भातुकली

© अपर्णा देशपांडे
अतिशय देखणा भव्य बंगला, समोर आखीव रेखीव फुललेली बाग आणि त्यावर सोडलेली संयत रोषणाई . मंद संगीत आणि हिरवळीवर मांडलेल्या सुबक टेबल खुर्च्या . सगळं चित्रातल्या सारखं मोहमयी .
इनामदारांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न झालं होतं , त्याची आज छानशी छोटेखानी मेजवानी होती . 
रागिणी ताई आणि शशिकांत यजमान म्हणून जातीने सगळ्याची आवभगत करत होते . देशमुखांसारखे व्याही आणि मंजिरी सारखी  आर्किटेक्ट सून मिळाली म्हणून खूष होते दोघं . 
गडद मरून रंगातील वेलवेटचे काळे काठ असलेली उंची साडी  आणि हिऱ्याचे मोजके दागिने घालून उभी असलेली मंजिरी म्हणजे बुद्धीमत्ता आणि सौंदर्य यांचं सुरेख मिश्रण होती .

अजिंक्य काळ्या सुटामध्ये कसला देखणा दिसत होता … मंजिरी डोळ्यांच्या कोनातून त्याला बघत होती . 
” कातील दिसतियेसी .”  हळूच तिच्या कडे झुकत तो तिच्या कानाशी कुजबुजला .  
कोपऱ्याने  त्याला हलका गुद्दा घालत ती म्हणाली , ” तू पण दिसतोय , मारू!!”  
आणि मग अचानक आठवून म्हणाली ,” अरे ? रेणू नाही आली ? लग्नाला पण नव्हती . आश्चर्य आहे नाही ?  तू भांडला नाहीस तिच्याशी ?” 
“अग , रोहन तरी कुठे येऊ शकला यू .एस  वरून?” त्याने हसत प्रश्न केला .
ती काही बोलणार इतक्यात मध्येच त्यांना भेटायला बरीच मंडळी आल्याने संवाद पूर्ण झाला नाही .

अतिशय रुचीपूर्ण जेवण करून भरपूर उंची भेटवस्तूंचा ढिगारा आवरून  रात्री उशिरा सगळे आत बंगल्यात गेले . नोकर चाकर मंडळी भराभर सगळं आवरत होती . मंजिरी पण वरती त्यांच्या खोलीत गेली .
शशिकांतने खास लक्ष घालून अजिंक्यच्या खोलीत नवीन फर्निचर करवून घेतलं होतं .
एक आर्किटेक्ट म्हणून अख्ख्या देशात नाव कमावलेल्या शशिकांत साठी आपलं घर सजवणं हे अतिशय जिव्हाळ्याचं काम होतं . मंजिरी वर गेली , तसा अजिंक्य मागच्या अंगणात पायरीवर जाऊन बसला …त्याची आवडती जागा .. फक्त त्याचीच नाही , रेणू ची पण आवडती जागा . 
अजिंक्यची तंद्री लागली . तिथे त्या कोपऱ्यात बसायचो आपण . किशन काकांनी एक छोटीशी चूल बनवून दिली होती …मग रेणू , काशी , स्वप्नील आपण तासनतास भातुकली खेळायचो इथे . 

काशी मुरमुरे आणायची . स्वप्नील गूळ आणि फुटाणे , मी कधी बिस्किटं , कधी केक , तर कधी चॉकलेट्स न्यायचो . असं काही नेलं की चिडायची ती . 
” इथे विकतचे पदार्थ नाही आणायचे . ही आपली भातुकली आहे न ? आपण सगळं इथे बनवूया ना ! ”  असं म्हणायची . रेणू आणि काशी पुढाकार घ्यायच्या . आपण आणि स्वप्नील मात्र नुसतं टीवल्या बावल्या करायचो . एकदा तर भांडण झालं तेव्हा  आपण सगळी पिटुकली भांडी उधळून लावली होती . 
काशी रड रड रडली , पण रेणू ने मात्र उठून येऊन मला आणि स्वप्नीलला चांगलंच बदडलं होतं .  लहानपणापासूनच धीट आणि स्वाभिमानी होती फार .
शाळा शाळा खेळतांना रेणू ला नेहमी गणिताची  ‘बाई’  व्हायला आवडायचं . पाढे तोंडपाठ होते तिचे . गणित इतकं आवडीचं की गणितात  एम. एस्सी केलं तिने .

