पण ती आईचं होती ना

©️ सायली पराड कुलकर्णी
“आई चल तुझी बॅग घे गाडी आली” असं म्हणत आशिषने सुमतीबाईंना जवळपास ओढतच घरातुन बाहेर आणलं. 
काय घडतंय हे आपल्या बरोबर आपल्याच पोटच्या गोळ्याने हे दिवस दाखवावे आपल्याला! असा प्रश्न पडलेल्या सुमतीबाई डोळ्यातून वाहणारं पाणी कसं बसं थोपवत गाडीत जाऊन बसल्या.
सुमतीबाईना वयापरत्वे आलेलं वृद्धत्व, त्यांच्या ह्यांचं जाणं, जमीन जुमला स्वतःच्या नावावर झाल्यावर पोटच्या पोरानं आपल्याला दाखवलेला हा वृद्धाश्रमाचा रस्ता! त्यांना खूप गलबलून आलं. 

हा दिवस का उगवला आपल्या आयुष्यात असं मनोमन म्हणत आपल्याच नशिबाला दोष देत गाडीच्या खिडकीतून त्या बाहेर पाहू लागल्या. त्यांची ती हरवलेली शून्यात पाहणारी नजर मात्र आतून खूप काही बोलू बघत होती पण डोळ्यांतून वाहत होते फक्त उष्ण पाण्याचे थेंब!
वृद्धाश्रमाच्या दारात गाडी थांबली. 
सुमतीबाईंच्या पायातलं जणू अवसानचं गळून गेलं होतं.

आयुष्यात आपण एवढं सगळं मिळवलं, दोन मुलं सुना आहेत, गोजिरवाणी नातवंड आहेत, आपली लाडकी लेक आहे, पण मुलांनी तिला साधं कळवलं सुद्धा नाही आपलयाला इथे ठेवणारे त्या बद्दल!! किती ते अभागी आपण! एव्हढ चुकलं का आपलं?
पण नशिबाचे भोग कोणाला सुटले नाहीत असा विचार करून जड पावलांनी त्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला. 
तिथे त्यांना स्वतंत्र खोली होती. खोली तशी छान होती. खोलीतच टॉयलेटची सोय होती, खोलीत ac होता हीटर होता, फिकट गुलाबी रंगाच्या भिंती रंगवलेल्या होत्या.

त्यातल्या एका भिंतीवर सुंदर पेंटिंग अडकवलेलं, मोठा प्रशस्त दिवाण त्यावर शुभ्र पांढऱ्या रंगाचे बेडशीट व्यवस्थित खोचून घातलेले, शेजारी टेबलावर फुलदाणीत सुवासिक फुलं ठेवली होती. एकंदरीत वातावरण हलकंफुलकं करणाऱ्याचा प्रयत्न होता. सुमतीबाई जरा तिथल्या आराम खुर्चीवर टेकल्या.
त्यांनी अंग मागे झोकून दिलं, डोळे मिटून शांत बसल्या.
त्यांना आता पूर्वीचं सगळं डोळ्यासमोरून जात होतं, आपलं लग्न वयाच्या सोळाव्या वर्षीच झालं. वयात आलो आणि आपले हात पिवळे करून माय बाप रिकामे झाले. आपण आपल्यापेक्षा सधन असलेल्या घरात सून म्हणून आलो आणि परत मागे वळून कधी पहिलंच नाही!

तशी माहेरच्या माणसांना पण नकोसेचं होतो आपण, तीन बहिणीच्या पाठीवर मुलगा व्हावा अशी आशा असलेल्या आपल्या माय बापाची आपल्या जन्माने निराशाच झाली. 
कशीबशी सोळा वर्षाची केली आणि लग्न लावून दिलं आणि ते रिकामे झाले.
पण त्या मानाने आपल्याला खूप छान सासर लाभलं.
नवरा, सासुसासरे, दीर जाऊ, नणंदा असा भलामोठा परिवार होता. सासुबाई तर खूप हौशी होत्या. सासरे पण साधा भला माणूस.

एकंदरीत सगळी घडी व्यवस्थित बसली होती. संसारातील गोष्टी सासूबाईंच्या हाताखाली करता करता एक दिवस आपल्या संसारवेलीवर सुंदर फुल उमलण्याचा आपल्याला संकेत मिळाला.
आतून बाहेरून खुललो होतो आपण, आपल्या “आहोंना” तर झालेला आनंद आजपण जसच्यातसा आठवतो.
यथावकाश आपल्याला पाहिले कन्यारत्न प्राप्त झालं. 
हौसेने सासूबाईंनी तिचं नाव “सोनाली” ठेवलं. गोंडस गोजिऱ्या आपल्या लेकीने आपल्या आयुष्याचं खरंच सोनं केलं.

