© कांचन सातपुते हिरण्या
” नानी कसं वाटतंय आता ? पाच-सहा दिवस झाले ना केस धुवून ?”नानींचं अवघडलेपण ओळखून माधुरी रोजसारखी बोलत होती. त्यांना अंघोळ घालून आवरून आणून तिनं बेडवर झोपवलं.
नानींनी डोळे मिटून घेतले माधुरी गेली असं समजून, त्या पुटपुटल्या, “देवा कसलं हे दुखणं मागं लावलंस. त्यापेक्षा बोलावून घे लवकर. कशाला उगाच या पोरांना त्रास.”
“नानी असं काय बोलता. कोण म्हणलं त्रास होतोय आम्हांला.”
” कुणी म्हणायला कशाला हवं? मला दिसत नाही का .”
” नानी तुम्ही पडा बरं शांत. काही पण विचार करत असता. आलेच मी, तोवर अण्णासुद्धा येतील मानसला डे केअरमध्ये सोडून.”
चार महिने होत आलेत, नेहमीसारखे संध्याकाळी नानी आणि अण्णा बागेत चक्कर मारायला म्हणून गेले.
तिथं झाडांना पाणी घातलेलं हरळीत पसरलं होतं.
थोडा वेळ बसावं म्हणून ते दोघं बसणार तोच नानींचा पाय घसरला.
ते निमित्त झालं अन अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या नानींचा मुक्काम जवळपास महिनाभर हॉस्पिटलमध्ये , छोटसं ऑपरेशनही करावं लागलं .
या सगळ्यामध्ये माधुरी मिलिंदची प्रचंड दगदग झाली .
मिलिंद दिवसभर ऑफिस आणि रात्री हॉस्पिटलमध्ये मुक्कामाला थांबत होता .
माधुरी दिवसभर अधेमधे घरी आणि बाकीचा वेळ हॉस्पिटल असं सांभाळत होती .
अण्णांना सांगून समजावून घरीच ठेवत होते . त्यांचंही नुकतंच ऐंशी पूर्ण झालेलं .
मानसला घराजवळच्या डे केअरमध्ये ठेवायचं ठरवलं होतं सध्या तरी .
नानी घरी आल्यावरही नातेवाईकांचं भेटायला येणं बरेच दिवस सुरू होतं .
त्यामुळं चहा पाणी , कधी जेवण यामुळं माधुरीवर खूप ताण आला .
एक दिवस मिलिंदनं तिला विचारलंच ,” माधुरी आपण नानीसाठी नर्स ठेवायची का ? नाही तर मग एखाद्या मावशी . हॉस्पिटलमधून आपल्याला लगेचच माहिती मिळेल . तुझी किती गडबड होतीय आणि मला काहीच मदत करता येत नाही . अण्णासुद्धा शांतच असतात आता वरवर दाखवत नसले तरी आणि मानस , त्याला पाळणाघरात ठेवावं लागतंय . सगळंच बदलून गेलं अचानक , नाही का गं ?”
” मिलिंद , तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय पण नानींचं काय ? मी त्यांचं करत असतानाच त्या किती अवघडल्यासारख्या होतात . नर्स ठेवल्यावर कसं होणार ? होणाऱ्या गोष्टी होतच असतात त्यात काही कोणाचा दोष आहे का . पण नानी या सगळ्याचा दोष स्वतःलाच देत असतात आणि मी म्हणाले का मला त्रास होतोय .तसं काही वाटेल तेव्हा मी नक्की सांगेन .”
” मीसुद्धा नानीच्या काळजीपोटीच बोलतोय ना गं . तुला माहितीये ना नानीचं आणि माझं नातं . आता तर माझी हिम्मतच होत नाही तिच्याशी बोलायची . किती हळवीये ती . डॉक्टरांनी काय सांगितलंय आठवतंय ना . वयोमानानं आता शरीर थकलंय नानीचं . नाहितर ट्रीटमेंटसाठी कुठंही न्यायला तयार आहे मी पण आता तिला सहन होणार नाही .”
” मिलिंद आता नानींना आपल्या प्रेमाच्या आधाराची जास्त गरज आहे . पैसे खर्च करून हे सगळं मिळणार नाही आणि माझ्यापेक्षा जास्त तर हे तुम्हाला माहिती , खरं ना .मी आलेच नानींच्या तळव्यांना तेल लावून देते आणि अण्णांना हळदीचं दूध देते . तेवढीच शांत झोप लागते दोघांना . मानस झोपलाय तुम्ही पडा त्याच्या शेजारी .”
पण माधुरीच्या पाठोपाठ मिलिंदही गेला .
नानी जाग्याच होत्या .
” मिलिंदा ये की . जागीच आहे मी .”
” नानी त्रास होतो ना गं खूप . “
“होतो की पण कशाचा माहितीये का ? तुम्हाला सगळ्यांना मी त्रासात टाकलंय याचा . “
“नानी पुन्हा असं अजिबात बोलू नकोस . आईचा कधी त्रास होतो का मुलांना ? तू तर जगावेगळी आई आहेस माझी . तुझे ऋण कधी न फिटणारे आहेत गं .”
