© सौ. प्रतिभा परांजपे
राधिका तयार होऊन हाॅलमधे आली. बाबांनी हाॅल रंगीत फुगे आणि Happy Birthday च्या रंगीत झिरमिळ्यांनी सजवला होता.
“झालीस तयार? किती गोड दिसतिय ग माझी राधिका. थांब –कानामागे काळी तीट लावते. माझीच नजर लागेल म्हणत सीमाने बोटाने काजळाची तीट लावली.
“अजून आले नाही तुझे फ्रेंड्स?” बाबांनी विचारलं!
“आई तू तर तयार हो ना लवकर.”
“अग हो साडीच तर बदलायची आहे”!
“आई थांब , मी आणते तीच साडी नेस” म्हणून राधिका सीमाच्या खोलीत गेली.
खोलीमध्ये आई-बाबांचा फोटो लावलेला होता त्याकडे लक्ष जाताच तिने अलमारी उघडून फोटोवाला लाल शालू शोधायला सुरुवात केली. अलमारीत एक पेटी दिसली तिने पेटी उघडली त्यात लाल शालू अगदी खाली ठेवलेला दिसला.
साडी काढता काढता त्याच्या खालून एक फाईल बाहेर पडली! .
राधिकाने उचलून पाहिले त्यातून एक फोटो खाली पडला.
“अरे–हा तर माझा लहानपण चा फोटो आहे!” या फाईल मध्ये काय आहे ते पहाणार तेवढ्यात बाहेर मैत्रिणींचा आवाज आला तेव्हा पेटी बंद करून साडी सीमाला देत राधिका बाहेर आली.
“हॅपी बर्थडे टू डिअर राधिका, हॅपी बर्थडे” असे तीन वेळा गात सर्वांनी टाळ्या वाजवल्या व राधिकाने आपल्या सोळाव्या वाढदिवसाचा केक कापला.
राधिकाने अनारकली ड्रेस घातला होता त्यात ती खूपच गोड दिसत होती.
खास तिच्या आवडीचा पायनॅपल केक सीमाने बनवला होता. त्यावर आयसिंगने दोन गुलाबाची फुलं सजवली होती ..
केक कट होताच सीमाने आपल्या लाडक्या लेकीला भरवला,
समीरने हळूच आयसिंग चे एक बोट राधिकाच्या नाकावर लावले.
सर्वजण हसायला लागले तसं लटक्या रागाने “काय बाबा आता काय मी लहान आहे का? “असे म्हणत नाक पुसले.
“हो हो ! ठाऊक आहे ताई साहेब सोळा वर्षाच्या झाल्यात” असे म्हणत समीरने एक गिफ्ट पॅकेट राधिकाच्या हातात दिले. मित्र-मैत्रिणींनी पण तिला भेटवस्तू दिल्या.
हसून थँक्यू म्हणत तिने सर्वांना जेवणाला चला म्हणून आग्रह केला.
सीमाने खास राधिकाच्या आवडीचा मेनू ठेवला होता. गुलाब जाम, छोले कुलचे, वेज लॉलीपॉप ,पुलाव, दाल मखनी, पाइनएप्पल रायता, बटरस्कॉच आइसक्रीम.
हास्यविनोद गप्पांनी पार्टी खूप रंगली होती.
“काकू तुम्ही खूप छान गाणं म्हणता आम्हाला ऐकायच आहे” राधिकाची एक मैत्रिण म्हणाली.
“हो आई तेच म्हण ना जे लहानपणी तू मला झोपवताना म्हणायचीस”
“हो हो”, सर्वांनी खूप आग्रह केला तेव्हा सीमाने “मेरे घर आई एक नन्ही परी” हे राधिकाचे आवडते गाणे म्हटले.
पार्टी संपून सर्व मित्र-मैत्रिणी जाऊ लागले, त्यांना बाय करायला राधिका बाहेर गेटपर्यंत गेली.
“सीमा रात्री राधिकाची दृष्ट काढ बरं” असं म्हणत समीर आत निघून गेले.
