चिरतरूण

© समीर खान
” हजारदा विचारलंय समीर पण तू ब्र काढत नाहीस.” शेल्फमधली पुस्तकं भिरकावत विभावरी आपला राग समीरवर काढत होती. 
” सांगणार होतो गं, तुला माहितीये ना की मला वाचनाची आवड आहे? ”  समीर विभावरीशी लगट करण्याच्या प्रयत्नात होता. 
” काही एक सांगू नकोस मला आणि अंगाला अजिबात हात लावू नको. ” विभू चांगलीच संतापली होती.
हतबल होत समीर बाजूच्या खुर्चीवर तोंड पाडून बसला .
” नाशिकला याच साठी गेला होता ना तू? कुठल्या अघोरी बाईच्या नादी लागलास की झोपून आलास तिच्या सोबत? ” विभूचे डोळे आग ओकत होते. 

“विभू ऽऽऽऽऽ खबरदार जर एक शब्दही पुढे बोललीस तर” समीरही त्वेषात आला होता. 
” मी तुला आधीच सांगितलं होतं की तू मला कुठल्याही बंधनात तु बांधू शकत नाहीस. समीर.. मी नावाप्रमाणेच हवा का झोका आहे. पटत असेल तरच सोबत राहू, नाहीतर नाही. ” समीरचे हे निर्वाणीचे बोल विभूला खूप टोचले आणि ती रडू लागली.
तिला रडताना पाहून समीरही अस्वस्थ झाला.
दोघं लिव्ह इन मध्ये राहत होते. अजून लग्न न करण्याची दोघांचीही वेगळी कारणे होती. मात्र त्यांचं नातं त्या ही पलीकडचं झालेलं होतं आणि या नात्यात आल्यापासूनच्या तीन वर्षात पहिल्यांदाच दोघं भांडत होते. 

” मी कुठल्याच गोष्टीला तुला आजवर रोखलंय का कधी? तुला काही विचारलंय की बंधने घातलीये? ” विभू अजूनही रडत होती. काहीच न बोलता तीला समीरने कुरवाळत जवळ घेतले आणि ओठावर ओठ टेकवले.
विभूचा लटका विरोध केव्हाच गळून पडला.
कपाळावर चुंबत घेत तिच्यावर  तो प्रेमवर्षाव करू लागला.
प्रेमवर्षाव करत असताना विभूने तो विषय पुन्हा काढलाच. रागात समीर तसाच बाजूला होत डोक्याला हात लावून बसला. 

” ऐकायचंय ना तुला? तर ऐक. होय, मी नाशिकला याच साठी गेलो होतो. खूप जुनी मैत्रीण आहे माझी तिथे आणि हो स्री मैत्रीणी फक्त झोपण्यासाठीच असतात हा तुझा गैरसमज आहे. मी कुणाचेही काही ऐकणार नाही माझंच खरं करणार हे तिला माहित असल्यामुळे तिने जास्त आढेवेढे न घेता एका अघोरीशी भेट घालून दिली माझी. त्या अघोरीचा गुरू आहे थेट हिमालयात. काही ठिकाणांची माहिती सांगितली आहे त्याने पण हे लोकं एका जागेवर स्थिर राहत नाहीत. सतत ठिकाण बदलत असतात त्या गुरुंना तिथे जाऊन शोधावं लागेल आणि मला हवी ती वस्तू आणावी लागेल. ” समीर एका दमात बोलून गेला. 

” ठिक आहे, मरायला तयारच झाला आहेस तर मी तुला एकटं जाऊ देणार नाही माझ्या आधुनिक ययाती. मी पण येईल तुझ्यासोबत आणि यापुढे तू एक शब्दही बोलणार नाहीस. ” विभूही हट्टाला पेटली होती आणि तिला काही समजावणं व्यर्थ आहे हे समजून समीरने होकारार्थी मान डोलावली. 
समीरच्या डोळयात अश्रू तरळलेले विभूच्या नजरेतून सुटले नाही. 
********************************
ट्रेकचा बहाणा सांगून त्यांचा चौघांचा ग्रुप निघला तर खरा कारण अघोरीने सांगितलेले ते स्थळ या ट्रेकच्या जवळच होते. यामुळे ट्रेकला जायचंय असं समीर व विभूने त्यांच्या ग्रुप ला कळवलं होतं. पंचवीस जणांच्या ग्रुप पैकी समीर व विभू वगळता अजून फक्त दोनच जण प्रत्यक्ष यायला तयार झाले होते कारण घनदाट जंगल, अकाली बर्फवृष्टी, अवघड ट्रेक, बिनभरोशाचा निसर्ग, हाडं गोठावणारी थंडी मध्ये असा ट्रेक करणं खूप घातक ठरू शकतं, प्रसंगी जिवावरही बेतू शकतं असा सल्ला सर्वांनीच त्यांना दिला होता