” मिलिंदा अरे मायलेकात ऋणाचं नातं नसतं बाळा . जेव्हा तुला हवं होतं तेव्हा मी प्रेम दिलं आणि आता मला तू आधार देतोय . माझीच पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून उशिरा का होईना देवानं तुझ्यासारखं लेकरू माझ्या ओटीत घातलं .”
मिलिंदाचे डोळे भरून आले .
हळूहळू घरातलं रुटीन पहिल्यासारखं झालं आता .
फरक एवढाच की चालत्या फिरत्या नाशी आता व्हीलचेअरवर होत्या .
पण ही परिस्थिती आता सगळ्यांनीच स्वीकारली .
रविवार त्यातल्या त्यात निवांत .
माधुरीसाठी तर जास्तच कारण मिलिंदला सुट्टी . मानसला शाळा ,
डे केअरला सुट्टी त्यामुळं दोघांची सकाळची घाई गडबड , डबे काही नाही .
माधुरीनं नानींना अंघोळ घातली .
मग तिनं न्हाऊन घेतलं . रविवारी मानसची अंघोळ , आवरणं सगळं बाबाकडे .
उशिरा उठणं , मस्ती करत आवरणं त्यामुळं स्वारी एकदम खुश असते .
” मानस आवर नानी अण्णा थांबलेत नाश्त्याला . ” माधुरीनं हाक मारली .
तोवर तिनं अण्णांना इडली सांबर वाढलं .
“नानी मी भरवते तुम्हांला . “
” काय गं माधुरी . तूही बस आमच्याबरोबर आता . मी खाते हळूहळू . उजवा हात दुखतोय पण डावा आहे की नीट .तू तरी काय काय करशील? त्यांना बाप लेकांना खाऊ दे मागून .”
नानी असं म्हणाल्या आणि मानस उड्या मारत हॉलमध्ये .
“आई भूक लागली .”
” मलासुद्धा खूप भूक लागली .” मिलिंदही आलाच .
” आला का लाडोबा ?”
” हो नानी .” आणि मानसनं नानी अण्णांना पापी दिली .
“नानी तुझा बर्थडे आलाय ना आता ?”
” तुला कसं माहिती रे लबाडा ?”
“मला सांगितलं ना काल अण्णांनी . आपण तुझ्या बर्थडेला मोठ्ठा केक आणायचा आणि पावभाजी , आईस्क्रीम .”
“मनू यावेळी माझा वाढदिवस नको करायला बाळा . मला बरं नाहीये ना .”
” नाssही , करायचा म्हणजे करायचा . तू छान आहेस आता .”
“बरं , पण घरातल्या घरात आपण पाच जणंच .”
मिलिंद आणि अण्णांनी समजावलं पण मानस काही ऐकेना .
मग माधुरीच म्हणाली ,” करू आपण दरवर्षीसारखा वाढदिवस नानींचा. सोसायटीतल्या सगळ्यांना बोलवू . तेवढंच त्यांनाही बरं वाटेल आणि आपल्यालासुद्धा .”
एवढं ऐकलं मात्र आणि मानस उड्या मारतच शेजारी पळाला सांगायला .
” माधुरी कशाला गं उगाच .”
” नानी आता काही बोलू नका . आमचं जाऊ दे पण मानससाठी तरी..”
” बरं बाई , तूम्ही म्हणाल तसं .”
” बघितलंस नशीबवान आहोत आपण . आता आयुष्याच्या या टप्प्यावर आणखी काय सुख हवं यापेक्षा .”
माधुरीनं लगेचच वाढदिवसाला काय काय करायचं याची यादी तयार करायला घेतली .
आठ दिवसांत केटरिंगची ऑर्डर , केकची ऑर्डर , लहानांना मोठ्यांना रिटर्न गिफ्ट्स सगळी तयारी केली .
तरी तिला अजूनही काय करू आणि काय नको असे झालं .
अन् वाढदिवसाचा दिवस उजाडला .
” नानी हॅपी बर्थडे . “
“वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नानी .”
मानस, माधुरी, मिलिंद सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या .
शनिवार असल्यामुळं मानसला अर्धी शाळा .त्याला बळेच शाळेत पाठवला तिनं .
मिलिंदसुद्धा हाफ डे घेऊन येणार होता .
ते दोघं गेल्यावर माधुरीनं नानींचं आवरलं .
नवा गाऊन , केसांचा पोनी , पावडर , टिकली .. आवरून झाल्यावर त्यांना औक्षण केलं .
” इडा पिडा टळो आणि दीर्घायुष्य मिळू दे नानी तुम्हांला .”
“माधुरी मी तुझ्यासाठी काही करावं तर तुलाच करावं लागतंय माझं .”
“इतकी वर्ष केलंत ना . आता मलाही करू द्या काहीतरी .”
” अरे व्वा ! झालं का आवरून ?”
अण्णांनी तेवढ्यात जाऊन गजरे आणले .