कॉलेज मध्ये असतांना मला म्हणायची , ” अभ्यासक्रमातील गणित उत्तम असेल तर आयुष्याचं गणित पण जमतच बरोबर . खरंच जमलं का तिला ?” तो स्वतःशी बोलत बसला असतांनाच  आवाज आला .
” अजिंक्य?  इथे का बसलाय ? ”  मंजिरी मागे येऊन उभी होती .  
” आय डोन्ट बिलिव्ह!” ज्या माणसाची आज लग्नानंतरची पहिली रात्र आहे , तो असा एकटा इथे बसलाय? …मला न तुझं कोडं पडतं नेहमी .” 
” अग , तू वर फ्रेश व्हायला गेलीस , म्हणून मी इथे बसलोय , इतकंच . Lets go .”  पटकन उठून तिच्या खांद्यावर हात घालून हलकं तिला जवळ ओढत वरच्या दिशेने घेऊन गेला . 
जाताजाता मंजिरी ने एक नजर मागच्या अंगणात टाकली , जिथे एकटक बघत तो बसला होता . 
******** 

” धिस इस रिअली ब्युटीफुल ! ओ अजिंक्य , आय ऍम सो हॅपी !! ”  त्याला आपल्या हातांनी वेढून घेत  ती म्हणाली . मॉरीशस च्या आलिशान हॉटेल समोरील राखीव समुद्र किनारी दोघे बसले होते .  
” असं वाटतंय  न , की सगळं आयुष्य इथे ह्या किनाऱ्यावरच घालवावं ?  तू अशी माझ्याजवळ , आणि समोर ही मावळती संध्याकाळ !..सुंदर !! ” मग बोलताना काही क्षण हरवल्या सारखा झाला आणि म्हणाला, “रेणूला फार वेड होतं समुद्राचं . अशी काठावर बसायची आणि वाळूत सुरेख किल्ला किंवा घर बनवायची . इतकं सुबक की बाकी पर्यटक यायचे बघायला…” तो बोलत राहिला आणि मंजिरीची त्याच्या भोवतीची पकड ढिली झाली. 

तिने आपली पर्स उचलली , सॅंडल गोळा केल्या तसा अजिंक्य भानावर आला .
” सॉरी मंजिरी !! रिअली सॉरी ! ….बस न . ” 
” बसले असते रे , पण काय न , तासनतास समुद्रावर बसायला मला नाही आवडत ! …बाय द वे , मी मंजिरी . आपलं बहुतेक गेल्या आठवड्यात लग्न झालंय ! आणि तू माझ्यासोबत इथे हनिमूनला आलाय ! ” झटक्यात मागे वळून ती हॉटेल कडे चालू लागली . 
” मंजिरी …प्लिज थांब …”  म्हणत तो ही मागे धावत गेला . नंतर पंधरा मिनिटं तो तिची मनधरणी करत होता . 
” कम ऑन मंजिरी . तुला माहितेय की ती माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे . तुला सगळं बोललोय न मी . ..हा , मान्य आहे मला की आपल्या रोमान्स मध्ये तिचा विषय काढणे बरोबर नाही , पण मम्मी , पप्पा , आजी इतकीच ती देखील भिनली आहे माझ्यात . सहज विषय निघतोच ग .”

