

© वर्षा पाचारणे.
“तू काय दिवसभर घरातच तर असतेस ! एक तर घरातली कामं करायची, नाही तर ते जुन्या साड्यांचे कपडे शिवत बसायचे.
अगं बाजारात आजकाल एवढे फॅशनेबल कपडे येतात पण तुला ते नको… घरातल्या अशा जुन्यापुराण्या वस्तूंचे कपडे कोण घालतं आज-काल? आता परवा दिवशी आपण त्या साठे आजींच्या नातीला बघायला गेलो, तिथे काय प्रेझेंट म्हणून… तू खणाची कुंची बनवून दिलीस!… ते दिल्यानंतर मला तर अगदीच लाजल्यासारखं झालं.

बरं ते आता आपल्यासमोर वस्तूचे कौतुकच करणार ना… नावं थोडी ना ठेवणार आहेत… पण तुला मात्र अगदी भारावून गेल्यासारखं झालं”
हॉलमध्ये निवांत पणे थोडावेळ बसावं, म्हणून टीव्ही बघत बसलेल्या कविताला आज सासूबाईंनी विनाकारणच फैलावर घेतलं होतं.

“काय ग ? त्या साठे आजींचा प्रदीप अमेरिकेला राहतो… त्याच्या मुलीच्या बारशाला तू तिला खणाची कुंची दिलीस! काय वेड बीड लागलं आहे का काय तुला?”..असे म्हणत नवरोबाने देखील आईच्या शब्दाची री ओढत साथ दिली..
“अरे नाही तर काय! मागच्या वेळेस माझ्या भजनी मंडळातल्या मैत्रिणी घरी आल्या होत्या, तेव्हा एका सुती साडी पासून बनवलेल्या पर्स बनवून त्याला जरीची लेस लावून तिने सगळ्यांना भेटवस्तू म्हणून दिली. मी छान पैकी प्रत्येकीला बाजारातून काहीतरी वस्तू विकत आणणार होते, परंतु हिने मात्र सगळ्या प्लॅनचा विचका करून टाकला”… असं म्हणत सासुबाईंनी तिच्याकडे पुन्हा तिरकी नजर करून पाहिले.

बिचारी कविता एवढे सारे ऐकून निमूटपणे स्वयंपाक घरात कामं करायला निघून गेली. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट जपून वापरायची शिकवण असलेली कविता पैशाची उधळपट्टी कधीही करत नसे. तरीही घरच्यांच्या लेखी मात्र ‘ती काहीच करत नाही’, असं एक पालुपद ठरलेलं असायचं.
कविताचे केस लांब सडक होते.. एक दिवस मैत्रिणीचे केस खूप गळत असल्याने तिने सहजच कविताला विचारले, “अगं, सध्या केस खूप गळतात. तू कसे मॅनेज करते हे तुझे लांब सडक केस? मला तर केस धुवायचे म्हटलं तरी सध्या टेन्शन येतं… कारण केस धुवून झाल्यानंतर केस डोक्यावर कमी आणि कंगव्यात जास्त निघून येतात की काय असं वाटायला लागलंय”.

त्यावर कविता म्हणाली ,”अगं, माझी आई लहानपणापासून मला घरीच बनवलेलं तेल केसांना लावायची. लग्नानंतरही वेळ मिळेल तेव्हा मी ते तेल बनवून ठेवते आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांना छान मालिश करते. त्यातले थोडे तेल मी तुला देते, ते लाव म्हणजे केस गळती निदान दोन महिन्यात जरा कमी तरी होईल”… असं म्हणत एका छोट्या बाटलीत कविताने ते तेल मैत्रिणीला दिलं.
दोन-तीन महिन्यानंतर ती मैत्रीण कविताला भेटल्यानंतर ते तेल खुपच प्रभावी असल्याचं तिने सांगितलं. तिने तेल बनवण्याची पद्धत कविताला विचारून घेतली.
बोल बोल म्हणता व्हाट्सअपवरती शेअर केलेली ती तेल बनवण्याची पद्धत खूप व्हायरल झाली.

स्वयंपाकाची मुळातच आवड असलेली कविता सतत काहीना काही नवीन पदार्थ करून पाहायची. असंच एक दिवस शिळ्या भाताचे चटपटीत कटलेट करून सहज तिच्या फॅमिली ग्रुप वर अपलोड केले. 
बघता बघता सगळ्याच नातेवाईकांनी त्याला भरभरून लाईक्स दिल्या.. हे प्रकरण तेवढ्यावरच न थांबता तिच्या केसांच्या तेलाला आणि तिच्या घरातील तिने बनवलेल्या कृत्रिम फुलांना भरपूर कमेंट्स मिळू लागल्या.
ओळखीपाळखीतले लोक तीचे तोंडभरून कौतुक करत असत. शांत स्वभावाची म्हणून ओळख असलेली कविता आता मल्टी टॅलेंटेड म्हणून ओळखली जावू लागली.

साठे आजींच्या नातीला दिलेल्या खणाच्या कुंचीने तर अगदी मजलच गाठली होती.. साठे आजींच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकताच बाळाच्या कौतुका बरोबरच त्या शिवलेल्या कुंचीचे देखील तोंड भरुन कौतुक होत होते..
पण घरात मात्र तिचे हे छंद कोणालाच आवडत नसल्याने दुसऱ्या दिवशी कविताने मनाशी ठरवलं की,’ नाही आपल्या घरच्यांना आवडत, तर आपण हे असे वस्तू बनवणे सोडून देऊयात’.. असा विचार करुन तिने सुई दोऱ्याचे डबे आणि कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारे सामान बांधून माळ्यावर ठेवून दिले.