“माधुरी घे हे .”
” अण्णा तुम्हीच माळा ना नानींच्या केसांत . बघा तरीच मी म्हटलं काहीतरी कमी वाटत होतं . मी आलेच नाश्ता घेऊन.”
ती हसली .
“नानी किती करतात ना ही पोरं आपल्यासाठी . उर भरून येतो अगदी .”
” खरंच हो . हल्ली रक्ताची नाती दुरावतात आणि मिलिंदा तर..”
” नानी असं नका बोलू . आपलाच आहे मिलिंदा .”
मिलिंद आणि माधुरीनं लिफ्टमधून नानींची व्हिल चेयर हळूच टेरेसवर आणली .
सोसायटीतली लहान मोठी सगळी मंडळी जमली होती .
” हॅपी बर्थडे नानी . “
“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नानी .”
सगळेच नानींच्या भोवती जमले .
केक कटिंग झालं .
“काही आणू नका ,” असं सांगितलं होतं माधुरीनं तरी भेटवस्तू दिल्याच सगळ्यांनी .
पावभाजी, पुलाव, केक, आईस्क्रीम सगळेच खुश होते .
मोठ्यांच्या गप्पागोष्टी , लहानाचं खाताखाता खेळणंही सुरू होतं .
नानींच्या मैत्रिणी त्यांच्या बाजूला खुर्च्या घेऊन बसल्या .
” काहीही म्हणा नानी नशीबवान आहात . हौसेनं करतात सून आणि मुलगा सगळं . नाहीतर आजकाल कोणाला वेळही नसतो आणि आवडही आपले वाढदिवस साजरे करायला .”
“हो ना , आम्हाला व्हिडिओ कॉल येतो लेकाचा सुनेचा अमेरिकेहून वाढदिवसाला . तेही नसे थोडके .आता फार अपेक्षा नाहीत .”
” मी काय म्हणते नानी . वर वर दाखवत नसले तरी त्यांना अडचण होतच असणार . सोपं नसतं अशा माणसाचं वर्षानुवर्षे करत राहणं. त्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून सांगा की मिलिंदाला . तो आधार आश्रम झालाय ना नवीन , तिथे ठेवायला तुम्हांला आणि अण्णांना . पैसे घेतात जास्त पण सगळं जिथल्या तिथं करतात . कशाला यांच्या संसारात अडचण ,नाही का ? “
मैत्रिणीच्या बोलण्यानं नानींचा हसरा चेहरा उतरलाच . डोळ्यांत खळकन पाणी आलं आणि नेमकंच हे सगळं बोलणं मघापासून मिलिंदच्या कानावर पडलं होतं .
त्यानं पटकन येऊन नानींच्या खांद्यावर हात ठेवला .
” हॅलो तुम्हांला सगळ्यांना आज या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी सांगायचंय मला .”
सगळेच बघायला लागले उत्सुकतेने आणि मिलिंद जे काही बोलला ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव .
“हे नानी आणि अण्णा माझे जन्मदाते आई वडील नाहीत.”
क्षणभर शांतता..
शरद , मिलिंदचा मित्र म्हणाला ,”मिलिंद म्हणजे तू अनाथ ..”
“म्हणायला गेलं तर अनाथ आहे आणि नाही पण . म्हणजे मी सहा वर्षांचा असताना माझे आई वडील अपघातात गेले . मी वाचलो. तेव्हा नातेवाईक आले. सगळं आटोपल्यावर प्रश्न होता माझं पुढे काय ? माझ्या आईला माहेरचं जवळचं कोणी नव्हतं आणि बाबांकडं जे होते त्यांच्यातल्या कोणाचीही मला सांभाळायची तयारी नव्हती . मोठा पेचप्रसंग .
तेव्हा आमच्या शेजारी राहणारे हे नानी अप्पा पुढं आले. लग्नानंतर बरीच वर्ष होऊनही त्यांना मूल नव्हतं.
आजपासून हा मिलिंद आमचा म्हणत अण्णांनी मला जवळ घेतलं.”
नातेवाईकांच्या चेहऱ्यावर अचानक मोकळेपणाचे भाव .
” कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मी नानी अण्णांचा झालो . काकू आता तुम्हीच सांगा ठेवू का मी या दोघांना वृद्धाश्रमात .”
मिलिंदनं जे काही सांगितलं ते ऐकल्यावर तिथे असलेल्या प्रत्येकाचे डोळे भरून आले .
नानी अण्णांसाठी आदर आणि मिलिंद माधुरीसाठीचं कौतुक सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं ..
” नानी झोपा आता शांत.” माधुरीनं पांघरूण एकसारखं केलं .
नानींनी तिचा हात हातात घेतला . तेवढ्यात अण्णा आणि मिलिंदही आलेच .
” नानी , आपलं हे मायेच्या धाग्यांनी विणलेलं रेशमी घरटं कायम असंच राहणार .”
माधुरीनं तिचा हात नानींच्या हातावर ठेवला .
समाप्त..
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.