” सहज ? ..मी संशय नाही घेतय अजिंक्य . मम्मीनी मला कल्पना दिली होती  , की तुम्ही  दोघं चड्डी बड्डी मित्र आहात . पण प्रत्येक नात्याची आपली आपली एक जागा असते . एक पुसटशी  अदृष्य चौकट . त्या चौकटीचे नियम देखील असतात  . त्या बाहेर नातं गेलं न , की सूर बिघडतात . ” पायाला  मॉइश्चरायझर क्रीम चोळत ती म्हणाली . 
” मी समजू शकतो .” 
” तुझ्या ह्या समजूतदार पणा वरच तर भाळले मी . तुझा हॉटेल व्यवसाय , त्यात तुझं सर्वस्व झोकून काम करणं , सामाजिक बांधिलकी जपणं , हे सगळं खूप आवडलं मला . पण पप्पा आर्किटेक्ट आणि मुलगा हॉटेल व्यावसायिक  हे कसं रे ? “

” खरं सांगू की खोटं ? ” डबल बेड वरील रेशमी दुलई पांघरत त्याने मिश्कीलपणे विचारलं .
” म्हणजे ?”
” नाही ,  उत्तर देताना पुन्हा रेणू येणार मध्ये ; म्हणून विचारलं . “
” ऑफकोर्स खरं !”
” रेणुला वेगवेगळ्या डिशेश बनवून बघायला खूप आवडायचं . यु ट्यूब वर बघून ती काय काय बनवायची . तिचे सगळे  खाद्यप्रयोग माझ्यावरच होत . मी चव बघून तिला दर्दी माणसासारखं मार्गदर्शन करायचो . आणि तो पदार्थ परफेक्ट व्हायचा . मग ती म्हणायची , ‘ अजु , तू न , चीफ फूड अडव्हायझर व्हायला पाहिजे . तुझी  “”टेस्ट””  परफेक्ट आहे . ‘  
” मग?” 

” मी म्हटलं तिला ..तूच का नाही होत अशी अडव्हायझर ?…तर म्हणाली , मला गणितज्ञ व्हायचंय . ..त्याने ऍनालीटीकल  माईंड डेव्हलप होतं . तू मात्र हॉटेल काढलंस न , तर मस्तं चालवशील !”  माझ्याही नकळत मी  वेगवेगळ्या  खाद्यपदार्थांच्या साईट्स वर  ‘टीप्स’ द्यायला लागलो . हॉटेल मॅनेजमेंट ला ऍडमिशन घेतली . मग स्वतःचा ब्लॉग सुरू केला . त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला . इतका की मला अनेक हॉटेल वाले बोलवायला लागले .  त्यानंतर तर तो भाटिया नाही का , त्याने हॉटेलची ऑफर दिली . भाटिया म्हणजे , रेणूच्या  सध्याच्या ऑफिस कलीगचे वडील . घरून पाठिंबा मिळाला , केलं सुरू हॉटेल . मग लवकरच  एकाचे तीन झाले . पण सुरुवात रेणू मुळेच झाली . ” 

” हं  . तू तिच्या प्रेमात नाही पडलास कधी ?”
” हा प्रश्न तू मला कितीतरी वेळा विचारलाय मंजिरी !”
” पण तू आज पर्यंत समाधानकारक उत्तर पण नाही दिलस !”
” मी कितीदा आणि काहीही सांगितलं तरीही तुझं समाधान होतच नाहीये . मग सांग मी काय करू?”
” मला  नेहमी वाटतं की मी माझा नवरा तिच्या सोबत वाटून घेतेय . त्याचा काही हिस्सा रेणुपाशी अडकून पडलाय .” 
त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला  आणि म्हणाला , ” अजिबात नाही !  डोक्यातून काढ ते , आणि झोप आता .”