आज कविता आणि शेखर मार्केटमध्ये साडी खरेदीसाठी गेलेले असताना तिथे नेमक्या साठे आजी आणि त्यांची सून भेटली..
“अगं कविता, तू दिलेलं गिफ्ट इतकं अप्रतिम होतं की त्या प्रकारची सेम कुंची अनेकांनी शोधूनही दुकानांमध्ये मिळाली नाही.. माझ्या बऱ्याच मैत्रिणी ज्यांची मुलं लहान आहेत, त्या अनेकींनी तुझा पत्ता आणि नंबर आज सकाळीच ग्रुप वर मागून घेतला आहे… त्यातल्या बऱ्याच जणी तुला नक्कीच फोन करून ऑर्डर देतील हं”… असं म्हणून कविताचं तोंड भरुन कौतुक करून साठे आजींची सून निघून गेली..

थोडं पुढे गेल्यावर कविताची मैत्रीण भेटली. मैत्रीण भेटल्याचा आनंद दोघींच्या चेहऱ्यावर अगदी झळकत होता.
इतर वेळेला विरळ झालेल्या केसांची लाज वाटत असलेली ती मैत्रीण, आज छान केस मोकळे सोडून फिरताना दिसताच कवितालाहि खूप छान वाटलं.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर त्या मैत्रिणीने देखील कविताचं तोंड भरून कौतुक केलं.

“अगं, तू दिलेल्या तेलाने कमालच केली बघ.. म्हणजे बाजारातील खूप प्रॉडक्ट वापरून पाहिली होती परंतु केस गळती काही थांबत नव्हती.. पण तू सांगितलं तसं तेल मी करून पाहिलं आणि दोन महिन्यात केस गळती बऱ्यापैकी कमी झाली गं.आधी केसात कंगवा घालायचा म्हटल्यावर आधीच जीव कासावीस व्हायचा, पण आता ते न गळणारे केस पाहून मी स्वतःच माझ्या केसांच्या प्रेमात पडायला लागले आहे बरं का”, असं म्हणत कविताला टाळी देत दोघीही खळखळून हसल्या..

येता-जाता भेटणारे लोक कविताचं असं भरभरून कौतुक करत आहेत, हे पाहून शेखरला स्वतःचीच थोडी लाज वाटली.. ‘कवितामध्ये इतक्या कला लपलेल्या आहेत, हे माहीत असूनही आपण कायम तिला मागासलेल्या विचारांची समजत आलो’ या विचाराने तो खजिल झाला.
बाजारात अनेक वस्तू नक्कीच मिळतात, पण स्वतः प्रेमाने, विचारपूर्वक, कलाकुसरीने बनवलेल्या वस्तू मात्र विरळच याची जाणीव त्याला झाली होती.

तिच्या या कलाकुसरीला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्याने तिला यूट्यूब चैनल सुरू करायला लावले… बोल बोल म्हणता वर्षभरात अनेक व्हिडिओ अपलोड करून कविता चांगलीच फेमस झाली होती.
तिच्या व्हिडिओजला प्रचंड लाइक्स मिळत होते… त्यातही सर्वात सुरुवातीला अपलोड केलेल्या त्या खणाच्या कुंची बरोबरच पोपटाच्या आकाराची अगदी हुबेहूब बनवलेली कुंची अनेकांच्या पसंतीस पडली होती… तिची ती कलाकृती खुपच व्हायरल झाली..

‘गृहिणींनी देखील घर कामाबरोबरच आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे’ हे तिचं वाक्य प्रत्येक गृहिणीला स्वतःतील जिद्द जागी ठेवण्यासाठी प्रवृत्त करत होतं. एक गृहिणी असून संसाराचा भार पेलताना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत जोपासलेल्या छंदामुळे आज तिने यशाचं शिखर गाठलं होतं…

‘मी फक्त गृहिणी आहे असं समजून स्वतःला कमी लेखण्यापेक्षा छंदाला मिळालेली कलात्मकतेची जोड नक्कीच तुमच्यासाठी यशाची नवीन कवाड उघडत असते’ या टॅग लाईनने अनेक महिलांमध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता… लाईक्स बरोबर शेअर्स आणि सबस्क्राईबरही दिवसागणिक वाढत होते..

कापडी पिशव्या, पडदे, निरनिराळ्या प्रकारचे छोट्या मुलींचे आकर्षक फ्रॉक तर कधी कस्टमाइझ बर्थडे केक, कधी छोट्या-मोठ्या फुड ऑर्डर घेऊन आता कविता चांगलीच फेमस होऊ लागली होती. 
तिच्या अनेक रेसिपीज आणि कलाकृतींचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले होते.. प्रचंड प्रसिद्धी मिळूनही कविताचे पाय मात्र जमिनीवरच होते.
टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना डोक्यात ठेवून तिने नेहमीच वस्तूंचा पुनर्वापर योग्यरीतीने केला होता.

लहानपणापासून आई-वडिलांनी जपणूकीने वागण्याचे संस्कार केल्याने आणि छंद आता छोटेखानी व्यवसायात रूपांतरित झाल्याने कविताने स्वतःच्या हिमतीवर आज स्वतःचे बुटीक सुरू केले होते. उद्घाटन सोहळ्यात तिने प्रमुख पाहुणे म्हणून सासुबाईंचीच निवड केली होती..
‘तिच्या छंदावरून मी तिला हिणावूनही तिने कधीही वाईट वाटून न घेता आपल्यातले गुण जोपासल्याने आज ती या उंचीवर येऊन पोहोचली आहे’, हे सांगताना सासुबाईंचेही डोळे आनंदाने पाणावले होते. तिच्या छंदाला आज सोशल मीडियाच्या या व्हायरल पद्धतीमुळे एक वेगळी उंची मिळाली होती.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!