मात्र समीर आपल्या निर्णयावर ठाम होता तर विभावरी त्याला एकटा सोडायला तयार नव्हतीच.
हिमालयाच्या कुशीत येतानाच ट्रेकचा पहिला टप्पा त्यांनी यशस्वीपणे पार केला होता. खळाळणार्‍या मंदाकिनी नदीचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.
सगळी कडे बर्फाच्छादित शुभ्र भव्य हिमशिखरे पसरलेली होती. जागोजागी नितळ पाण्याचे झरे वाहत होते. दाट जंगल होतं. विविध प्राणी पक्षांचे  मनमोहक आवाज वातावरण अजूनच प्रसन्न करत होते. 

सर्व सुरळीत सुरू असतांना आणि ट्रेकचा पहिला टप्पा यशस्वी पणे पुर्ण करूनही अचानक वादळी वारे आणि बर्फवृष्टी सुरू झाली आणि यांचा चौघांचा ग्रुप फुटला.
नशीब की समीर आणि विभावरी दोघं सोबतच होते. रस्ता भटकत ते कुठल्या कुठे आले होते. तीन दिवस कसेबसे रेटत जवळचे अन्नपाणी कधीच संपले होते.
बाकीच्या दोघांचंही काय झालं हे कळायला मार्ग नव्हता.
ते दोघं जर सुखरूप जवळच्या गावात पोहोचले असतील तर एखादा पोलिस आणि फाॅरेस्ट मधल्या लोकांची पथके शोधत येतीलच ही आशा समीरला होती.

अजून नाही आले म्हणजे त्यांचंही काही बरंवाईट? नाही, नाही… असं नसेल झालं तो स्वतःलाच समजावत होता.
समीर आपल्याला या जंगलातून सुखरूप बाहेर काढेल या ठाम विश्वासावर विभावरीने हे खडतर असे तीन दिवस काढले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपण विभावरीच्या विश्वासावर खरे ऊतरणार नाही याची निराशा समीरच्या डोळयात स्पष्ट दिसत होती. 
” माझा अट्टाहास तुला आज या मृत्यूच्या दारात घेऊन आला विभू ”  समीर हताशपणे ऊद्गारला. 
” तुला पाहिलं त्याच दिवशी मी माझे प्राण तुझ्या सुपूर्द केले होते समीर. ” विभावरी ठामपणे म्हणाली. 

बर्फवृष्टीमध्ये जवळ जवळ दोघं गाडले गेले होते. उसनं अवसान आणून समीर विभूकडे पाहत होता.
विभू.. विभावरी पाटील आणि समीर सरदेसाई. एका ट्रेक निमित्ताने दोघांची भेट झालेली. दोघेही साहसी, हिंमती आणि जिंदादील. दोघांची जोडी जमायला वेळ लागला नाही.
दोस्ती, यारी नंतर एकत्र राहणे, खाणे ते दोघं एकमेकांचा जिव की प्राण कधी झाले ते दोघांनाही समजलं नाही.
अश्याच एका दिवशी समीरचं आधार कार्ड विभावरीच्या हाती लागलं आणि ती दचकलीच.

त्यावरच्या जन्मतारीखेनुसार समीर 40 वर्षांचा होता. विभावरीने याचा जाब समीरला विचारलाच. आधी उडवाउडवीची उत्तरे देऊन समीरने विषय झटकला मात्र विभावरी समोर त्याला कबूल करावच लागलं की तो 40 शी तला आहे.
मात्र आश्चर्याची गोष्ट ही की तो कधी चाळीशीतला प्रौढ वाटलाच नाही.
तर अजूनही 25 वी शी तला तरूण दिसत असे. असंही त्याला म्हातारपणाची भिती वाटत असे. व्यायाम, डाएट, खाणं पिणं, कसल्या कसल्या जडी बुटी, पथ्यपाणी यांच्या जोरावर अजूनतरी तो वयाला रोखून धरण्यात यशस्वी ठरला होता.

