आहेराची साडी

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
लेटरबॉक्स उघडताच मृण्मयीच्या लग्नाची पत्रिका बघितली अन् रेखा हरखलीच!! तिच्या माहेरचं.. नव्हे नव्हे.. आजोळचं कार्य!! कित्येक वर्षांनी तिच्या माहेरच्या लोकांनी तिची आठवण काढली होती.
म्हणजे माहेरच्या लोकांशी रेखाचा काही तंटा नव्हता. पण तिचं माहेर मध्यमवर्गीय अन् वडील महानगरपालिकेत कारकून! परिस्थिती अगदीच जेमतेम पण पदरी तीनही मुलीच!
रेखाच्या दोघी मोठ्या बहिणी दिसायला सामान्य पण रेखा मात्र मूर्तीमंत सौंदर्याचा नमुना! जन्मतःच तिचा गोल चेहरा अन् रेखीव नाकडोळे बघून तिच्या आईला ती अभिनेत्री रेखासारखी वाटली अन् तिचं नाव त्यांनी रेखा असं ठेवलं.

दोघी मोठ्या बहिणी सर्वसामान्य घरांत पडल्या अन् त्यांचा ओढाताणीचा संसार सुरू झाला.
रेखा मात्र दिवसेंदिवस रेखीव दिसू लागली. तिला आपल्या जन्मजात सौंदर्याची जाण होती अन् त्याप्रमाणे तिचं राहणीमान देखील खूप शानशौकीचं नसलं तरी टापटीपीचं नक्कीच होतं. कुणालाही भुरळ पडेल असं सौंदर्य असणाऱ्या रेखाभोवती भ्रमर गुंजारव न करतील तरच नवल!
अशातच अक्षय राजे ह्या एका धनाढ्य व्यावसायिकाच्या मुलाकडून रेखाला मागणी आली अन् रेखासह तिच्या घरची मंडळी हरखून गेली खरी पण त्यांच्यावर वेगळाच ताण येऊ लागला.

“अण्णासाहेब, आम्ही लहान माणसं! तुमच्या योग्यतेचं कार्य करू शकणार नाही!” रेखाच्या बाबांनी अक्षयच्या वडिलांना आर्जव केलं.
“काळजी करू नका, बाबासाहेब! आम्हाला फक्त मुलगी द्या! नारळ देखील नको! आमच्या कोकणात नारळाच्या खूप बागा आहेत!!” अण्णासाहेब म्हणजे अक्षयच्या वडिलांनी मस्करी करून रेखाच्या बाबांना हसवलं अन् रेखाच्या मनावरचं ओझं उतरलं.
रेखा अन् अक्षयचं लग्न राजे मंडळींनी त्यांच्या खर्चाने पार पाडलं. लग्नात सजावट काय.. जेवणात शंभरेक पदार्थ काय.. वऱ्हाड्यांना सोन्याचांदीचा आहेर काय!! रेखाच्या माहेरच्या मंडळींनी लग्नाचा एव्हढा थाट पहिल्यांदाच बघितला.

रेखा खूप खुश होती.. अन् अक्षय देखील!! त्यामुळे राजेंच्या श्रीमंती थाटाकडे बघून बुजलेल्या तिच्या आईबाबा अन् बहिणींचे बावरलेले चेहरे तिला जाणवलेच नाहीत.
नवीन जोडपं मधुचंद्राकरीता मलेशियाला जाऊन आलं अन् रेखाच्या माहेरच्या मंडळींनी दोघांना मांडवपरतणीकरिता आमंत्रण धाडलं.
रेखा लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जायला उत्सुक होतीच. “चला, ना! आपण माझ्या माहेरी जाऊन येऊ!” म्हणून अक्षयला गळ घातली.