राधिका आत आली तेव्हा सीमा साडी बदलून मागचे आवरत होती.
‘आई किती मस्त केल होत ग सर्व, माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना खूप खूप आवडल जेवण, सगळे म्हणत होते ‘तुझी आई खूपच सुगरण आहे’.
“आई खूप थकवा आला कां?”
तेवढ्यात समीर आत येत सीमाला म्हणाले, “जेवण जरा जास्तच झाले आहे शतपावली करायला चलते? पानं खाऊन येऊ.”
आईबाबा फिरायला गेले पाहून राधिकाने कपडे बदलून घडी केलेली सीमाची साडी पेटीत ठेवायला गेली तेव्हा फाईल दृष्टीस पडली.
सहजच फाईल मधले पेपर्स वाचता वाचता तिला धक्का बसला, ओठ थरथरु लागले, डोळ्यात पाणी येऊ लागले.
राधिकाने पूर्ण फाईल पाहिली.
आज तिचा वाढदिवस होता म्हणजे आजच्या दिवशी तिला आश्रमातून दत्तक घेतले होते.
फाईल मध्ये तिचा त्यावेळी घेतलेला फोटोही होता व आश्रमाचे नावंही होते.
पूर्ण वाचून फाईल परत जागेवर ठेवून राधिकाने धावत खोली गाठली.
माझी मम्मा, माझे बाबा माझे जन्मदाते नाहीत ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती.
अचानक पोरकं झाल्यासारखं मनाला वाटू लागले . ह्रदयात धडधडू लागले.
मग मी कोणाची मुलगी आहे? आई कोण आहे माझी? ती जिवंत आहे कि नाही?आणि तिने मला का सोडून दिले?
असे अनेक प्रश्नांचे काहूर माजले .खूप जोरा जोरात रडावेसे वाटू लागले.
पण घरात आवाज ऐकून आई बाबा धावत येतील त्यांना कळायला नको.
मन सैरभैर झाले,रात्र भर झोप लागली नाही. रात्र कशीबशी पार पडली.
सकाळी लवकर उठून गाडीची चावी घेऊन राधिका बाहेर निघाली.
बराच वेळ निर्रथक फिरत राहिली. नंतर गाडी टेकडीकडे वळवली.
टेकडी वरच्या देवळात राधा कृष्णाची सुंदरशी मूर्ती होती आणि आजूबाजूच्या प्रांगणात सुंदर असे कृष्णाच्या बाललीला, यशोदा कृष्ण यांचे पेंटिंग्ज लावलेले होते.
कितीतरी वेळ राधिका ते पहात उभी होती . डोळ्यातून पाणी झरझर वाहत वाहत होते .
अचानक मागून “क्या देख रही हो बेटी “आवाज आला .
मागे देवळातले पुजारी प्रसाद घेऊन उभे, “बेटी,तासभर झाला मी पहातोय तुला, काय दुःख आहे ज्या मुळे तू इथे देवा समोर अश्रु ढाळत आहे??
“पंडित जी कृष्णा ची खरी आई कोणती हो देवकी की यशोदा”? डोळे पुसत राधिका ने विचारले.
बेटी देवकीने कृष्णाला जन्म दिला खरा पण त्याचे सगळे लालन पालन तर यशोदेने केले ना म्हणून तर सारे जग कृष्णाला यशोदेचा नंदलाल म्हणतात .
मग देवकी? तिने कृष्णाला का त्यागले? राधिका ने विचारले.
बेटी, “आपल्या जिगरच्या तुकड्याचा जीव वाचवण्यासाठी केले,” स्वतः साठी नाही.
म्हणूनच कृष्णाला देवकीनंदन ही म्हणतात ना.
“बेटा कुंतीने पण आपल नवजात बालक पाण्यात सोडला पण ते स्वतः साठी, म्हणूनच कर्ण कुंतीपुत्र न म्हणता ‘राधेय’ म्हणवतो. देवकीने बाळाच्या कुशलतेसाठी त्याला आपल्या पासून दूर ठेवले होते. ही प्रेमाची खूण आहे. पण स्वतः च्या सुखा साठी त्याचा त्याग करणं हा स्वार्थ आहे.