दुलईत  शिरून , पाठ वळवून  मंजिरी कितीतरी वेळ जागीच होती  .
शेजारी झोपल्याचं नाटक करत अजिंक्यही जागाच होता . त्याच्या मनाचा पट पुन्हा उलगडलाच ….
********
” अजू , मला एम.एस्सी. ला स्कॉलरशिप मिळतेय .”  रेणू उत्साहाने फुलली होती नुसती .
” हाय रे मेरा बच्चा ! ..आलोच मी तिकडे .”
” आलोच काय? उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे न , त्या यु ट्यूब चॅनेल वर?..मी येतांना काकू जवळ सूट ठेवून आलेय . तो घेतलास?”
” सूट  कशाला ?  नोकरी साठी इंटरव्ह्यू देत नाहीये मी! “
” जास्त शहाणपणा नको करुस , मुकाट घरी जा , सूट घाल , आणि मग जा . मी आले असते , पण काय न , बंगलोर पुणे अंतर जरा जास्तच आहे नाही ?”

” मी आहे म्हणून तुझं ऐकतोय ग ! तुला असा हट्टी नवरा मिळेल न ,बघ तू . मग त्याचं सगळं ऐकशील तू .”
” बा s s य !” म्हणून तिने संवाद बंद केला होता .
रेणू माझा लकी चॅम्प होती .
तीची संमती असली की सगळीकडे यश मिळायचच . अगदी शाळेत पण ……एकदा मला बाईंनी बोलावून घेतलं होतं …डिबेट स्पर्धा होती .
” रेणू , बाई म्हणतात , मी इंटरनॅशनल  ‘यंग जिनिअस’  च्या डिबेट स्पर्धेत मध्ये जावं .”
” wow ! अजू”” 

“विषय काय माहितेय? रोल ऑफ युथ इन कंट्रीज प्रोग्रेस”……… 
मग रेणू ने कुठून कुठून कितीतरी पुस्तकं आणून दिली आपल्याला . नोट्स काढून दिल्या , सराव करवून घेतला आणि मी  राज्यात पहिला आलो तर गावभर नाचत सगळ्यांना पेढे वाटले ….पागल होती …पागल ! …..…….
तिला  लंडनच्या गणित संशोधन संस्थेत जॉईन होण्याचा प्रस्ताव आला तर आनंदाने नाचत घरी आली होती …मध्यरात्री ….
”  रेणू ? तू ? इतक्या रात्री ? ” 
”  तिकडे इंग्लडला तर दिवस आहे न ? मला मेल आलीये . मला लंडन मध्ये जॉब लागलाय अजू !!!. ” 
“……”

” काही तरी बोल न ! ” 
” ग्रेट !”
”  बस ? इतकंच ? तुला आनंद नाही झाला ?” 
” झाला ग , पण ..म्हणजे तू आता इंग्लंड ला जाणार?”
” हो . मला पण कसंतरीच वाटतंय , पण माझं स्वप्न अजू , स्वप्न पूर्ण होतंय. “
ती इंग्लंड ला रुळली . जबरदस्त पगार होता तिला . आणि तेव्हाच  भाटियाचा प्रस्ताव आला … हॉटेल पार्टनरशिप . 

आपण तिला इंग्लंड ला कळवले, ” रेणू , भाटिया ने मला हॉटेल ची ऑफर दिलीये . “
” मला खात्री होती अजू !! Yess !!!! “
” येस काय ? किती मोठी गुंतवणूक आहे कल्पना आहे का ?”
” किती ?”
” तीन कोटी!!” 
” तू कशाला त्रास करून घेतोय? मी आहे ना . इथे इंग्लंड मध्ये असून काय कामाची मी ?”  

आणि खरंच मला न सांगता दहा दिवसातच रेणुने दोन करोड पाठवले . चक्क दोन करोड .नक्कीच ते सगळे तिचे जमवले पैसे नव्हते, काही उधार घेतले असणार , पण माझं  काम तिने अतिशय सोपं केलं हे नक्की .
रेणुला खूप जवळून ओळखत असूनही त्यावेळी आई बाबांना फार आश्चर्य वाटलं होतं .
” इतकी प्रचंड रक्कम तिने पाठवली , संध्या आणि प्रशांत भौजींना माहितेय का अजू ? त्यांची मुलगी अशी दुसऱ्याला मदत करतेय ते? ”  आई नी विचारलं होतं .
” हो , माहितेय .”