“मला खूप काम आहे ऑफिसात! आताच लग्न आणि मलेशिया मिळून महिनाभर रजा झालीय! तू जाऊन ये!” अक्षयने सांगताच रेखा नाराज झाली.
“काही तासांचाच तर प्रश्न आहे! प्लीज, चला ना! लग्नानंतर मी एकटीनेच घरी गेलेलं बरं नाही दिसणार!” रेखाने केलेलं आर्जव नेमकंच त्यांच्या खोलीबाहेर काही कामाने आलेल्या तिच्या सासूबाईंच्या कानावर पडलं अन् त्या लागलीच समोर झाल्या.
“रेखा, अगं समजून घे! तो नाही म्हणतोय ना! काही तासांकरितासुद्धा तो तुमच्या अडीच खोल्यांच्या घरात नाही ऍडजस्ट करू शकणार!” अक्षयची आई बोलू लागल्या.. “त्याला जेवायला डायनिंग टेबलची सवय आहे अन् पाणी तो फक्त मिनरल वॉटर घेतो. चहा त्याला ग्रीन टी लागतो. तुझे आईबाबा जावयासाठी करतील देखील सगळं! पण त्यांना कशाला उगाच खर्चात पाडतेस!”

सासूबाईंचं बोलणं ऐकताच रेखाने मोठ्या अपेक्षेने अक्षयकडे बघितलं.. आपला नवरा.. ज्याला आपण सर्वस्व दिलंय निदान त्यानं तरी काही बोलावं म्हणून रेखा काळजाचे कान करून ऐकू लागली.
“अगं, आई खरंच म्हणतेय.. मला नाही जमणार खरंच! पण मी तुला अडवत नाहीये.. तू जा.. राहा.. पण मला आग्रह करू नकोस. आईबाबांना पण समजावून सांग!” अक्षयने पण आईचीच री ओढली.
रेखाच्या डोळ्यात पाणी आलं. “मी एकटीच माहेरी जाऊन आईबाबांना आणि दोघी ताई आणि भाऊजींना काय उत्तर देऊ?” रेखा निराश झाली.

अक्षयने मात्र तिच्या घरच्यांसाठी खूप साऱ्या भेटवस्तू अन् मिठाई देऊन ड्रायव्हर सोबत तिला माहेरी धाडलं. रेखाच्या घरचे जे समजायचं ते समजले.. आपली पोर सुखात आहे.. श्रीमंतीत लोळण घेतेय हेच त्यांच्यासाठी खूप होतं.
कोणीच काहीही बोललं नाही तरी ही बातमी रेखाच्या माहेरच्या अन् आजोळच्या मंडळींपर्यंत पोहोचलीच. आधीच ती सगळी मंडळी रेखाच्या सासरच्या श्रीमंतीला वचकून होती. त्यात जावयाचा हायफायपणा! “नाकापेक्षा मोती जड! नको रे बाबा!!” असं म्हणून त्यांनी रेखाला कार्यात बोलावणंच टाळायला सुरूवात केली.

“आई, पुष्पामावशीच्या मुलीचं.. विद्याचं लग्न झालं आणि मला बोलावलं पण नाही!” तिनं एकदा हताश होऊन आईला विचारलं.. “मोठ्या ताईच्या व्हॉट्सअँप स्टेटसवर फोटो बघितले तेव्हा कळलं मला! सगळ्यांना बोलावलं.. फक्त मला नाही!” रेखा दुखावली गेली होती.
“अगं, तुम्ही मोठी माणसं! तुमच्या मानाने वागणं जमणार आहे का त्या मंडळींना! आणि गरीब असली तरी स्वाभिमानी असतात लोक! त्यांनी आमंत्रण करायचं अन् तुम्ही जायचं नाही.. असं एखादे वेळी चालेल गं! पण नेहमीच असं होऊ लागलं की लोकही समजून जातात काय समजायचं ते!” आईने नातेवाईकांची बाजू स्पष्ट केली.

“पण, ‘हे’ नाही तर नाही.. मी आले असते ना!” रेखा धीर करून बोललीच.
“बाई गं! तू एकटी आलीस तरी लोक जावईबापूंबद्दल विचारणारच ना! आणि कितीही श्रीमंत असलीस तरी कार्यात बाईला नवऱ्यामुळेच मान असतो!” आईचं म्हणणं रेखाला पटलं नाहीच पण मला बोलवाच अशी जबरदस्ती तर ती कुणावर करू शकत नव्हती.
तशी रेखा सासरी अतिशय सुखी होती. तिची सासूदेखील अलिप्त असायची. सासऱ्यांच्या प्रकृतीच्या अधूनमधून होणाऱ्या कुरबुरी सोडल्या तर कसलाही ताणतणाव नव्हता. अक्षय देखील खूप प्रेम करायचा रेखावर!