पुढे जाऊन दोन लेक झाले. एक “आशिष” आणि धाकटा “अनिल”. 
दृष्ट लागण्यासारखा संसार आपला! मुलं मोठी होत होती, वृद्धपकाळात सासू सासरे निवर्तले.
माहेर असं नव्हतंच आपल्याला पण कसेही असले तरी आपले माय बाप होते ते पण वृध्दत्वाने गेले.
आपली मुलं आणि नवरा एवढंच आपलं जग! दिवस पुढे जात राहिले मुलीचं सुयोग्य स्थळ पाहून आपण लग्न लावून दिलं. मुलांची शिक्षण, नोकऱ्या सुरू झाल्या.

त्यांनी दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पसंतीच्या मुलींशी लग्न केली. आपला काही विरोध नव्हता पण आपण त्यांच्या जगात कुठेच नव्हतो.
“पाखरं मोठी झाली की घरटं सोडून उडून जाणारच गं” असं ह्यांनी समजावलं खरं!
सगळ्यांचे नवीन संसार सुरू झाले. धाकटा अनिल, त्याची बायको आणि त्यांची लेक छोटी सई कामानिम्मिताने परदेशी उडून गेले. हा आशिष आणि सीमा असायचे आपल्या सोबत पण आताशा त्यांनाही आपली त्यांच्या संसारातील लुडबुड नकोशी झाली आणि आपण इथे येऊन पडलोय! 

लेक आपली बाहेरगावी! औरंगाबादला दिली.तिची मुलं लहान असतांना येणं व्हायचं तिचं माहेरपणाला. पण आता तिचीही मुलं त्यांच्या व्यापात अडकलीत. आपली सोनाली मात्र त्यातूनही वेळ काढून यायचा प्रयत्न करते, निदान फोन तरी असतो तिचा!
फोन म्हंटल्यावर एकदम त्यांना लेकीला फोन तरी करावा असं वाटलं.
त्यांनी मोबाईलवरून लेकीला फोन लावला. पलीकडे रिंग वाजत राहिली पण उत्तर आलं नाही. 
सुमतीबाईंना अगदीचं गलबलून आलं. काय झालं असावं?

ही पण का नाही घेत आपला फोन? रागावली का आपल्यावर? आताशा हळव्या झालेल्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीने पण डोळ्यांत तरळलं…एवढयात दरवाजावर कोणीतरी टकटक केली.
आता इथे कोण आलं असेल आपल्या खोलीजवळ? मनाशीच विचार करत कसनुसं वाटत असतांनाही सुमतीबाईंनी दार उघडलं. पाहतात तो काय त्यांना एक क्षणभर काहीच सुचेना दारात त्यांची लाडकी लेक उभी…! ही इथे? हिला कोणी कळवलं? आपल्याला तिला भेटण्यासाठीची ओढचं तिला इथे घेऊन आली असावी.

आपल्याचं विचारात हरवलेल्या आईला मिठीत घेत सोनालीने हाताला धरून हळुवारपणे खोलीत आणलं. खुर्चीवर बसवलं.
“चल आई आपल्याला जायचं इथून थेट माझ्या घरी. तू आता कायम माझ्यापाशी राहायचंस. इतकी वर्ष तू केलंस आता मला संधी दे. निमिष थांबलाय इथे खाली गाडी घेऊन उठ आवर जायचं आपल्याला आता.” सोनाली बोलली. 
सुमतीबाईंना ह्यावर काय बोलावं हेचं कळेना… जगातली सगळी सुखं एकीकडे आणि पोटी लेक असण्याचं भाग्य एकीकडे. आपण आपल्या सगळ्याचं लेकरांना सारखंच जपलं, वाढवलं.

पण आज हा दिवस दाखवणाराही आपणचं दिलेल्या संस्कारात वाढलेला आपला लेक होता आणि ह्या सगळ्यातून बाहेर काढून नवीन सुंदर आयुष्य जगायला शिकवणारी निर्मळ मनाची आपली लेकही आपल्या त्याचं संस्कारांनी समृद्ध झालेली होती. फरक इतकाच झाला होता ती संस्कृती आणि संस्कार विसरली नाही आणि तो….
सुमतीबाईंनी मनात येणारे विचार बाजूला सारले. पदराला डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि परमेश्वराला हात जोडून आपल्या लेकीच्या मागे निघाल्या.
कधींच मागे वळून नं पाहण्यासाठी….
आज त्यांच्या दोन्ही लेकांनी जिवंतपणीचं आईला गमावले होते.
©️ सायली पराड कुलकर्णी

सदर कथा लेखिका सायली पराड कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!