” कमाल आहे रे त्यांची .” 
आई चं म्हणणं बरोबरच  होतं . 
कारण आमच्या दोघांच्या आईवडिलांना कायम वाटत होतं की आम्ही लग्न करणार आहोत , मग काय हरकत आहे कितीही पैसे गुंतवले तरी … शेवटी दोघांचा पैसा एकच आहे  , असं त्यांना वाटे .
एक दिवस रेणू चा फोन आला . ” अजू , आई बाबा लग्नासाठी मागे लागले आहेत . “
”  आता हरकत नाही खरं तर . पण  तुला भेटला नाही कुणी अजून ?” 
ती चिडली होती .  
” भेटला असता तर तुला सांगितलं नसतं का ? काही पण विचारतो !” 
” रेणू? ..अग , तुझं लग्न झालं की मला तुझे पैसे लगेच वापस द्यावे लागतील न ग ? तुझा नवरा का खपवून घेईल हे?”

” …..”
” अग बोल की !” 
” पंचवीस सव्हीस वर्षांची मैत्री मोठी की आठ दिवसांपूर्वी आयुष्यात आलेला नवरा नावाचा प्राणी मोठा ? ” असा प्रश्न करून तिने गप्प केलं होतं आपल्याला . आमच्या घरच्या मोठ्यांना मात्र भयानक धक्का बसला जेव्हा आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. रेणूला त्यांनी बोलावून घेतलं होतं . आम्हाला दोघांना आपापल्या घरी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते .
संध्या काकू तर कसली उसळली होती . 
” कमाल आहे!!  फक्त मैत्री म्हणे!  नुसते मित्र मैत्रीण असे मध्य रात्री एकमेकांच्या घरी जात असतात का ? …मित्राला कुणी दोन कोटी रुपये ‘असंच’  लिखापढी न करता देत असतं का ? इतके एकमेकांत गुंतलेले तुम्ही ,पण लग्न नाही करणार?” असं बरंच काय काय बोलली होती . 
****** 

मधुचंद्राची नशा उतरून अजिंक्य मंजिरी जोरात कामाला लागले होते . त्यांच्यातील विश्वास , प्रेम  आणि सामंजस्य हे  खूप दृढ होतं , पण रेणूच्या बाबतीत काही प्रश्न मंजिरीला अस्वस्थ करत असत . एक दिवस न रहवून तिने रागिणीताईंना विचारल .
 ” आई , एक विचारू? खरं उत्तर द्याल ?”
” खोटं बोलण्यासारखं काही आहे का मंजिरी?”
” आई , अजिंक्य आणि रेणू इतके जवळचे मित्र , तर रेणू  आमच्या लग्नात का नव्हती ? माझी आणि तिची  आतापर्यंत फक्त फोनवरच भेट का बरं झाली?” 
“रेणू तिथे इंग्लंड मध्ये  आजारी आहे . तुमच्या लग्नानंतर तिने सांगितलं . सध्या संध्या, म्हणजे तिची आई तिकडेच गेली आहे . “

” काय झालं  आई ? काही सिरीयस ? अजिंक्य ला माहितेय हे?”
” नाही , तसं काहीच नाही , पण इथे इतका लांब प्रवास करण्या इतपत चांगली झाली की मग येतील दोघी इकडे …आणि हो . अजिंक्य ला माहीत आहे .”
” ओहह” 
मंजिरीचं समाधान झालं , पण रागिणी मात्र पुन्हा अस्वस्थ झाली . अजिंक्य आणि रेणू च्या मैत्रीमुळे मंजिरी दुखावल्या नको जायला असं तिला वाटत होतं .