पण म्हणतात ना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.
अघोरींचा पत्ता शोधत तो थेट हिमालयाच्या या बर्फाच्छादित पर्वत रांगांमध्ये तो आला होता आणि विभावरीही काहीही विचार न करता त्याच्या मागोमाग आली होती.
दोघंही ऊत्तम ट्रेकर असल्याने तशी खास अशी चिंता नव्हती आणि गरजेच्या सर्व वस्तू ही त्यांनी सोबत घेतल्या होत्या मात्र कुठून कुठून माहिती एकत्र करत अघोरींना शोधत ते या भागात आले खरे आणि जोरदार बर्फवृष्टीत अडकले आणि मृत्यूच्या दाढेत जाऊन पोहोचले. 

“सम्या आपण जगलो तरी आणि मेलो तरी तुझी इच्छा पुर्ण होणार रे, चिरतरूण राहण्याची! कसं ते माहितीये?? जगलो तर अघोरी शोधून तू तुला हवी ती बुटी मिळवणार आणि तरूण राहणार.
मेलो तरी या बर्फात गाडले जाणार आणि कितीही वर्षांनी ऊकरून काढलं तरी आपली शरीरं या बर्फामुळे न सडता जशीच्या तशी मिळणार. झालं ना मग तुझ्या मनासारखं? ” थरथरणारे ओठ जोडत कसंतरी विभावरी समीरच्या डोळयात पाहून ऊद्गारली. विभावरीच्या गार पडत चाललेल्या शरीराला समीरने अलिंगन देत आपलं तोंड तिच्या मानेजवळ टेकवलं. तिथली फडफडणारी नस त्याला विभावरीच्या असण्याचा दिलासा देत होती. 

“सम्या, तुझ्याप्रमाणेच तुझ्या शायरीवर मरत आलेयं रे मी, कुछ सुना दे यार…. ” 
समीरच्या डोळयातून दोन टपोरे अश्रू विभावरीच्या मानेवर पडले. 
” जिंदगी जिये तो डर डर के,
की कही ऊम्रे लंबी हुयी तो बुढापा दबोच लेगा, 
अब मौत के आगोश मे समीर दुवाँ कर रहा है लंबी ऊम्र की। “
” वा ऽऽह ” विभावरीचा आवाज क्षीण होत चालला होता. 

” विभू, विभू ऽऽऽऽ अगं थोडा वेळ अजून , प्लिज…” रडण्यासाठीही ताकद ऊरली नव्हती समीरकडे. 
” विभू ऽऽऽ तु नेहमीच छळायची ना मला? माझं ‘चिरतरूण ‘ असण्याचं सिक्रेट सांग म्हणून? जे मी तुला कधी सांगितलं नाही? ऐक मी सांगतोय… ” 
” हममम ऽऽऽ” बर्फ दाटलेले डोळे हलकेसे खोलत विभावरीने आवाज दिला. काही बर्फकण घरंगळत खाली पडले. 
समीरलाही आता धाप लागत होती. हाडं गोठवणार्‍या त्या थंडीत बर्फवृष्टीमध्ये दोघंही जवळपास गाडले गेले होते मात्र ट्रेकमधील सोबतचे सवंगडी शोधत येतील या आशेवर ते एकमेकांना जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होते. 

“चिंचेच्या झाडाखाली भुतं, पिशाच,जिन्न असतात असं नेहमी आई बोलायची. आमच्या वाड्यापासून जवळच चिंचेची मोठमोठी झाडं होती त्याच्या सावलीत आमचे खेळ चालायचे.
एक दिवस लपाछपी खेळताना त्या झाडाच्या खोडाच्या ईतक्या आतल्या बाजूला मी कधी आलो हे मलाच समजलं नाही. समीऽऽऽऽर… समीऽऽऽऽऽर.. कानात कुणीतरी फुसफुसत होतं.
मला सरसरून काटा आला. शुद्ध हरपली आणि रात्र तिथेच काढली मी.
इकडे हल्लकल्लोळ माजला होता की समीर हरवला मात्र मी स्वतःच ऊठून दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेलो.

आधी, नंतर काय झालं काय नाही मला समजलंच नाही. कुणी काय बोलायचं तर कुणी काय. त्यानंतर माझी कांती चमकत गेली ती आजवर कधी कमी झालीच नाही.
माझ्यासमोर जन्मलेली मुलं, मुली माझ्यासमोर प्रौढ वाटायला लागली तेव्हा ही चर्चा अजून वाढली.
चिंचेच्या झाडातला सदाबहार जिन्न समीरवर हावी आहे असं जो तो बोलू लागला. खरं काय खोटं काय मला काहीच माहिती नाही पण त्यादिवशी कानात आलेला तो आवाज अजूनही थरकाप उडवतो माझा.
त्या आवाजाने मला हवं असलेलं चिरतारूण्य नक्कीच दिलं पण या मोबदल्यात जो ही माझ्या जवळ येतो तो त्यास हिरावून घेतो. इतकंच काय तर माझ्या वर प्रेम करणारी एक एक व्यक्ती माझ्या आयुष्यातून वजा होते.