रेखा पण आता नव्या शाही लाईफस्टाईलला सरावली होती. सासरच्या लग्नकार्यात रेखा अन् अक्षय दोघेही सोबतीने सहभागी होत. खूप धमाल करत.. सोबतीने नृत्य करत.. खूप सारं फोटोसेशन आणि भरगच्च आहेर देऊन अन् घेऊन परतत. पण रेखाला कसली तरी उणीव भासत होती.
एक दिवस लेटरबॉक्समध्ये मृण्मयीच्या लग्नाची पत्रिका बघितली अन् रेखा हरखलीच. मृण्मयी.. म्हणजे तिच्या धाकट्या मामाची सगळ्यात धाकटी मुलगी. तिच्या आजोळचं ह्या पिढीतलं शेवटचं कार्य! “नक्कीच आईने सांगितलं असेल मामाला मला बोलवायला!” रेखाने मनाशीच विचार केला अन् काहीतरी निश्चय करून अन् लग्नाची पत्रिका घेऊन ती सासूसमोर गेली.

“आई, माझ्या मामेबहिणीचं लग्न आहे.. मामाच्या गावी! आमच्या पिढीतलं शेवटचं कार्य! आम्हाला बोलावलं आहे.. अन् मला जायचं आहे.” पत्रिका सासूच्या हाती देत रेखाने मोठया हिमतीने एका दमात एक पूर्ण वाक्य म्हटलं.
“हो का!” सासूबाई थंडपणे म्हणाल्या. “पण तुझ्या मामाचं गाव तर खूप लहान आहे ना! आणि लग्न ‘मे ‘ महिन्यात! खूप ऊन असेल. तुझी नीट सोय होणार नाही.. तिथे खूप लोडशेडींग असतं म्हणे! मग साधा पंखा पण नसेल.. तुला पण आता एसीची सवय आहे.. जाशील अन् तब्येत खराब करून येशील!”
रेखा हिरमुसली अन् पत्रिका घेऊन सासऱ्यांकडे गेली.

“अण्णा, प्लिज तुम्ही सांगा ना ‘ह्यां’ना! मला जायचं आहे हो!” रेखाने आर्जव केलं.
“माझी अजिबात हरकत नाही. पण गावात सगळं अन्-हायजिनिक असतं.. मिनरल वॉटर म्हणून कुठलं कुठलं पाणी वापरतात.. रस्त्यावर पंगती मांडतात.. तुलाच त्रास होईल!” अण्णांनी गोड बोलून प्रश्न निकाली काढला.
“अहो, मी काही मागितलं तर मला द्याल?” सायंकाळी रेखाने अक्षयला लाडिकपणे विचारलं. अक्षयने बघितलं.. आज रेखा त्याच्या आवडीचा ड्रेस अन् ज्वेलरी घालून त्याच्यासमोर उभी होती.

“आज तुझा एकूण नूर पाहून नक्कीच मला संकटात टाकण्याचा तुझा विचार दिसतोय!” अक्षय हसत म्हणाला.
“आधी ‘हो ‘ म्हणा!” रेखाने लाडिक स्वर कायम ठेवला.
“हो! देईन!!” अक्षयने अभावितपणे म्हटलं.
” 24 मे ला माझ्या मामेबहीणीचं लग्न आहे.. आपल्याला बोलावलंय.. आणि आपण जायचंय.. ” रेखाने संधीचा पुरेपूर फायदा घेत क्षणभर देखील वेळ न दवडता सांगून टाकलं.
“अगं, पण तुला माहित आहेत माझ्या लिमिटेशन्स!! आणि मला स्पेनला जायचंय.. 20 मे लाच!” अक्षयने धर्मसंकटातून आपली सुटका करण्यासाठी सांगून टाकलं अन् तो मनातल्या मनात 20 मे च्या स्पेन टूरचं प्लॅनिंग करू लागला.