रेणू अजिंक्य कॉलेज मध्ये असल्यापासून ती रेणुला सून म्हणून ह्या घरात आणायचे स्वप्न बघत होती . रेणू लंडनला जाणार हे कळाल्यावर तिने अजिंक्य जवळ हा विषय काढला होता .
” अजू , तू रेणुशी बोललास ?”
” कशाबद्दल ?”
” कशाबद्दल काय? तुमच्या नात्याबद्दल !”
” ए आई ! तू भलतंच डोक्यात घेऊन नको बसुस हं . आम्ही बालमित्र आहोत ..बस! “

” पण जर मी म्हणाले की मला ती सून म्हणून हवी आहे तर ?”
” शी ! काहीतरीच काय ? ब्रो कोड रिलेशन आहे आमचं
“” बघ बाबा . डोळ्यासमोर ची मुलगी आहे , आणि माझा जीव आहे तिच्यात .” 
सगळं उडवून लावलं होतं अजिंक्यने . त्याची भातुकलीतील मैत्रीण , कुणीतरी खूप जीवाभावाची अशी रेणू …त्याचं मैत्र्य !
*********
मंजिरी क्विन्स टॉवर्स ह्या  एकूण चार  सहामजली इमारतीच्या डिझायनिंग चं काम बघत होती . रोज यायला उशीर होत होता . रागिणी ताई  सगळं सांभाळून घेत होती . 

आजही रागिणीने  मावशीबाईंकडून  सगळं करवून घेऊन जेवण  टेबलवर तयार ठेवलं होतं आणि ती झोपायला निघून गेली .
मंजिरी  बरीच उशिरा आली .  आत  रूममध्ये  गेली तर अजिंक्य कुणाशीतरी बोलत होता . 
बहुतेक कुणाजवळ रेणू ची चौकशी करत असावा . तिच्याकडे वळून म्हणाला ,
” हाय !  थकलीस न ? चल , फ्रेश होऊ , आणि मस्तं जेवण करू .”
“कुणाचा फोन होता ?” तिचा आवाज त्रासिक .
” अग , समीर शी बोलत होतो…….एक सेकंद !! तू संशय घेतीयेस माझ्यावर ? “

” संशय नाही , अजिंक्य . सतत कुणीतरी आपल्याला बघतंय , तुझ्यावर हक्क दाखवतंय , माझं प्रेम वाटल्या जातंय ही भावना जगू देत नाहीये मला. ” 
” मंजिरी , हद्द झाली यार ! माझा बालमित्र कुणी मुलगा असला असता , आणि मी वारंवार त्याच्या आठवणी तुला सांगत असतो तर तू असंच म्हणाली असतीस  का ? तुला समजत कसं नाहीये ?” 
” मित्राने तुला दोन करोड दिले असते ? “
” व्हाय नॉट ? “
” डिसगस्टिंग !….बरं ठीक आहे , मला झोप येतेय , तू जाऊन जेऊन घे .”

अजिंक्य हताशपणे तिच्याकडे बघत बाहेर गेला .
रागिणी आणि शशिकांत आपल्या खोलीतून काळजीने त्याच्याकडे बघत होते .
रात्री   त्याचा फोन वाजला . तिने नाव वाचलं . ‘रेणू?’ 
पलीकडून रेणू बोलत होती .
तो उत्साहात बोलत होता .
*******
” मंजिरी , थोडा वेळ काढून घरी येतेस का ? सरप्राइज आहे .” रागिणीने फोन केला , आणि तासाभरात मंजिरी घरी आली .

घरात  अजिंक्य आणि  रोहन गप्पा मारत होते .
” सरप्राईज !!”  रोहन म्हणाला , तशी अत्यानंदाने जाऊन मंजिरी त्याला बीलगली . 
” तुला झोडून काढते ! नालायका , लग्नाला आला नाहीस न आमच्या? …अमेरिका काय इतकी दूर आहे का ? .बाय द वे , अजिंक्य , हा माझा मित्र ..”
” अरे , आमची ओळख झाली , आंटीच्या हातचे थालीपिठ आणि कॉफी पण झाली . एकदम टेस्टी ! मंजिरी , यू आर सो लकी ! “
” येस ! नक्कीच . ” ती म्हणाली .