चिरतारूण्यासोबत एकाकीपणाचा श्राप सोबत जोडला गेलाय माझ्या. बाबा, माझा मित्र सागर, आमच्या शाळेच्या माझ्या आवडत्या शिक्षिका, आणि आता…… ” समीरला हुंदका दाटून आला. 
” हं… ” विभूची ती मानेची नस अचानक शांत झालेली समीरला जाणवली. गुंफलेले हातातले हात गार पडलेले त्यास जाणवले. तिला आणखी घट्ट मिठी मारत समीरही सुटत चाललेले आयुष्य आणि वेळ यांची सांगड घालत होता.
मंद झालेला श्वास, जडावलेले डोळे, बर्फात गारठ्याने सुंध पडलेले शरीर…. तोच समी ऽऽऽर, समी ऽऽऽर तोच आवाज समीरच्या कानात ऐकू आला.

अर्धग्लानित समीर बडबडत होता, ” वयाची चाळीशी गाठली ती स्वतःच्या हिंमतीवर, स्वतःच्याच मर्जीप्रमाणे. मन मानेल तसं जगत आलो. ज्वानीची नशा मनसोक्त भोगली. हवं ते आणि हवी तशी शरीरं कुस्करली. कुठेच कुचराई केली नाही. यासाठी माझ्या या चिरयौवनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. तु माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी हा विचार केलाच नव्हता की आपलं नातं दिवसेंदिवस असं बहरेल कारण आतापर्यंत भेटलेली माणसे अशीच होती. प्रणयसुखात मदमस्त झाल्यावर सोडून जाणारी. तु तशी नव्हतीस विभू. माझा हा भ्रम तू तोडण्यात यशस्वी झाली आणि मी नखशिखांत हादरून गेलो.

मला माहित होतं की असं काही असल्यास माझ्या सोबत जे आजपर्यंत घडत आलंय तेच घडणार आणि तू माझ्यापासून हिरावली जाणार. अज्ञानातच सुख असतं असं म्हणतात ते खरंच आहे. होय मी नाशिकला गेलो होतो पण चिरतरूण राहण्यासाठी बुटीचा पत्ता शोधण्यासाठी नव्हे तर मला असलेल्या या श्रापावर ऊःशाप मिळवण्यासाठी.चिरतरूण राहतानाच माझ्या आयुष्यातील माझ्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती माझ्याकडून हिरावली जाणार हीच त्या चिरयौवनाची किंमत.
ज्यास मी बदलण्याची ईच्छा असूनही बदलू शकत नव्हतो. लांब आणि खडतर आयुष्य कायम तरूण राहूनही एकटेपणाचा श्राप सोबत घेऊनच मला जगायचे होते. तिथल्या त्या शिष्याकडे याचा उपाय नव्हताच.

त्यासाठी त्याच्या गुरूंकडे जाणं भाग होतं. तुला जर हे आधी सांगितलं असतं तर तू हसण्यावारी नेत हा विषयच फेटाळून लावला असता. कुठल्याही अंधश्रद्धेला मानणारी तू नव्हतीच.
मी ही अशा गोष्टींवर विश्वास करत नव्हतो पण कितीही नाकारलं तरी नाईलाजाने का होईना काही गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. तुला माहितीये माझ्यावर प्रेम करणाऱ्या किती व्यक्ती मला सोडून गेल्या आणि मी एकटाच मागे ऊरलो. मला तुला गमवायचे नव्हते विभू…….”  यापुढे समीरला शब्द फुटत नव्हते.

हळूहळू त्याचा श्वास कोंडत चालला होता आणि धाप लागत होती.
आता त्याचीही शुद्ध पुर्णपणे हरपली आणि समीरनेही अखेरचा श्वास घेतला.
दोघांनी मारलेली मिठी कधी ,कोणी ,कशी विलग केली समजलंच नाही त्याला.
बर्फामध्ये गाडलं गेलेलं त्याचं शरीर अगदी जसंच्या तसं राहणार होतं अनंत काळासाठी ” चिरतरूण ” राहण्यासाठी. 
© समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!