तुला काय दुःख आहे ते मी नाही विचारत ,पण घरी तुझी वाट पाहणारे, तुझ्यावर प्रेम करणारे आईबाबा असतील पोरी त्यांना दुःखी करू नको.”
राधिका विचार करू लागली, हेच सत्य आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते. सत्य कळल्यावर मी दुःखी होईन तिच्यापासून दुरावेन, किंवा आपल्या खऱ्या आईचा शोध घेईन . माझे आई बाबां वरचे प्रेम कमी होईल ,असे तिला वाटत असावे.
आई मनाने फारच हळवी आहे. मला ना, जरा काही झाले किंवा मी जराशी उदास झाले, तरी किती कावरीबावरी होते.
मी लहान असताना शाळेतून यायला थोडा वेळ उशीर झाला तरी किती घाबरीघुबरी व्हायची .
मला जरा बरं नसल तर लगेच दृष्ट काढायची, झोपताना रोज गाणं म्हणून झोपवायची.
“बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई” ,हे आईचं पेटंट गाणं.
बाबा त्यामानाने किती स्ट्रॉंग आहे शांत ,कणखर.
या माझ्या आईने पण मला जन्म नसेल दिला, पण तिला माझी आस होती .आई-बाबांनी जर मला त्या क्षणी स्वीकारले नसते तर मी वाचलेही नसते. आईने मला कुशीत घेतले तोच माझा खरा जन्म हीच माझी आई, मग माझी जन्मदात्री कोण, कुठे आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात जराही उत्सुकता नाही व रागही नाही . कारण तिला मी नकोच होते . त्यामुळे तिच्याबाबतीत माझ्या मनात प्रेम जागृत व्हायचे नाही.
मी दुखावेल ह्या नुसत्या कल्पनेने जी आई एवढी घाबरते त्या माझ्या आईला मी दुखावणार नाही.
हे रहस्य मला समजले आहे हे तिला मी कळू देणार नाही. असा सगळा विचार करतां करतां मन शांत झाले.
राधिका घरी आली तेव्हा दारात बाबा उभे होते,
“काय बेटा एकटीच कुठे गेली होती? “
“बाबा– काल माझा वाढदिवस होता मी सोळा वर्षांची झाले, म्हणजे आता मी मोठी झाले नाही का? “
राधिकाचा मोठेपणाचा तो अविर्भाव पाहून समीर हसायला लागले.
“वा–वा म्हणे मोठी झाले, काल पर्यंत तर सगळ हातात द्यावे लागत होते”. सीमा ने म्हणताच, ‘आज पासून सर्व हाताने करणार वाटत बाबांनी हसत विचारल?’
“हं म्हणजे सर्व नाही पण जेवण झाल्यावर मागच आवरेन आणखीन—” बराच वेळ विचार करूनही राधिकाला काही सुचत नव्हते ते पाहून सीमा म्हणाली, “पुरे, अभ्यास नीट कर तेवढच पुरे, बर आज काॅलेज..”
“नो –आज मी आणि आई बाबा घरीच धमाल करु आई कालचा केक उरला आहे न? तो भरव ना.”
तू पण ना, म्हणून सीमा ने केकचा पीस उचलला तशी,”मला नाही मी तुला भरवते आज .माझी प्यारी मम्मा” म्हणून राधिका सीमाच्या कुशीत शिरली .
सीमाने तिला घट्ट धरले,
“आता आई लेकीच्या मध्ये आम्हाला काही जागा आहे कां? आम्हाला काही मिळणार आहे कि,-“–
“काय हो बाबा?” म्हणून उरलेला केकचा पीस राधिकाने समीरच्या तोंडात घातला आणि अचानक समजलेल्या रहस्याला मनाच्या तळाशी गाडून टाकले…कायमचे.
समाप्त
*********
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.