” बरं रोहन , फ्रेश होऊन जा , आणि कुठेही हॉटेल मध्ये रहायचं नाही , इथे गेस्ट रुम आहे . आता तुम्ही गप्पा मारा ,  मी कमावर जातो .”   म्हणत रोहनचा निरोप घेऊन अजिंक्य निघून गेला .
रोहनला हॉटेल वर न जाऊ देता त्यांनी घरीच ठेवून घेतला .
मंजिरी रोहनला दोन वर्षांनी  भेटत होती . सगळ्या जुन्या आठवणी , मित्रांशी विडिओ कॉल्स , कॉलेज कंपू सोबत बाहेर जेवणे , अमेरिकेतील मित्रांशी रात्री उशिरा बोलणे , अशी धमाल सुरू होती . 
ते काही दिवस तिने भरपूर  मजा केली . तिला अजिंक्यचा विसर पडल्यासारखं झालं होतं . 

रोहनने पण जातांना अजिंक्य साठी भारीची भेटवस्तू आणली होती .
जातांना त्याला  गंमतीत   ‘ आमच्या हिरॉईन ची नीट काळजी घ्या हा !’ अशी  तंबी देऊन गेला . 
“हा बॉक्स कशाचा आहे ग ?”  एक लाल मखमली डबा बघून अजिंक्य म्हणाला . 
” अरे , रोहन ने यू. एस.  वरुन डायमंड नेकलेस आणलंय मला गिफ्ट म्हणून .  कसला मेक आहे न ? चांगला मालदार झालाय हा  रोहन .” 
“असू दे ग , अशी मैत्री मिळायला भाग्य लागतं .  उगाच ह्या वस्तुचं ओझं नको बाळगूस .  त्याची आई पण बोलली न तुझ्याशी ? किती छान लोकं आहेत ही . आपल्या करिअर आणि नोकरीच्या टप्प्यावर कितीतरी मित्र भेटतात . पण ही चड्डी बड्डी शाळेतील मैत्री  काही वेगळीच ! स्पर्धा ,असूया , अपेक्षा यांच्या पलीकडची . ती देखील प्रत्येकाच्या वाट्याला असतेच असं नाही ….” अजिंक्य बोलत होता .

 ऐकताना तिच्या चेहऱ्यावर चे भाव मात्र बदलत होते . 
अजिंक्य  बोलू लागला  ” रेणू चा मला काल रात्री फोन आला होता . आम्ही कायम मैत्रीच्याच नात्यात अत्यंत गुंतलो होतो . त्यात कुठेही त्यापालिकडचे प्रेम नव्हते . आम्ही एकमेकांच्या अडचणीत कायम सोबत असूच , पण तिने मला त्या नात्याच्या मर्यादांची काल जाणीव दिली . तुझ्या माझ्या नात्यात त्याची फक्त उपस्थिती असावी बस..त्या पलीकडे  गेल्याच गालबोट लागेल म्हणाली …”
मंजिरीला काहीतरी आत खोलवर जाणवल्यासारखं झालं..
तिने   अचानक  आवेगाने त्याला मिठी मारली . काहीतरी गवसलं होतं .
*******     

“आठ दिवस सुट्टी मिळेल का रे तुला ?” अजिंक्य चा टिफिन बॅग मध्ये ठेवत तिने विचारलं .
” इरादा काय आहे मॅडम?”  
” सांगू ? रेणू येणार आहे , आम्हाला खूप धमाल करायचीय . तुझ्या सगळ्या लहानपणी च्या खोड्यांचे किस्से ऐकाययचेत . खास करून भातुकलीचे .”
”  अस्स ? ”  म्हणत त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले . 
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!