“मग मी एकटी जाते! आई आणि ताई असतील माझ्या सोबत! नाहीतरी तुम्ही नाही आहात तर आधी मोठ्या ताईकडे जाईन.. मग आईकडे आणि तिथून मधल्या ताईकडे!! मग आम्ही मिळून मामाकडे जाऊ लग्नाला!!” रेखाने लग्नानंतर पहिल्यांदाच अक्षयला धीटपणे सांगितलं.
“कार आणि ड्रायव्हर घेऊन जा!” अक्षयने म्हटलं खरं.. पण रेखाचं मन केव्हाच आगगाडीच्या डब्यात जाऊन बसलं होतं. “लग्नाला रेखा जाणारे.. राजेंची सून नव्हे!” ती मनाशीच खुद्कन हसली.

लग्नात रेखा पोहोचली अन् सगळ्या नातलगांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. मृण्मयीने तर रेखाला मिठीच मारली. मामा अन् मामीच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती.. “आमचं भाग्य थोर.. म्हणून एवढ्या मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले!” मामा म्हणू लागले.
दोन दिवस रेखाने लग्नात खूप धमाल केली.. हातावरच्या मेंदीसोबतच आते-मामे भावंडांच्या गप्पा रंगल्या.. रात्री जागवल्या गेल्या.. लाडू चिवड्यावर ताव मारून झाला.. नवरीची मनसोक्त थट्टा करून झाली अन् लग्नाचा दिवस उजाडला.
लग्नाच्या दिवशी वातावरण जरासं भावूक झालं. रेखाला स्वतःचं लग्न आठवलं. सासरी कितीही सुख असलं तरी मुलीला माहेर आठवतंच!” रेखाच्या मनात आलं. मृण्मयीची पाठवणी झाली अन् रेखानेही निघण्याची तयारी केली.

“अण्णांची प्रकृती फार बरी नसते हल्ली! त्यात ‘हे’ देखील इथे नाहीत.. मला गेलं पाहिजे!!” राहण्याचा आग्रह करणाऱ्या मामीला रेखाने सांगितलं अन् ती बॅग उचलून निघू लागली.
“थांब गं, रेखा!‌ कुंकू लावून जा!” मामीने हाक दिली अन् रेखा थांबली.
मामी देवघरातून कुंकवाचा करंडा अन् हातात एक कॅरी बॅग घेऊन बाहेर आली. रेखाला कुंकू लावून तिनं रेखाच्या हातात ती पिशवी दिली.. “साडी आहे.. तुमच्या प्रकारची नाही.. साधीच आहे.. पण नक्की नेस हं! मामाकडचा.. तुझ्या आजोळचा आहेर आहे हा ! ” सद्गदित होऊन मामी म्हणाली.

“थांब हं! मी आलेच!” असं म्हणून रेखा धावतच आतल्या खोलीत गेली.. तिने पुडकं उघडलं. त्यात साधारण चारशे रुपये व्यावहारिक किंमत असलेली फुलाफुलांची साडी होती. तिने पटकन अंगावर असलेल्या पंजाबी ड्रेसवरच ती साडी गुंडाळली. “नेसले हं तुमच्याकडची साडी! आणि ही आहेराची साडी नेसूनच मी माझ्या घरी जाणारे!” रेखा मामामामीला वाकून नमस्कार करत म्हणाली अन् घाईघाईने बाहेर निघाली सुद्धा!!
परतीच्या प्रवासात तिने नेसलेल्या आहेराच्या साडीचं भवितव्य फक्त तिला ठाऊक होतं.
फक्त आजच्या दिवस ही साडी तिच्याजवळ असणार होती. उद्याच्या उद्या ही मामाकडची आहेेराची साडी तिला घरच्या कामवाली किंवा ड्रायव्हरच्या बायकोच्या अंगावर दिसणार होती.. अन् म्हणूनच आज ती साडी तिला मनापासून जगून घ्यायची होती.
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

Leave a Comment

error: Content is protected !!